Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क

मुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीशिवलिलामृत अध्याय पहिला || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय पहिला || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय पहिला || Devotional ||

श्रीगणेशाय नमः ।
श्रीसरस्वत्यैानमः ।
श्री गुरुभ्यो नमः ।
श्रीसांबसदाशिवाय नमः ।

ॐ नमोजी शिवा अपरिमिता । आदि अनादि मायातीता ।
पूर्णब्रह्मानंदशाश्र्वता । हेरंबताता जगद्गुरो ॥ १ ॥
ज्योतिर्मयस्वुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा ।
मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥
जय जय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या ।
विश्रवंभरा कर्ममोचकगहना । मनोजदहना मनमोहन जो ॥ ३ ॥
भक्तवल्लभ तूं हिमनगजामात । भाललोचन नीलग्रीव उमानाथ ।
मस्तकीं स्वर्धुनी विराजित । जातिसुमनहारवत जी ॥ ४ ॥
पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक । यक्षपतिमित्र प्रतापार्क ।
दक्षमखविध्वंसक मृगांक । निष्कलंक तव मस्तकीं ॥ ५ ॥
विशाळभाळ कर्पूरगौरवर्ण । काकोलभक्षक निजभक्तरक्षण ।
विश्र्वसाक्षी भस्मलेपन । भयमोचन भवहारक जो ॥ ६ ॥
जो सर्गस्थित्यंतकारण । त्रिशूलपाणी शार्दूलचर्मवसन ।
स्कंदतात सुहास्यवदन । मायाविपिनदहन जो ॥ ७ ॥
जो सच्चिदानंद निर्मळ । शिव शांत ज्ञानघन अचळ ।
जो भानुकोटितेज अढळ । सर्वकाळ व्यापक जो ॥ ८ ॥
सकलकलिमलदहन कल्मषमोचन । अनंत ब्रह्मांडनायक जगरक्षण ।
पद्मजतातमनरंजन । जननमरणनाशक जो ॥ ९ ॥
कमलोद्भव कमलावर । दशशतमुख दशशतकर ।
दशशतनेत्र सुर भूसुर । अहोरात्र ध्याती जया ॥ १० ॥
भव भवांतक भवानीवर । स्मशानवासी गिरां अगोचर ।
जो स्वर्धुनीतीरविहार । विश्र्वेश्र्वर काशीराज जो ॥ ११ ॥
व्योमहरण व्यालभूषण । जो गजदमन अंधकमर्दन ।
ॐकारमहाबलेश्र्वर आनंदघन । मदगर्वभंजन अज अजित जो ॥ १२ ॥
अमितगर्भ निगमागमनुत । जो दिगंबर अवयवरहित ।
उज्जयिनी महाकाळ कालातीत । स्मरणें कृतांतभय नाशी ॥ १३ ॥
दुरितकाननवैश्र्वानर । जो निजजनचित्तचकोतचंद्र ।
वेणुनृपवरमहत्पापहर । घृष्णेश्र्वर सनातन जो ॥ १४ ॥
जो उमाहृदयपंजरकीर । जो निजजनहृदयाब्जभ्रमर ।
तो सोमनाथ शशिशेखर । सौराष्ट्रदेशविहारी जो ॥ १५ ॥
कैरवलोचन करुणासमुद्र । रुद्राक्षभूषण रुद्रावतार ।
भीम भयानक भीमाशंकर । तपा पार नाहीं ज्याच्या ॥ १६ ॥
नागदमन नागभूषण । नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ।
ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण । नागाननजनक जो ॥ १७ ॥
वृत्रारिशत्रुजनकवरदायक । बाणवल्लभ पंचबाणांतक ।
भवरोगवैद्य त्रिपुरहारक । वैजनाथ अत्यद्भुत जो ॥ १८ ॥
त्रिनयन त्रिगुणातीत । त्रितापशमन त्रिविधभेदरहित ।
त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत । करुणाकर बलाहक जो ॥ १९ ॥
कामसिंधुरविदारक कंठीरव । जगदानंदकंद कृपार्णव ।
हिमनगवासी हैमवतीधव । हिमकेदार अभिनव जो ॥ २० ॥
पंचमुकुट मायामलहरण । निशिदिन गाती आम्नाय गुण ।
नाहीं जया आदि मध्य अवसान । मल्लिकार्जुन श्रीशैलवासी ॥ २१ ॥
जो शक्रारिजनकांतकप्रियकर । भूजासंतापहरण जोडोनि कर ।
जेथें तिष्ठत अहोरात्र । रामेश्र्वर जगद्गुरु ॥ २२ ॥
ऐसिया शिवा सर्वोत्तमा । अज अजित ब्रह्मानंदधामा ।
तुझा वर्णवया महिमा । निगमागमां अतर्क्य ॥ २३ ॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । तव गुणार्णव अगाध थोर ।
तेथें बुद्धि चित्त तर्क पोहणार । न पावती पार तत्त्वतां ॥ २४ ॥
कनकाद्रिसहित मेदिनीचें वजन । करावया ताजवा आणूं कोठून ।
व्योम सांठवे संपूर्ण । ऐसें सांठवण कोठून आणूं ॥ २५ ॥
मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता । कोणत्या मापें मोजूं आतां ।
प्रकाशावया आदित्या । दिप सरता केवीं होय ॥ २६ ॥
धरित्रीचें करुनि पत्र । कुधर कज्जल जलधि मषीपात्र ।
सुरद्रुम लेखणी विचित्र । करुनि लिहीत कंजकन्या ॥ २७ ॥
तेही तेथें राहिली तटस्थ । तरी आतां केवीं करुं ग्रंथ ।
जरी तूं मनीं धरिसी यथार्थ । तरी काय एक न होय ॥ २८ ॥
द्वितीयेचा किशोर इंदु । त्यासी जीर्ण वाहती दिनबंधु ।
तैसे तुझे गुण करुणासिंधु । वर्णीतसें अल्पमती ॥ २९ ॥
सत्यवतीहृदयरत्नमराळ । भेदीत गेला तव गुणनिराळ ।
अंत नकळेचि समूळ । तोही तटस्थ राहिला ॥ ३० ॥
तेथें मी मंदमति किंकर । केवीं क्रमूं शकें महीमांबर ।
परी आत्मसार्थक करावया साचार । तव गुणार्णवीं मीन झालों ॥ ३१ ॥
ऐसे शब्द ऐकतां साचार । तोषला दाक्षायणीवर ।
म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर । आरंभीं रस भरीन मी ॥ ३२ ॥
जैसा धरुनि शिशूचा हात । अक्षरें लिहवी पंडित ।
तैसे तव मुखें मम गुण समस्त । सुरस अत्यंत बोलवीन मी ॥ ३३ ॥
श्रोतीं व्हावें सावधचित्त । स्कंदपुराणीं बोलिला श्रीशुकतात ।
अगाध शिवलीलामृत ग्रंथ । ब्रह्मोत्तरखंड जें ॥ ३४ ॥
नैमिषारण्यीं शौनकादिक सुमती । सूताप्रति प्रश्र्न करिती ।
तूं चिदाकाशींचा रोहिणीपति । करीं तृप्ति श्रवणचकोरां ॥ ३५ ॥
तुवां बहुत पुराणें सुरस । श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष ।
अगाध महिमा आसपास । दशावतार वर्णिले ॥ ३६ ॥
भारत रामायण भागवत । ऐकतां श्रवण झाले तृप्त ।
परी शिवलीलामृत अद्भुत । श्रवणद्वारें प्राशन करुं ॥ ३७ ॥
यावरी वेदव्यासशिष्य सूत । म्हणे ऐका आतां देऊनि चित्त ।
शिवचरित्र परमाद्भुत । श्रवणें पातकपर्वत जळती ॥ ३८ ॥
आयुरारोग्य ऐश्र्वर्य अपार । संतति संपत्ति ज्ञानविचार ।
श्रवणमात्रें देणार । श्रीशंकर निजांगें ॥ ३९ ॥
सकळ तीर्थव्रतांचे फळ । महामखांचें श्रेय केवळ ।
देणार शिवचरित्र निर्मळ । श्रवणें कलिमल नासती ॥ ४० ॥
सकल यज्ञांमाजी जपयज्ञ थोर । म्हणाल जपावा कोणता मंत्र ।
तरी मंत्रराज शिवषडक्षर । बीजसहित जपावा ॥ ४१ ॥
दुजा मंत्र शिवपंचाक्षर । दोहींचे फळ एकचि साचार ।
उतरती संसारार्णवपार । ब्रह्मादिसुरऋषी हाचि जपती ॥ ४२ ॥
दारिद्र्य दुःख भय शोक । काम क्रोध द्वंद्व पातक ।
इतुक्यांसही संहारक । शिवतारक मंत्र जो ॥ ४३ ॥
तुष्टिपुष्टिधृतिकारण । मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण ।
कर्ता मंत्रराज संपूर्ण । अगाध महिमा न वर्णवे ॥ ४४ ॥
नवग्रहांत वासरमणि थोर । तैसा मंत्रांत शिवपंचाक्षर ।
कमलोद्भव कमलावर । अहोरात्र हाचि जपती ॥ ४५ ॥
शास्त्रांमाजी वेदांत । तीर्थामाजी प्रयाग अद्भुत ।
महास्मशान क्षेत्रांत । मंत्रराज तैसा हा ॥ ४६ ॥
शस्त्रांमाजी पाशुपत । देवांमाजी कैलासनाथ ।
कनकाद्रि जैसा पर्वतांत । मंत्र पंचाक्षरी तेवीं हा ॥ ४७ ॥
केवळ परमतत्त्व चिन्मात्र । परब्रह्म हेंचि तारक मंत्र ।
तीर्थव्रतांचे संभार । ओंवाळूनि टाकावे ॥ ४८ ॥
हा मंत्र आत्मप्राप्ताची खाणी । कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी ।
अविद्याकाननदाह ब्रह्माग्नी । सनकादिक ज्ञानि हाचि जपती ॥ ४९ ॥
स्त्री शूद्र आदिकरुनी । हाचि जप मुख्य चहूं वर्णीं ।
गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरुनी । दिवसरजनी जपावा ॥ ५० ॥
जागृतीं स्वप्नीं येता जातां । उभे असतां निद्रा करितां ।
कार्या जातां बोलतां भांडतां । सर्वदाही जपावा ॥ ५१ ॥
शिवमंत्र ध्वनिपंचानन । कर्णी आकर्णितां दोषावारण ।
उभेचि सांडिती प्राण । न लागतां क्षण भस्म होती ॥ ५२ ॥
न्यास मातृकाविधि आसन । न लागे जपावा प्रीतीकरुन ।
शिव शिव उच्चारिता पूर्ण । शंकर येऊनि पुढें उभा ॥ ५३ ॥
अखंड जपती जे हा मंत्र । त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र ।
आपुल्या अंगाची साउली करी पंचचक्र । अहोरात्र रक्षी तयां ॥ ५४ ॥
मंत्र जपकांलागुनी । शिव म्हणे मी तुमचा ऋणी ।
परी तो मंत्र गुरुमुखेंकरुनी । घेइंजे आधीं विधीनें ॥ ५५ ॥
गुरु करावा मुख्यवर्ण । भक्तिवैराग्यदिव्यज्ञान ।
सर्वज्ञ उदार दयाळ पूर्ण । या चिन्हेंकरुन मंडित जो ॥ ५६ ॥
मितभाषणी शांत दांत । अंगीं अमानित्व अदंभित्व ।
अहिंसक अतिविरक्त । तोचि गुरु करावा ॥ ५७ ॥
वर्णानां ब्राह्मणो गुरुः । हीं वेदवचनें निर्धारु ।
हा त्यापासोनि मंत्रोच्चारु । करुनि घ्यावा प्रीतीनें ॥ ५८ ॥
जरी आपणासी ठाउका मंत्र । तरी गुरुमुखें घ्यावा निर्धार ।
उगाचि जपे तो अविचार । तरी निष्फळ जाणिजे ॥ ५९ ॥
कामक्रोधमदयुक्त । जे कां प्राणी गुरुविरहित ।
त्यांनीं ज्ञान कथिलें बहुत । परी त्यांचे मुख न पहावें ॥ ६० ॥
वेदशास्त्रें शोधून । जरी झालें अपरोक्षज्ञान ।
करी संतांशीं चर्चा पूर्ण । तरी गुरुविण तरेना ॥ ६१ ॥
एक म्हणती स्वप्नीं आम्हांतें । मंत्र सांगितला भगवंते ।
आदरें सांगे लोकांतें । परी तो गुरुविण तरेना ॥ ६२ ॥
प्रत्यक्ष येऊनियां देव । सांगितला जरी गुह्यभाव ।
तरी तो न तरेचि स्वयमेव । गुरुसी शरण न रिघतां ॥ ६३ ॥
मौंजीबंधनाविण गायत्रीमंत्र । जपे तो भ्रष्ट अपवित्र ।
वराविण वर्‍हाडी समग्र । काय व्यर्थ मिळोनी ॥ ६४ ॥
तो वाचक झाला बहुवस । परी त्याचे न चुकती गर्भवास ।
म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरुस । शरण जावें निर्धारें ॥ ६५ ॥
जरी गुरु केला भलता एक । परी पूर्वसांप्रदाय नसे ठाऊक ।
जैसे गर्भांधासी सम्यक । वर्णव्यक्त स्वरुप न कळेचि ॥ ६६ ॥
असो त्या मंत्राचें पुरश्र्चरण । उत्तम क्षेत्रीं करावें पूर्ण ।
काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य । गोकर्ण क्षेत्र आदिकरुनि ॥ ६७ ॥
शिवविष्णुक्षेत्र सुगम । पवित्र स्थळीं जपावा सप्रेम ।
तरी येचिविषयीं पुरातन उत्तम । कथा सांगेन ते ऐका ॥ ६८ ॥
श्रवणीं पठणीं निजध्यास । आदरें धरावा दिवसेंदिवस ।
अनुमोदन देतां कथेस । सर्व पापास क्षय होय ॥ ६९ ॥
श्रवण मनन निजध्यास । धरितां साक्षात्कार होय सरस ।
ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस । पावन सर्व होती ॥ ७० ॥
तरी मथुरानाम नगर । यादववंशीं परमपवित्र ।
दाशार्हनामें राजेंद्र । अति उदार सुलक्षणी ॥ ७१ ॥
सर्व राजे देती करभार । कर जोडोनि नमिती वारंवार ।
त्यांच्या मुगुटरत्नकिरणें साचार । प्रपदें ज्याचीं उजळलीं ॥ ७२ ॥
मुगुटघर्षणेंकरुनी । किरणें पडलीं दिसती चरणीं ।
जेणें सत्तावसन पसरुनी । पालाणिली कुंभिनी हे ॥ ७३ ॥
उभारिला यशोध्वज । जेवी शरत्काळींचा द्विजराज ।
सकल प्रजा आणि द्विज । चिंतिती कल्याण जयाचें ॥ ७४ ॥
जैसा शुद्धद्वितीयेचा हिमांश । तेवीं ऐश्र्वर्य चढे विशेष ।
जो दुर्बुद्धिदासीस । स्पर्श न करी कालत्रयीं ॥ ७५ ॥
सद्बुद्धिधर्मपत्नीसीं रत । स्वरुपाशीं तुळिजे रमानाथ ।
दानशस्त्रें समस्त । यांचकांचे दारिद्र्य निवटिलें ॥ ७६ ॥
भृभुंजांवरी जामदग्न्य । समरांगणीं जेवीं प्रळयाग्न ।
ठाण न चळे रणींहून । कुठारघायें भूरुह जैसा ॥ ७७ ॥
चतुर्दश विद्या चौसष्टी कळा । आकळी जेवीं करतळींचा आवळा ।
जेणें दानमेघें निवटिला । दारिद्र्यधुरोळा याचकांचा ॥ ७८ ॥
बोलणें अति मधुर । मेघ गर्जे जेवीं गंभीर ।
प्रजाजनांचे चित्तमयूर । नृत्य करिती स्वानंदें ॥ ७९ ॥
ज्याचा सेनासिंधु देखोनि अद्भुत । जलसिंधु होय भयभीत ।
निश्र्चळ अंबारींचा ध्रुव सत्य । वचन तेवीं न चळेचि ॥ ८० ॥
त्याची कांता रुपवती सती । काशीराजकुमारी नाम कलावती ।
जिचे स्वरुप वर्णी सरस्वती । विश्र्वदनें करुनियां ॥ ८१ ॥
जे लावण्यसागरींची लहरी । खंजनाक्षी बिंबाधरी ।
मृदुभाषिणी पिकस्वरी । हंसगमना हरिमध्या ॥ ८२ ॥
शशिवदना भुजंगवेणी । अलंकारा शोभा जिची तनु आणी ।
दर्शन झळकती जेवीं हिरेखाणी । बोलता सदनीं प्रकाश पडे ॥ ८३ ॥
सकलकलानिपुण । यालागी कलावती नाम पूर्ण ।
जें सौंदर्यवैरागरींचे रत्न । जे निधान चातुर्यभूमीचें ॥ ८४ ॥
आंगींचा सुवास न माये सदनांत । जिचें मुखाब्ज देखतां नृपनाथ ।
नेत्रमिलिंद रुंजी घालीत । धणी पाहतां न पुरेचि ॥ ८५ ॥
नूतन आणिली पर्णून । मनसिजें आकर्षिलें रायाचें मन ।
बोलावूं पाठविलें प्रीतीकरुन । परी ते न येचि प्रार्थिता ॥ ८६ ॥
स्वरुपश्रृंगार जाळें पसरुन । आकर्षिला नुपमानसमीन ।
यालागीं दाशर्हराजा उठोन । आपणचि गेला तिजपाशीं ॥ ८७ ॥
म्हणे श्रृंगारवल्ली शुभांगी । मम तनुवृक्षासी आलिंगीं ।
उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगीं । अत्यानंदें सर्वांदेखतां ॥ ८८ ॥
तव ते श्रृंगारसरोवरमराळीं । बोले सुहास्यवदना वेल्हाळी ।
म्हणे म्यां उपासिला शशिमौळी । सर्वकाळ व्रतस्थ असें ॥ ८९ ॥
जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत । गर्भिणी किंवा ऋतुस्नात ।
अभुक्त अथवा व्रतस्थ । वृद्ध अशक्त न भोगावी ॥ ९० ॥
स्त्रीपुरुषें हर्षयुक्त । असावीं तरुण रुपवंत ।
अष्टभोगेंकरुनि युक्त । चिंताग्रस्त नसावीं ॥ ९१ ॥
पर्वकाळ व्रतदिन निरसून । उत्तमकाळीं षड्रस अन्न भक्षून ।
मग ललना भोगावी प्रीतीकरुन । राजलक्षण सत्य हें ॥ ९२ ॥
राव काममदें मत्त प्रचंड । रतिभरें पसरोनि दोर्दंड ।
आलिंगन देता बळें प्रचंड । शरीर त्याचें पोळलें ॥ ९३ ॥
लोहार्गला तप्त अत्यंत । तैसी कलावतीची तनू पोळत ।
नृप वेगळा होऊनि पुसत । कैसा वृतांत सांग हा ॥ ९४ ॥
श्रृंगारसदनविलासिनी । मम हृदयानंदवर्धिनी ।
सकळ संशय टाकुनी । मुळींहूनि गोष्टी सांग ॥ ९५ ॥
म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस । क्रोधें भरों नेदीं मानस ।
माझा गुरु स्वामी दुर्वास । अनसुयात्मज महाराज ॥ ९६ ॥
त्या गुरुनें परम पवित्र । मज दीधला शिवपंचाक्षरी मंत्र ।
तो जपतां अहोरात्र । परमपावन पुनीत मी ॥ ९७ ॥
ममांग शीतळ अत्यंत । तव कलेवर पापसंयुक्त ।
अगम्यागमन केलें विचाररहित । अभक्ष्य तितुकें भक्षिलें ॥ ९८ ॥
मज श्रीगुरुदयेंकरुन । राजेन्द्रा आहे त्रिकाळज्ञान ।
तुज जप तप शिवार्चन । घडलें नाहीं सर्वथा ॥ ९९ ॥
घडलें नाहीं गुरुसेवन । पुढें राज्यांतीं नरक दारुण ।
ऐकतां राव अनुतापेंकरुन । सद्गदित जाहला ॥ १०० ॥
म्हणे कलावती गुणगंभीरे । तो शिवमंत्र मज देईं आदरें ।
ज्याचेनि जपें सर्वत्रें । महत्पापें भस्म होती ॥ १०१ ॥
ती म्हणे हे भूभुजेंद्र । मज सांगावया नाहीं अधिकार ।
मी वल्लभा तूं प्राणेश्र्वर । गुरु निर्धार तूं माझा ॥ १०२ ॥
तरी यादवकुळीं गुरु वसिष्ठ । गर्गमुनि महाराज श्रेष्ठ ।
जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट । विद्या वरिष्ठ तयाची ॥ १०३ ॥
जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी । तैसाच महाराज गर्गमुनी ।
त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी । शिवदीक्षा घेइंजे ॥ १०४ ॥
मग कलावतीसहित भूपाळ । गर्गाश्रमीं पातला तत्काळ ।
साष्टांग नमूनि करकमळ । जोडूनि उभा ठाकला ॥ १०५ ॥
अष्टभावें दाटूनि हृदयीं । म्हणे शिवदीक्षा मज देईं ।
म्हणूनि पुढती लागे पायीं । मिती नाहीं भावार्थ ॥ १०६ ॥
यावरी तो गर्गमुनी । कृतांतभगिनीतीरा येऊनी ।
पुण्यवृक्षातळीं बैसोनी । स्नान करवी यमुनेचें ॥ १०७ ॥
उभयतांनीं करुनि स्नान । यथासांग केलें शिवपूजन ।
यावरी दिव्य रत्नें आणून । अभिषेक केला गुरुसी ॥ १०८ ॥
दिव्याभरणें दिव्य वस्त्रें । गुरु पुजिला नृपें आदरें ।
गुरुदक्षिणेसी भांडारे । दाशार्हरायें समर्पिली ॥ १०९ ॥
तनुमनधनेंसी उदार । गर्गचरणीं लागे नृपवर ।
असोनि गुरुसी वंचिती जे पामर । ते दारुण निरय भोगिती ॥ ११० ॥
श्रीगुरुचे घरीं आपदा । आपण भोगी सर्व संपदा ।
कैचें ज्ञान त्या मतिमंदा । गुरुब्रह्मानंदा न भजे जो ॥ १११ ॥
एक म्हणती तनुमनधन । नाशिवंत गुरुसी काय अर्पून ।
परम चांडाळ त्याचें शठज्ञान । कदा वदन न पाहावें ॥ ११२ ॥
धिक् विद्या धिक् ज्ञान । धिक् वैराग्यसाधन ।
चतुर्वेद शास्त्रें आला पढून । धिक् पठण तयाचें ॥ ११३ ॥
जैसा खरपृष्ठीवरी चंदन । षड्रसीं दर्वी व्यर्थ फिरुन ।
जेवीं मापें तंदुल मोजून । इकडून तिकडे तिकडे टाकिती ॥ ११४ ॥
घाणा इक्षुरस गाळी । इतर सेविती रसनव्हाळी ।
कीं पात्रांत शर्करा सांठविली । परी गोडी न कळे तया ॥ ११५ ३
असो ते अभाविक खळ । तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ ।
षोडशोपचारें निर्मळ । पूजन केलें गुरुचें ॥ ११६ ॥
उभा ठाकला कर जोडून । मग तो गर्गे हृदयीं धरुन ।
मस्तकीं हस्त ठेवून । शिवशडक्षर मंत्र सांगे ॥ ११७ ॥
हृदयआकाशभुवनीं । उगवला निजबोधतरणी ।
अज्ञानतम तेच क्षणीं । निरसूनि नवल जाहलें ॥ ११८ ॥
अद्भुत मंत्राचें महिमान । रायाचिया शरीरामधून ।
कोट्यावधि काक निघोन । पळते झाले तेधवां ॥ ११९ ॥
किती एकांचे पक्ष जळाले । चरफडितचि बाहेर आले ।
अवघेचि भस्म होऊनि गेले । संख्या नाहीं तयांतें ॥ १२० ॥
जैसा किंचित् पडतां कृशान । दग्ध होय कंटकवन ।
तैसे काक गेले जळोन । देखोनि राव नवल करी ॥ १२१ ॥
गुरुसी नमूनि पुसे नृप । काक कैंचे निघाले अमूप ।
माझें झालें दिव्यरुप । निर्जरांहूनि आगळं ॥ १२२ ॥
गुरु म्हणे ऐक साक्षेपें । अनंत जन्मींची महापापें ।
बाहेर निघालीं काकरुपें । शिवमंत्रप्रतापें भस्म झालीं ॥ १२३ ॥
निष्पाप झाला नृपवर । गुरुस्तवन करी वारंवार ।
धन्य पंचाक्षरी मंत्र । तूं धन्य गुरु पंचाक्षरी ॥ १२४ ॥
पंचभूतांची झाडणी करुन । सावध केलें मजलागून ।
चारी देह निरसून । केलें पावन गुरुराया ॥ १२५ ॥
पंचवीस तत्त्वांचा मेळ । त्यांत सांपडलों बहु काळ ।
क्रोध महिषासुर सबळ । कामवेताळ धुसधुसी ॥ १२६ ॥
आशा मनशा तृष्णा कल्पना । भ्रांति भुली इच्छा वासना ।
या जखिणी यक्षिणी नाना । विटंबीत मज होत्या ॥ १२७ ॥
ऐसा हा अवघा मायामेळ । तुवां निरसिला तातकाळ ।
धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ । गुरु दयाळ धन्य तूं ॥ १२८ ॥
सहस्रजन्मपर्यंत । मज ज्ञान झालें समस्त ।
पापें जळालीं असंख्यात । काकरुपें देखिलीं म्यां ॥ १२९ ॥
सुवर्णस्तेय अभक्ष्य भक्षक । सुरापान गुरुतल्पक ।
परदारागमन गुरुनिंदक । ऐसीं नाना महत्पापें ॥ १३० ॥
गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक। स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक ।
परनिंदा पशुहिंसक । वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन ॥ १३१ ॥
मित्रद्रोही गुरुद्रोही । विश्र्वद्रोही वेदद्रोही ।
प्रासादभेद लिंगभेद पाहीं । पंक्तिभेद हरिहरभेद ॥ १३२ ॥
ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक। पाखांडमति मिथ्यावादक ।
भेदबुद्धि भ्रष्टमार्गस्थापक । स्त्रीलंपटदुराचारी ॥ १३३ ॥
कृतघ्न परद्रव्यापहारक । कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउचछेदक ।
बकध्यानी गुरुछळक । मातृहतक पितृहत्या ॥ १३४ ॥
दुर्बलघातुक कर्ममार्गगघ्न । दीनहत्यारी पाहती पैशून्य ।
तृणदाहक पीडिती सज्जन । गोत्रवध भगिनीवध ॥ १३५ ॥
कन्या विक्रय गोविक्रय । हयविक्रय रसविक्रय ।
ग्रामदाहक आत्महत्या पाहें । भ्रूणहत्या महापापें ॥ १३६ ॥
हीं महापापें सांगितलीं । क्षुद्रपापें नाहीं गणिलीं ।
इतुकीं काकरुपें निघालीं । भस्म झालीं प्रत्यक्ष ॥ १३७ ॥
कांहीं गांठीं पुण्य होतें परम । म्हणोनि नरदेह पावलों उत्तम ।
गुरुप्रतापें तरलों निःसीम । काय महिमा बोलू आतां ॥ १३८ ॥
गुरुस्तवन करुनि अपार । ग्रामासी आला दाशार्ह नृपवर ।
सवें कलावती परमचतुर । केला उद्धार रायाचा ॥ १३९ ॥
जपतां शिवमंत्र निर्मळ । राज्य वर्धमान झालें सकळ ।
अवर्षणदोष दुष्काळ । देशांतुनि पळाले ॥ १४० ॥
वैधव्य आणि रोग मृत्य । नाहींच कोठें देशांत ।
आलिंगितां कलावतीसी नृपनाथ । शशीऐसी शीतल वाटे ॥ १४१ ॥
शिव भजनीं लाविलें सकळ जन । घरोघरीं होत शिवकीर्तन ।
रुद्राभिषेक शिवपूजन । ब्राह्मणभोजन यथाविधि ॥ १४२ ॥
दाशार्हरायाचें आख्यान । जे लिहिती ऐकती करिती पठण ।
प्रीतीकरुनि ग्रंथरक्षण । अनुमोदन देती जे ॥ १४३ ॥
सुफळ त्यांचा संसार । त्यांसी निजांगें रक्षी श्रीशंकर ।
धन्य धन्य तेचि नर । शिवमहिमा वर्णिती जे ॥ १४४ ॥
पुढें कथा सुरस सार । अमृताहूनि रसिक फार ।
ऐकोत पंडित चतुर । गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥ १४५ ॥
पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी । श्रीधरमुख निमित्त करुनी ।
तोचि बोलवीत विचारोनी । पाहावें मनीं निर्धारें ॥ १४६ ॥
श्रीधरवरद पांडुरंग । तेणें शिरीं धरिलें शिवलिंग ।
पूर्णब्रह्मानंद अभंग । नव्हे विरंग कालत्रयीं ॥ १४७ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । प्रथमाध्याय गोड हा ॥ १४८ ॥

॥ इती श्री प्रथमोऽध्यायः सम्पाप्तः ॥

Sponsored Links

SHARE

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • Click to share on Skype (Opens in new window)
Tags श्रीशिवलिलामृत अध्याय पहिला DEVOTIONAL

READ MORE

श्री बटुक भैरव स्तोत्र || Devotional ||
श्री बटुक भैरव अष्टोत्तर नामावली || Devotional ||
भगवान कुबेर यांची १०८ नावे || Devotional ||
श्री कुबेर अष्टोत्तर नामावली || Devotional ||
बुद्धिस्तोत्र || Buddhistotr || Adhyatmik ||
श्री सरस्वती अष्टोत्तर नामावली || Devotional ||
श्रीकृष्णाष्टोत्तरशतनाम स्तोत्रं || Stotr || Devotional ||
श्री कृष्ण अष्टोत्तर नामावली || Devotional ||
Read Previous Story श्रीशिवलिलामृत अध्याय तेरावा || Devotional ||
Read Next Story श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा || Devotional ||

TOP POEMS

white painted papers

हरवलेले पत्र || PATR MARATHI KAVITA ||

हरवलेल्या पत्रास आता कोणी पत्ता सांगेन का खुप काही लिहलंय मनातल आता कोणी वाचेन का काळाच्या धुळीत मिसळुन सगळं काही संपलय का शोधुनही सापडेना काही वाट मी चुकतोय का
a couple sitting on the floor

पाहुनी तुझ एकदा !! || PAHUNI TUJH Ekda || Marathi love Poem ||

पाहुनी तुझला एकदा मी पुन्हा पुन्हा का पहावे नजरेतुनी बोलताना ते शब्द घायाळ का व्हावे घुटमळते मनही तिथेच तुझ्या वाटेवरती का फिरावे तुला भेटण्यास ते पुन्हा कोणते हे कारण शोधावे
happy ethnic couple with suitcase in park

कधी कधी || KADHI KADHI || MARATHI POEM||

कधी कधी मनाच्या या खेळात तुझ्यासवे मी का हरवतो तुला शोधण्याचा हट्ट इतका का? की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो तुला यायचं नाही माहितेय मला तरी मी तुझी वाट का पाहतो
a woman and her child sitting on the shore

मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||

वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!
glasses filled with tea on the table

चहा .. || CHAHA MARATHI POEM ||

अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या याच्या शिवाय पर्याय नाही पेपर वाचत दोन घोट घेता स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही
man and woman kissing under sunset

हास्य || HASYA MARATHI KAVITA ||

खळखळून वाहणाऱ्या नदीत तुझ हास्य वाहुन जातं माझ्या मनातल्या समुद्रात अलगद ते मिळुन जातं ओलावतात तो किनारा ही नावं तुझ कोरुन जातं लाटांच्या या खेळात कित्येक वेळा पुसुन जातं

TOP STORIES

bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग १ || LOVE STORIES ||

आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगितलं होतं की आता पुन्हा प्रेमात पडायचं नाही. ती आली पुन्हा तरी तिला माफ करायचं नाही. पण जेव्हा तिचा आठवणीतला चेहरा पाहतो तेव्हा सगळं हे ठरवलेलं चुकीचं होईल अस वाटत राहतं
child and woman standing near water

आई || कथा भाग १० || Story || Marathi ||

"हॅलो !! हा मेघा बोल ना !!" "मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??"
child and woman standing near water

आई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||

"शीतल काही विचारायचं होत !! " "विचार ना !!" "पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??" "तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! " "पण ती राहील तुझ्याशिवाय !!" "तिला राहावं लागेल !!" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. "समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!" "पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! "
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न ||अंतिम भाग || SWAPN MARATHI KATHA ||

बरसल्या सरी अगणित वेळा त्या शांत कराया मातीस तूही प्रयत्न कर अगणित वेळा मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस
fashion man people woman

द्वंद्व || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले असे काय?? की विशाल स्वतःला हरवून गेला.
child and woman standing near water

आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy