नव्या नवरीचे उखाणे

१. संसार रुपी वेलीला, झाली आता सुरुवात !!
… रावांचे नाव घेते, सुखाच्या या क्षणात !!

२. नव्या वाटेवरती चालताना, हात देते हाती
….. रावांच्या सोबतीने, संसार होईल सुखी !!

३. सात पाऊले, सात फेरे , साता जन्माची साथ जणू !!
….. रावांच्या सोबत असेन, झाडा सोबत सावली जणू !!

४. साक्ष त्या देवाब्रांह्मणांची, साक्ष आहे त्या अग्नीची !!
…. रावांच्या साथीने , साक्षी होईन सुखी संसाराची !!

५. माप ओलांडून येताच, मिळाली कित्येक नवी नाती !!
… रावांच्या सोबत, बहरून येतील ही नातीगोती !!!

६. आईची माया, बाबांचे विचार , एवढीच शिदोरी आणली सोबत !!
येईल उन्ह नी वारा ,पाऊस नी वादळ, नेहमीच राहील … रावा सोबत !!

७. साथ असेल , हाती हात असेल , एवढा विश्वास आहे सोबत !!
….. रावांच्या जीवनात येताना , साऱ्यांचा आशीर्वाद घेईन सोबत !!

८. अक्षता पडल्या डोक्यावर, साक्ष आहे त्या अग्नीची !!
….. रावांच्या सोबत आता, सुरुवात झाली संसाराची!!!

९. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना , आशीर्वाद द्यावा सर्वांनी!!
…. रावांच्या सोबत असेल, लिहून घ्यावं त्या क्षणानी !!

१०. मुहूर्त मिळाला, अक्षता पडल्या, साथ त्या वचनांची !!
…… रावांचे आयुष्यात येणे, चाहूल नव्या स्वप्नांची !!

११. संसार करेन सुखाचा , सांगते या मंगल क्षणी !!
…. रावांचे नाव घेते , थोरामोठ्याना नमस्कार करुनी !!

१२. नमस्कार करते देवाला, पहिलं पाऊल टाकताना !!
सोबत देईन आयुष्यभर, … रावांच्या स्वप्नांना !!!

१३. सुखाच्या या क्षणांचे, सारे चित्र मनी या रंगले !!
… रावांच्या सोबतीने, मला पूर्णत्व आज मिळाले !!

१४. उंबर्यावरच्या मापाला ,अलगद ओलांडून यावे !!
… रावांच्या सोबतीने, स्वप्नातील घर सजवावे !!!

१५. हळव्या क्षणांची माळ विणली, नव्या आयुष्याची सुरुवात झाली!!
…. रावांच्या सोबत आता, माझ्या स्वप्नांची पहाट झाली !!

१६. साथ हवी होती, साता जन्माची, हात हाती घेऊन !!
… रावांच्या रुपाने भेटले, टाकते पहिले पाऊल !!

१७. विखुरणाऱ्या क्षणांना, आनंदाने कवेत आज घ्यावे !!
…. रावांच्या सोबतीने, आयुष्य मनभर जगावे !!!

१८. सात जन्म ,सात वचन , जणू इंद्रधनुचे रंग भरावे !!
… रावांच्या सोबतीत आता, प्रत्येक रंगात रंगून जावे !!

१९. मंगळसूत्र जणू गाठ कायमची, कपाळी कुंकू, निशाणी सौभाग्याची !!
… रावा सोबत, साथ आयुष्याची , हीच आहे, सुरुवात संसाराची !!

२०. आशीर्वाद असावा सर्वांचा , पहिले पाऊल टाकताना !!!
….. रावांचे नाव घेते , माप ओलांडून येताना !!

२१. बंध रेशमाचे, बंध आयुष्यभराचे, बंध जुळले साता जन्माचे!!
…. रावांच्या सोबतीने आता, बहरून येतील क्षण हे जगण्याचे !!

२२. उमलून आल्या फुलाचा, गंध पसरला चारी दिशा !!
…. रावाच्या येण्याने जणू, मला मिळाली नवी उषा !!

२३. वाजले सनई चौघडे, मुहूर्त तो लग्नाचा !!
… रावांच्या सोबत आता, प्रवास हा साताजन्माचा !!!

२४. सारे सुख या जणू, ओंजळीत येवून राहावे !!
…. रावांच्या सोबतीने, वाटे जग हे आता पहावे !!

२५. मंत्रोच्चारात सारे, विधी आज पार पडले !!
… रावांच्या सोबत, नवे आयुष्य सुरु झाले!!

