"साद कोणती या मनास आज
चाहूल ती कोणती आहे!!
तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब का भिजवत आहे??
कुठे कधी भेटावे नकळत
आस कोणती या मनास आहे!!
तुझ्या वाटेवरती उगाच ते
तुझीच वाट का पाहत आहे??
गंध पसरले दाही दिशांनी
तो गंध ओळखीचा आहे!!
तुझ्या येण्याचा भास मग
उगाच मला का होत आहे??
दवबिंदू होऊन पानावरती
मोती होऊन ते पसरले आहे!!
तुझ्या सोबतीचे क्षण जणू ते
पुन्हा मला का दिसत आहे??
ओलावा त्या माती मधला
नात्याची जाणीव होत आहे!!
पुन्हा बहरून येण्या जणू
ती पालवी का फुटली आहे??
नभी दाटल्या त्या ढगांनी
जणू हाक मज दिली आहे!!
तुझ्या नि माझ्या भेटीस
ती सरही आतुर का झाली आहे??
तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब भिजवत आहे !!! "
✍️योगेश खजानदार