खुप दिवस असेच निघून गेले पण मी काही लिहिलंच नाही. शब्दांच्या दुनियेत मी आलोच नाही. शब्दांच मला बोलणं चालूच होत, पण मी त्यांना कागदावर लिहिलंच नाही. क्षणभर राहिले मनात आणि निघून गेले !! काही शब्द रुसून गेले. आपल्या हृदयाच्या आणि विचारांच्या मध्ये उगाच कुठे हरवून गेले. ते शब्द असेच मनात राहून गेले. पण मग कुठेतरी एकटेपणाची जाणीव मला होऊ लागली, या शब्दांची सोबत किती गरजेची आहे ही गोष्ट मला त्यावेळी कळाली. त्या अलगद मनातून कागदावर येणाऱ्या कविता कुठेतरी मला पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आणि पुन्हा लिहावं असं वाटू लागलं. पण ते सगळं भावनिक होत, सगळं काही त्या शब्दांशी असलेल्या प्रेमासाठी होत, असच कुठेतरी वाटू लागलं. मग त्यात अजून काहीतरी राहतेय ही भावना मला का येत असावी हेच मला कळत नव्हतं. पण शब्दांशी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार हे ही कळून चुकलं होत. पण मग ती कोणती सल होती मनात, की मला माझ्या शब्दापासून दूर करत होती. तेव्हा मी खूप शोधलं आणि कुठेतरी अनोळखी चेहरे माझ्या डोळ्यासमोरून गेले. कदाचित आजचे अनोळखी पण पूर्वीचे ओळखीचे !! मनाच मनाशी भांडण सुरू झालं. त्या शब्दाचा काय दोष ज्यांनी तुला कायमच साथ दिली. जे आजही तुझ्या एका हाकेवर आत्ता तुझ्यासाठी धावून आले. कशासाठी ?? तुझ्या मनातलं सार काही व्यक्त करण्यासाठी ?? हो ना ?? मग का राहावं त्या शब्दांपासून दूर?? कोणा अनोळखी लोकांमुळे ?? शब्द आजही सोबत आहेत , फक्त त्यातली ती व्यक्ती हरवून गेली, खरंच !! कुठे हरवून गेली आणि कुठे बदलून गेली. पण मग शब्दांनीच प्रतिप्रश्न केला, आमची ओळख ती फक्त अनोळखी चेहऱ्यातच आहे ?? तू म्हणून आमची काहीच ओळख नाही ?? सांग ना !! मी त्या क्षणी निरुत्तर झालो.
ठरवून असं काहीच होत नाही. आणि नशीबा पुढे काहीच मिळत नाही. म्हणून तेव्हाच ठरवलं आता स्वतःसाठी लिहायचं. शब्दांच्या दुनियेत आपण आता स्वतः ला पहायचं. आणि नव्याने पुन्हा सुरुवात करायची. शब्दांना पुन्हा नव्याने बोलायला लावायच. इतकं की शब्दही पुन्हा नव्याने मला मनसोक्त बोलतील. कसं असतं ना !! आपण शेवटी कितीही चेहरे पाहिले तरी आपल्याला आपल्या चेहऱ्याची ओढ ती काही वेगळीच वाटते. तसच काहीस माझं आता झालंय. नेहमी शब्दांच्या दुनियेत अनोळखी चेहरे मी खूप व्यक्त केले आणि एक चेहरा तो नेहमीच राहून गेला, आणि तो म्हणजे स्वतःचा !! पण अलगद या चेहऱ्याला आता मला रंगवायचं आहे. कित्येक भाव मला माझ्या शब्दात मांडायचे आहेत. कित्येक कविता लिहायच्या आहेत ज्यांना शब्दात मला गुंफायच आहे. ना कोणा वाचकाची वाट पाहणे ना कोणा अनोळखी चेहऱ्याची ओढ ! ओढ ती फक्त स्वतःची स्वतःसाठी !!
आजपर्यंत नात्यांना मी माझ्या शब्दात लिहिलं. रागाला त्या भावनेत व्यक्त केलं, त्या प्रेमाला मी कवितेत मांडलं. पण हे सगळं झालं ते अनोळखी चेहऱसाठी त्यात मी कुठे होतो ?? मलाच माहीत नाही. पण मग आता मी शोधू तरी कुठे स्वतः ला!! आजही प्रश्न पडतो आणि उत्तरही मिळत. अंतर्मनात!! त्या खोल मनात मी मलाच कुठेतरी दडचून ठेवलंय. ज्याला वर यायचं आहे. मुक्त फिरायच आहे. त्याला शब्दात व्यक्त व्हायचं आहे. त्याला स्वतःचा चेहरा पाहायचा आहे. मला पुन्हा लिहायचं आहे !! हो मला पुन्हा लिहायचं आहे !! स्वतःसाठी !!!
✍️ योगेश