MARATHI LOVE POEM

अल्लड ते तुझे हसू मला,
नव्याने पुन्हा भेटले!!
कधी खूप बोलले माझ्यासवे,
कधी अबोल राहीले!!
बावरले ते क्षणभर जरा नी,
ओठांवरती जणू विरले!!
अल्लड ते हसू मला का,
पुन्हा तुझ्यात हरवून बसले!!

बोलले त्या नजरेस काही,
मनात ते साठवून ठेवले!!
येणाऱ्या शब्दासही उगाच,
आपलेसे करून घेतले!!
गंधाळलेल्या त्या फुलासही,
उगाच भांडत बसले!!
अल्लड ते हसू मला का,
पुन्हा नव्याने बहरताना दिसले!!

कधी त्या चांदणी सवे,
चंद्रास सतावताना भासले!!
सांजवेळी बुडणाऱ्या सूर्यास,
पाहणारे जणू मज वाटले!!
मंद ते उनाड वारे जणू,
वाटेवरती त्यास भेटले!!
गालातल्या खळीस पाहून का,
पुन्हा नव्याने प्रेमात पडले!!

अल्लड ते तुझे हसू मला का,
नव्याने पुन्हा भेटले!!

✍️©योगेश खजानदार

SHARE