🚩🚩आमचा महाराष्ट्र ..!!🚩🚩

“मातीचा कण नी कण बोलतो
गाथा इथे पराक्रमाची
शिवाजी महाराज आणि
निडर शंभू राजांची

वाऱ्यासवे घुमते आजही
वाणी थोर महात्म्यांची
संत तुकाराम आणि
बोली ज्ञानोबा माऊलींची

अखंड तेवत राहते ज्योत
महापुरुषांच्या विचारांची
टिळक,शाहू,फुले आणि
कित्येक थोर व्यक्तींची

पानाफुलात बहरते इथे
संस्कृती मराठी माणसांची
सांगते मराठी बाणा आणि
ताकद या महाराष्ट्राची ..!!!”

✍️©योगेश खजानदार

राजं मुजरा..🙏

“शस्त्र, शास्त्र आणि शौर्य
यांचं एक रूप राजं माझे
हाती भवानी तलवार
ध्येय हिंदवी स्वराज्य
आणि वादळाशी झुंज
असे आहेत राजं माझे

थरथरला गनीम जिथं
झुकल्या कित्येक माना इथ
आई भवानीचा आशीर्वाद घेऊन
साकारले स्वप्न रयतेचे जिथं
असे आहेत राजं माझे

तळपत्या त्या सूर्या सम तेज
आकाश कवेत यावे असे हृदय
वाऱ्यासही हेवा अशी ती दौड
बरसत्या त्या सरींची तमा न ज्यांस
असे आहेत राजं माझे

प्रत्येक मावळ्यात एक विचार
गडकोट आजही करतो जयजयकार
ज्यांनी घडवला इतिहास
हृदयात आता एकच नाव
असे आहेत राजं माझे

गेली कित्येक वर्ष तरी आज
अखंड तेवत आहे एक ज्योत
हिंदवी स्वराज्य संस्थापक
राजा शिवछत्रपती ज्यांचे नाव
असे आहेत राजं माझे..!”

✍️©योगेश खजानदार