
नमस्कार मंडळी, मराठी कथाकविता.com या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. हा ब्लॉग खरंतर मी (म्हणजे योगेश खजानदार) लिहिलेल्या कविता ,कथा, चारोळ्या तसेच मराठी लेख यांचा संग्रह आहे. जो सर्व वाचनप्रेमी माझ्या मित्रांना वाचण्यास सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने लिहिलेला. यामध्ये पुन्हा काही वाचकांच्या आग्रहास्तव दिनविशेष, अध्यात्मिक गोष्टी, माहितीपर लेख सामील करण्यात आले आहेत. जे सर्व माझ्या वाचकांना उपयुक्त ठरतील.
या ब्लॉगची सुरुवात खरतर अगदी सहज झाली होती. वाचनाची आवड जोपासत असताना पुढे लिहिण्याची इच्छा होऊ लागली. म्हणून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चारोळ्या , सुचतील त्या कविता लिहीत गेलो , लघुकथा लेखन करू लागलो, पुढे वाचकांच्या प्रतिसादाने आज या साध्या ब्लॉगच रूपच बदलून गेलं. लिहिण्याची अजून प्रबळ इच्छा वाढत गेली आणि मराठी कथाकविता.com चा पसारा वाढत गेला.
साहित्य क्षेत्राचे आणि माझे तसे काही जवळचे नाते नव्हते की कोणी आजूबाजूला अशी व्यक्ती होती. पुण्यात शिक्षण घेत असताना सहज हातात आलेल्या कादंबरीने मला सर्वप्रथम वाचनाची गोडी निर्माण केली , पुढे अजून पुस्तक वाचायला लागलो. या वाचनाचं जणू व्यसनच मला जडल आणि मला मराठी साहित्याविषयी अजून गोडी, आवड निर्माण झाली. खासकरून मराठी साहित्य मी जास्त वाचत राहिलो. मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज लेखकांचे विचार , त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, यामुळे माझ्यात प्रचंड बदल होत गेले आणि स्वतः काहितरी लिहावं या प्रेरणेने मी लिहू लागलो.
प्राथमिक शिक्षण माझं तस बार्शी या शहरात झालं. पुढे उच्चशिक्षणासाठी पुण्यात आलो. डिग्री पूर्ण केल्या नंतर पूर्णवेळ लिखाणासाठी देऊ लागलो. सध्या विविध विषयांवर अभ्यास आणि लिखाण चालू आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याशी संवाद होत राहिलच. आपणही ब्लॉग वाचल्यानंतर मला आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
आपलाच