कधी तरी..✍️

Photo by mododeolhar on Pexels.com

“थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं
कधी जुन्या अडगळीत
उगाच रमून जाणं

धुळीत पडलेल्या त्या फोटोला
अलगद पुसून घेणं
थोड तरी हवं त्या क्षणाना
पुन्हा मागे घेऊन जाणं

जीर्ण झालेल्या त्या पत्रात
पुसटस आपलं नाव शोधणं
थोड तरी त्या शब्दातले तेव्हा
भाव डोळ्यात या दिसणं

तुटलेल्या त्या खेळण्यात
बालपण आपलं पाहणं
थोड तरी हवं या वयाला
पुन्हा लहान होऊन जाण

पाहता पाहता आठवणींचे
कित्येक गाव फिरून येणं
थोड तरी हवं पण तेव्हा
उगाच रस्ता ते विसरण

कधी कळत, कधी नकळत
सारं काही मनातलं सांगणं
थोड तरी हवं या अडगळीत
उगाच स्वतःला शोधणं..!!

थोड तरी हवं या मनाला
उगाच हरवून जाणं ..!!”

✍️©योगेश खजानदार

2 comments

Leave a Reply