Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क

मुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीशिवलीलामृत अध्याय पंधरावा || Devotional ||

श्रीशिवलीलामृत अध्याय पंधरावा || Devotional ||

श्रीशिवलीलामृत अध्याय पंधरावा || Devotional ||

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयश्रीगंगाधरा ॥ त्रिशूळपाणी पंचवक्रा ॥
अर्धनारीनटेश्वरा ॥ श्रीशंकरा नीलकंठा ॥१॥

भस्मोद्धलना त्रिनयना ॥ कर्पूरगौरा नागभूषणा ॥
गजास्यजनका ॥ गौरीरमणा ॥ भक्तवत्सला दयानिधे ॥२॥

तू आदिमध्यांतरहित ॥ अज अव्यय मायातीत ॥
विश्वव्यापका विश्वनाथ ॥ विश्वंभर जगद्गुरो ॥३॥

तू नामगुणातीत असून ॥ स्वेच्छे मायेसी आश्रयून ॥
नानारूप नानाभिधान ॥ क्रीडार्थ होसी सर्वेशा ॥४॥

सत्त्व रज तम हे गुणत्रय ॥ तूचि नटलासी निःसंशय ॥
स्थिर चरात्मक भूतमय ॥ तद्रूपचि आहे बा ॥५॥

तू ब्रह्मांड आदिकारण ॥ विश्वसूत्र तव अधीन ॥
जैसे हालविसी स्वेच्छेकरून ॥ तैसे संपूर्ण नाचत ॥६॥

तुझिया इच्छेवाचुनी ॥ काहींच नोहे जीवांचेनी ॥
ऐसे जाणोनि अंतःकरणी ॥ तुज शरण रिघती जे ॥७॥

तया भक्तांसी तू शंकर ॥ पूर्ण काम करोनि साचार ॥
भवाब्धीतूनि नेऊनि पार ॥ स्वपदी स्थिर स्थापिसी ॥८॥

ऐसा तुझा अद्भुत महिमा ॥ नकळे त्याची कवणा सीमा ॥
म्हणोनि केवळ परब्रह्मा ॥ शरण आलो असे पा ॥९॥

तरी दयाब्धे मज पामरा ॥ न्यावे भवाब्धिपैलपारा ॥
तुजवाचूनि कोण दातारा ॥ अनाथासी उद्धरील ॥१०॥

असो आता बहु विनवणी ॥ आधी पुरवी मनाची धणी ॥
त्वद्रुण प्राकृतवाणी ॥ कीजे ऐसी असे जी ॥११॥

तुझिया कृपे शिवलीलामृ ॥ चवदा अध्याय वर्णिले यथार्थ ॥
वेदव्यासे स्कंदपुराणात ॥ ब्रह्मोत्तरखंडी कथिले जे ॥१२॥

परी माझ्या मनाची तृप्ती ॥ जाहली नाही बा पशुपती ॥
म्हणोनि आणिक ह्रदयी स्फूर्ती ॥ देऊनि कथा वर्णावी पा ॥१३॥

तू शंकर होता प्रसन्न ॥ हाता येते सर्व त्रिभुवन ॥
महाराज तू भक्तालागून ॥ वरप्रदाने तोषविसी ॥१४॥

तुज श्रीशंकरा समान ॥ वरदाना शक्त नसे कोण ॥
तुझे देखोनि उदारपण ॥ ब्रह्मा विष्णूही लाजती ॥१५॥

काय वर्णावी उदारता ॥ प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता ॥
देऊनिया रावणभक्ता ॥ आत्मलिंग वोपिलेसी ॥१६॥

तेवीच दैत्येंद्र त्रिपुर ॥ तारक आणि भस्मासुर ॥
इत्यादि स्वभक्तालागी अपार ॥ अनिवार वर दिल्हेसी ॥१७॥

तू अत्यंत भोळा भगवान ॥ कपटेहि करिता तव सेवन ॥
देऊनि इच्छित वरदान ॥ आनंदविसी सेवका ॥१८॥

असो ऐका श्रोते सर्व ॥ ऐसा करिता म्या शिवस्तव ॥
ह्रदयी प्रगटोनि दयार्णव ॥ स्फूर्ति देत उत्तम ॥१९॥

अरे ह्या कलियुगामाझारी पाखंडी मातोनि पृथ्वीवरी ॥
श्रुति स्मृति पुरणोक्त सारी ॥ कर्मे बुडविते जाहले ॥२०॥

जैनमत ते आगळे ॥ सर्व भूमंडळी पसरले ॥
तेणे योगे वर्ण सगळे ॥ भूलोनि गेले साचार ॥२१॥

ते देखोनि म्या सत्वर ॥ तन्मतखंडनालागी भूवर ॥
शंकरनामे अति सुंदर ॥ जो अवतार धरियेला ॥२२॥

ते माझे अद्भुत चरित्र ॥ आधुनिकांसी न कळे पवित्र ॥
तरी तू प्राकृत भाषे विचित्र ॥ वर्णन करी श्रीधरा ॥२३॥

ऐसी शिवे केली प्रेरणा ॥ म्हणोनि पुराणार्थविवरणी ॥
एकीकडे ठेवूनि जणा ॥ जगद्गुरुचरित्र वर्णितो ॥२४॥

तरी सर्व तुम्ही श्रोते संत ॥ सावध एकीकडे ठेवूनि जाणा ॥
जगद्गुरुकथा ऐकता समस्त ॥ पापपर्वत भंगती ॥२५॥

कल्पारंभी कमळासने ॥ परब्रह्माच्या आज्ञेने ॥
महदादिकांच्या योगाने ॥ ही सर्व सृष्टी रचियेली ॥२६॥

इयेच्या कल्याणालागून ॥ सर्वमार्गदर्शक पूर्ण ॥
ऋग्यजुःसाम अथर्वण ॥ हे चार वेद जाहले ॥२७॥

परी त्या वेदांचे अर्थराशी ॥ स्पष्ट न होता सर्वांसी ॥
म्हणोनि परमात्म्याच्या मानसी ॥ कृपासमुद्र उचंबळला ॥२८॥

मग तो स्पष्ट व्हावयालागुनी ॥ पाणिन्यादि रूपे अवतरोनी ॥
व्याकरणादि षट्शास्त्रे झणी ॥ करिता जाहला परमात्मा ॥२९॥

आणि मन्वादि स्मृती ॥ करिता झाला तो विंशती ॥
तदभ्यासे सर्व जगती ॥ श्रुत्यर्थ जाणू लागले ॥३०॥

पुढे कलियुग होता प्राप्त ॥ भूमंडळ मानव समस्त ॥
अल्पायु मंदमती अत्यंत ॥ ऐसे जाण होतील ॥३१॥

आणि श्रुती स्मृति शास्त्रे केवळ ॥ गगनापरी अत्यंत विशाळ ॥
म्हणोनि त्यांचा मानवा सकळ ॥ अभ्यास नोहे कदापी ॥३२॥

तेणे ते सर्व अति अज्ञानी ॥ आणि सन्मार्गभ्रष्ट होऊनी
जन्ममरणादि तीव्र दुःखांनी ॥ तडफडतील निश्चये ॥३३॥

ऐसे पूर्वी नारायणे ॥ जाणुनी मग दयार्द्रपणे ॥
कलिजनांच्या उद्धाराकारणे ॥ व्यासावतार धरियेला ॥३४॥

आणि त्या व्यासरूपे चांग ॥ चारी वेदांचे करूनि विभाग ॥
वेदार्थदर्शक ऐसे सवेग ॥ महाभारत रचियेले ॥३५॥

आणि विष्णु शिव नारद पद्म ॥ मार्कंडेय भागवत ब्राह्म ॥
अग्नि भविष्य वराह कूर्म ॥ मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त ॥३६॥

स्कंद वामन आणि गरुड ॥ तेवीच अठरावे ब्रह्मांड ॥
ऐसी अष्टादश पुराणे प्रचंड ॥ लोकोद्धारार्थ रचियेली ॥३७॥

मग मेदिनी एकैक ब्राह्मण ॥ व्यासकृत विभागातून ॥
यथामती एकैक भागालागून ॥ अभ्यासू लागले आनंदे ॥३८॥

आणि इतिहास पुराणे ऐकून ॥ सन्मार्गे चालू लागले संपूर्ण ॥
परी पुढे कलीच्या योगेकरून ॥ संकट दारुण पातले ॥३९॥

वेदशास्त्र पुराणे निंदूनि ॥ तयांचा दूरचि त्याग करूनि ॥
पाखंड बौद्धमते निशिदिनी ॥ वर्तू लागले सकळिक ॥४०॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ॥ लोम विलोम आणि संकर ॥
ह्या सर्व जातींचे नारी नर ॥ अधर्मे वर्तू लागले ॥४१॥

सकळ मेदिनीवरुती ॥ बौद्धधर्म पसरला अती ॥
देव ग्रामदेवतांप्रती भजू लागले जैनशास्त्रे ॥४२॥

वेदशास्त्रे पुराणे समस्त ॥ अनुदिनी चालली लोपत ॥
श्रुतिस्मृति पुराणोक्त पंथ ॥ बहुतेक पै लोपले ॥४३॥

अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ॥ ऐसे व्हावया काय कारण ॥
तरी मंडनमिश्र नामेकरून ॥ एक जैन उद्भवला ॥४४॥

तो केवळ बुद्धीचा सागर ॥ देवगुरूपरी वक्ता चतुर ॥
जयाच्या विद्येची साचार ॥ सरी न पावे शुकही ॥४५॥

तेणे स्वये अति दारुण ॥ करूनिया पै अनुष्ठान ॥
सरस्वती आणि कृशान ॥ प्रसन्न करून घेतले ॥४६॥

अग्नीमाजी हवन करूनी ॥ कल्पिले काढी कुंडांतुनी ॥
याचकजनांची इच्छा झणी ॥ तृप्त करी सर्वदा ॥४७॥

जैसा पूर्वी रावणसुत ॥ महापराक्रमी इंद्रजित ॥
हवन करोनी अश्वांसहित ॥ रथ काढिता जाहला ॥४८॥

तैसा तो मंडनमिश्रित अय्या ॥ अग्नीत हवन करूनिया ॥
त्यातूनि पितांबरादिक वस्तु चया काढीतसे यथेच्छ ॥४९॥

विद्या पाहता अति प्रबळ ॥ हुंकारे सूर्यासि उभा करील ॥
अत्यद्भुत सामर्थ्य केवळ ॥ सांगता वाचे न वदवे ॥५०॥

शास्त्री पुराणिक पंडित ॥ अय्याचा मानिती धाक बहुत ॥
वादविवाद करिता समस्त ॥ खंडित होत तत्क्षणी ॥५१॥

स्वये नवी शास्त्रे करूनी ॥ पंडिता जिंकी तयांचेनी ॥
कोणी न टिकती सभास्थानी ॥ मुखा गवसणी घालीत ॥५२॥

मोठे मोठे पंडित सगळे ॥ वादविवाद करिता थकले ॥
सकळ सृष्टीते जिंकिले ॥ आपुल्या शास्त्री अय्याने ॥५३॥

श्रुतिस्मृत्युक्त सद्धर्ममार्ग ॥ अधर्म ऐसे दावूनि सवेग ॥
आपुली शास्त्रे सर्वत्र सांग ॥ स्थापन केली दुष्टाने ॥५४॥

आणि चारी वर्ण अठरा याती ॥ यांची मती भ्रष्टावूनि अती ॥
ग्रामदैवते आपुल्या हाती ॥ आपुल्या शास्त्रे स्थापिली ॥५५॥

पूर्व शास्त्रे पडली एकीकडे ॥ जैने स्वशास्त्र केले उघडे ॥
तया अय्याच्या सामर्थ्यापुढे ॥ चकित झाले सर्वही ॥५६॥

आणि आमुचा धर्म नाही उत्तम ॥ जैनधर्म हा बहु सुगम ॥
ऐसे म्हणोनि सर्व जन परम ॥ अंतरी खिन्न जाहले ॥५७॥

मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ ॥ यासि टाकूनि तत्काळ ॥
चारी वर्ण अठरा याति सकळ ॥ चालवू लागले जैनधर्म ॥५८॥

अहो त्या मंडनमिश्रालागून ॥ असे सरस्वती सुप्रसन्न ॥
म्हणोनि त्याच्या जिव्हाग्री बैसोन ॥ बोलिल्या वचना सत्य करी ॥५९॥

आणि सदा होऊनि अंकित ॥ तया अय्याच्या घरी राबत ॥
मद्यपान करूनि सतत ॥ अनाचार वाढवी तो ॥६०॥

नित्य प्रातःकाळी उठोन ॥ मद्याचा एक घट मांडून ॥
तेथे सरस्वतीची पूजा करून ॥ नैवेद्य अर्पी मद्याचा ॥६१॥

ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा ॥ सरस्वतीच्या करूनि पूजना ॥
प्रसाद म्हणोनि मद्यपाना ॥ करीतसे यथेष्ट ॥६२॥

नाही आचार ना विचार ॥ कर्मभ्रष्ट पाखंडी थोर ॥
आपुला शास्त्रघर्म साचार ॥ सर्व स्थळी स्थापीतसे ॥६३॥

सर्व जनांसी शिष्य करून ॥ स्वये तयांचा गुरु होऊन ॥
श्रुतिस्मृत्युक्त धर्म संपूर्ण ॥ आचरो नेदी कवणासी ॥६४॥

ऐसा अनर्थ करिता फार ॥ भूमीसी होऊनि अति भार ॥
रात्रंदिवस ती अनिवार ॥ दुःखाश्रु टाकू लागली ॥६५॥

देव ब्राह्मण साधुसंत ॥ दुःखे पोळती अहोरात ॥
काही काळे हे वृत्त समस्त ॥ श्रुत जाहले शंकरासी ॥६६॥

तेव्हा तो शंकर पिनाकपाणी ॥ अत्यंत कोपाविष्ट होऊनि ॥
म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवुनी ॥ वर्तती की जैनधर्मे ॥६७॥

सकळही भूमंडळावर ॥ जैनधर्माचा झाला की प्रसार ॥
तरी आता मी अवतरोनी शंकर ॥ जैनधर्मा उच्छेदितो ॥६८॥

ऐसे कोपे बोलोनि शिव ॥ जो अनाथनाथ कृपार्णव ॥
पुराणपुरुष महादेव ॥ भाललोचन जगदात्मा ॥६९॥

जो अनंत ब्रह्मांडनायक ॥ भस्मासुरवरदायक ॥
त्रिशूळपाणी मदनांतक ॥ चंद्रशेखर उमापती ॥७०॥

तेणे तत्काळ मेदिनीवर ॥ उत्तरदेशी निर्मळ क्षेत्र ॥
तेथे विप्रकुळामाजी सत्वर ॥ घेतला अवतार नररूपे ॥७१॥

तेव्हा समुद्रवसनेलागुन ॥ परमानंद झाला संपूर्ण ॥
दश दिशांतरे प्रसन्न ॥ देव संपूर्ण हर्षले ॥७२॥

मंद सुगंध शीतळ ॥ वाहू लागला तो अनिळ ॥
वापी कूप नद्यांचे जळ ॥ झाले निर्मळ तत्क्षणी ॥७३॥

ऐसी शुभ चिन्हे अपार ॥ होऊ लागली पृथ्वीवरी ॥
मुनी जाणूनी समाचार ॥ निर्मळ क्षेत्री पातले ॥७४॥

आणि जाऊनिया विप्रसदनी ॥ बाळजातक वर्तवूनी ॥
शंकराचार्य ऐसे तत्क्षणी ॥ नाम ठेविते जाहले ॥७५॥

आता ह्या नामासी काय कारण ॥ तरी शं म्हणजे सुकल्याण ॥
कृञू धातृचा अर्थ करण ॥ आणि आचार्य म्हणजे सद्गुरू ॥७६॥

ऐसा हा तीन शब्दांचा अर्थ ॥ आणि हा सदुपदेश यथार्थ ॥
सर्व लोकांचे कल्याण सतत ॥ करणार असा निश्चये ॥७७॥

अथवा शंकर छेदावया ॥ अवतरला असे म्हणोनिया ॥
शंकराचार्य ऐसे तया ॥ नाम ठेविते जाहले ॥७८॥

असो ऐसा तो कर्पूरगौर ॥ वैदिक मार्ग स्थापावया सत्वर ॥
शंकराचार्य नामे भूवर ॥ निर्मळक्षेत्री अवतरला ॥७९॥

पुढे झाले उपनयन ॥ सकळ विद्या अभ्यासून ॥
अल्प वयांतचि संन्यासग्रहण ॥ करिता झाला मातृआज्ञे ॥८०॥

मग सवे घेऊनि शिष्यमंडळी ॥ तीर्थयात्रार्थ भूमंडळी ॥
फिरता जैनमताची आगळी प्रवृत्ति देखिली सर्वत्र ॥८१॥

देशोदेशींचे निखिलजन ॥ शंकराचार्यांचा करीत अपमान ॥
सकळ जनांचे लागले ध्यान ॥ जैनशास्त्राकडे पा ॥८२॥

असो ऐसे फिरता मेदिनीसी ॥ आचार्य पातले कोल्हापुरासी ॥
मग शिष्यांसहित एके दिवशी ॥ ग्रामात चालिले भिक्षार्थ ॥८३॥

घरोघरी भिक्षा याचित ॥ येऊनि कांसाराच्या आळीत ॥
तयांजवळी भिक्षा मागत ॥ तो हसू लागले जैन ते ॥८४॥

आणि म्हणती भिक्षा कैची येथ ॥ काचरस आहे कढईत ॥
पाहिजे तरी हा समस्त भिक्षेलागी समर्पितो ॥८५॥

तै स्वामी म्हणती कासाराप्रती ॥ तुमची आहे जैनयाती ॥
तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती ॥ कांचरसचि आम्हां द्या ॥८६॥

ऐसे तयाप्रती सांगुनी ॥ स्वामी म्हणती शिष्यांलागुनी ॥
तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करुनी ॥ कांचरस प्राशिजे ॥८७॥

ऐसे स्वामीचे ऐकूनि वचन ॥ भिवोनी सकळ शिष्यजन ॥
म्हणती वाचलो तरी यासमान ॥ बहुत गुरु संपादू ॥८८॥

हा प्रत्यक्ष तप्त काचरस ॥ स्पर्शता मृत्यु येईल आम्हांस ॥
ज्याचे त्याणेचि घ्यावे विष ॥ आम्हा नलगे सेवा ही ॥८९॥

ऐसे बोलून शिष्यजन ॥ पळू लागले सर्व तेथून ॥
मग स्वामी स्वये ओंजळ करून ॥ म्हणती ओता कांचरस ॥९०॥

अहो पूर्वी समुद्रमंथनकाळी ॥ काळकूटविष ज्वाळामाळी ॥
प्रगटला तया येऊनि जवळी ॥ स्वये प्राशिता झाला जो ॥९१॥

तोचि तो शंकराचार्य भगवान ॥ तयासि काय कांचरस कठिण ॥
कल्पांतीच्या कृशानूलागून ॥ गिळील जाण क्षणार्धे ॥९२॥

असो मग ते दुष्ट कांसार ॥ तो तप्त कांचरस प्रखर ॥
आचार्यांच्या ओंजळीत सत्वर ॥ ओतिते झाले भिक्षेसी ॥९३॥

जया रसाचा बिंदु तत्त्वता ॥ भूमीवर पडला असता ॥
जळोनि जाईल भूमी समस्ता ॥ ऐसा तप्त अत्यंत ॥९४॥

परी तो जगद्गुरु भगवान ॥ अति शीतळ मधुर जीवन ॥
प्यावे तैसे त्या रसा तत्क्षण ॥ प्राशिता झाला साचार ॥९५॥

ऐसे तयाचे पाहूनि साहस ॥ कांसारांचे दचकले मानस ॥
म्हणती हा पै पुराणपुरुष ॥ धर्मस्थापनार्थ अवतरला ॥९६॥

अहो पाहता ज्या रसाप्रती ॥ आमुचे नेत्र गरगरा फिरती ॥
तो रस प्याला स्वये निगुती ॥ धन्य मूर्ती शंकराचार्य ॥९७॥

ऐसे सर्व कांसारी बोलून ॥ घट्ट धरिले स्वामीचे चरण ॥
मग शंकराचार्य तेथून ॥ जैनग्रामासी पातले ॥९८॥

आणि स्वकीय शिष्यमुखेसी ॥ निरोपिले मंडनमिश्रासी ॥
की तुम्ही भेटूनि आम्हांसी ॥ शास्त्र विवाद कीजिये ॥९९॥

वादी समस्त शास्त्रवैभवे ॥ आम्हालागी त्वा जिंकावे ॥
अथवा आम्ही पराभवावे ॥ सद्धर्म शास्त्रे तुम्हांसी ॥१००॥

ऐसा शंकराचार्यांचा निरोप ॥ ऐकूनि तो महागर्वकूप ॥
मंडनमिश्र आगळे अमूप ॥ बोलता झाला अभिमाने ॥१॥

अरे आजपर्यंत बहु पंडित ॥ वादार्थ आले मी मी म्हणत ॥
परि ते म्या जिंकिले समस्त ॥ आमच्या जैनशास्त्रेसी ॥२॥

आता हा येऊनि संन्यासी ॥ सांगोन पाठवितो आम्हांसी ॥
तरी मी आजि जिंकीन यासी ॥ सरस्वतीच्या प्रसादे ॥३॥

ऐसे गर्वे बोले वचन ॥ सरस्वतीचे करूनि ध्यान ॥
तो मंडनमिश्र जगद्गुरुलागुन ॥ जाऊनि भेटला तात्काळ ॥४॥

ते दोघेही तेजस्वी महापुरुष ॥ केवळ जैसे चंद्र चंडांश ॥
दोघांचेही पराक्रम विशेष ॥ समसमान निर्धारे ॥५॥

दोघेही बोलती एकमेकांसी ॥ सभा करावी आजचे दिवशी ॥
वेदशास्त्राची स्वमुखेसी ॥ चर्चा व्हावी सविस्तर ॥६॥

पूर्वपक्ष उत्तरपक्ष करोन ॥ अर्थ विवरावा संपूर्ण ॥
ज्यासी नर्थ न होय पूर्ण ॥ तयाचे शास्त्र मिथ्या पै ॥७॥

आणि जो पराजय पावेल ॥ तद्धर्म विध्वंसूनि सकळ ॥
ग्रंथही तयाचे तात्काळ ॥ बुडवूनिया टाकावे ॥८॥

ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी ॥ बैसले मध्ये पडदा लावुनी ॥
सर्व जातींचे लोक तत्क्षणी ॥ सभेलागुनी पातले ॥९॥

तो मंडनमिश्रे पडद्याआंत शंकराचार्यासी नकळत ॥
मद्यघट ठेवूनि तयात ॥ सरस्वती स्थापूनि पूजिली ॥११०॥

तै तया मद्याच्या घटांतूनि ॥ सरस्वती बोले अय्यालागुनी ॥
आता मी शंकराचार्यासि झणी ॥ शास्त्रमते विध्वंसिते ॥११॥

तू माझ्या मागे बैसून ॥ चमत्कार पाहे संपूर्ण ॥
मी तुज आहे सुप्रसन्न ॥ वचन सत्य करीन पाहे ॥१२॥

ऐसिये प्रकारे सुंदर ॥ सरस्वतीचा ऐकूनि वर ॥
तो महापंडित मंडनमिश्र ॥ समाधान पावला ॥१३॥

मग पडद्याआतून ॥ शंकराचार्यासी बोले वचन ॥
कोणता वेद आरंभून ॥ अर्थ करू सांग पा ॥१४॥

तै शंकराचार्य बोलत ॥ चारी वेद करी समाप्त ॥
जे जे मी पुसेन यथार्थ ॥ ते ते मजसी सांगावे ॥१५॥

ठायी ठायी अर्थ पुसेन ॥ त्याचे करावे समाधान ॥
न सांगता पदवीपासून ॥ भ्रष्ट करीन क्षणमात्रे ॥१६॥

मग त्याच आचार्यभाषिता ॥ मान्य करूनि तो तत्त्वता ॥
सरस्वतीसि म्हणे हे माता ॥ बोल आता सत्वरी ॥१७॥

तै श्रीशंकराचार्याप्रती ॥ बोलू लागली सरस्वती ॥
परी शंकराचार्यांच्या चित्ती ॥ जैन बोलतो ऐसेच ॥१८॥

म्हणोनि आचार्य बोलले ॥ अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे ॥
तव सरस्वतीने मुख काढिले ॥ घटातूनि बाहेरी ॥१९॥

प्रथम ऋग्वेद ऋचांसहित ॥ सरस्वती चालली बोलत ॥
ठायी ठायी आचार्य पुसत ॥ अर्थकूटे तेधवा ॥१२०॥

परी ज्याच्या मुखापासून ॥ चार वेद झाले उत्पन्न ॥
त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न ॥ न अडखळे कोठेची ॥२१॥

शंकराचार्य जे जे पुसत ॥ त्याचे तत्क्षणी ती उत्तर देत ॥
असो ऐसा ऋग्वेद समस्त ॥ समाप्त जाणा जाहला ॥२२॥

परी सरस्वती म्हणते वेद ॥ हा आचार्यी नेणोनि भेद ॥
आता बोले रे यजुर्वेद ॥ ऐसे अय्यासी सांगितले ॥२३॥

ते स्वामींचे ऐकूनि भाषित ॥ सरस्वती पडद्याआत ॥
यजुर्वेदालागी त्वरित ॥ आरंभिती जाहली ॥२४॥

अस्खलित शब्द उमटती ॥ शंकराचार्य अर्थ पुसती ॥
परी कुशलत्वे ती सरस्वती ॥ करी समाधान तत्काळ ॥२५॥

आचार्यांचा न चाले उपाव ॥ कोठेच न होय पाडाव ॥
मग अंतरी एक उपाय ॥ ऐसा त्यांनी योजिला ॥२६॥

पूर्वी ऋग्वेद जाहला ॥ आता यजुर्वेद असे चालला ॥
तरी यासी ऋग्वेदातील भला ॥ पुनरपी प्रश्न कीजिये ॥२७॥

ऐसा करूनिया निश्चय ॥ अय्यासी बोलती आचार्य अरे तू सांप्रत निःसंशय ॥
यजुर्वेद बोलतोसी ॥२८॥

परी ऋग्वेदामाजी देख ॥ शंका राहिली असे एक ॥
तरी ती ऋचा बोलूनि सम्यक ॥ अर्थ सांगे पुनरपि ॥२९॥

ऐशा स्वामीच्या प्रश्नाला ॥ ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा ॥
पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला ॥ परी तिसी त्याचा आठव नसे ॥१३०॥

अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग ॥ की वेद शास्त्र पुराणे सांग ॥
आरंभापासोनि स्पष्ट सवेग ॥ संपूर्णहि म्हणे पा ॥३१॥

परी पुढे पुढे म्हणत असता ॥ मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था ॥
तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा ॥ स्मरत नसे काहीच ॥३२॥

म्हणोनि अंतरी गडबडोन ॥ स्तब्ध होतसे तत्क्षण ॥
हे तियेचे वर्म कठीण ॥ ठाउके नसे कोणासी ॥३३॥

परी शंकराचार्य चतुर ॥ अंतरी करिती विचार ॥
ऐसे वेद सार्थ साचार ॥ ब्रह्मांडी कोण बोलणार ॥३४॥

ब्रह्मा आणि सरस्वती ॥ ही मात्र बोलतील निश्चिती ॥
या दोघांवाचूनि जगती ॥ नसे कोणी समर्थ ॥३५॥

ह्या अय्याच्या बापाचेने ॥ ऐसे नोहे वेद बोलणे ॥
मग ह्या क्षुल्लक पामराचेने ॥ कोठोनिया बोलवेल ॥३६॥

तरी येथे काही तरी ॥ कपट आहे निर्धारी ॥
ऐसे जाणोनिया अंतरी ॥ अय्यालागी बोलत ॥३७॥

अरे आता उगा राहिलासी ॥ मग प्रश्नासी का नोत्तरिसी ॥
तो तो अय्या गडबडोनि मानसी ॥ म्हणे अनर्थ ओढवला ॥३८॥

दोन चार वेळा स्वामींनी ॥ प्रश्निले असे अय्यालागुनी ॥
परी तो अत्यंत भय पावोनी ॥ काहीच वाणी बोलेना ॥३९॥

मग शंकराचार्य उठोन ॥ पाहाती पडदा उघडोन ॥
तो तेथे मद्यघटांतून ॥ मुख बाहेर आले असे ॥१४०॥

ते पाहता ही सरस्वती होय ॥ ऐसा अंतरी करूनि निश्चय ॥
जगद्गुरु शंकराचार्य ॥ कोपे संतप्त जाहले ॥४१॥

मग सकळ पडदे फाडून ॥ शिरी घातला दंड दारुण ॥
तेथे तो मद्यघट फुटोन ॥ चूर्ण तत्क्षणी जाहला ॥४२॥

आणि म्हणती हे दुराचारिणी ॥ जैनालागी प्रसन्न होउनी ॥
वेदशास्त्रचर्चा रात्रंदिनी ॥ चांडाळिणी करितेस ॥४३॥

तुझे न पहावे जारिणी मुख ॥ ज्याच्या पोटी जन्मलीस देख ॥
त्या ब्रह्मयासीच तू निःशंक ॥ अंगभोग देसी निर्लज्जे ॥४४॥

ऐसी तू महापापिणी ॥ ह्या जैनासी वश होऊनी ॥
जैनशास्त्र स्थापावयालागुनी ॥ सर्वदा रत झालीस ॥४५॥

ह्या दुष्ट पाखांड मतासी ॥ आश्रय देऊनि अहर्निशी ॥
अठरा याती चार वर्णासी ॥ एकंकार केलास ॥४६॥

जैनी झाले लोक समग्र ॥ हा तूचि केलासी वर्णसंकर ॥
वेदशास्त्रे पुराणे परिकर ॥ एकीकडे राहिली ॥४७॥

या जैनाची शास्त्रे संपूर्ण ॥ तुवा त्यांचा धरोनि अभिमान जैनमत प्रगटवून ॥
लोका पाखंडी घातलेस ॥४८॥

तुझ्या आश्रये ह्या दुष्टे स्वमते ॥ पृथ्वीवरील ग्रामदैवते ॥
स्थापूनिया स्वकीय हस्ते ॥ भ्रष्ट केली सर्वही ॥४९॥

ऐसा तुझ्यायोगे सगळा अत्यनर्थ ओढवला ॥
तो म्या कैलासी ऐकिला ॥ म्हणोनि घेतला अवतार ॥१५०॥

तू अनाचार केलासि अत्यंत ॥ तरी सदा राहे नीच मुखात ॥
अत्यंजादिकांच्या गृही सतत ॥ वास होवो मम शापे ॥५१॥

ऐसे रीती सरस्वतीप्रती ॥ शंकरस्वामी शाप देती ॥
मग ती कोपोनी सरस्वती ॥ स्वामीप्रती बोलत ॥५२॥

तू तो धर्म स्थापावयासी ॥ साक्षात् शंकर अवतरलासी ॥
तरी तुजा देह कीटकदेशी ॥ पडेल जाण मद्वचने ॥५३॥

ऐसे स्वामीस शापून ॥ सरस्वती गुप्त झाली तत्क्षण ॥
मग स्वामीचे धरूनि चरण ॥ मंडनमिश्र लोळत ॥५४॥

परी शंकराचार्यी तत्क्षणी ॥ जैनशास्त्रांच्या मोटा बांधुनि ॥
अति अगाध समुद्रजीवनी ॥ नेऊनिया बुडविल्या ॥५५॥

त्यांतूनि एक अमरकोश ॥ सर्वोपयोगी असे विशेष ॥
म्हणोनि त्या मात्र ग्रंथास ॥ शंकराचार्यी रक्षिले ॥५६॥

असो ऐसे जैनशास्त्रांसी ॥ विध्वंसूनिया क्षणार्धेसी ॥
मग जवळ पाचारूनि जनांसी ॥ स्वामी तयासी बोलत ॥५७॥

अहो ही ग्रामदैवते समस्त ॥ आहेत खरी जैनस्थापित ॥
परी त्याते तुम्ही सतत ॥ भजत जावे स्वधर्मे ॥५८॥

जैने स्थापिली म्हणोनी ॥ संशय काही न धरावा मनी ॥
आपुला धर्म आपणालागुनी ॥ देवापाशी काय असे ॥५९॥

ऐसे स्वामी सकळ लोका ॥ सांगती तेव्हा अय्या देखा ॥
स्वामीचरणी स्वकीय मस्तका ॥ ठेवूनिया विनवीत ॥१६०॥

म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण ॥ तुम्ही टाकिले उच्छेदून ॥
परी कृपे जनाचे अभिधान ॥ किंचित् तरी रक्षावे ॥६१॥

ऐसी ऐकता दीनवाणी ॥ कृपा उपजोनि स्वामीच्या मनी ॥
ग्रामदेवतांच्या सन्निधानी ॥ जैनाचा धोंडा स्थापिला ॥६२॥

जेथे जेथे ग्रामदैवत ॥ तेथे जैनांचा धोंडा वसत ॥
ग्रामदेवतासंगे त्याप्रत ॥ प्रतिदिनी पूजिती ॥६३॥

असो मग स्वामी तेजोरशी ॥ आज्ञापिती सकळ जनांसी ॥
की आपुल्या जातिधर्मेसी ॥ पूर्वीप्रमाणे वर्तावे ॥६४॥

जरी अधर्मे वर्ताल कोणी ॥ तरी दंडीन ऐसे बोलुनि ॥
वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी ॥ प्रगट केली साचार ॥६५॥

मग सकळही ब्राह्मण ॥ करू लागले वेदशास्त्राध्ययन ॥
आणि अन्य जनही संपूर्ण ॥ वर्तू लागले स्वधर्मे ॥६६॥

ऐसे शंकराचार्ये दयाळे ॥ आपुल्या उत्तम बुद्धिबळे ॥
जैनांचे पाखंडमत आगळे ॥ विध्वंसिले सर्वही ॥६७॥

श्रुतिस्मृत्युक्त धर्म परिकर ॥ सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर ॥
तेवीच अद्वैताचा साचार ॥ मार्ग सर्वांसी दाविला ॥६८॥

एवं महाराज शंकर ॥ भक्तवत्सल कर्पूरगौर ॥
अवतरोनिया भूमीवर ॥ भूभार हरिता जाहला ॥६९॥

अहो शंकराची लीला अगाध ॥ जो भक्तवत्सल स्वानंदकंद ॥
सेवका तारूनिया विशद ॥ निजपदासी नेतसे ॥१७०॥

काय वर्णावे त्याचे चरित ॥ जे दीन अनाथ सद्भक्त ॥
शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत ॥ तया तारीत प्रसादे ॥७१॥

दाशार्हराव आणि कलावती ॥ बहुला विदुर पापमती ॥
तेही शिवपंचाक्षरे निगुती ॥ अक्षय गती पावले ॥७२॥

शबर केवळ निषाद ॥ शिवकृपे तरला हे प्रसिद्ध ॥
भस्म झालेली तद्भार्या शुद्ध ॥ पुनरपि देहे प्रगटली ॥७३॥

श्रीशिवयोगिने ॥ सुमति भद्रायू कारणे ॥
शिवकवचाच्या उपदेशाने ॥ पावन केली साचार ॥७४॥

मैत्रेयीच्या उपदेशेकरूनी ॥ शिवव्रत आचरता सीमंतिनी ॥
यमुनेत पति बुडाला असोनी आला वाचोनी शिवकृपे ॥७५॥

पराशर ऋषीने आपण ॥ रुद्राभिषेकेकरून ॥
राजपुत्राचा मृत्यु टाळून ॥ तयासि राज्यी स्थापिले ॥७६॥

ऐसे शिवकवचरुद्र ॥ षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादि मंत्र ॥
सर्वोद्धारक आहेत पवित्र ॥ परी अभक्ता काय ते ॥७७॥

जरी गर्गमुनिसारिखे सद्गुरु ॥ दाशार्हरायापरी शिष्य थोरू ॥
भाविक असतील तरी उद्धारू ॥ होईल जाण निश्चये ॥७८॥

जरी भद्रायूसमान शिष्यजन ॥ शिवयोगियापरी गुरु सुजाण ॥ त
री प्रत्यक्ष शिव प्रगटोन ॥ नेईल शिष्या कैलासा ॥७९॥

कलियुगामाजी गुरु महंत ॥ एक अडक्यासि तीन मिळत ॥
परी सद्गुरुसम अत्यद्भुत ॥ सामर्थ्य तेथे कैचे पा ॥१८०॥

द्रव्याची इच्छा धरूनि मनी ॥ केवळ शिष्यजनांसि भोंदुनी ॥
मंत्रतंत्र फुंकोनी कानी ॥ व्यर्थ साधना लाविती ॥८१॥

शिष्यही अभाविक दुर्जन ॥ गुरूचे पाहाती सदा न्यून ॥
म्हणोनि दोघा नरक दारुण ॥ प्राप्त होय शेवटी ॥८२॥

आतांचे गुरुशिष्य सकळिक ॥ केवळ द्रव्याचे गिराइक ॥
दाशार्हादिकांपरी तो एक ॥ शिष्य न दिसे कलियुगी ॥८३॥

सद्गुरु तो शिष्यांच्या धना ॥ नरकासम मानिती जाणा ॥
सच्छिष्यहि तनुमनधना ॥ अर्पितात गुरुपायी ॥८४॥

म्हणोनि तरले ते दाशार्हादिक ॥ नातरी तेच मंत्र सकळिक ॥
परी हे आतांचि जन मूर्ख ॥ द्रव्यलोभे भुलले पै ॥८५॥

अहो कृतयुगामाजी पाहता ॥ अस्थिगत प्राण होता ॥
जेव्हा अस्थी पडती सर्वथा ॥ तेव्हा प्राण जातसे ॥८६॥

म्हणोनि तोपर्यंत साधन ॥ करित बैसती अरण्यी जाऊन ॥
त्रेतायुगी ते चर्मगत प्राण ॥ चर्म झडता मृत्यु होय ॥८७॥

द्वापारी प्राण नाडीगत ॥ नाडी सुकती तो वाचत ॥
ऐसे पूर्वी आयुष्य बहुत ॥ होते सकळ मानवा ॥८८॥

आणि लक्ष अयुत सहस्त्र वर्षे ॥ ऐसी तेव्हा होती आयुष्ये ॥
म्हणोनि सकळ बहुत वर्षै ॥ अनुष्ठाने आचरत ॥८९॥

आणि ऐसे तप करित ॥ की जेणे अंगी वारुळ वाढत ॥
मग प्रसन्न होऊनि भगवंत ॥ आपुल्या नेत पदासी ॥१९०॥

आता तो अन्नमय प्राण ॥ अन्नाविण सत्वर मरण ॥
आणि आयुष्य तेहि अपूर्ण ॥ नोहे साधन काहीच ॥९१॥

देहाचा नाही भरवसा ॥ कोण दिवस येईल कैसा ॥
म्हणोनि साक्षाज्जगदीशा ॥ अंतरी दया उद्भवली ॥९२॥

आणि औटघटिकात पूर्ण ॥ परमेश्वरप्राप्ती होऊन ॥
मोक्षासि जावे उद्धरोन ॥ ऐसा मार्ग काढिला ॥९३॥

तो मार्ग म्हणाल कवण ॥ तरी सद्गुरुसी जावे शरण ॥
यावीण मोक्षलाभालागून ॥ इतर साधन नसेचि ॥९४॥

आता सद्गुरु तो कैसा असावा ॥ सदा आनंद तन्मनी वसावा ॥
वामदेव गर्ग शुक किंवा ॥ पराशरापरी साचा ॥९५॥

शिष्यही असावे भाविक ॥ गुरूच मानावा ईश्वर एक ॥
ऐसे घडता हे सकळिक ॥ जन तरतील कलियुगी ॥९६॥

श्रीधर म्हणे श्रोतयासी ॥ ज्या मंत्री तरले महाऋषी ॥
तेचि हे मंत्र तुम्हांसी ॥ प्रकाशित केले पा ॥९७॥

ज्या मंत्रे भद्रायु तरला ॥ जेणे दाशार्हराव उद्धरला ॥
आणि जो मंत्र सुमति राणीला ॥ शिवयोगिये दिधला असे ॥९८॥

ज्या मंत्रे बहुला उद्धरली ॥ विदुर पावला शिवपदकमळी ॥
आणि भ्रतारासहित तरली ॥ सीमंतिनी ज्या मंत्रे ॥९९॥

तेचि षडाक्षर पंचाक्षरी रुद्र ॥ मृत्युंजय शिवकवच पवित्र ॥
इत्यादि सकळहि मंत्र ॥ या ग्रंथात कथियेले ॥२००॥

परी श्रोते तुम्ही म्हणाल जरी ॥ तेचि मंत्र असता निर्धारी ॥
तिही सांप्रत पूर्वीच्या परी ॥ का न उद्धरती जन हे ॥१॥

तरि जपकर्त्याचे मन ॥ शुद्ध असेल तरी तत्क्षण ॥
पूर्वीप्रमाणे तयासि गुण ॥ येईल जाण निश्चये ॥२॥

यालागी विशुद्ध भावेसी ॥ जपावे या शिवमंत्रासी ॥
आणि सर्वांनीही अहर्निशी ॥ शिवलीलामृतासी ऐकिजे ॥३॥

आपुल्या प्रपंचालागुनी ॥ सावध जैसे अहर्निशी ॥
तैसे जरी शिवस्मरणी ॥ तरी मग उणे कायसे ॥४॥

कलियुगींच्या जनांकारणे ॥ शंकराचार्य ह्या अभिधाने ॥
अवतार घेऊनिया शिवाने ॥ जैनमत बुडविले ॥५॥

ऐसा सद्धर्मप्रतिपालक ॥ जो शंभु अर्पर्णानायक ॥
तयाचे स्मरण करिता सकळिक ॥ भवभय निरसे पै ॥६॥

आपुल्या कार्यात रात्रंदिन ॥ गुंतले असती जे का जन ॥
ते अभागी आयुष्य सरोन ॥ पावती निधन अकस्मात ॥७॥

जे कित्येक प्रपंची गुंतले ॥ शिवध्यान करू विसरले ॥
जन्मासि आले तैसेचि गेले ॥ ते जन्मले मेले सारखेच ॥८॥

जे जन्मोनि काही करीत नाही ॥ ते शेवटी जावोनि यमाचे गेही ॥
तेथे जन्मोनि नरकडोही ॥ अनेक भोग भोगित ॥९॥

आणि पुनरपि नाना योनीत ॥ जन्मोनि अनंत दुःखे भोगित ॥
एवं संसृतीच्या आवर्तांत ॥ बुचकळत सर्वदा ॥२१०॥

म्हणोनि सांगतो सर्वालागुन ॥ शिवचरणी भाव धरोन ॥
करिता शिवलीलामृतपान ॥ जन्ममरण खंडेल ॥११॥

शिवस्मरणकर्त्या जनांसी ॥ शिव नेतो मोक्षपदासी ॥
ब्राह्मणादि सर्व जातींसी ॥ शिवस्मरण तारक ॥१२॥

परी ब्राह्मण आपुल्या कर्मात ॥ बैसती बहुत ग्रंथ घोकित ॥
आणि प्रपंची होऊनि रत ॥ शिवस्मरण विसरले ॥१३॥

वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी ॥ द्रव्याची दुणाई इच्छूनि मानसी ॥
तागडी धरित अहर्निशी ॥ शिवस्मरण मग कैचे ॥१४॥

आणि क्षत्रिय ते संपूर्ण ॥ नाना शस्त्रे सांभाळून ॥
सदा युद्ध इच्छिती म्हणोन ॥ शिवस्मरण विसरले ॥१५॥

कुणब्यासी नाहि घरदार ॥ नित्य नूतन संसार ॥
भूमिसेवा करिती निरंतर ॥ मग शिवस्मरण कैचे तया ॥१६॥

सोनार सुतार कासार ॥ करिती आपुले व्यवहार ॥
प्रपंची गुंतले निरंतर ॥ मग शिवस्मरण कोठूनी ॥१७॥

ऐशा सकळही याती ॥ आपापुल्या व्यवहारी गुंतती ॥
जन्ममरणाच्या आवृत्ती ॥ न सुटती साचार ॥१८॥

पुनः पुनः जन्ममरणे ॥ चौर्यांशी लक्ष योनी भोगणे ॥
परी तयांच्या परिहाराकारणे ॥ शिवनाममृत यथार्थ ॥१९॥

यालागी शिवलीलामृत ग्रंथ ॥ पापी जनोद्धारक निश्चित ॥
याते जे श्रवण पठण करित ॥ ते जन होत शिवरूप ॥२२०॥

एक मंडळामाझारी ॥ म्हणजे बेचाळीस दिनाभीतरी ॥
सदाशिवमूर्ती ध्याऊनि अंतरी ॥ सात आवर्तने करिती जे ॥२१॥

तया श्रीगौरीरमण ॥ प्रत्यक्ष देऊनिया दर्शन ॥
सकळ कामना करितो पूर्ण ॥ ऐसा महिमा ग्रंथाचा ॥२२॥

श्रावणमासी सोमवारी ॥ एक एक आवर्तन जो करी ॥
श्रीशंकर तयाचे घरी ॥ वास करितो सर्वदा ॥२३॥

श्रीशंकर झालिया प्रसन्न ॥ जगी तयासी काय न्यून ॥
जैसी कामधेनु मिळता संपूर्ण ॥ मनोरथ पूर्ण होतात ॥२४॥

जरी पाहिजे शंभूची कृपा ॥ तरी हा आहे मार्ग सोपा ॥
करीत पंचाक्षरादि मंत्र जपा ॥ शिवलीलामृत वाचावे ॥२५॥

शनिप्रदोषी शिवरात्रीदिनी ॥ तीन आवर्तने करिता तत्क्षणी ॥
सर्व बंधमुक्त होऊनी ॥ इच्छिला पदार्थ लाधतो ॥२६॥

आता शकेल श्रोत्यांचे मन ॥ श्रीशिवमंत्राच्या जपेकरून ॥
जैसी दाशार्हाच्या अंगातून ॥ पापे निघाली काकरूपे ॥२७॥

तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप ॥ आम्ही करीत असता अमूप ॥
काकरूपे आमुचे पाप ॥ गेले का न दिसे पै ॥२८॥

तरी श्रोतेजन हो ऐका ऐसी अंतरी न धरा शंका ॥
स्कंदपुराणी व्याजे का ॥ लिहिले तेचि हे कथिलेसे ॥२९॥

यालागी हे असत्य म्हणता ॥ जिव्हेसी कीटक पडतील तत्त्वता ॥
दाशार्हापरी भावे वर्तता ॥ पापे भस्म होतील ॥२३०॥

चवदा अध्यायाभीतरी जे ॥ मंत्र कथिले ऋषीश्वरी ॥
तिही निष्पाप होऊनि सत्वरी ॥ बहुत जन उद्धरिले ॥३१॥

शिवकवचे भद्रायुबाळ ॥ शिवमंत्रे शारदा निर्मळ ॥
राजपुत्राचा आलेला काळ ॥ रुद्रावर्तने परतला ॥३२॥

शबरस्त्री भस्म झाली ॥ परी ती नैवेद्यार्पणाच्या वेळी ॥
अन्नपात्र घेऊनि पतीजवळी ॥ उभी राहिली पूर्ववत ॥३३॥

बहुला ती केवळ पातकी ॥ पश्चात्तापे गेली स्वर्गलोकी ॥
विदुर भ्रतार होता नरकी ॥ तोही तेथे आणविला ॥३४॥

वामदेवे ब्रह्मराक्षसास ॥ गौतमे कल्माषपादरायास ॥
श्रीशिवे श्रियाळ चांगुणेस ॥ आणि चिलयास उद्धरिले ॥३५॥

दाशार्हराव आणि कलावती ॥ शिवमंत्रे पावली मुक्ती ॥
व्याध तरला अरण्यपंथी ॥ कीर्तनश्रवणमात्रेच ॥३६॥

गोरक्ष बाळ अज्ञान ॥ तोहि तरला शिवमंत्रेकरून ॥
मंत्रांत मंत्र श्रेष्ठ हे दोन ॥ पंचाक्षरी आणि षडाक्षरी ॥३७॥

शिवकवच महामंत्रासहित ॥ मृत्युंजयभस्ममंत्र विख्यात ॥
रुद्रावर्तन चिताभस्मपूत ॥ आणि शिवदर्शन उत्तम ॥३८॥

ह्यांची माहात्म्ये संपुर्ण ॥ चवदा अध्यायात वर्णून ॥
ह्या पंधराव्या अध्यायी आख्यान ॥ जगद्गुरूचे कथियेले ॥३९॥

स्कंदाप्रति शंकर सांगत ॥ जे ह्या मंत्रासि मुखे बोलत ॥
तया मी प्रत्यक्ष उमानाथ ॥ दर्शन देतो प्रीतीने ॥२४०॥

जो शिवलीलेसी पठण करी ॥ तयासि प्रसन्न गिरिकुमारी ॥
आणि मीहि तयासी अहोरात्री ॥ न विसंबे निश्चये ॥४१॥

ऐसे श्रीगिरिजानाथ ॥ कथिते जाहले स्कंदाप्रत ॥
म्हणोनि मीहि तैसेचि येथ ॥ वर्णियेले असे पा ॥४२॥

मी आपुल्या पदरींचे काही ॥ उगाच वर्णन केले नाही श्रोतेजनी ह्रदयाठायी ॥
विकल्प काही न धरावा ॥४३॥

शिवलीलेचे चवदा अध्याय ॥ हा पंधरावा कोठील काय ॥
ऐसा मनी विकल्प होय ॥ तरी सांगतो ऐकिजे ॥४४॥

ज्या शिवे भक्त तारिले अपार ॥ आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र ॥
त्याणेच ह्या कलियुगी अवतार ॥ धर्मस्थापनार्थ घेतला ॥४५॥

शिवमहिमा अगाध ॥ सकळहि कीजे प्रसिद्ध ॥
म्हणोनि पंधरावा अध्याय शुद्ध ॥ शिवाज्ञेने वर्णिला ॥४६॥

पूर्वयुगी जी लीला वर्तली ॥ ती चवदा अध्यायी वर्णिली ॥
कलियुगी श्रीचंद्रमौळी ॥ शंकराचार्य अवतरले ॥४७॥

तेचि सविस्तर कथन ॥ या पंधराव्यात केले पूर्ण ॥
श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन ॥ सादर असावे साचार ॥४८॥

हे पंधरा अध्याय संपूर्ण ॥ नित्य करावे श्रवण पठण ॥
अथवा सात पारायणे ॥ अत्यादरे करावी ॥४९॥

मद्य मांस भक्षून ॥ न करावे ग्रंथपठण ॥
की स्नान केल्यावाचून ॥ पारायण न करावे ॥२५०॥

रजस्वलेच्या श्रवणी ॥ न पडावा हा मंत्रशिरोमणी ॥
की अभक्ष्य भक्षण भक्षूनी ॥ शिवो नये या ग्रंथा ॥५१॥

आणि जो दुष्ट दुर्जन ॥ अविश्वासू निंदक महान ॥
तयाच्या श्रवणी जाण ॥ न घालावा सर्वथा ॥५२॥

रजस्वला स्त्रियांसमान ॥ दुर्जन निंदकांचे मन ॥
केवळ अशुद्ध असते म्हणोन ॥ ग्रंथश्रवणा योग्य नव्हे ॥५३॥

ह्या ग्रंथाच्या पठणेकरून ॥ इच्छिले सर्व प्राप्त होऊन ॥
गडांतरे रोग मृत्यु पाप ऋण ॥ दारिद्र संकटे निरसती ॥५४॥

अष्ट कुष्ठादि रोग निरसती ॥ श्रृंखळादि बंधने तुटती ॥
आयुष्यवर्धन धन संतती ॥ अखंडित होय पा ॥५५॥

आणि तुष्टि पुष्टि सायुज्यसदन ॥ पठणमात्रे लाधते पूर्ण ॥
याच्या नित्य पारायणासमान ॥ पुण्य नाही दुसरे ॥५६॥

पंधरा अध्याय ग्रंथ सकळ ॥ जरी नित्य नेमे न वाचवेल ॥
तरी बेचाळीस ओव्या सोज्वळ ॥ भक्तिभावे वाचाव्या ॥५७॥

नित्य प्रभाती स्नान करून ॥ बेचाळीस ओव्या वाचिता पूर्ण ॥
सर्व शिवलीलामृत पठण ॥ केल्याचे पुण्य होईल ॥५८॥

शिवलीलामृत ग्रंथ विशेष ॥ पंधरा अध्याय बहु सुरस ॥
त्यांतील निवडोनि सारांश ॥ बेचाळीस ओव्या काढिल्या ॥५९॥

आता बेचाळीस ओव्या कोणत्या ॥ तरी सांगतो ऐकाव्या त्या ॥
श्रवणमात्रे सकळ श्रोत्या ॥ स्वर्गप्राप्ती निश्चये ॥२६०॥

(नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ॥ ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥
आदि अनादि मायातीता ॥ पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरु ॥६१॥

ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिद्धा आनंदवनविलासा ॥
मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा जगत्पते ॥६२॥

जयजय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या ॥
मनोजदमना मनमोहना ॥ कर्ममोचका विश्वंभरा ॥६३॥

जेथे सर्वदा शिवस्मरण ॥ तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण ॥
नाना संकटे विघ्ने दारुण ॥ न बाधिती कालत्रयी ॥६४॥

संकेते अथवा हास्येकरून ॥ भलत्या मिषे घडो शिवस्मरण ॥
न कळता परिस लोहालागुन ॥ झगडता सुवर्ण करीतसे ॥६५॥

न कळत प्राशिता अमृत ॥ अमर काया होय यथार्थ ॥
औषध नेणता भक्षिता ॥ परी रोग हरे तत्काळ ॥६६॥

जय जय मंगलधामा ॥ निजजनतारक आत्मारामा ॥
चराचरफलांकित कल्पद्रुमा ॥ नामा अनामा अतीता ॥६७॥

हिमाचलसुतामनरंजना ॥ स्कंदजनका शफरीध्वजादहना ॥
ब्रह्मानंदा भाललोचना ॥ भवभंजना महेश्वरा ॥६८॥

हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा ॥
अर्धनारीनटेश्वरा ॥ गिरुजारंगा गिरीशा ॥६९॥

धराधरेंद्रमानससरोवरी ॥ तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी ॥
तव अपार गुणासी परोपरी ॥ सर्वदा वर्णिती आम्नाय ॥२७०॥

नकळे तुझे आदिमध्यावसान ॥ आपणचि सर्व कर्ता कारण ॥
कोठे प्रगटशी याचे अनुमान ॥ ठायी न पडे ब्रह्मादिका ॥७१॥

जाणोनि भक्तांचे मानस ॥ तेथेंचि प्रगटशी जगन्निवास ॥
सर्वकाळ भक्तकार्यास स्वांगे उडी घालिसी ॥७२॥

सदाशिव ही अक्षरे चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥
तो परमपावन संसारी ॥ होऊनि तारी इतरांते ॥७३॥

बहुत शास्त्रवक्ते नर ॥ प्रायश्चित्तांचे करिता विचार ॥
परी शिवनाम एक पवित्र ॥ सर्व प्रायश्चिता आगळे ॥७४॥

नामाचा महिमा अद्भुत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥
त्यांसी सर्व सिद्धि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥७५॥

जयजयाजी पंचवदना ॥ महा पापद्रुमनिकृंतना ॥
मदमत्सरकाननदहना ॥ निरंजना भवहारका ॥७६॥

हिमाद्रिजामाता गंगाधरा ॥ सुहास्यवदना कर्पूरगौरा ॥
पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा ॥ त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥७७॥

नीलग्रीवा अहिभूषणा ॥ नंदिवाहना अंधकमर्दना ॥
दक्षप्रजापति मखभंजना ॥ दानवदमना दयानिधे ॥७८॥

जय जय किशोर चंद्रशेखरा ॥ उर्वीधरेंद्रनंदिनीवरा ॥
त्रिपुरमर्दना कैलासविहारा ॥ तुझ्या लीला विचित्र ॥७९॥

कोटि भानुतेजा अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥
समाधिप्रिया भुतादिनाथा ॥ मूर्तामूर्ता त्रयीमूर्तै ॥२८०॥

परमानंदा परमपवित्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥
पशुपते पयःफेनगात्रा ॥ परममंगला परब्रह्मा ॥८१॥

जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ती ॥ तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती ॥
शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती कथिलीस ॥८२॥

जय जय भस्मोध्दूलितांगा ॥ योगिध्येया भक्तभवभंगा ॥
सकळजनरआराध्यलिंगा ॥ नेई वेगी तुजपाशी ॥८३॥

जेथे नाही शिवाचे नाम ॥ तो धिक् ग्राम धिक् आश्रम ॥
धिक् ग्रहपुर उत्तम ॥ आणि दानधर्मा धिक्कार ॥८४॥

जेथे शिवनामाचा उच्चार ॥ तेथे कैचा जन्ममृत्युसंसार ॥
ज्यांसी शिव शिव छंद निरंतर ॥ त्यांही जिंकिले कळिकाळा ॥५॥

जयाची शिवनामी भक्ती ॥ तयाची सर्व पापे जळती ॥
आणि चुके पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥८६॥

जैसे प्राणियांचे चित्त ॥ विषयी गुंते अहोरात ॥
तैसे शिवनामी जरी लागत ॥ तरी मग बंधन कैचे ॥८७॥

कामगजविदारकपंचानना ॥ क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ॥
लोभांधकार चंडकिरणा ॥ धर्मवर्धना दशभुजा ॥८८॥

मत्सरविपिनकृशाना ॥ दंभनगभंदका सहस्त्रनयना ॥
लोभमहासागरशोषणा ॥ अगस्त्य महामुनिवर्या ॥८९॥

आनंदकैलासविहारा ॥ निगमागमवंद्या दीनोद्धारा ॥
रुंडमालांकितशरीरा ॥ ब्रह्मानंदा दयानिधे ॥२९०॥

धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥
सदा शिवलीलामृत पठण ॥ किंवा श्रवण करिती पै ॥९१॥

सूत सांगे शौनकांप्रति ॥ जे भस्म रुद्राक्ष धारण करिती ॥
त्यांच्या पुण्यासी नाही गणती ॥ त्रिजगती धन्य ते ॥९२॥

जे करिती रुद्राक्ष धारण ॥ त्यांसी वंदिती शक्रद्रुहिण ॥
केवळ तयांचे घेता दर्शन ॥ तरती जन तत्काळ ॥९३॥

ब्राह्मणादि चार वर्ण ॥ ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण ॥
स्त्री बाल वृद्ध आणि तरुण ॥ याही शिवकीर्तन करावे ॥९४॥

शिवकीर्तन नावडे अणुमात्र ॥ तो अंत्यजाहूनि अपवित्र ॥
लेइले नाना वस्त्रालंकार ॥ तरी ते केवळ प्रेतचि ॥९५॥

जरी भक्षिती मिष्टान्न ॥ तरी ते केवळ पशूसमान ॥
मयूरांगीचे व्यर्थ नयन ॥ तैसे नेत्र तयांचे ॥९६॥

शिव शिव म्हणता वाचे ॥ मूळ न राहे पापाचे ॥
ऐसे माहात्म्य शंकराचे ॥ निगमागम वर्णिती ॥९७॥

जो जगदात्मा सदाशिव ॥ ज्यासि वंदिती कमलोद्भव ॥
गजास्य इंद्र माधव ॥ आणि नारदादि योगींद्र ॥९८॥

जो जगद्गुरु ब्रह्मानंद ॥ अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥
शुद्ध चैतन्य जगदादिकंद ॥ विश्वंभर दयाब्धी ॥९९॥

जो पंचमुख दशनयन ॥ भार्गववरद भक्तजीवन ॥
अघोर भस्मासुरमर्दन ॥ भेदातीत भूतपती ॥३००॥

तो तू स्वजनभद्रकारक ॥ संकटी रक्षिसी भोळ्या भाविका ॥
ऐसी कीर्ति अलोलिका ॥ गाजतसे ब्रह्मांडी ॥१॥

म्हणोनि भावे तुजलागून ॥ शरण रिघालो असे मी दीन ॥
तरी या संकटातून ॥ काढूनि पूर्ण संरक्षी ॥२॥ (ओव्या बेचाळीस समाप्त ॥)

ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ ह्या बेचाळीस ओव्या समग्र ॥
शिवलीलामृताचे होय सार ॥ श्रोती निरंतर परिसाव्या ॥३॥

सकळ शिवलीलामृताचे ॥ आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे ॥
श्रवण पठण केल्याचे ॥ फळ असे समान ॥४॥

जेवी इक्षुरस गाळुनी ॥ शर्करा काढिजे त्यांतुनी ॥
तेवीच हे शिवलीलेतुनी ॥ सार काढिले सज्जनार्थ ॥५॥

कोणी व्यवहारी गुंतत ॥ म्हणोनि वाचवेना सर्व ग्रंथ ॥
कित्येक ते आळस करित ॥ ग्रंथ विस्तृत म्हणोनिया ॥६॥

हे जाणोनिया अंतरात ॥ शंकरआज्ञे नित्य पठणार्थ ॥
श्रीशिवलीलेच्या सारभूत ॥ ऐशा ह्या ओव्या रचियेल्या ॥७॥

भोळा चक्रवर्ती उदार ॥ भक्तवत्सल कर्पूरगौर ॥
तारावया जन समग्र ॥ नाना उपाय करितसे ॥८॥

तो दीनांचा कनवाळू ॥ नानारीती करीत सांभाळू ॥
परी हे दुर्जन कृतघ्न केवळू ॥ मुखे नामही न घेती पा ॥९॥

शिवनाम मुखी असावे म्हणोन ॥ साधुसंत करिती यत्न ॥
परी हे सर्व अति मूर्ख जन ॥ प्रपंची गुंतोन पडताती ॥३१०॥

तरणिउदयापासून ॥ अस्तमानापर्यंत अनुदिन ॥
निंदावाद मुखातून ॥ परी शिवनाम न येचि ॥११॥

यालागी सज्जनालागुनी ॥ विनवितो उभय हस्त जोडोनी ॥
शिवलीलामृत पठणेकरूनी ॥ मोक्ष जोडुनी घेईजे ॥१२॥

नित्य समस्त नोहे पठण ॥ तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण ॥
वाचिता शुद्धभावे करून ॥ मनोरथ पूर्ण होतील ॥१३॥

पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय ॥ इत्यादि मंत्र जपता दिव्य ॥
काशीविश्वेश्वराचे दर्शन भव्य ॥ घेतले ऐसे होतसे ॥१४॥

श्रीविश्वेश्वराच्या मुखांतील ॥ हे मंत्र आहेत सकळ ॥
म्हणोनि तो जाश्वनीळ ॥ प्रत्यक्ष होय जपकर्त्या ॥१५॥

आता शेवटी मी श्रीधर ॥ श्रोतयांप्रती जोडूनि कर ॥
विनंति करतो ही सादर ॥ अंतरामाजी ठेवावी ॥१६॥

पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र ॥ शिवकवच मृत्युंजयादि मंत्र ॥
शिवलीलामृतामाजी पवित्र ॥ आहेत जाणा निर्धारे ॥१७॥

यालागी हा उत्तम ग्रंथ ॥ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत ॥
तथापि देणार तरी निश्चित ॥ इतके गुह्य राखावे ॥१८॥

हा पंधरावा अध्याय संपूर्ण ॥ आणि मंत्र न द्यावे निंदकालागून ॥
एवढे श्रीधर हस्त जोडून ॥ श्रोतयांप्रती मागत ॥१९॥

हा शिवलीलामृत ग्रंथ ॥ श्रीमत्स्कंदपुराणांतर्गत ॥
ब्रह्मोत्तरखंडीचा अर्थ ॥ असे यथार्थ सर्वही ॥३२०॥

स्कंदपुरानी व्यास नारायणे ॥ जैसे कथिले संस्कृत भाषेने ॥
आणि नैमिषारण्यी सूताने ॥ जैसे ऋषींसी कथिले पै ॥२१॥

तैसे हे प्राकृत भाषेत समस्त ॥ पंधरा अध्याय शिवलीलामृत ॥
रचिले येणे श्रीविश्वनाथ ॥ असो प्रीत सर्वदा ॥२२॥

जैसे शंकरे कर्णी कथिले ॥ तैसे पत्री असे लिहिले ॥
न्यूनाधिक यद्यपि जाहले ॥ तरी दोष नसे मजवरी ॥२३॥

जय जय शिवा कर्पूरगौरा ॥ ब्रह्मानंद जगदुद्धारा ॥
श्रीधरह्रदयारविंद भ्रमरा ॥ अक्षय अभंगा दयानिधे ॥२४॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ रसभरित जेवी इक्षुदंड ॥
संत सज्जन परिसोत अखंड ॥ पंचदशोध्याय गोड हा ॥३२५॥

समाप्त ॥

Sponsored Links

SHARE

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • Click to share on Skype (Opens in new window)
Tags श्रीशिवलीलामृत अध्याय पंधरावा DEVOTIONAL

READ MORE

श्री बटुक भैरव स्तोत्र || Devotional ||
श्री बटुक भैरव अष्टोत्तर नामावली || Devotional ||
भगवान कुबेर यांची १०८ नावे || Devotional ||
श्री कुबेर अष्टोत्तर नामावली || Devotional ||
बुद्धिस्तोत्र || Buddhistotr || Adhyatmik ||
श्री सरस्वती अष्टोत्तर नामावली || Devotional ||
श्रीकृष्णाष्टोत्तरशतनाम स्तोत्रं || Stotr || Devotional ||
श्री कृष्ण अष्टोत्तर नामावली || Devotional ||
Read Previous Story श्रीशिवलिलामृत अध्याय बारावा || Devvotional ||
Read Next Story अघोरकष्टोद्धारणस्तोत्रम || Devotional ||

TOP POEMS

white painted papers

हरवलेले पत्र || PATR MARATHI KAVITA ||

हरवलेल्या पत्रास आता कोणी पत्ता सांगेन का खुप काही लिहलंय मनातल आता कोणी वाचेन का काळाच्या धुळीत मिसळुन सगळं काही संपलय का शोधुनही सापडेना काही वाट मी चुकतोय का
a couple sitting on the floor

पाहुनी तुझ एकदा !! || PAHUNI TUJH Ekda || Marathi love Poem ||

पाहुनी तुझला एकदा मी पुन्हा पुन्हा का पहावे नजरेतुनी बोलताना ते शब्द घायाळ का व्हावे घुटमळते मनही तिथेच तुझ्या वाटेवरती का फिरावे तुला भेटण्यास ते पुन्हा कोणते हे कारण शोधावे
happy ethnic couple with suitcase in park

कधी कधी || KADHI KADHI || MARATHI POEM||

कधी कधी मनाच्या या खेळात तुझ्यासवे मी का हरवतो तुला शोधण्याचा हट्ट इतका का? की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो तुला यायचं नाही माहितेय मला तरी मी तुझी वाट का पाहतो
a woman and her child sitting on the shore

मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||

वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!
glasses filled with tea on the table

चहा .. || CHAHA MARATHI POEM ||

अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या याच्या शिवाय पर्याय नाही पेपर वाचत दोन घोट घेता स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही
man and woman kissing under sunset

हास्य || HASYA MARATHI KAVITA ||

खळखळून वाहणाऱ्या नदीत तुझ हास्य वाहुन जातं माझ्या मनातल्या समुद्रात अलगद ते मिळुन जातं ओलावतात तो किनारा ही नावं तुझ कोरुन जातं लाटांच्या या खेळात कित्येक वेळा पुसुन जातं

TOP STORIES

a couple in white dress standing in view of the mountain

विरुद्ध || कथा भाग २ || MARATHI HATE STORY ||

"मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे मला काहीच न बोलता निघून गेली !! खरंच मी कधी ओळखु शकत नाही तिला !! पण नक्की ती काय शोधतेय ते सांगेन तर ना !! " सुहास कित्येक विचार मनातच बोलत होता.
a couple in white dress standing in view of the mountain

विरुद्ध || कथा भाग ४ || VIRUDDH MARATHI KATHA ||

अलगद मग ती कळी खुलावी नात्यास मग या गंध द्यावी कधी उगाच हसून जावी कधी माझ्यासवे गीत गावी
woman looking outside window

दृष्टी || कथा भाग ५ || शेवट भाग ||

दृष्टी (कथा भाग ५) शेवट भाग
pexels-photo-2956952.jpeg

सहवास || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

अखंड जळत राहिले मी माझेच मला विसरून अखेरच्या क्षणी उरले ते कलकांचे काजळ जगी
silhouette of happy couple against picturesque mountains in sunset

अंतर || कथा भाग १ || MARATHI LOVE STORY ||

कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला.
child and woman standing near water

आई || मराठी कथा भाग १ || Marathi Story ||

" ohh no..!! " शीतल हातातल्या pregnancy टेस्टिंग kit कडे पाहत म्हणाली. हातातले ते किट तसेच घेऊन ती बाथरूम मधून बाहेर आली. समोर बसलेल्या समीरकडे पाहत म्हणाली.  "जे मला नको होत तेच झालं!! "  समीर हातातले पुस्तक बाजूला ठेवत म्हणाला. "काय झाल ??" शीतल थोडी अडखळत म्हणाली. "I'm pregnant !!"

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy