भाग ६
सुमेधाने मनोजला पत्र पाठवले होते. त्याला ते सगळे अनपेक्षित होते.तो पुढे वाचू लागला.
प्रिय मनोज ,
खरतर त्या दिवशी कित्येक गोष्टी मी मनमोकळेपणाने तुला बोलले. मनाला हलकं वाटलं. २५ वर्ष मनात साठून राहिलेल, त्या दिवशी सगळं रित केलं मी. तुझ्या मनाचा खरंच विचार न करता मी माझ्या आयुष्याच्या कित्येक निर्णयांवर ठाम राहिले. पण तू माझ्यावर प्रेम करायच्या या एकाच निर्णयावर आजही ठाम आहेस. २५ वर्ष मी नको त्या माणसा सोबत, त्याच्या सहवासात काढले, आणि तू तेच वर्ष माझ्या आठवणीच्या सहवासात काढले. तू त्या दिवशी लग्न केलच नाहीस म्हणालास आणि मनातल्या कित्येक भावना मलाच दोष देऊ लागल्या. तुझ्या एकटेपणाचा दोष माझ्याच माथी मारू लागल्या. हो मी तुझी गुन्हेगार आहे हे नक्की.पण मला माफ करशील एवढं मात्र नक्की.
त्या दिवशी अचानक समोर आलास आणि मनाला आनंद झाला. तुझ्या सोबतच्या कित्येक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पण ही वेळ पुन्हा भेटण्याची नाहीये. कदाचित पुन्हा कधीच न भेटण्याची आहे. तुला हे सगळे वाचून थोडे दुःख होईल पण मी हे शहर सोडून जाते आहे. कायमची!! मला पुन्हा भेटण्याचं वचन नको !! पण माझ्या त्या गोड आठवणी तशाच जपून ठेव एवढं मात्र मी हक्काने सांगेन .त्यावेळी मी अचानक लग्नाचा निर्णय घेतला म्हणून तू रागावलास पण आज या माझ्या निर्णयाने रागावू नकोस.
रमण गेला!! पण आयुष्याची सारी गणिते सांगून गेला. मला मिळवलं त्याने !!! पण माझा होऊ नाहीं शकला तो कधी. याच एका दुःखाने त्याला मरण जवळ करावासं वाटलं. या त्याच्या सहवासात काही पहिली वर्ष सरली द्वेशाची !! पण त्याने नंतर खूप प्रेम केलं माझ्यावर. पहिल्या साऱ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न ही केला त्याने. पण त्याचच मन त्याला आतून खात राहील. आयुष्याच्या संध्याकाळी त्याने फक्त मला एवढंच मागणं मागितलं होत की माझ्या नंतर मला अग्नी दिल्यावर अखेरपर्यंत मी तिथे थाबावं. आणि त्याची ती इच्छा मी पूर्ण केली. शेवटची ती राख ही मला माफी मागते आहे असा मला भास झाला.” मनोज डोळ्यातील अश्रू पुसून पुढे वाचत होता.
“सगळं सहन करूनही अखेर माझ्याच माणसांनी मलाच दोषी धरले याची खंत खूप आहे मला. पण माझ्याच कोणीतरी अखेरपर्यंत माझाच होऊन राहावं हेही खूप काही बोलत मनाशी. हो मनोज!! तुझ्या या प्रेमा समोर मी निशब्द झाले. खरंच इतकं का रे प्रेम करतोस माझ्यावर तू?? कदाचित या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी अनुत्तरितच राहील.असो जास्त काही अजुन लिहिणार नाही!! आयुष्यात कोणाचा तरी सहवास हवा असतो !! तुला माझ्या आठवणींचा आहे आणि मला तुझ्या आठवणींचा!! काळजी घे !!
तुझीच
सुमेधा …
पत्र तसेच हातात ठेवून मनोज कित्येक वेळ खिडकीतून बाहेर बघत राहिला. जणू मनाशी कित्येक गोष्टी बोलू लागला.
“आयुष्यात माणूस खऱ्या प्रेमाला का मुकतो!! तेच मला कधी कळत नाही!! कित्येक वर्ष सुमेधाच्या आठवणी या उराशी बाळगून होतो मी. ती पुन्हा भेटली तर जाऊ नाही द्यायचं तिला!! अस मनाशी पक्क ठरवल होत ना !! मग आता कुठे जाऊ शोधायला पुन्हा तिला!! की जाऊन भेटाव सुमेधाला आणि खडसावून सांगावं की पुन्हा निघून गेलीस तर बघ !!! पण शोधावं तरी कुठे तिला?? त्या दाही दिशांनी एकच कल्लोळ केला असे का भास व्हावे !! जायचं असेन तर खुशाल जा म्हणावं तिला!! पण या आठवणींचा सहवास नको आता मला !! घेऊन. जा त्याही सोबत !! ” अचानक मनोज भानावर आला.
आयुष्यात एकदा नाही तर दोनदा प्रेम केलं. पण दोन्ही वेळा ती ओंजळ फक्त आठवणींनीच भरून गेली.
मनोज पुन्हा त्या जुन्या कट्ट्यावर गेला. एकटाच जणू भरलेल्या आठवणीची ओंजळ रिकामी करण्यास. पण तिथे आज कोणचं का नव्हते?? त्या कल्लोळातही तो एकटेपणा खूप काही सांगत होता. सुमेधा पुन्हा आपल्याला आठवणीच्या सहवासात सोडून गेली !! जणू कायमची !!
आठणींचा तो सहवास
उगाच मला का छळतो
तुझ्या असण्याचे खोटे भास
मनास आज का देतो
शोधतो दाही दिशा
पुन्हा पुन्हा तिथेच येतो
तू ना दिसताच त्यास
बावाऱ्या मनास का बोलतो
सांगु कसे मी त्याला
उगाच का व्यर्थ शोधतो
आठवणीतल्या तुला
माझ्या अश्रू मध्ये रोज भेटतो !!
मनोज कित्येक वेळ त्या कट्ट्यावर बसून होता. सुमेधाच्या आठवणींच्या सहवासात …!!!