स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये कुठेतरी गोंधळ होतो आणि सर्वच आयुष्याच्या व्याख्या बदलुन जातात. आम्ही खुप प्रगत आहोत आमची विचारसरणी खुप आधुनिक आहे असे म्हणारेच लोक कदाचित या दोन्ही गोष्टी मध्ये कुठेतरी गोंधळून जातात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आणि स्वैराचार म्हणजेच स्वातंत्र नव्हे हेही समजुन घेणे आता गरजेचे आहे.
आमची मुल खुप आधुनिक विचारसरणीची आहेत अस म्हणत जेव्हा आपल्या मुलांना आई वडील हवं तेवढं स्वातंत्र देतात तेव्हाच त्यांना सांगण गरजेच असतं की स्वातंत्र आणि स्वैराचार यात फरक असतो. तुम्ही कुठे आणि कोणाच्या संगतीत वाढता याही गोष्टी यावेळी लक्षात घेणं खुप महत्वाचं असतं. जेव्हा 4 वर्षाची चिमुरडी पोरं कोणत्याही फिल्म मधला संवाद मोठ्या अभिमानाने म्हणतात तेव्हा नक्कीच आई वडिलांना आनंद होतो पण हीच खरी सुरुवात आहे का? हाही प्रश्न तुमच्या मनात येणं खुप गरजेचं असतं. मग पुन्हा मुल स्वैराचारी वागतात तेही असंच काहीस पाहुन. नक्की हे संस्कार होतात की स्वैराचार पणे वागण्याची एक पायरी.. तेच कळत नाही. नंतर मुल मोठेपणी आईवडिलांशी उद्धटपणे वागतात ते हेच अस काहीस पाहुन. हा झाला एक भाग.
आपल्या आजच्या समाजात खरंच आदर्श बदलतायत का हेही पहावे लागेल?? कारंण कित्येक सराईत गुंड आणि गुन्हेगार हेही आता आदर्श होतायत हे पाहुन खरंच नवलं वाटतं. कित्येक गुन्हे करुन समाजात ताठ मानेने वावरणार्या गुंडासमोर कित्येक लोक झुकतात ते कशासाठी?. पण समाजासाठी लढणाऱ्या लोकांना आज कोणी पाठिंबा देतोय का? खरंच विचार करायला लावतात या गोष्टी. इतिहास घडला कारण त्यावेळेस समाज आदर्श महान पुरुषांच्या मागे उभा राहिला. गुंडाच्या नव्हे. असे कित्येक विचार आहेत आणि त्यांचा आता गांभीर्याने विचार करण गरजेच आहे. नाहीतर उद्याचा समाज गुंडाचे पुतळे रस्त्यात एक आदर्श म्हणुन उभा करणार नाहीत हे कशावरुन.
खूप विचार करायला लावणारे हे मुद्दे आता काहीना पटणार नाहीत पण हेच सत्य आहे. आधुनिक विचार म्हणता म्हणता आपण खरंच त्या विचारांचे आहोत का हेही पहावं लागेल. कारण सुधारणा ही झालीच पाहिजे आज आमच्या सारख्या तरुण पिढीच्या फक्त अभिमानातच आदर्श पुरुष राहिलेत आणि मनात चोर, गुंड, गुन्हेगार याचे विचार. आणि हेच सत्य आहे.
स्वातंत्र सर्वानाच हवं असतं पण एक अंकुश हवाच नाहीतर उद्याचा समाज फक्त स्वैराचार शिकवेल यात काहीच शंका नाही. तुमचे विचार आधी बदलावे लागतील नाहीतर दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार व्हायला वेळ लागणार नाही हेही तितकंच खरं आहे. नाहीतर उद्या तुमच्या जवळची व्यक्ती गुंड होण्याची स्वप्ने पाहु नये म्हणजे झालं. यावरुन आपले विचार स्वतंत्र नसुन स्वैराचारी झाले आहेत हे कळत.
अगदी मला वाट्टेल ते मी करेन अस म्हणणारा समाज नक्कीच स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय की गैरफायदा हेही आता कळायला हवं. माणसाला स्वातंत्र हवच तो त्याचा हक्क आहे पण स्वातंत्र्यातही बंधने हवीच . बंधने मोठ्याच्या आदराची, बंधने आदर्श विचारांची , बंधने समाजाच्या कल्याणाची अशी बंधने हवीच अशाने स्वातंत्र टिकुन राहत आणि स्वैराचार मनाला शिवतही नाही. तुम्ही ठरवायच की आपला आदर्श कोणं ते.. कारण आदर्शावरुनच विचार ठरतात आणि विचारावरुनच माणुस चांगला वागतो ..नाहीतर स्वैराचारी होतो..
✍योगेश खजानदार