Skip to main content

बाबा

“रात्री आकाशात पहाताना
चांदण्याकडे बोट करणारा
माझ्या लुकलुकत्या डोळ्यात
स्वप्न पहाणारा आणि
त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा
बाबा तुच होतास

कधी मला रागवलास तरी
मायेनं जवळ करणारा
जगाची दुख सहन करून
आपली आसवे लपवताना
मला आनंदी ठेवणारा ही
बाबा तुच होतास

माझा हट्ट पुरवताना
स्वतः काटकसर करणारा
माझ्या छोट्याश्या जगाला
आनंदाने भरणारा
स्वतःच्या कष्टाने उभा करणारा ही
बाबा तुच होतास

माझ्या लटपणार्‍या पायांना
सावरून घेणारा
आणि उडणाऱ्या पक्षाकडे
बोट दाखवताना
पखांना बळ देणारा ही
बाबा तुच होतास

मी हरलो तरी
मला पुन्हा उठवणारा
आणि मी जिंकलो तरी
एका कोपर्‍यात उभारुन
आनंदाने पहाणारा ही
बाबा तुच होतास!!”

– योगेश खजानदार

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply