Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » अध्यात्मिक

समर्थ रामदासस्वामीकृत राममंत्राचे श्र्लोक || Devotional ||

समर्थ रामदासस्वामीकृत राममंत्राचे श्र्लोक || Devotional ||

नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ति मोठी ।
जडे गर्व ताठा अभीमान पोटीं ।
कसा कोणता नेणवे आजपारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १ ॥

नको कंठ शोषूं बहू वेदपाठी ।
नको तूं पडूं साधनाचे कपाटीं ।
घडे कर्म खोटें बहू तो दगा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २ ॥

तुला ही तनू मानवी प्राप्त झाली ।
बहू जन्मपुण्यें फळालागिं आली ।
तिला तूं कसा गोंविसी वीषमा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३ ॥

जरी ही तनू रक्षिसी पुष्ट कांहीं ।
तरी भोग तो रोग होईल देही ।
विपत्ती पुढें ते न ये बोलतां रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४ ॥

खुळे हस्तपादादि हे मग्न होती ।
दिली मंद होवोनियां कर्ण जाती ।
तनू कंप सर्वांगि होती कळा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ५ ॥

कफें कंठ हा रोध होईल जेव्हां ।
अकस्मात तो प्राण जाईल तेव्हां ।
तुला कोण तेथें सखे सोयरे रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ६ ॥

तुझें बाल्य तारुण्य गेलें निघोनी ।
कळेना कसे लोक जाती मरोनी ।
करीसी मुलांची स्वहस्तें क्रिया रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ७ ॥

दुराशा नकोरे परस्त्री धनाची ।
नको तूं करुं नीच सेवा जनाची ।
पराधीन कैसा भला दिससी रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ८ ॥

मदें डोलसी बोलसी साधुवृंदा ।
कसें हीत तूं नेणसी बुद्धिमंदा ।
रिकामाचि तूं गुंतसी वाउगा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ९ ॥

बहू व्याप संताप तो मूळ पापा ।
गतायुष्य द्रव्य नये कोटि बापा ।
कळेना कसें कोणता तो नफा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १० ॥

तुझे आप्त द्रव्यार्थे नुस्तेचि होती ।
तनू हेचि ते माजि ते बोळवीती ।
असें जाणुनी हीत माझें करारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ११ ॥

कुटुंबी स्त्रिया पुत्र ते दास दासी ।
बहु पोशिसी सोसुनी दुःखराशी ।
त्यजी भार काबाड ओझें कितीरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १२ ॥

बहू इच्छिसी कीर्ति सन्मान कांही ।
सुखाचा कधीं अंतरीं लेश नाही ।
फुकाचें मुखीं नाम तें कां नये रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १३ ॥

रवीसूत ते दूत विक्राळ येती ।
तुझ्या लिंगदेहासि ओढोनि नेती ।
तुला खंडिती मुंडिती दंडितीरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १४ ॥

नको वीषयीं फारसा मस्त होऊं ।
नको मानदंभा मध्यें चित्त रोवूं ।
नको भस्म लाऊं जटाभार कांरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १५ ॥

नको फार मंत्राग्निच्या मंत्रदीक्षा ।
नको जारणामारणादी अपेक्षा ।
कळायुक्त चातुर्यता वीकळारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १६ ॥

नको याग अष्टांग तो घोर प्राणा ।
नको कृच्छ्रचांद्रायणीं हट्ट जाणा ।
अपभ्रंश हा मार्ग कीं वोखटारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १७ ॥

कदापी घडेना व्रतें यज्ञ दानें ।
नसे द्रव्य गांठीं करावें जपानें ।
घडेना घडे यद्यपी कां फुकारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १८ ॥

नसे सत्य कांहीं दिसे दों दिसांचें ।
तुला लूटिती चोरटे लोक साचे ।
स्त्रिया पुत्र कामा न येती तुलारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ १९ ॥

नको तूं कदापी करुं तीर्थयात्रा ।
तनू-दंडणीं क्षीणता सर्व गात्रा ।
करी ग्रस्त आयुष्य तूं कोणसारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २० ॥

तुला येम पाशीं करीं बद्ध जेव्हां ।
कसा कोण तो सोडवी सांग तेव्हां ।
यमाला कदापी दया ते नये रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २१ ॥

तपस्वीं मनस्वी बहू पार गेले ।
दुजी सृष्टिकर्ते असे थोर मेले ।
चिरंजीव अल्पायु गेले कितीरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २२ ॥

बहू कामधंद्यामधें मग्न होसी ।
किती नांवरुपा जगीं मीरवीसी ।
कशाला तुला उंट घोडे नगारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २३ ॥

ह्मणे देश माझे भुमी गांव वाडे ।
शिबीकासनी बैससी उंच लोडें ।
कसा उंच तूं मंचकीं लोळसीरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २४ ॥

दशग्रीव लंकापुरीं मस्त झाला ।
अकस्मात मृत्युपुरीमाजि गेला ।
चिरंजीव हें राज्य बीभीषणारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २५ ॥

अधोमूख विष्टेमध्यें मायपोटीं ।
पचे पिंड हा सोसिसी दुःखकोटी ।
स्मरेना कसें लाज नाहीं तुलारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २६ ॥

असें भोगुनी पंचचत्वारिमासीं ।
पुढें दैवयोगें सख्या जन्मलासी ।
कसा वीसरे ध्यान सोहं पुढेंरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २७ ॥

कळे वायुचा स्पर्श होतांचि जेव्हां ।
रडे बाळ सोहं ह्मणे जीव तेव्हां ।
पुढे खेळ नाना परी खेळसीरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २८ ॥

दिसंदीस मातापिता बंधु जाणे ।
परा रोग नाना करी तेथ ठाणें ।
जरी दैवयोगें पुढें वांचलारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ २९ ॥

करी लग्न मुंजी पितामाय त्याचे ।
करी शाहणा मारुनी रुप साचें ।
करी पोटधंदा बरा लागलारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३० ॥

बहु पाळिलें पोशिलें मायबापीं ।
निघे भिन्न निंदूनियां पापरुपी ।
स्त्रियेचे मुळें सर्व ही दुर्गतीरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३१ ॥

शतायू नव्हे पूर्ण आयुष्य कांही ।
असें हीत आहीत अद्यापि पाहीं ।
अशाही मध्यें बालतारुण्य सारें ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३२ ॥

करीसील धर्माश्रमा अस्त जेव्हां ।
बहू घातपाती घरीं होय तेव्हां ।
भरी पोट पोशी कुटुंबी बरारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३३ ॥

रवीऊदयो अस्त तों पोटधंदा ।
स्तवी आर्जवी तो करी येरनिंदा ।
कळेना पुढें काय होणार तें रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३४ ॥
बहू ढीग मागें पुढें मोहरांचे ।
मदोन्मत्त होवोनियां तेथ नाचे ।
असे गर्व त्यालागिं नर्कासि थारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३५ ॥

अलंकार नाना तनू सज्जवीतो ।
मना दर्पणीं पाहूनी रंजवीतो ।
कळेना जळे सर्पणीं रुप तें रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३६ ॥

बहू द्रव्य गांठी पुन्हां मेळवीशी ।
गुरु विप्र बंधू कसे चाळवीसी ।
दुरावा कशाला मशाला पुढेंरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३७ ॥

जरी क्षीण देहीं परी वृद्धकाळीं ।
करीती स्त्रिया सूत पणतू टवाळी ।
धना ऊचकी लागतां गूज कीरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३८ ॥

रवी जे घडी हाणतां काळ जेव्हां ।
श्रुती शब्द हे गर्जती तास तेव्हां ।
ह्मणे क्षीण आयुष्य गेलें तुझेरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ३९ ॥

कशी जन्मुनी माय त्वां वांझ केली ।
कशी लाज वंशा कुळा लावियेली ।
भूमिभार घोडा पशु हा खरारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४० ॥

कसा कोणता काळ येईल जेव्हां ।
दिनासारिखा काळ नेईल तेव्हां ।
तुझें वित्त तारुण्य लोपेल सारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४१ ॥

तुला खंडिती दंडिती येम पाकीं ।
तुला खंडुनि अग्निकुंडांत टाकी ।
तुला ओढिती तोडिती सांडसेंरे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४२ ॥

असा उंच भोगोनियां कल्पकोटी ।
पुन्हां जन्म घे लक्ष चौर्‍यांशि कोटी ।
महासंकटीं हिंपुटी लोक सारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४३ ॥

नको सोंग छंदे करुं ढोंग कांहीं ।
नको शिष्य शाखामठीं सुख नाहीं ।
अहंतेमुळें नाश होतो तपा रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४४ ॥

नको चाउटी वाउगी या जनाशीं ।
हरीचिंतनीं ध्यान लावी मनासी ।
अमोलीक हा काळ जातो वृथारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४५ ॥

महाघोर हा थोर संसार मोाठा ।
कळे संतसंगें समूळींच खोटा ।
कळे भक्तिमुक्ति विरक्तीच गारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४६ ॥

त्यजा दुष्टसंगासि पाहा भल्यासीं ।
करा हीत येऊं नका गर्भवासीं ।
जसें अंतिंचें दुःख होते जिवारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४७ ॥

बहू भोगितां पूढती नर्क आहे ।
असें जाणुनी त्या सुखामाजि राहें ।
प्रपंचीं उगा कां गपा मारिसी रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४८ ॥

कळे साधनें याविणें सर्व निंदी ।
हरे राम हा मंत्र जो त्यासि वंदी ।
हरे राम हे माळिकाक्षा धरारे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपारे ॥ ४९ ॥

॥ इति रामदासस्वामीकृत श्रीराममंत्राचे श्र्लोक संपूर्ण ॥

SHARE

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter
  • Tumblr
  • Pinterest
समर्थ रामदासस्वामीकृत राममंत्राचे श्र्लोक DEVOTIONAL

READ MORE

gold buddha figurine in gold and red floral dress
पंचश्लोकि गणेशपुराण || Devotional ||
श्रीसन्तानगणपतिस्तोत्रं || Devotional ||
श्रीसन्तानगणपतिस्तोत्रं || Devotional ||
मनोरथसिद्धि गणेशस्तोत्र
मनोरथसिद्धि गणेशस्तोत्र || Devotional ||
मयूरेश स्तोत्रं || MayureshStotr || DEVOTIONAL || ADHYATMIK ||
ऋणमोचनमहागणपतिस्तोत्रं || Stotr || Devotional ||

TOP POEMS

person standing near lake

ओझे भावनांचे || OJHE BHAVANANCHE ||

"नकळत साऱ्या भावनांचे ओझे आज का झाले काही चेहरे ओळखीचे त्यात काही अनोळखी का निघाले!! बोलल्या भावना मनाशी तेव्हा सारे गुपित उघडे का झाले क्षणभर सोबती हसवून जाता आपलेच का रडवून गेले!!
woman with weary eyes

मला माहितेय || MARATHI KAVITA ||

खुप बोलावंसं वाटतं तुला पण मला माहितेय आता तु मला, बोलणार नाहीस!! सतत डोळे शोधतात तुला पहाण्यास एकदा आता नजरेस तु पुन्हा, दिसणार नाहीस!!
white black and gray floral textile

सावली || SAWALI || MARATHI POEM ||

आठवणींची सावली प्रेम जणु मावळती दूरवर पसरावी चित्र अंधुक लांबता ही सोबती दुर का ही चालती का मझ तु सोडती विरह नकळत
woman and child walking on beach

माझी आई || MAJHI AAI || MARATHI POEM ||

अथांग भरलेल्या सागराचे कोणी मोजेल का पाणी त्या सम माझ्या आईचे प्रेम नजरेत दिसते आकाश सारे सामावून घ्यावे मिठीत वारे त्या सम् माझ्या आईचे मन

TOP STORIES

fashion man people woman

द्वंद्व || कथा भाग ५ || शेवट भाग ||

विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सायली अखेर भेटेल का विशालला ?? की पुन्हा विशालच प्रेम अधुरच राहील. नक्की वाचा शेवट भाग.
close up photo of skull

स्मशान || शेवट भाग || Marathi Katha ||

आयुष्यभर जगण्यासाठी क्षण न क्षण जळत राहायचं !! कशासाठी ?? अखेर राख होऊन धगधगत राहण्यासाठी ?? परवा हाच सरपंच किती रुबाबात बसला होता !!! आज त्याची राख झाली!! ज्या वाड्यासाठी अट्टाहास केला तो तर मिळाला नाहीच !! भेटलं अखेर काय ?? तर ही समाधानाची छोटीशी जागा !! अखेरचं जळण्यासाठी !! पण हे का आणि कशासाठी ??
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

"कुठ गेली होतीस प्रिती ?? आणि तुझा फोन बंद का लागतोय ?? "स्वतःला सावरतच प्रिती बोलते. "मैत्रिणीकडे गेले होते!!!" "यायला उशीर का झाला ??" "झाला उशीर !! जाऊदे ना आता !! जाऊन झोप बर तू !!" प्रिती थोड्या चिडल्या आवाजात बोलते. "कुठ गेली होतीस प्रिती !! खरं सांग !! त्या अनिकेतला भेटायला गेली होतीस ना ??" प्रिती अगदी रागात येत म्हणाली.
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न || कथा भाग १ || MARATHI KATHA ||

"स्वप्नातल्या ध्येयास तू उगाच फुंकर घाल वेड्या मनास आज तू उद्याची साद घाल नसेल सोबती कोणी तरी एकटाच तू पुढे चाल मागे उरले काय ते पाहण्या मनास आवर घाल..!

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest