भाग ४
दत्तू जवळ येऊन बसला. लगबगीने चालत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. शिवा त्याला तसे पाहून म्हणाला.
“अरे !! एवढं काय काम काढलंय दत्तू !! धापा टाकत आलास !!हे बघ काही दुसरं काम असल तर आत्ताच जमणार नाही बघ !! सरपंचाच काम करतोय !!! नाही केलं तर ओरडलं मला परत !!”
” अरे शिवा !! सरपंच !!!” दत्तू आता शांत होत बोलू लागला.
“काय?? सरपंचांनी बोलावलंय ??” शिवा मोठ्या आवाजात बोलू लागला.
“त्यांना म्हण !! तुमचंच काम करतोय !! झाल की येतो !!!”
“अरे जरा शांत बस की !!” दत्तू चिडून म्हणाला.
“अरे सरपंच गेले !!! “
“काय ??” शिवाला हे ऐकुन काय बोलावं तेच कळेना.
“कधी ?? कस काय ??”
“अरे हो तर !! आता तिथूनच आलोय !! रात्री झोपला ते उठलाच नाहीं सकाळी !!! बायकोन बघितलं तर काहीच हालचाल करत नव्हता!! वैद्यबुवा आले आणि बघितलं !! तर म्हटले इलाज करून काही उपयोग नाही !! सरपंच गेलेत म्हणून!!”
“मायला, वाईट झाल म्हणायचं !!! तू हो पुढं !! मी आलोच मागून !!!” शिवा जागेवरून उठतं म्हणाला.
दत्तू आला तसा निघून गेला. शिवा काम आवरून तिकड निघाला. सुधाला सांगायला तो खोपटात गेला.
“सुधा !! “
“काय हो!! ” सुधा झोपेतून उठतं म्हणू लागली.
“सरपंच गेले !! “
“काय ??” सुधाला यावर विश्वास बसत नव्हता.
“हो!! आताच दत्तू सांगून गेला. मी तिकडं जाऊन येतो !! परत इकडं सगळी तयारी करावी लागल मला.”
“बर !! ” सुधा खालच्या आवाजात म्हणाली.
शिवाला सुधाचा बदललेला आवाज लगेच जाणवला आणि तो म्हणाला.
“काय झाल सुधा ??”
“काही नाही !! जरा अंग कणकण करतंय !!” सुधा अंगावरच पांघरूण काढत म्हणाली.
शिवा तिच्या जवळ जात तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलू लागला.
“ताप पण आलाय तुला!! “
“होईल ठीक !! तुम्ही जाऊन या !!!”सुधा जवळच ठेवलेल्या पेल्यातले पाणी पीत म्हणाली.
“सदा गेला ना शाळेत??”
“हो !!!” सुधा पुन्हा पांघरुण घेत बोलली.
“बरं !! मी जाऊन येतो !! आणि येताना वैद्यबुवाकडून औषध घेऊन येतो !! बर वाटेल तुला!!” शिवा बाहेर जात म्हणाला.
“बर !! ” एवढंच तुटक बोलत सुधा पुन्हा झोपी गेली.
शिवा धावतच गावात गेला. सरपंचाच्या घरी पाहतो तर भली मोठ्ठी गर्दी जमलेली. एका कोपऱ्यात उभा राहून तो सगळं पाहू लागला. सरपंच रुबाबदार माणूस पण आज अगदी भेसूर वाटू लागला. बायको एकटी रडत होती. बाप एका कोपऱ्यात आपल्या अपंगत्वाला दोष देत मुलाकडे पाहून आसवे गाळत होता. शिवा सगळं काही पाहत होता. रात्रीच्या जागरणामुळे शिवाचे डोळे लालबुंद झाले होते. तेवढ्यात दत्तू शिवा जवळ येऊन बोलू लागला.
“सरपंचाच काय काम करत होता रे तू !! आणि तेपण मसनवाट्यात??”
दत्तूच्या या प्रश्नानं शिवाला काय बोलावं तेच कळलं नाही.
“काही नाही !! असच नेहमीचच !!” शिवाने वेळ काढून घेतली.
“बरं !! जा तू पुढ मसनवाट्यात आणि तयारी कर सगळी !! निघतीलच आता तिकडं!!!”
“तसचं करतो !! ” शिवा दत्तूलं म्हणत लगेच निघाला.
मसनवाट्यात येताच तो सरळ खोपटात गेला. सुधा तापेन फणफणत होती.
“सुधा !! ताप किती वाढलाय ?? ” तिच्या डोक्यावर हात ठेवत शिवा बोलू लागला.
सुधा आता जागेवरून न उठताच शिवाकडे पाहू लागली. कित्येक वेळ दोघे तसेच बसून राहिले. शिवाला सुधाची काळजी वाटू लागली. आणि तेवढ्यात,
“शिवा !! ” खोपटाच्या बाहेर दत्तू येऊन हाका मारू लागला होता.
“आलो आलो !!” शिवा बाहेर येत म्हणाला.
बाहेर पाहतो तर दत्तू आणि बाकी सगळे तिथे केव्हाच आले होते. सरपंचाला तसे पाहून शिवा अगदी सुन्न होता. क्षणभर थांबून तो लगेच कामाला लागला. सरपंचानेच सांगितलेली लाकड तो रचू लागला. कोपऱ्यात दोघांनी खांद्यावरून धरलेला सरपंचाचा बाप आसवे गाळत होता. बाकी रडावं अस कोणी राहीलच नव्हतं. सरपंचाचा मुलगा विलयातेत होता त्याला येणं शक्य नव्हतं अस दत्तू म्हणत होता.
सारी तयार झाली आणि शिवा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. सरपणान बघता बघता पेट घेतला. आणि त्या आगीच्या लोटात कित्येक विचार जणू शिवाला जळताना दिसू लागले, जणू त्याला बोलू लागले.
“बापाची चिता पेटवायला आतुर झालेला हा सरपंच आज स्वतःच जळून खाख झाला!! आपल्या बापासाठी ज्याने त्या बापाच्या जिवंतपणी सरपन रचले !! त्याच सरपणात स्वतःच जळून खाक झाला!! कोणासाठी केलं त्याने एवढं सगळं !!त्या मुलासाठी ज्याला बाप गेला तरी यायला वेळ नाही त्याच्यासाठी!!! अखेर कोणीच नाही आज इथे !! तो बघा तो माणूस !! त्या दिवशी सरपंचाच्या हो ला हो करणारा !! निघूनही चालला !! पेटत्या ज्वाला आणि हा निर्जीव देह एकटा सोडून !!! या लोकांची साथ फक्त जगताना !! मेल्यावर तर काय साथ देणार ?? दुसऱ्यासाठी जमा केलेली लाकड स्वतःलाच जाळून गेली !! यापेक्षा ते वाईट काय !! म्हणून तर आयुष्य आहे तोपर्यंत दुसऱ्याच चांगलं करत राहायचं म्हणतात ते यासाठीच!” शिवा जागेवरून उठला.
एव्हाना आता सगळे निघून गेले होते. उरले होते ते फक्त काही लोक , शिवा आणि त्याचा मित्र दत्तू. त्या जळत्या चीतेकडे बघत.
काही वेळात दत्तुही निघून गेला. पाहता पाहता सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. शिवा कित्येक वेळ सरपंचाच्या जळत्या चितेस राखण करत बसला होता. सुधा आत आजारी आहे याचं भानही त्याला राहिले नव्हते. तेवढ्यात सदा शाळेतून आला. आत खोपटात गेला आणि धावतच बाहेर आला.
“आबा !! “
शिवा सदाच्या आवाजाने भानावर आला आणि खोपटाकडे पाहत म्हणाला.
“काय रे सदा ???शाळेतून कधी आला तू ???”
सदा घाबरत घाबरत म्हणाला.
“आईला जास्त त्रास होतोय !!!”
शिवाला हे कळताच तो धावतच आला. खोपटात शिरत सुधा जवळ आला.
“माफ कर सुधा !! कामात मी खरंच विसरलो !! माफ कर !!!”
“आहो ठीक आहे !! एवढं काही झाल नाहीये मला!!” सुधा स्वतःला सावरत म्हणाली.
शिवा सुधाचे डोके आपल्या मांडीवर ठेवत म्हणाला.
“नाही कस !! ताप वाढलाय सुधा !! मी आत्ता जातो आणि वैद्यबुवाला घेऊन येतो!” शिवा उठायचा प्रयत्न करू लागला.
सुधा त्याला थांबवत म्हणू लागली.
“थांबा हो जरा वेळ !! काही होत नाही मला!!मी एकदम ठीक आहे !!”
“गप्प बस तू !! तुला काही कळत नाही !सदा आईजवळ थांब!!! मी आलोच जाऊन!!”शिवा जागेवरून उठूत म्हणाला.
सदा सुधाजवळ बसला. शिवा धावत धावत वैद्यबुवांकडे गेला.एव्हाना सगळीकडे अंधार झाला होता. शिवा वैद्यबुवाच्या घरासमोर येऊन दरवाजा वाजवू लागला. थोड्या वेळानं दरवाजा उघडला.
“बुवा आहेत का ??” समोर वैद्यबुवांची बायको पाहून शिवा म्हणाला.
“बुवा तर नाहीत घरी !! आताच थोड्या वेळापूर्वी दुसऱ्या गावाला गेलेत!! कोणीतरी माणूस आला होता त्यांच्या सोबत गेले !!!”
“कधीपर्यंत येतील ??”शिवा अगदिक होऊन विचारू लागला.
“माहीत नाही!!!” बुवांची बायको शिवाची तगमग पाहून पुढे म्हणाली.
“काय झालंय एवढं शिवा??”
“बायको खूप आजारी आहे !!! तापानं अंग नुसतं गरम झालंय !!!” शिवा.
“तू अस कर !! तू जा घरी !! ते आले की पाठवून देते मी तुझ्याकडं !!! “
“लई उपकार होतील तुमचे !!!” शिवा हात जोडत म्हणाला.
शिवा धावत धावत पुन्हा मसनवाट्यात आला.सुधाला अश्या अवस्थेत पाहून त्याला काय करावं तेच कळतं नव्हतं. सदा सुधाच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. पण तरीही ताप काही कमी होत नव्हता.शिवा हतबल होऊन एकटक समोरच्या धगधगत्या चितेकडे पाहत बसला होता. एकटाच.