शेतात ज्वारीची कणस डौलात डोलायला लागली की सर्वांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे, ज्वारीचा दाणा कोवळा हिरवा असला की सुरुवात होते ती हुरड्याची. साधारणतः पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा या भागात हुरडा पार्टीचे प्रमाण खूप पाहायला मिळते. यावेळी लोक दिवस दिवस रानात फिरून कोवळी ज्वारीची कणस खास हूर्ड्यासाठी निवडतात तर काही लोक खास आवर्जून हुर्ड्यासाठी ज्वारीच्या पिकाची पेरणी देखील करतात. साधारणतः मकर संक्रांती झाली की हुरडा पार्टीला सूरूवात होते त्यानंतर पुढचे महिना दिड महिना हूर्ड्यासाठी योग्य असतात, त्यानंतर कणसे पिवळी पडायला लागतात.
शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक लोकांची छोटीशी ट्रीप सुद्धा होते. अशावेळी एखाद्या झाडाखाली ही हुरडा पार्टी करण्याची मजाच वेगळी असते. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जमिनीत एक आपटी केली जाते ज्याला सरळ भाषेत एक छोटासा खड्डा म्हणतात. तर ही आपटी केल्यानंतर त्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या पेटवून विस्तव तयार केला जातो. आग पूर्ण शांत झाल्यावर जो विस्तव पेटता राहतो त्यामध्ये ही कवळी ज्वारीची कणसे भाजली जातात. ती योग्य प्रकारे भाजली जावी याची काळजी घ्यावी लागते. भाजलेली कणसे हातावर चोळून त्यातील भाजलेली ज्वारीचे कोवळे दाणे म्हणजे आपला हुरडा.

गरम गरम हा हुरडा आपल्या समोर आल्यानंतर त्याला खाण्याचा मोह आवरणार नाही हे नक्की. म्हणून त्यासोबत चवीने खायला गूळ, खारमुरे, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, लसणाची चटणी, शेव , फरसाण असे विविध प्रकार घेतले जातात. त्यामुळे चवीने खावा असा हुरडा खरंच खूप मस्त लागतो. ती धगधगणारी आपटी, ते सोबत खायच्या पदार्थांचे सुवास काही वेगळीच मजा आणतात. पुन्हा रानात फिरून खाल्लेला ऊस, ढाळा म्हणजे वेगळेच सुख असतं.
अशावेळी कित्येक हुरडा प्रेमी लोकांचा दिवस फक्त हुरडा खाण्यातच जातो. यासोबतच रानात जेवण्याची मजा काही वेगळीच असते कित्येक ठिकाणी अशा जेवणाचे बेतही होतात. रानातल्या चुलीवर केलेली भाकरी आणि भाजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. अशावेळी माणूस नेहमी पेक्षा जास्त जेवणार हे नक्की असतं. कारण रानातल्या वाऱ्याचा परिणाम तोच असतो. आभाळ म्हणजे छत , काळी माती खाली आणि समोर ठेवलेले ते सुंदर भाजी भाकरीचे ताट म्हणजे स्वर्ग म्हणावा अस काही.

तसेच यामध्ये आपण ज्वारीचे पीक कोणत्या प्रकारे घेतो त्यावरूनही हुरड्याची चव बदलत जाते. जसे की गुळभेंडी, मालदांडी, लालबोंडी, पिवळी असे ज्वारीचे प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये गुळभेंडी चवीने छान लागते. तसे बाकीचेही प्रकार खायला सुंदर लागतात पण चवीत फरक जाणवतो. हुरडा एक दीड किंवा दोन दोन महिने देखील खायला योग्य असतात. पण एकदा कणसे पिवळी पडू लागली की मग त्याचा हुरडा होत नाही. ते पूर्ण पिकलेले ज्वारीचे पीक होते.
अशा या हुरडा पार्टी निमित्ताने दर वर्षी रानात जाऊन जेवणाचे बेत नक्की ठरतात. त्यानिमित्त कित्येक मित्रांना पुन्हा भेटण्याचे कारण मिळते, घरच्यांसोबत मज्जा मस्ती करता येते, सर्वांसोबत गप्पा टप्पा करत आणि हातातला तो हुरडा चवीने खात रहावा एवढेच वाटत राहते.



