घोर हा नको फार कष्टलों ॥
निजहितास मी व्यर्थ गु्ंतलों ॥
वारिं शीघ्र ही संसारयातना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १ ॥
विषय गोड हे लागले मला ॥
यामुळें असे घात आपुला ॥
कळुनियां असे भ्रांति जाइना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ २ ॥
त्रिविध ताप हा जाळितो अती ॥
काम क्रोध हे जाण पीडिती ॥
चित्त सर्वथा स्वस्थ राहिना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ३ ॥
स्त्रीधनादि हें आठवीं मनीं ॥
छंद हाचि रे दिवसयामिनीं ॥
विसरलों तुला दीनपालना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ४ ॥
माउली पिता बंधु सोयरा ॥
तूंचि आमुचा निश्र्चयें खरा ॥
शरण तूज मी विघ्नभंजना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ५ ॥
म्हणवितों तुझा दास या जनीं ॥
सकळ व्यापका जाणशी मनीं ॥
भुक्ति मुक्ति दे भक्तपालना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ६ ॥
काय काय रे साधने करुं ॥
मी असें तुझें मूर्ख लेंकरुं ॥
विटंबिती मला द्वैतभावना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ७ ॥
विषयचिंतनें शोक पावलों ॥
देहबुद्धिनें व्यर्थ नाडलों ॥
भालचंद्रजी तोडि बंधना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ८ ॥
गजमुखा तुझी वाट पाहतां ॥
नेत्र शीणले जाण तत्वतां ॥
भेटसी कधीं भ्रमनिवारणा ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ९ ॥
प्रभु समर्थ तूं आमुचे शिरीं ॥
वेष्टिलों असें विषय पामरीं ॥
नवल हेंचि रे वाटतें मना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १० ॥
अगुण अद्वया तूं परात्परा ॥
पार नेणवे विधिहरीहरां ॥
अचल निर्मळा नित्य निर्गुणा ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ ११ ॥
जिवन व्यर्थ हें तूजवेगळें ॥
स्वहित आपुलें काय साधिलें ॥
सुख नसे सदा मोह यातना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १२ ॥
फारसें मला बोलतां न ये ॥
पाउलें तुझीं देखिलीं स्वयें ॥
मांडिली असे बहुत वल्गना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १३ ॥
दीनबंधु हें ब्रीद आपुलें ॥
साच तूं करीं दाविं पाउलें ॥
मंगलालया विश्र्वजीवना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १४ ॥
नाशिवंत रे सर्व संपदा ॥
हें नको मला पाव एकदां ॥
क्षेम देउनी चित्तरंजना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १५ ॥
जातसे घडी पलयुगापरी ॥
लागली तुझी खंति अंतरीं ॥
स्वामि आपुला विरह साहिना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १६ ॥
कळेल तें करीं विनवणें किती ॥
तारिं अथवा मारिं गणपती ॥
सकल दोष संकष्टनाशना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १७ ॥
आवडे मला त्रिभुवनाकृती ॥
पूजुनी वरी करिन आरती ॥
धांव पाव रे मोदकाशना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १८ ॥
ह्रदय कठिण तूं न करिं सर्वथा ॥
अंत आमुचा पाहसि पूरता ॥
सिद्धिवल्लभा मुषकवाहना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ १९ ॥
कल्पवृक्ष तूं कामधेनु वा॥
लाविजे स्तनीं जीविंच्या जिवा ॥
हाचि हेत रे शेषभूषणा ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ २० ॥
तारिं मोरया दुःखसागरीं ॥
गोसाविनंदन प्रार्थना करी ॥
आत्मया मनीं जाण चिद्घना ॥
हे दयानिधे श्री गजानना ॥ २१ ॥
प्रारंभीं विनती करुं गणपती विद्यादयासागरा ॥
अज्ञानत्व हरोनि बुद्धि मति दे आराध्य मोरेश्र्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघें देशांतरा पाठवीं ॥
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहू तोषवीं ॥ २२ ॥
॥ इति गोसाविनंदन विरचितं श्री गणेश स्तवन संपूर्णं ॥
श्री गणेश स्तवन || Shri Ganesh Stavan || Devotional ||
