Skip to main content

आली दिवाळी..!!

image

चकली गोलच का करायची
म्हणून पोट्टे विचारत होते
दिवाळी जवळ आली आता म्हणून
घरात फराळ बनत होते

शंकरपाळी मध्ये शंकर कुठे आहे
पोट्टे उगाच शोधत होते
आणि ताटभर चिवडा खाऊन
किल्ला बनवत होते

चिंगी, मंगी सगळेच आता
घरात दंग झाले होते
दिवाळी जवळ आली म्हणून
आकाशकंदील बनवू लागले होते

कुठे आजीची लगबग सुरू नी
खमंग वास दरवळू लागले होते
दिवाळीची सुट्टी लागली म्हणून
अंगणात पोट्टे नाचत होते

राजे तयार झाले किल्ल्यावर यायला
मावळे पाहणी करु लागले होते
किल्ले पुरंदर नी रायगड ही आता
दिव्याने उजळून निघाले होते

कोणती रांगोळी काढायची म्हणून
चिंगी नी मंगी भांडत होते
दिवाळीच्या सुरवातीस घर नुसते
भरून गेले होते

आईने तुळशीवृंदावन रंगवून
त्याला नवीन केले होते
बाबांनी पोट्ट्यासाठी तेव्हा
फटाके आणून दिले होते

दिवाळीचा सण हा आला
घर साऱ्या आनंदाने उजळत होते
दिवांच्या प्रकाशात ही न्हावून जाण्यास
हे आकाशही तयार होत होते!!!
-योगेश खजानदार

image
image

Yogesh khajandar

लेखक

6 thoughts to “आली दिवाळी..!!”

Leave a Reply