तुला आठवतात ते दिवस जेव्हा आपण खुप बोलायचो. पण त्यावेळी नेमकं बोलण्याच साधन कमी पडायचं. मोबाईलला बॅलेन्स नाही, रोजचे मेसेज संपले अशा कित्येक कारणांनी आपलं बोलन अर्धवटच राहायचं. तेव्हा आपण दुसर्या दिवसाची आतुरतेने वाट पहायचो. सकाळच्या मेसेजेस ने सुरुवात करताना बोलन सुरु व्हायचं ते थेट रात्री गुड नाईट म्हणे पर्यंत. हे असे कित्येक क्षणांच्या आठवणी तो तिला सांगत होता.
पण बघ ना काळ बदलला आणि सगळच बदलुन गेल. आता पुर्वी पेक्षा जास्त साधन आले आहेत बोलायला. कित्येक अॅप्स, मेसेंजर .. जीवन अगदी स्मार्ट झालं ना यामुळे? पण सगळंच बदलय .. तु ही मी पण ..!! आता बोलायला वेळच नाही आपल्याला. बॅलेन्स भरपुर आहे पण काय बोलायचं आणि का? हा प्रश्नच आहे. आपण एकमेकां पासुन खुप दुरावलो आहोत अस वाटतंय मला. निखळ हास्य विनोद करणारा मी आणि त्यावर तुझी अगदी मनसोक्त दिलेली हास्याची लकेर आता कुठेतरी हरवलीये गं!! बघ ना विनोद हा विनोद होतंच नाही ना आता त्यांच भांडणात रुपांतर व्हावं. हा कोणता दोष आहे ते तरी बघावं ना!! मनात कुठेतरी माझं जुन रुप तु दडवुन ठेवलं असशीलच ? ते एकदा नीट आठवुन बघ , तासनतास बोलणारे आपण, त्या बागे जवळ भेटण्याची ओढ, आणि त्या भेटी मध्ये मी दिलेल एक चाॅकलेट. त्या चाॅकलेटची गोडी आजही मनात तशीच आहे ना ? की बदलुन गेलंय सगळं आज?
त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ती आपल्या पासुन दुरावतेय याच दुख त्याला वाटतं होतं. तिलाही ते कळतं होतं. तेव्हा ती त्याच्या डोळ्यात पहात म्हणाली . हे सगळं तुलाही आठवतं याचच मला समाधान आहे. काळा सोबत प्रेमाची ओहोटी होणारी जोडपी कित्येक पाहिली पण तु तस कधी होऊच दिलं नाहीस. मला आठवतात ते दिवस. काळ बदलला पण प्रेम तसेच आहे. कुठेतरी मनात काहीतरी सलतय तुझ्याही आणि माझ्याही. मला हेच पाहिजे होतं. कधीतरी हे सगळं मोकळ करन खुप गरजेचं होतं रे!! चुक माझी ही असेन तुझी ही असेन आपण मिळुन त्या समजुन घ्याव्यात अस मला ही वाटतं. तिच्या या बोलण्याने तो कित्येक वेळ फक्त तिच्याकडे पहातच होता. तिने अगदी मनाचे दरवाजे त्याच्यासाठी मोकळे केले.
दोघे कित्येक वेळ त्या समुद्र किनारी बसुन मनातील सल सांगत होते. दोघां मधील ते अंतर केव्हाच कमी झालं होतं. ती त्याला मनमोकळेपणाने सगळं सांगतं होती. त्या रुसलेल्या नात्याला कुठेतरी पुन्हा भरती आला होती. समुद्राची प्रत्येक लाट त्याच बोलण ऐकण्यास पायां जवळ येत होती. पण त्या दोघांना आता कोणाची चिंता नव्हती. होती फक्त ती आणि तो यांची एक सुंदर सांजभेट ..
“मज वाट एक अधुरी दिसते,
तुझी साथ हवी होती!!
त्या वळणावरती एकदा,
तुज पहायची ओढ होती!!
मनात तुझ्या एक सल,
मला बोलायची होती!!
माझ्या मनाची बैचेनी,
तुला सांगायची होती!!
ती आठवण पुन्हा,
तुला करुन द्यायची होती!!
नात्याची गोडी आपल्या,
पुन्हा अनुभवयाची होती!!
तुझ्या ओठांवरच्या शब्दांना,
पुन्हा साथ द्यायची होती!!
तुझ्या सवे समुद्र किनारी,
एक भेट व्हायची होती!!
तु सोबत असावी मज,
आस एक मनाची होती!!
ती वाट अधुरी दिसते,
तुझी साथ हवी होती!!”