Content
शेजारती
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता। स्वामी करा अवधूता।
चिन्मय सुखधामी जाउनी, पहुडा एकांता॥धृ॥
वैराग्याचा कुंचा घेवूनी चौक झाडीला। स्वामी हो चौक झाडीला।
तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला॥१॥
पायघड्या घातल्या सुंदर नवविध भक्ती। स्वामी नवविध भक्ती।
ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती॥२॥
भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला। हृदयाकाशी टांगिला।
मनाची सुमने करुन गेला शेजेला॥३॥
द्वैताचे कपाट लावूनी एकत्र केले। गुरुने एकत्र केले।
दुर्बुध्दीच्या गाठी सोडूनी पडदे सोडले॥४॥
आशा तृष्णा कल्पनांचा सांडूनी गलबला। गुरु हा सांडूनी गलबला।
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला॥५॥
अलक्ष उन्मन सेवूनी स्वामी नाजूक हा शेला। गुरु हा नाजूक शेला।
निरंजन सद्-गुरु स्वामी निजे शेजेला॥६॥