२६. सहज सुचेलं ते , नाव आता मी घेते !!
…. रावांच्या सोबत, नाव माझं मी जोडते !!

२७. धागा धागा सुखाचा, विणते मी आता!!
… रावांच्या सोबतीने , स्वप्न पाहते मी आता !!

२८. सात पावलांची सप्तपदी, आयुष्यभराची साथ !!
… रावांच नाव घेते , आता येऊ का मी घरात ??

२९. नव्याने बहरावी ती पालवी, बहरून यावी नाती तशी!!
….. रावांच्या सोबत आता, मिळावी मला नवी ओळख जशी !!

३०. नाव घ्यावे म्हणून , आठवते मी उखाणा!!
… रावांचे नाव घ्यायला, कशाला हवा बहाणा !!

३१. हळूवार क्षणांनी , सोबत मला दिली!!
… रावांच्या सोबत , सारी स्वप्न मी लिहिली !!

३२. कुलदैवताला पाया पडून , मागते एक मागणे !!
.. .. रावांची सोबत हवी, एवढेच एक सांगणे !!

३३.हवी होती साथ, हवा होता हातात हात!!
… रावांच्या सोबत आता, बांधली कायमची गाठ!!

३४. शब्दांच्या पलीकडे जाऊन, नात हे लिहावं !!
… रावांच्या सोबत आता, सार आयुष्य हे बहरावं!!

३५. नात्यास या नाव आज द्यावे, बहरून येण्या मुक्त हे करावे !!
हृदयातल्या एका कोपऱ्यात, … रावांचे नाव आज कोरावे!!

३६. क्षणही थांबला क्षणभर आता, नाव आज घेते!!
… रावांचे नाव आता , माझ्या नावाशी जोडते !!

३७. बहरलेल्या फुलांचा, गंध पसरला चोहीकडे!!
… रावांच सोबत आता, पाहते मी स्वप्नांकडे!!

३८. नाव घे, नाव घे , सगळ्यांनी केला आग्रह !!
… रावांचे नाव घेताना, लिहावा वाटतो कविता संग्रह !!

३९. हरवून जावे या क्षणात, क्षण हे आनंदाचे !!
… रावांच्या सोबतीने, सोने झाले आयुष्याचे !!

४०. आयुष्य सोबत जगण्यासाठी, धरला मी हात !!
… रावांचे नाव घेते, पहिले पाऊल पडले घरात !!

४१. अक्षता वाटल्या सर्वांना, मंगलाष्टक म्हटले ब्राह्मणांनी!
… रावांच्या सोबत आता, नाते जोडले देवांनी !!

४२. बहरून आल्या वेलीचा , सुगंध दरवळला चारी दिशा !!
… रावांचे नाव घेते,ही नव्या आयुष्याची नवी उषा !!

४३. सप्तपदी , सात पावले ,आयुष्य सारे फुलून जावे!!
…. रावांची सोबत असता, सारे क्षण जगून घ्यावे !!

४४. सोबत करण्या माझी, हाती हात माझ्या द्यावा!!
…. रावांच्या आयुष्यात, प्रत्येक क्षण मी पहावा!!

४५. खुदकन हसली मेहंदी, आज जरा जास्तच रंगली !!
… रावांचे नाव घेताच, हळूच ती लाजली !!

४६. वळणावरती त्या, अचानक भेट आमची झाली !!
…. रावांच्या सोबत, आयुष्याची पहाट आज झाली !!

४७. एक एक पाऊले पुढे चालताना, सोबत आहे यांची !!
… रावांचे नाव घेते, वाट एक ती जीवनाची !!

४८.अक्षता पडल्या जेव्हा, माझी ना मी राहिले!!
… रावांच्या आयुष्यात , स्वतः स मी जोडले !!

४९. इतकं सुंदर व्हावं सार, मन प्रसन्न होऊन जावं !!
… रावांच्या सोबत, मन माझे फुलून जावं !!

५०. साऱ्या स्वप्नाची, आज खोलावी दारे !!
… रावांचे नाव घेते , सुखाने भरून जा रे !!

✍️© योगेश

©कथा कविता आणि बरंच काही!!” या ब्लॉगवर लिहिलेले सर्व उखाणे यांचे हक्क लेखकांकडे आहेत , तरी कोणत्याही website वर अथवा पुस्तकात ते सामाविष्ट करण्या पूर्वी लेखकांची परवानगी असने आवश्यक आहे©