स्वप्न || कथा भाग ३ || SWAPN KATHA ||

भाग ३

आप्पा कित्येक वेळ तसेच बसून होते. रात्री तसेच बसल्या बसल्या झोपी गेले. सकाळी जाग आली तेव्हा मंदा खोली आवरत होती. मंदाच्या आवाजाने जागे होत आप्पा मंदाकडे पाहू लागले. आजही मंदा आप्पाना तशीच पूर्वीची मंदाच वाटत होती.

“आज काय अगदी गोड दिसतेस मंदा तू !!”
“कायतरीच काय हो तुमचं !!”मंदा लाजेने चूर होत म्हणाली.
“वाटलं ते बोललो !त्यात काय लाजायचं !!”
“मुलगा लग्नाचा झालाय म्हटलं !! डोक्यावरचं पण पांढरं झालं !!त्याचा विचार करा आता !!” मंदा चेष्टेच्या सुरात म्हणाली.
“अरे !! पांढरे केस झाले म्हणून काय झालं !! मन अजून जवान आहे !!” असे म्हणताच मंदा लाजून खोलीतून निघून गेली.

आप्पा बाहेर येताच सुनील आणि उमा समोरच बसलेले दिसले. आज कुठे काय करायचं, कुठे पथनाट्य करायचं !! किती गरीब मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं सगळं व्यवस्थित ठरवत होते. आप्पा स्वयंपाक घरात जाऊन मंदाशी बोलू लागले.
“उमा बद्दल तुझ काय मत आहे ??”
“खूप गोड मुलगी आहे ती !! काल सुनीलला लागलं तेव्हा तिनेच सांभाळलं त्याला !! नेहमी काळजी घेत असते ती त्याची !! ” मंदा अगदी तोंडभरून कौतुक करत होती.
“आज एवढं कौतुक ?” आप्पा मंदाकडे पाहून म्हणाले.
“आहेच मला कौतुक दोघांचही!! ते जे करतायत त्याच आहेच !! त्यांना रागावते मी, पण तो राग त्यांच्या काळजीपोटी असतो!! ” आप्पा फक्त ऐकत होते.
काहीच न बोलता आप्पा थेट सुनील आणि उमा जवळ जाऊन बसले. कित्येक वेळ त्यांचं बोलणं ऐकत असता अचानक सुनील काहीतरी विसरलं म्हणून आणायला खोलीत गेला. उमा आणि आप्पा दोघेच तिथे होते. आप्पा नी थोडा वेळ घेत उमाला विचारलं.

“उमा!! ऐक विचारू ?”
“आहो आप्पा विचारांना !! “
“हे जे तुम्ही कार्य करताय त्याचा तुम्हाला काही फायदा आहे ?? “
“आप्पा समाज शिकला, त्यातूनही जर मुलगी शिकली तर समाज सुधारेलच ना!! आणि त्याचा फायदा तुम्हाला मला सगळ्यांना होईल!! ” उमा अगदी बिंधास्त बोलली.
“हो पण !! आजकाल मुल शिकतात !! मोठ्या पदावर जातात !! परदेशात भले मोठे पगार मिळवतात !! मग ते सारं सोडून इथे हे असं करत बसायचं म्हणजे !! “
“आप्पा !! कधीपर्यंत आपण दुसऱ्या देशांकडे असे जात राहणार!! इथे सुधारणा झाली तर बाहेर जायचा प्रश्नच येणार नाही!! आणि तिकडे जाऊन भले मोठी पगार मिळवणे हे आमचं स्वप्न नाहीच !! हा समाज सक्षम करणं !! त्याला स्वतः च्या मार्गावर चालवणं ही गरज आहे !! “
“वाह!! पोरी तुमचे विचार ऐकून आज मला खरंच खूप बरं वाटलं !!पण प्रत्येकाला वाटत की आयुष्य अशा प्रकारे जगायचं असेल तर जोडीदारही तसाच हवा !! ” आप्पा उमाकडे बघत राहिले.
“हो!! पण सगळ्यांनाच तसा मिळेल अस कस !! आपण जे कार्य करतोय त्यात आपल्या जोडिदाराचा सहवास मिळाला तर कोणाला नको वाटेनं !! “
“तुला मिळेल असा जोडीदार !! ” आप्पा अचानक बोलून गेले.
उमा अगदी गोंधळून गेली . इतक्या वेळ स्पष्ट बोलणारी उमा जरा चाचरत बोलू लागली. सुनील गेला त्या खोलीकडे पाहू लागली. आप्पा तिच्याकडे पाहत बोलले.
“आमच्या सूनिलला कोण भेटेन काही कळत नाही बघ !! “
“भेटेन ना नक्की !! त्यांच्यासारखी !! ” उमा आता मात्र गोंधळून गेली.
“बरं उमा आमच्या सुनील बद्दल तुला काय वाटतं ??”
असा प्रश्न विचारताच उमाला काय बोलावं तेच कळेना . ती शांत झाली. फक्त आप्पाकडे बघून हसली. सुनील तेवढ्यात खोलीतून बाहेर आला.
“काय आप्पा !! काय बोलताय उमा सोबत !! “
“असच रे !! सहजच !! ” आप्पा उमाकडें पाहत हसले आणि निघून गेले. जाताना उमाच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र त्यांनी आपल्या डोळ्यात टिपले. सुनील बद्दलच प्रेम त्यात स्पष्ट दिसत होत.

“चल उमा निघुयात !! “
उमा स्तब्ध होती.
“उमा !! उमा !! चल !! ” विचारांच्या तंद्रीतुन उमा अचानक भानावर आली.
तिच्या मनात सुनील बद्दल प्रेम होत, पण ते कधी तिला कळलंच नाही. आप्पांनी फक्त उमाला त्याची जाणीव करून दिली.

” उमा!! आज तो पडका बंगला पूर्ण स्वच्छ करून घेऊयात बघ !! आपली शाळा तिथेच सुरू करूयात !! आणि बोरुवस्तीत पुन्हा जाऊन त्यांना समजावून सांगुयात !! उमा ऐकतेयस ना तू ??” सुनील उमाकडे पाहत म्हणाला पण उमाच्या मनात प्रेमाचे तरंग उठत होते. त्या सगळ्या गोष्टींशी सुनील अनभिज्ञ होता. सुनील बोलत होता उमा फक्त त्याच्याकडे पाहत होती. मनात कित्येक भाव उमटत होते जणू तिला बोलत होते
“वेड्या मनाने माझ्या
प्रेम अंतरीचे ओळखले
त्याच्या नजरेत पाहता
माझेच मला मी दिसले
कधी हरवून जाता
स्वतः स मी शोधले
व्यक्त करावे म्हटले तरी
ओठणावरच का विरले
वेड्या मनाने माझ्या
प्रेम अंतरीचे ओळखले !!! “
उमा भान हरपून सूनीलकडे पाहतंच राहिली. प्रेमाची ती चाहूल मनाला देत राहिली.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *