Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » अध्यात्मिक

श्री समर्थ रामदास स्वामी लिखीत मनाचे श्लोक || DEVOTIONAL ||

Category अध्यात्मिक
श्री समर्थ रामदास स्वामी लिखीत मनाचे श्लोक || DEVOTIONAL ||
Share This:

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥

सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥

मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥

मना सांग पां रावणां काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १३ ॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥

मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥

मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥

मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥

मना सज्जना हीत माझे करावे ।
रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥

न बाले मना राघवेवीण काही ।
मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥

रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥

मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥

देहेरक्षणाकारणे यत्न केला ।
परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची ।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥

महासंकटी सोडिले देव जेणे ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥

अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला ॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥

उपेक्षी कदा रामरूपी असेना ।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥

असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥

मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगे समाधान बाणे ॥
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
विविके कुडी कल्पना पालटीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥

बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥

बहुतांपरी हेचि आता धरावे ।
रघूनायका आपुलेसे करावे ॥
दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥

मना सज्जना एक जीवी धरावे ।
जनीं आपुले हीत तुवां करावे ॥
रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसी तो निजघ्यास राहो ॥ ४३ ॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥

जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥

मना जे घडी राघवेवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥

मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे सत्य साचा ॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥

सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकी सदा एक देवासि पाहे ॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥

नसे अंतरी काम नानाविकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥

मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी ।
प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे ।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥
करी सूखसंवाद जो ऊगमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी ।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥

नसे मानसी नष्ट आशा दुराशा ।
वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥
तया अंतरी क्रोध संताप कैचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥

जगी होइजे धन्य या रामनामे ।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥
उदासीनता तत्त्वता सार आहे ।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

नको वासना वीषयी वृत्तिरूपे ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनी कामना राम नही जयाला ।
अती आदरे प्रीति नाहि तयाला ॥ ५९ ॥

मना राम कल्पतरू कालधेनू ।
निधी सार चिंतामणी काय वानू ॥
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥
जनीं सज्जनीं वाद हा वाढवा ।
पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥

निजध्यास तो सर्व तूटोनी गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला ॥
सुखानंद आनंद भेदे बुडाला ।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥
करी सार चिंतामणी काचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥

नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥
धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥

नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥
जनीं वीष खाता पुढे सूख कैचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥

घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥
करी संकटी सेवकांचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥

बळे आगळा राम कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥

सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७० ॥

जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती ॥
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥

न वेचे कदा ग्रंथची अर्थ काही ।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥
महाघोर संसारशत्रू जिणावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥

देहेदंडणेचे महादुःख आहे ।
महादुःख ते नाम घेता न राहे ॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥

बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥

समस्तांमधे सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधूत पाहे ॥
जिवा असंशयो वाऊगा तो त्यजावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥

करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।
तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।
वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥

मना पावना भावना राघवाची ।
धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।
नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥

मना मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिताही न साहे ॥ ८१ ॥

बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो ॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३ ॥

विठोने शिरी वाहिला देवराणा ।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद सेवोनि आहे ॥
तयावीण तो शीण संदेहकारी ।
निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥
हरीभक्त तो शक्त कामास भारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८६ ॥

बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥

जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥

न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥

नको वीट मानू रघूनायकाचा ।
अती आदरे बोलिजे राम वाचा ॥
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥

अती आदरे सर्वही नामघोषे ।
गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥
हरी तिष्ठतू तोषला नामघोषे ।
निशेषे हरामानसी रामपीसे ॥ ९२ ॥

जगी पाहता देव हा अन्नदाता ।
तया लागली तत्त्वता सार चिंता ॥
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।
मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥

तिन्ही कोप जाळू शके कोप येता ।
निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥
जपे आदरे पार्वती विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ॥
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥

मुखी नाम नीही तया मुक्ति कैची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहू तारिले मानवी देहधारी ॥
तया रामनामी सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥

जगी धन्य वाराणसी पुण्यराशी ।
तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥
मुखे रामनामावळी नित्यकाळी ।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥

यथासांग रे कर्म तेही घडेना ।
घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥
दया पाहता सर्व भूती असेना ।
फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥

Pages: 1 2 3
Tags जय जय रघुवीर समर्थ! श्री समर्थ रामदास स्वामी लिखीत मनाचे श्लोक DEVOTIONAL manache shlok

RECENTLY ADDED

कावेरीस्तुतिः || Stuti || Devotional ||
दीप प्रज्वलन मंत्र: || Devotional || शुभं करोति ||
बुद्धिस्तोत्र || Buddhistotr || Adhyatmik ||
सरस्वती वंदना || DEVOTIONAL ||
श्रीगोपालद्वादशनाम स्तोत्रम् || Devotional ||
श्री कृष्ण स्तुती || Stuti || Devotional ||
नमामि नारायणपादपङ्कजम् स्तोत्रम् || Devotional ||
नमामि नारायणपादपङ्कजम् स्तोत्रम् || Devotional ||

TOP POST’S

कहाणी ललितापंचमीची || Kahani || Devotional ||

कहाणी ललितापंचमीची || Kahani || Devotional ||

आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मरुन गेले. भाऊबंदांनी त्यांच काय होते नव्हते ते सगळे हिरावून घेतले. मुलांना देशोधडीस लावले. पुढे ती मुले जातां जातां एका नगरांत आली. दोन प्रहराची वेळ झाली आहे. दोघेही दमून गेले आहेत, भुकेने कळवळले आहेत. तोंड सुकुन गेली आहेत, असे ते दोघे त्या नगरांत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्यासाठी घरातून बाहेर आला. त्याने त्या मुलांना पाहिले. आपल्या घरी बोलावून नेले. जेवू घातले. नंतर त्यांची सगळी हकीगत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकिगत त्या ब्राह्मणाला सांगितली. ब्राह्मणाने त्या मुलांना घरी ठेवून घेतले. त्यांना तो वेदाध्यन शिकवू लागला. ती मुलेही वेद शिकू लागली. असे करता करता बरेच दिवस. महिने, वर्ष गेली.
Dinvishesh

दिनविशेष ६ जुलै || Dinvishesh 6 July ||

१. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. (१९१०) २. डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन झाले. (१७८५) ३. आल्फ्रेड डिकिन हे ऑस्ट्रियाचे पंतप्रधान झाले. (१९०५) ४. अडॉल्फो लोपेझ मटिओस हे मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५८) ५. मलावी हा देश ब्रिटीश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९६४)
Dinvishesh

दिनविशेष ११ फेब्रुवारी || Dinvishesh 11 February ||

१. रॉबर्ट फुल्टन यांनी स्टीमबोटचे पेटंट केले. (१८०९) २. नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका , सत्तावीस वर्ष ते तुरुंगात होते. (१९९०) ३. फ्रेडरिक एबर्ट हे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९१९) ४. सोव्हिएत युनियनने इस्राएल सोबत राजनीतिक संबंध संपुष्टात आणले. (१९५३) ५. जपान हे जगातले चौथे राष्ट्र बनले ज्यांनी पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह प्रस्थापित केला. (१९७०)
Dinvishesh

दिनविशेष १६ ऑगस्ट || Dinvishesh 16 August ||

१. सायप्रसला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०) २. एडविन प्रेस्कॉट यांनी रोलर कोस्टरचे पेटंट केले. (१८९८) ३. कोलकत्ता मध्ये वांशिक संघर्षात ४०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४६) ४. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांनी कृष्णवर्णीय लोकांना मतदान अधिकार मिळवण्यासाठी मियामी फ्लोरिडा येथे आंदोलन केले. (१९६१) ५. स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विद्यालय बनले. (१९१३)
man and woman near grass field

तुला लिहिताना..!! || Tula Lihitana Kavita Marathi ||

मनातल्या तुला लिहिताना जणु शब्द हे मझ बोलतात कधी स्वतः कागदावर येतात तर कधी तुला पाहुन सुचतात न राहुन स्वतःस शोधताना तुझ्या मध्येच सामावतात

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest