दरवर्षी स्वातंत्र्य दिन येतो आणि जातो. आपण विविध प्रकारे तो साजराही करतो, आणि तो केलाच पाहिजे. व्हॉट्सअँप , फेसबुक किंवा अनेक ठिकाणी राष्ट्रभक्तीपर स्टेटस ठेवून आपण आपल्या मनातली भावना व्यक्त करतो, आणि असे पाहता पाहता दरवर्षी हा स्वातंत्र्य दिवस येतो आणि जातो. या सर्वांमध्ये आपण विसरून जातो ती एक गोष्ट, ज्याचा कोणीही कधी विचार करत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे राष्ट्राप्रती चिंतन आणि मनन. आता तुम्ही म्हणाल चिंतन मनन म्हणजे तरी काय ?? तर आपल्या देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून आपणच घेतलेला एक छोटासा आढावा. आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झालेली संस्थान भारतात विलीन झाली, आणि घडला तो आजचा भारत. त्यानंतर कालचा तो भारत आज कुठे आहे? याबद्दल केलेले आपलेच विचार आपल्याला या देशाप्रती अजुन सखोल विचार करायला लावणारी आहेत.
तुम्ही म्हणाल हे काम तर सरकारचं आहे, पण ही भावनाच मुळात चुकीची आहे, कारण देशाप्रती विचार, चिंतन मनन करण्याची गरज त्या प्रत्येक नागरिकाला आहे जो या देशाचा सुज्ञ नागरिक आहे. कोणत्याही देशाचा इतिहास हा त्या देशातील नागरिक लिहितात, तसेच भविष्यही हेच नागरिक घडवतात. अशावेळी आपण आपल्या देशाप्रती काय विचार करतो हे तितकंच महत्त्वाचं होत. फक्त व्हॉट्सअँप आणि फेसबुक वर आपली देशभक्ती व्यक्त करून आपली जबाबदारी संपत नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की तसे करू नये उलट उत्साहाने स्टेटस ठेवावे , फेसबुक वर राष्ट्रभक्तीपर विचार शेअर करावे पण त्यासोबत या गोष्टीचा विचारही व्हावा ही माफक अपेक्षा. उलट आजच्या टेक्नॉलॉजीने प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक साधन दिले आहे आणि त्याचा वापर नक्कीच करावा, असो. आज २०२० या वर्षी भारतासमोर नेमकी कोणती आव्हान आहेत याचा सामान्य नागरिक म्हणून मी आज विचार करणे आवश्यक आहे. कारण आपले एक छोटेसे पाऊल देशासाठी खूप महत्त्वाच आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर आपण आज जिथे उभा आहोत त्याचा विचार करता प्रत्येक भारतीयाने आपली पावले कशा प्रकारे उभारावी याचा विचार करावा. आज २०२० ची आव्हाने पाहिली तर, चीन आपल्या सोबत आक्रमक भूमिका घेत आहे. त्याची विस्तारवादी नीती ही नेहमीच भारताला घातक ठरत आलेली आहे. अक्साई चीनवर त्याने यापूर्वीच अतिक्रण केले आहे. पण भारत आणि चीन मध्यें प्रचंड मोठा व्यापार चालतो. भारत आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तू आणि technology यांवर अवलंबून होता. पण जर समोरच्याची बाजू आपणास नेहमी घातकच ठरणारी असेल तर त्याला योग्य पद्धतीने उत्तरही द्यावे लागते. भारतीय सैन्य आपल्या बाजूने त्यांना नेहमीच सडेतोड उत्तर देत आलेले आहे. पण एक नागरिक म्हणून या चिनी मालावर बहिष्कार करून आपण सुज्ञ नागरिक आपल्या बाजूने त्यांना उत्तर देऊ शकतो. जर मनात खोट असेल तर नात कधीच टिकत नाही आणि अशीच काहीशी स्थिती भारत चीन संबंधावर आहे. कारण विस्तारवादी नीती आणि नेहमीच व्यापारी दृष्ट्या देशांवर आर्थिक पकड निर्माण करून समोरील देशाचे नुकसान करणे ही चिनी देशाची नेहमीच वाईट नीती राहिली आहे. अशा या चीनला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्या मालावर बहिष्कार टाकून आत्मनिर्भर भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची गरज प्रत्येकाची आहे. आणि त्या दृष्टीने भारत सरकारने आपली पाऊलेही उचलली आहेत सरकारी कॉन्ट्रॅक्ट मधून चिनी कंपन्या हद्दपार केल्या, कित्येक चिनी मालावर बंदी घातली. नव्या युगातील डिजिटल strike ही झाली कित्येक चिनी ॲप्सवर भारताने बंदी घातली. कारण त्यामुळे भारतीय सुरक्षेला धोका होता. आणि याच स्वागत प्रत्येक भारतीयाने केलं ही खरंच कौतुकाची गोष्ट.
आत्मनिर्भर भारत खरतर ही संकल्पनाच मुळात भारत कसा असावा हे स्वतःच सांगते. याला कोणत्याही वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाहीये . तर भारत कसा असावा हे या दोन शब्दात कळून जात. आजची आव्हान या देशाला घ्यायची असतील तर त्याला आता आत्मनिर्भर होण तितकंच गरजेचं आहे. स्वावलंबी देश हा नेहमीच जगावर राज्य करतो हे तितकंच खरं आहे. जेव्हा कोणताही देश हा जगाला लागणारी आवश्यक गोष्ट निर्माण करतो तेव्हा त्याची निर्यात करतो आणि कमीत कमी परकीय वस्तूंचा वापर करून त्यांचे उत्पादन स्वगृही म्हणजे आपल्याच देशात निर्माण करतो तेव्हा तो देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर चालतो.आजच्या भारत सरकारची ही नवी आव्हाने आपल्याला तीच सांगतात की आत्मनिर्भर व्हा कमीत कमी परकीय वस्तूंचा वापर करून स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा. कारण जेव्हा परकीय चलन देशात जास्त येते आणि आपले चलन परकीय देशात कमीत कमी प्रमाणत जाते तेव्हाच देशाची आर्थिक परिस्थिती ही मजबूत होते. अगदी संपूर्णतः परकीय वस्तूंचा वापर बंद करता येईल हेही तितकंच अशक्य आहे कारण भौगोलिक दृष्ट्या किंवा इतर कोणत्याही कारणाने काही गोष्टी या देशात निर्माण करणं शक्य नसतं एव्हाना प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या दृष्ट्या अशा वस्तूंमुळे इतर देशांवर अवलंबून असतोच, पण अशा वस्तूंचा वापर जर कमी करता आला तर त्याचा फायदा देशाला होईल. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा विचार करताना काही उदाहरणे आवर्जून द्यावीशी वाटतात. यावर्षी संपूर्ण जगात अचानक आलेल्या महामारीमूळे आपल्याला खूप काही शिकवलं. याच उत्तम उदाहरण म्हणजे Personal Protective Equipment Kit (PPE KIT) यापूर्वी भारतात कधीच निर्माण केले जात नसत पण या काळात भारतीयांना स्वावलंबी होण्याची किती गरज आहे यांची जाणिव झाली आणि पाहता पाहता आज देश जगातला दुसरा सर्वात जास्त PPE KIT निर्माण करणारा देश झाला. हे सगळं संभव झालं ते आपल्यातील दृढ विश्वास आणि निश्चयामुळे आणि हीच आत्मनिर्भरता आता आपल्याला सर्व स्तरावर करायची आहे. आणि यातूनच घडवायचा आहे तो उद्याचा एक स्वावलंबी भारत.
उद्याची आव्हान पेलायची असतील तर आपल्याला आज जबाबदारी उचलावी लागणार यात काहीच वाद नाही. एक नागरिक म्हणून मी आज कुठे उभा आहे हे मी पाहिलं पाहिजे. उद्या एकीच आव्हान आमच्या समोर आहे!! मग आम्ही सर्व धर्मांना , जातीला , पंथना सोबत घेऊन आहोत का ?? याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा प्रत्येक महापुरुषावर प्रत्येक भारतीयांचा तेवढाच अभिमान असायला हवा. अमुक अमुक महापुरुषाला अमुक अमुक जातीचेच फक्त आठवण करतात हे जोपर्यंत थांबत नाही आणि प्रत्येक महापुरुषाला एक भारतीय म्हणून मी तेवढाच मान देत नाही तोपर्यंत त्या महापुरुषाला खरी आदरांजली आपण देऊ शकत नाही हेही तितकंच खरं आहे. प्रखर राष्ट्रभक्त होऊन या भारताची सेवा ही आता आपले पहिले कर्तव्य आहे ही विसरू नका. कारण आजूबाजूचे हे देश आपल्या मातृभूमीला खंड खंड करण्यासाठी सक्रिय आहेतच. मध्यंतरी नेपाळने आपल्या नकाशामध्ये भारतीय भूमीचे काही गाव , प्रदेश दाखवले, पाकिस्तान नेहमीच काश्मीरला आपला भाग मानत आला आहे आणि यावर्षी त्याने नकाशाद्वारे सांगण्याचा प्रयत्नही केला आहे, आणि चीनची विस्तारवादी नीती. अशा चारही बाजूंनी हे देश आपला अजेंडा चालवत असताना आपण भारतीय नागरिक एक होण्याची किती गरज आहे हे वेगळं सांगावं लागतं नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचा जातीचा अभिमान असावा, किंबहुना तो असायलाच हवा. पण एक भारतीय नागरिक म्हणून त्याचा त्रास इतरांना होता कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिले. कारण राष्ट्र मजबूत असेल तर त्या राष्ट्राची संस्कृती मजबूत राहते आणि त्या संस्कृतीत मग या सर्व गोष्टी अगदी आनंदाने राहतील. त्यामुळे राष्ट्र सर्वप्रथम हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
तुमची ओळख ही सर्वप्रथम तुम्ही तुमच्या राष्ट्राचे एक नागरिक आहात यावरून होते आणि तो नागरिक सुज्ञ असावा किंवा तो तसा घडवावा हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. आपली संस्कृती ही खूप जुनी आणि तितकीच सुंदर संस्कृती आहे, हे येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं असतं. आणि त्याची सुरुवात अगदी लहानपणा पासून झाली पाहिजे. आपला राष्ट्राप्रती अभिमान हा आपल्या राष्ट्राला मजबूत करतो. उद्याच्या आव्हानाला पेलण्याची ताकद देतो. नाहीतर काय हो स्वातंत्र्य दीन दरवर्षीच येतो त्यामध्ये नवल ते काय??, हे उद्याची पिढी म्हणायला नको एवढीच अपेक्षा. आणि म्हणून उद्याचा पिढीला इतिहास कळावा आणि तो त्यांना तितकाच महत्त्वाचा वाटावा हे गरजेच आहे. कारण उद्याचे हे सुज्ञ नागरिक आहेत. येणाऱ्या पिढीला आपल्या सांस्कृतिक वारसेच महत्त्व पटवून देणं तितकंच गरजेच आहे. आजच्या या परकीय संस्कृतीच्या अतिक्रमणात कित्येक इथल्या जुन्या चालीरीती , भाषा , पेहराव यांचा कुठेतरी र्हास होत आहे याची जाणीव आपल्याला होत आहे. याच्या वाढीसाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने कार्य करण्याची गरज आहे. कारण एक नागरिक म्हणून तुम्हीच हे जपलं पाहिजे. कोणत्याही प्रखर राष्ट्राची ओळख ही पहिले त्याची राष्ट्रभाषा यावरून होते आणि हीच ओळख आपल्याला पुन्हा निर्माण करायची आहे. परकीय भाषा या देशातून हद्दपार करण तितकंच महत्त्वाचं आहे. आपली संस्कृती ही आपल्या भाषेतच शोभून दिसते आणि त्याची सुरुवात प्रत्येक भारतीयाने करायला हवी. आपल्या भारतात विविध भाषा आहेत आणि त्या भाषा जोपासण्यासाठी तिथल्या नागरिकांनी त्या भाषेत बोललं पाहिजे. आज कित्येक ठिकाणी नव्या येणाऱ्या पिढीला आपल्या मातृभाषेत नीटसं बोलताही येत नाही ही सत्य परिस्थीती पाहायल मिळते. खरतर याही परकीय आक्रमणांचा गंभीर विचार आता करण गरजेच आहे . तुमची भाषा तुमची ओळख सांगते आणि हीच भाषा तुमची संस्कृती टिकवते हे लक्षात असण खूप गरजेचं आहे.
अश्या कित्येक मुद्द्यावरती आज मनन चिंतन करण्याची गरज आपल्याला आहे. स्वातंत्र्य दिवस हा एक दिवस जरी असला तरी तो साजरा करण्यासाठी आपल्याला वर्षाचे संपूर्ण दिवस एक तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या ती एकीची, तपश्चर्या ती राष्ट्रभक्ती जागृत ठेवण्याची, तपश्चर्या करावी लागते ती आपल्या देशाची अखंडता टिकवण्याची , तपश्चर्या करावी लागते ती एक सुज्ञ नागरिक म्हणून या देशाची सेवा करण्याची. तर मग पुन्हा त्या निर्धाराने आपण या स्वतंत्र दिनी पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी राष्ट्राभिमान , राष्ट्रभक्ती, एक सक्षम, आत्मनिर्भर भारत करण्यासाठी कटिबद्ध होऊ.
जय हिंद!!
भारत माता की जय !!
वंदे मातरम् !
राष्ट्र सर्वप्रथम !!
✍️ योगेश खजानदार