हो मला बदलायचं आहे ..!! || MARATHI LEKH ||

आयुष्य जगताना खरंतर खूप काही गोष्टी आपल्याकडून अनवधानाने होऊन जातात. मग त्या गोष्टीचा पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. आपण कधी कधी असे वागून जातो की आपणच आपल्याला विचारतो की हा मीच आहे का ?? कारण आपल्या मध्ये आपल्यालाच माहीत नसलेला एक छुपा चेहरा नेहमी दडलेला असतो जो आपल्याला आपल्या ढासळलेल्या मनाच्या अचानक एका कोपऱ्यात मिळतो.

कधी आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकत नाही, तर कधी अचानक गरजेपेक्षा जास्त प्रतिक्रिया देतो , कधी अचानक खूप रागावतो तर कधी जे करायचं नसतं ते करून जातो , याला म्हणायचं आपल्यातला एक लपलेला चेहरा, सहसा हा आपल्यालाही अज्ञात असतो पण खूप काही जे करायचं नसतं ते करून जातो , अशा परिस्थितीत काय करावं खरंतर कोणालाच काही सुचत नाही आणि मग कधी कधी स्वतःलाच केलेल्याला गोष्टीचं वाईट वाटायला लागतं.

त्यामुळे मिञांनो काही गोष्टीवर खरंचं नियंत्रण असणं खूप गरजेचं असतं त्यामुळें पुढे नको त्या परिस्थतीतही आपण चुकीचं वागत नाही. याची खरतर हळू हळू सवय लावायला हवी. अचानक तुम्हीं हे करू शकाल अस होत नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ना…

१.रागावर नियंत्रण ठेवणे.

कधी कधी आपण इतकं रागावतो की आपण काय बोलत आहोत याचं भानच आपल्याला नसतं. रागाच्या भरात कित्येक गोष्टी अशा घडून जातात की ज्या घडायला नको असतात. एका क्षणाचा राग आयुष्यही उध्दवस्त करून टाकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण खरचं करण्याचा प्रयत्न करायला हवा. कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रथम स्वतःला समजून सांगायला हवं की खरंच ते तस आहे का ?? याचाही विचार करावा. खूप काही गोष्टी या रागात उध्वस्त होतात हे मात्र नक्की. आणि नात्यात तर याचा खूप विचार करायला हवा. क्षणाचा राग कदाचित सारं नात उध्वस्त करत. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला अशी परिस्थिती निर्माण होईल तिथे नक्कीच रागावर नियंत्रण मिळवायला हवं. हळू हळू आपण अशा परिस्थितीत विचाराने वागायला सुरुवात करतो , कधी कधी चिडून बोलून परिस्थिती बिघडवतो. त्यामुळे नक्की प्रयत्न करायला हवा.

२.चालढकल टाळणे.

प्रत्येक माणसात थोडी का होईना पण ही सवय नक्की असते. आजच्या गोष्टी उद्यावर टाकणे किंवा आजच्या परिस्थितीला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणे. या गोष्टीमुळे सोप्या गोष्टीही अवघड होऊन जातात. कोणत्याही बाबतीत आपण चालढकल करणे या
एका कारणामुळे नियंत्रणात असलेली परिस्थितीही आपल्या हातातून निघून जाते. खरतर आपण ज्या गोष्टीची चालढकल करतो त्या टाळल्या जाऊ शकतचं नाहीत. आज नाही तर उद्या त्या कराव्या लागतातच. वेळ तेवढी बदलते बाकी परिस्थिती तशीच राहते. त्यामुळे चालढकल करणे ही पळवाट होऊच शकत नाही. त्याला फक्त परिस्थितीला सामोर न जाणे एवढंच म्हणायचं. त्यामुळे चालढकल टाळावी हे मात्र नक्की.

३. आळसाला शत्रू बनवणे.

“आळस हा माणसाचा शत्रू असतो !!” त्यामुळे शत्रूला शत्रू सारखंचं वागवयाला हवं . आळस करणे या गोष्टी आपल्याला खूप चांगल्या गोष्टींपासून दूर घेऊन जातात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कित्येक गोष्टी करण्यात आपण आळस करतो. कित्येक लोक तर उठल्यापासून आळस करतात ज्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होतो. आळस ही सवय असते पण स्वभाव होण्या अगोदर त्याला दूर करणं खूप चांगलं असतं. आळस झटकून काम कारण आणि त्याच जोमाने कामाला सुरुवात करणं यापेक्षा दुसरा आनंद कुठेच मिळणार नाही. तुम्हाला आवडत्या गोष्टी तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीचा आळस किंवा कंटाळा करून कसे चालेल. नाही का .!! त्यामुळे आळस हा शत्रूच आहे हे लक्षात ठेवा.

४.वाईट गोष्टींपासून दूर राहणे.

वाईट गोष्टी दिसायला नेहमीच छान असतात. सुरुवातीला त्या करताना ही खूप छान वाटत. पण त्याचा परिणाम शेवटी आपल्याला वाईटच असतो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून दूर राहणे कधीही उत्तमच. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या त्रासापासून आपण लांब राहतो. वाईट गोष्टीचा नाद म्हणा किंवा सवय म्हणा लागायला वेळ लागत नाही. पण त्याचा परिणाम कधी कधी आपलं आयुष्यही उध्दवस्त करून टाकत. आणि हे वेळीच कळायला हवं.

५. खर्चावर नियंत्रण ठेवणे.

आपण किती कमावतो या गोष्टीपेक्षा आपण जे कमावतो त्याचा उपयोग आपण कसा करतो याला जास्त महत्त्व असतं. कारण आपल्या येणाऱ्या काळात त्याचा योग्य उपयोग आपल्याला झाला पाहिजे. पैसा हा योग्य मार्गासाठी उपयोगी आला तर त्याचे कित्येक चांगले फायदे आपल्याला भेटतात. अवास्तव खर्च हा आपल्या कित्येक मोठ्या कमाई वर सुधा भारी पडू शकतो. त्यामुळे योग्य खर्च करणे हे कधीही उत्तमच.

६.नियमांवर ठाम राहणे.

आयुष्यात आपण कित्येक निर्णय घेतो, पण त्या निर्णयावर आपण कसे ठाम राहतो याला जास्त महत्त्व असतं. पण आपण घेत असलेले निर्णय हे आपल्यासाठी आणि सर्वांसाठीही तितकेच महत्वाचे आणि उपयोगी असावे. एखादा निर्णय घेतल्यावर सुरुवातीला आपल्याला त्रास होईल पण त्याचा परिणाम चांगला होणार असेल तर न डगमगता त्या निर्णयावर ठाम राहणं खूप गरजेचं असतं. कधी कधी आपल्या एका निर्णयावर आपल्या घराचं भविष्य ठरत. अशावेळी योग्य निर्णयावर ठाम राहणं हेच उपयोगच असतं. आपण प्रत्येक वेळी निर्णय सोयीनुसार बदलत गेलो तर अशाने आपल्या निर्णय क्षमतेवर ही प्रश्न केले जातात त्यामुळे घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं गरजेचं असतं.

७. खचून जाऊ नये.

माणसाच्या आयुष्यात खूप काही चांगल्या आणि वाईट गोष्टी येतात. कधी कधी वाईट परिस्थिती माणसाला संपूर्ण बदलवून टाकते. अशा वाईट परिस्थितीमध्ये माणसाने खचून जाऊ नये. त्यामुळे कदाचित आलेली परिस्थिती अजुन वाईट होते. प्रत्येक वेळी नव्याने उभा राहील पाहिजे. आलेल्या गोष्टीशी लढल पाहिजे . प्रत्येक वेळी स्वतः लां विचारलं पाहिजे की, आपण यापेक्षा चांगलं करू शकतो नक्कीचं करू शकतो. वेळ बदलत राहते त्यासमोर हतबल होऊन कस चालेल . नाही का…!! त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला शरण नाही जायचं.

८.वेळेचा सदुपयोग करणे.

आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी माणसाने वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे असते. प्रत्येक क्षण हा खूप मोलाचा असतो कारण तो पुन्हा आयुष्यात कधीच येत नाही. त्यामुळे आहे त्या वेळेचा उपयोग कसा करावा हे मनाशी पक्के असणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही नक्कीच तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगा पण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची विसरू नका. प्रवासात रस्तावर चोहोबाजूंनी दिसणारे सुंदर निसर्ग आपल्याला मोहित नक्कीचं करतात पण आपण तिथेच थांबत नाही पुढची वाटचाल सुरू असतेच ना !! तसचं वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी करायलाच हव्या.

९. पुनरावृत्ती टाळणे.

आपण पुन्हा पुन्हा तीच चूक करणार असतोल तर येणारा परिणाम नक्कीचं बदलणार नाही. आपल्या आयुष्यात आपण पूर्वी काही चुका केल्या असतील तर पुन्हा तेच करणे याला मूर्खपणा म्हणातात. मग ती कोणत्याही बाबतीत असो. अशी पुनरावृत्ती टाळणं खरंच खूप गरजेचं असतं. एखाद्या नात्यात आपण विश्वासघात सहन केला असेल आणि अशा व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवत असतोल तर हे मूर्खपणाच असतं. कदाचित बदल झाला असेल पण ते नीटस सांगता येणं खूप अवघड असतं. एखादा निर्णय , एखादी सवय , एखादी घटना ज्यामुळे फक्त नुकसानच झाल होत अशा गोष्टी खरंच टाळणं उत्तमच.

१०. भिती हे अपयशाचा मुख्य कारण आहे.

कोणत्याही गोष्टीची भिती वाटणे हे आपण करत असलेल्या कामाचं निम्मं अपयश असत. आपण कोणाची भिती बाळगतो याचा विचार करणं फार गरजेचं असतं. समोर असलेल्या कित्येक गोष्टी या त्यामुळेच आपण करत नाहीत. भिती हाही माणसाचा तितकाच मोठा शत्रू आहे जितका आळस. परीक्षा असताना पेपर ची भिती आपल्या कित्येक चांगल्या गोष्टीही आपल्यापासून दूर घेऊन जाते.त्यामुळे जिथे आपण उतम गुणांनी उत्तीर्ण होणार असतो तिथे ही भिती आपल्याला मागे खेचण्याच काम करते. त्यामुळे कोणतंही काम निर्धास्त करायला हवं. त्यामुळे आपण स्वतःला संपुर्ण झोकुन देऊन ते काम करतो. बघा नक्की विचार करा.

तर हे आहेत आपल्यात लपून बसलेल्या त्या अनोळखी चेहऱ्याचे कित्येक रूप जे नियंत्रणात आणणे खूप गरजेचं असतं आणि या १० सूत्रांचा वापर जर नक्की केला तर आपण नक्की हे करू शकु आणि त्यामुळे कित्येक गोष्टी सहज सोप्या होतील यात काहीच वाद नाही. चांगल्या लोकांची संगत , वेळेचा सदुपयोग, खचून न जाता पुन्हा नव्याने कामाला लागणे , भिती आणि आळस यांना शत्रू करणे. यामुळे नक्कीचं आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत होईल हे नक्की..!!!

✍️©योगेश खजानदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *