स्मशान || कथा भाग २ || Smashan Marathi Katha ||

भाग २

“आबा !!” हातातून रक्त येतंय तुमच्या !!! ” कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता.
“काही नाही होत सदा!! होईल बरी दोन तीन दिवसात !!! ” शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला.
“पण आबा !! हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला !! “
“म्हटलं होत ना बाळा !! मेलेल्या भुतापेक्षा जिवंत भूत लई बेकार म्हणून !! “
“खरंय आबा !! “
या सगळ्या गोष्टीत रात्र कशी सरली कळलंच नाही. शिवा पहाटे निर्धास्त झोपी गेला. सदा तांबड फुटताच शाळेत जायला निघाला. सुधा त्याला आवरायला मदत करत होती.तेवढ्यात दत्तू तिथे आला.
“शिवा !! “दत्तू बाहेरूनच हाका मारू लागला.
“झोपलेत अजुन !! ” सुधा बाहेर येत म्हणाली.
“दिस डोक्यावर आलाय आणि झोपलाय अजुन !!”
“रात्री कोहल्याची टोळीनं झोपू दिलं तर ना !! ” सुधा दत्तूला पेल्यात पाणी देत म्हणाली.
“म्हणजे ! रात्री कोल्हे आलते काय !! ” दत्तू आश्चर्याने म्हणाला.
“होय तर !! सारखी इथच घुटमळत होती!!” सुधा आत पाहत म्हणाली.
तेवढ्यात शिवा झोपेतून उठला आणि बाहेर येत दत्तुला म्हणाला.
“काय रे दत्तू !! काय काम काढलसं सकाळ सकाळ??”
सरपंचानी बोलावलंय तुला!! “
“का म्हणून ??”
“आता ते मला काय माहीत !!ये पटकन !! मी जातो पुढं !!” दत्तू एवढं म्हणून निघून गेला.
पाठमोऱ्या दत्तुला जाताना शिवा जरावेळ थांबला. लगेच लगबगीने उठला. सकाळची न्याहारी करून सरपंचाकडं जायला निघाला.
सरपंचाच घर म्हणजे आलिशान वाडा. कित्येक नोकर चाकर दिमतीला. शिवा बारक्या दरवज्यातून आत वाड्यात आला. सरपंच समोरच बसलेले पाहून त्यांना नमस्कार करू पुढे आला. शिवाला पाहताच सरपंच म्हणाले.
“काय शिवा !! आजकाल तोंडपण दाखवणं झाला तू तर !! मोठा झाला का लई !!” सरपंच जरा चिडक्या आवाजात बोलू लागले.
“तस नाही सरकार !! सध्या काम लई आहेत म्हणून येणं झाल नाही !!!”
“मसनवाट्यात कसली आली रे काम !! पेटल की झाल!! ” सरपंच हसत म्हणाले.
सरपंच हसलेले पाहून शेजारीच बसलेले दोन तीन गावकरी पण हसू लागले.
“चूक झाली सरकार !! ” शिवा खाली मान घालून म्हणाला.
“बर ऐक !! या दोन तीन दिवसात आमचा म्हातारा खपायच्या मार्गावर आहे !! तर त्याला चंदनाची लाकड आणून ठिव !! एवढंच सांगायला बोलावलं होत तुला !! “
“जी सरकार !! प्रयत्न करतो !!”
” प्रयत्न काय?? पाहिजेतच मला!! ” सरपंच मोठ्या आवाजात बोलू लागले.
शिवा शांत सगळं ऐकत होता. गावातली या सरपंचाची जवळची माणसं त्याला साथ देत होती.
“मायला !! वैताग नुसता !! तुम्हाला सांगतो तात्या !! हे म्हातारं गेली चार वर्ष झाली मरणा झालंय !! जागेवर पडून नुसता !! पण जीव हित या शरीरात !! मायला म्हातारा मेला म्हणजे सगळा हा वाडा आपलाच होईल बघा !! आणि त्या खालच्या बाजूची शेती !! पैसा सगळं आपलं होईल !! ” सरपंच डोळ्यात कित्येक तीव्र भाव आणून बोलत होते.
“आणि नाही मेला ना तर मी मारील बघा त्याला !! आईला वैताग नुसता !! ” सरपंच अस म्हणत शिवाकडे पाहू लागले.
शिवा जागेवरून उभा राहिला.सरपंच एकदम त्याचावर खेकसले.
“तुझ काय आता !! झाल तुझ काम !! निघ आता !! आणि सांगितलय ते काम झाल पाहिजे बघ !! माझ्या अब्रूचा प्रश्न आहे !! नाहीतर गाववाले म्हणतील !! एवढा मोठा सरपंच आणि बापाला असाचं जाळला म्हणून !! “
“जी सरकार !! ” शिवा मागे सरकत म्हणाला.

गावाच्या वेशीवर येऊन शिवा थांबला. जणू त्याच्या मनात कित्येक विचारांचं द्वंद्व सुरू झालं होत.
“मेलेल्या मड्याचे लचके तोडू नये म्हणून काल मी रात्रभर त्या भुकेल्या कोह्ल्यांशी लढलो ! कशासाठी ?? त्या निर्जीव शरीराला वाचवण्यासाठी !! की अजून कशासाठी !!ती भूक त्यांना तिथे घेऊन आली होती !! त्यांची काय चूक होती ?? खरंच काय चूक होती ?? माझेच मला समजतं नाहीये !! त्या जंगलातल्या प्राण्यांची भूक ती केवढी .!! संपून जाईल लगेच !! पण या जिवंत माणसांची भूक ती कोणती ?? याला अंत नाही ?? त्या मसनवाट्यात खरंच या माणसाच्या भुकेचा अंत आहे ???आयुष्यभर काय कमावलं त्यांनी !! सार काही राख होताना मी पाहिलंय ! !” शिवा गावाच्या वेशीबाहेर येत आपल्या खोपट्याकडे जाऊ लागला. मागे न पाहता, त्या माणसाच्या वस्तीकडे न पाहता, पुढे चालत राहिला.
दुपारच्या रखरखत्या उन्हात शिवा स्मशानात राखेच्या शेजारी जाऊन बसला.अजूनही ती राख धगधगत होती. तेव्हा जणू सरपंचाचे शब्द त्याच्या मनात घोळत होते.तो तिथे कित्येक वेळ बसला. दुपारची वेळ जाऊन सांज होत आली. आणि तेवढ्यात सुधा खोपट्यातून शिवाला पाहून त्याच्याकडे धावत आली.
“काय हो!! अस का बसलाय इथ???” सुधा थोड्या घाबाऱ्या आवाजात म्हणाली.
“काही नाही !! असच बसलो होतो !! ” शिवा शांत म्हणाला.
“सरपंच काही म्हणाले का ??”
” ते काय म्हणणार !! ” शिवा जागेवरून उठूत म्हणाला.
“मग इथ अस !! ” सुधा कुतूहलाने विचारू लागली.
“काही नाही चल !! संध्याकाळ होत आली !! सदा येईल आता !! आल की पोरगं भूक भूक करत !! त्याला खायला कर काहीतरी !! ” शिवा सुधाच्या पुढे चालत जात म्हणाला. सुधा क्षणभर थांबली आणि शिवाच्या मागे खोपटाकडे गेली. बाहेर तेवढ्यात सदा आलाच होता . हातपाय धुऊन स्वच्छ कपडे घालून निवांत अंगणात बसला होता.
“आई !! कुठ गेला होतात दोघं तुम्ही ??”
“अरे !! इकडचं पलीकडे बसलो होतो!! ” सुधा आत जात म्हणाली.
शिवा हातपाय धुऊन धोतरान अंग पुसून सदाच्या जवळ जाऊन बसला. सदा पुस्तक उघडून अभ्यास करू लागला. त्याला पाहून शिवा क्षणभर गालातल्या गालात पुसटसा हसला. मनातला कित्येक गोंधळ क्षणभर विसरला. सदा पुस्तकातून डोकं वर घेत शिवाकडे पाहत होता. त्याला पाहून शिवा म्हणाला.
“काय असतं रे या पुस्तकात ??” शिवा सदाला कुतूहलाने विचारू लागला.
“थोर पुरुष , विज्ञान , चांगलं काय, वाईट काय सगळं असतं या पुस्तकात !!! ” सदा म्हणाला.
“अस्स होय !! चांगलंय !!मन लावून कर आभ्यास !! “शिवा जागेवरून उठतं बोलला.
सदा क्षणभर गालातल्या गालात हसला आणि पुस्तकात पाहून वाचू लागला.
सुधा खोपट्यातून बाहेर येत म्हणाली.
“चला जेवायला !! परत उशीर होतो !!”
एव्हाना आता रात्र होतच आली होती. शिवा आणि सुधा जेवायला बसले. सदा पुस्तक ठेवून खोपट्याच्या बाजूला क्षणभर थांबला. दुर असलेल्या गावाच्या त्या मिणमिणत्या दिव्यांकडे कुतूहलाने पाहू लागला. मसनवाट्यात गडद अंधार दिसत होता.अगदी समोरचं माणूसही दिसणार नाही इतका अंधार होता.
सदा आत जाऊ लागला. तेवढ्यात मसनवाट्याकडे काही कंदील लूकलूकताना त्याला दिसले. गोंधळलेला सदा घाईघाईत आत आला.
“आबा!! ” सदा जोरात ओरडला.
“अरे झाल काय?? ” शिवा जागेवरून उठतं म्हणाला. हातातला घास तसाच पुन्हा ताटात ठेवला.
“मसनवाट्याच्या बाजून कंदील दिसायेलेत !!” सदा शांत होत म्हणाला.
शिवा बाहेर गेला. हातात कंदील घेत चालू लागला. तसेतसे ते दिवे जवळ जवळ येऊ लागले. सदा शिवा सोबत मागे मागे चालत होता.
“आबा !! एवढ्या अंधाराच कोण आलं असेल !! ” सदा घाबऱ्या आवाजात म्हणाला.
“बघुयात तरी !! ” शिवा जोरात पुढे चालत चालत म्हणाला.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *