Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क

मुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीशिवलिलामृत अध्याय दुसरा || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय दुसरा  || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय दुसरा || Devotional ||

श्रीगणेशाय नमः ।

जेथें सर्वदा शिवस्मरण । तेथेंभुक्ति मुक्ति सर्वकल्याण ।
नाना संकटें विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयीं ॥ १ ॥
संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिसें घडो शिवस्मरण ।
न कळतां परिसासी लोह जाण । संघटतां सुवर्ण करी कीं ॥ २ ॥
न कळतां प्राशिलें अमृत । परी अमर करी कीं यथार्थ ।
औषधी नेणतां भक्षित । परी रोग सत्य हरी कीं ॥ ३ ॥
शुष्कतृणपर्वत अद्भुत । नेणतां बाळक अकस्मात ।
अग्निस्फुलिंग टाकीत । परी भस्म यथार्थ करी कीं ॥ ४ ॥
तैसें न कळतां घडे शिवस्मरण । परी सकळ दोषां होय दहन ।
अथवा विनोदेंकरुन । शिवस्मरण घडो कां ॥ ५ ॥
हे कां व्यर्थ हांका फोडिती । शिव शिव नामें आरडती ।
अरे कां हे उगे न राहती । हरहर गर्जती वेळोवेळां ॥ ६ ॥
शिवनामाचा करिती कोल्हाळ । माझें उठविलें कपाळ ।
शिव शिव म्हणतां वेळोवेळ । काय येतें यांच्या हाता ॥ ७ ॥
ऐसी हेळणा करी क्षणक्षणीं । परी उमावल्लभनाम ये वदनीं ।
पुत्रकन्यानामेंकरुनी । शिवस्मरण घडो कां ॥ ८ ॥
महाप्रीतीनें करितां शिवस्मरण । आदरें करितां शिवध्यान ।
शिवस्वरुप मानूनी ब्राह्मण । संतर्पण करी सदां ॥ ९ ॥
ऐसी शिवीं आवडी धरी । त्याहीमाजी आली शिवरात्री ।
उपवास जागरण करी । होय बोहरी महत्पापा ॥ १० ॥
ते दिवशीं बिल्वदळें घेऊन । यथासांग घडलें शिवार्चन ।
तरी सहस्त्रजन्मींचे पाप संपूर्ण । भस्म होऊन जाईल ॥ ११ ॥
नित्य बिल्वदळें शिवासी वाहत । त्याएवढा नाहीं पुण्यवंत ।
तो तरेल हें नवल नव्हे सत्य । त्याच्या दर्शनें बहुत तरती ॥ १२ ॥
प्रातःकाळी घेतां शिवदर्शन । यामिनीचें पाप जाय जळोन ।
पूर्वजन्मींचें दोष गहन । माध्याह्नीं दर्शन घेतां नुरती ॥ १३ ॥
सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम । सप्तजन्मींचें पाप होय भस्म ।
शिवरात्रीचा महिमा परम । शेषही वर्णू शकेना ॥ १४ ॥
कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण । महोदय गजच्छाया ग्रहण ।
इतुकेही पर्वकाळ ओंवाळून । शिवरात्रीवरुन टाकावे ॥ १५ ॥
शिवरात्री आधींचा पुण्यदिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष ।
त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥ १६ ॥
वसिष्ठ विश्र्वामित्रादि मुनीश्र्वर । सुरगण गंधर्व किन्नर ।
सिद्ध चारण विद्याधर । शिवरात्रीव्रत करिताती ॥ १७ ॥
यदर्थीं सुरस कथा बहुत । शौनकादिकां सांगे सूत ।
ती श्रोतीं ऐकावी सावचित्त । अत्यादरें करुनियां ॥ १८ ॥
तरी मासांमाजी माघमास । ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष ।
त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस । मुख्य शिवरात्री जाणिजे ॥ १९ ॥
विंध्याद्रिवासी एक व्याध । मृगपक्षीघातक परमनिषिद्ध ।
महानिर्दय हिंसक निषाद । केले अपराध बहुत तेणें ॥ २० ॥
धनुष्यबाण घेऊनि करीं । पारधीसी चालिला दुराचारी ।
पाश वागुरा कक्षेसी धरी । कवच लेत हरितवर्ण ॥ २१ ॥
करीं गोधांगुलित्राण । आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन ।
काननीं जातां शिवस्थान । शोभायमान देखिलें ॥ २२ ॥
तंव तो शिवरात्रीचा दिन । यात्रा आली चहूंकडून ।
शिवमंदिर श्रृंगारुन । शोभा आणिली कैलासींची ॥ २३ ॥
शुद्धरजततगटवर्ण । देवालय झळके शोभायमान ।
गगनचुंबित ध्वज पूर्ण । रत्नजडित कळस तळपताती ॥ २४ ॥
मध्यें मणिमय शिवलिंग । भक्त पूजा करिती सांग ।
अभिषेकधारा अभंग । विप्र धरिती रुद्रघोषें ॥ २५ ॥
एक टाळ मृदंग घेऊन । सप्रेम करिती शिवकीर्तन ।
श्रोते करटाळी वाजवून । हरहर शब्दें घोष करिती ॥ २६ ॥
नाना परिमळद्रव्यसुवास । तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष ।
लक्ष दीपांचे प्रकाश । जलजघोष घंटारव ॥ २७ ॥
शशिमुखा गर्जती भेरी । त्यांचा नाद न माये अंबरीं ।
एवं चतुर्विध वाद्यें नानापरी । भक्त वाजविती आनंदें ॥ २८ ॥
तों तेथें व्याध पातला । समोर विलोकी सर्व सोहळा ।
एक मुहूर्त उभा ठाकला । हांसत बोलिला विनोदे ॥ २९ ॥
हे मूर्ख अवघे जन । येथें द्रव्य काय व्यर्थ नासोन ।
आंत दगड बाहेरी पाषाण । देवपण येथें कैंचे ॥ ३० ॥
उत्तम अन्न सांडून । व्यर्थ कां करिती उपोषण ।
ऐसिया चेष्टा करीत तेथून । काननाप्रती जातसे ॥ ३१ ॥
लोक नामें गर्जती वारंवार । आपणहि विनोदें म्हणें शिव हर हर ।
सहज सव्य घालूनि शिवमंदिर । घोर कांतार प्रवेशला ॥ ३२ ॥
वाचेसी लागला तोचि वेध । विनोदें बोले शिव शिव शब्द ।
नामप्रतापें दोष अगाध । झडत सर्व चालिले ॥ ३३ ॥
घोरांदर सेवितां वन । नाढळतीच जीव लघुदारुण ।
तों वरुणदिग्वधूचें सदन । वासरमणि प्रवेशला ॥ ३४ ॥
निशा प्रवर्तली सबळ । कीं ब्रह्मांड करंडां भरलें काजळ ।
कीं विशाळ कृष्णकंबळ । मंडप काय उभारिला ॥ ३५ ॥
विगत धवा जेवीं कामिनी । तेवीं न शोभे कदा यामिनी ।
जरी मंडित दिसे उडुगणीं । परी पतिहीन रजनी ते ॥ ३६ ॥
जैसा पंडित गेलिया सभेंतून । मूर्ख जल्पती पाखंडज्ञान ।
जेवीं अस्ता जाता सहस्त्रकिरण । उडुगणें मागें झळकती ॥ ३७ ॥
असो ऐसी निशा दाटली सुबद्ध । अवघा वेळ उपवासी निषाद ।
तों एक सरोवर अगाध । दृष्टीं देखिलें शोधितां ॥ ३८ ॥
अनेक संपत्ती सभाग्यसदनीं । तेवीं सरोवरीं शोभती कुमुदिनी ।
तटीं बिल्ववृक्ष गगनीं । शोभायमान पसरला ॥ ३९ ॥
योगभ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन । तेवीं बिल्व डहाळिया गगनींहून ।
भूमीस लागल्या येऊन । माजी रविशशिकिरण न दिसे ॥ ४० ॥
त्यांत तम दाटलें दारुण । माजी बैसला व्याध जाऊन ।
शरासनीं शर लावून । कानाडी ओढोन सावज लक्षी ॥ ४१ ॥
दृष्टीं बिल्वदळें दाटली बहुत । तीं दक्षिणहस्तें खुडोनि टाकीत ।
तों तेथें पद्मर्जहस्तें स्थापित । शिवलिंग दिव्य होतें ॥ ४२ ॥
त्यावरी बिल्वदळें पडत । तेणें संतोषला अपर्णानाथ ।
व्याधासी उपवास जागरण घडत । सायास न करितां अनायासें ॥ ४३ ॥
वाचेसी शिवनामाचा चाळा । हर हर म्हणे वेळोवेळां ।
पापक्षय होत चालिला । पूजन स्मरण सर्व घडलें ॥ ४४ ॥
एक याम झालिया रजनी । तों जलपानालागीं एक हरिणी ।
आली तेथें ते गर्भिणी । परम सुकुमार तेजस्वी ॥ ४५ ॥
व्याध तिणें लक्षिला दुरुन । कृतांतवत परम दारुण ।
आकर्ण ओढिला बाण । देखोनि हरिणी बोलतसे ॥ ४६ ॥
म्हणे महापुरुषा अन्यायाविण । कां मजवरी लाविला बाण ।
मी तव हरिणी आहे गर्भिण । वध तुवां न करावा ॥ ४७ ॥
उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान । वधितां दोष तुज दारुण ।
एक रथभरी जीव वधिता सान । तरी एक बस्त वधियेला ॥ ४८ ॥
शत बस्त वधितां एक । वृषभहत्येचें पातक ।
शत वृषभ तैं गोहत्या देख । घडली शास्त्र वदतसे ॥ ४९ ॥
शत गोहत्येचें पातक पूर्ण । एक वधिता होय ब्राह्मण ।
शत ब्रह्महत्येचें पातक जाण । एक स्त्री वधिलिया ॥ ५० ॥
शत स्त्रियांहूनि अधिक । एक गुरुहत्येचे पातक ।
त्याहूनि शतगुणी देख । एक गर्भिणी वधिलिया ॥ ५१ ॥
तरी अन्याय नसतां ये अवसरीं । मज मारिसी कां वनांतरीं ।
व्याध म्हणे कुटुंब घरीं । उपवास वाट पहात ॥ ५२ ॥
मीही आजी निराहार । अन्न नाहींच अणुमात्र ।
परी मृगी होऊनि सुंदर । गोष्टी वदसी शास्त्रींच्या ॥ ५३ ॥
मज आश्र्चर्य वाटतें पोटीं । नराऐशा सांगसी गोष्टी ।
तिज देखोनियां दृष्टीं । दया हृदयीं उपजतसे ॥ ५४ ॥
पूर्वी तूं होतीस कोण । तुज एवढें ज्ञान कोठून ।
तूं विशाळनेत्री रुपलावण्य । सर्व वर्तमान मज सांगे ॥ ५५ ॥
मृगी म्हणे ते अवसरीं । पूर्वी मंथन करितां क्षीर सागरीं ।
चतुर्दश रत्नें काढिलीं सुरासुरीं । महाप्रयत्नेंकरुनियां ॥ ५६ ॥
त्यांमाजी मी रंभा चतुर । मज देखोनि भुलती सुरवर ।
नाना तपें आचरोनि अपार । तपस्वी पावती आम्हांतें ॥ ५७ ॥
म्यां नयनकटाक्षजाळें पसरुन । बांधिले निर्जरांचें मनमीन ।
माझिया अंगसुवास वेधून । मुनिभ्रमर धांवती ॥ ५८ ॥
माझें गायन ऐकावया सुरंग । सुधापानीं धांवती कुरंग ।
मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग । स्वरुपें न मानी कोणासी ॥ ५९ ॥
मद अंगीं चढला बहुत । शिवभजन टाकिलें समस्त ।
शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत । शिवार्चन सांडिलें म्यां ॥ ६० ॥
सोडोनियां सुधापान । करुं लागलें मद्यप्राशन ।
हिरण्यनामा दैत्य दारुण । सुर सोडोनि रतलें त्यासीं ॥ ६१ ॥
ऐसा लोटला काळ अपार । मृगयेसी गेला तो असुर ।
त्या दुष्टासंगे अपर्णावर- । भजनपूजन विसरलें ॥ ६२ ॥
मनासी ऐसें वाटलें पूर्ण । असुर गेला मृगयेलागुन ।
इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन । म्हणोनि गेलें कैलासा ॥ ६३ ॥
मज देखतां हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत ।
तूं परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकीं ॥ ६४ ॥
तुझ्या सख्या दोघीजणी । त्या होतील तुजसवें हरिणी ।
हिरण्य असुर माझिये भजनीं । असावध सर्वदा ॥ ६५ ॥
तोही मृग होऊनि सत्य । तुम्हांसींचि होईल रत ।
ऐक व्याधा सावचित्त । मग म्यां शिव प्रार्थिला ॥ ६६ ॥
हे पंचवदना विरुपाक्षा । सच्चिदानंदा कर्माध्यक्षा ।
दक्षमखदळणा सर्वसाक्षा । उःशाप देईं आम्हांतें ॥ ६७ ॥
भोळा चक्रवर्ती दयाळ । उःशाप वदला पयःफेनधवल ।
द्वादश वर्षें भरतां तात्काळ । पावाल माझिया पदातें ॥ ६८ ॥
मग आम्हीं मृगयोनीं । जन्मलों ये कर्मअवनीं ।
मी गर्भिणी आहें हरिणी । प्रसूतकाळ समीप असे ॥ ६९ ॥
तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन । सत्वर येतें गर्भ ठेवून ।
मग तूं सुखें घेईं प्राण । सत्य वचन हें माझें ॥ ७० ॥
ऐसी मृगी बोलिली सावचित्त । त्यावरी तो व्याध काय बोलत ।
तूं गोड बोलसी यथार्थ । परी विश्र्वास मज न वाटे ॥ ७१ ॥
नानापरी असत्य बोलोन । करावें शरीराचें संरक्षण ।
हें प्राणीमात्रासी आहे ज्ञान । तरी तूं शपथ वदे आतां ॥ ७२ ॥
महत्पापें उच्चारुन । शपथ वदें यथार्थ पूर्ण ।
यावरी ते हरिणी दीनवदन । वाहत आण ऐका ते ॥ ७३ ॥
ब्राह्मणकुळीं उपजोन । जो न करी वेदशास्त्राध्यन ।
सत्यशौचवर्जित संध्याहीन । माझें शिरीं पातक तें ॥ ७४ ॥
एक वेदविक्रय करिती पूर्ण । कृतघ्न परपीडक नावडे भजन ।
एक दानासी करिती विघ्न । गुरु निंदाश्रवण एक करिती ॥ ७५ ॥
रमावरउमावरांची निंदा । त्या पापाची मज होय आपदा ।
दान दिधलें जें ब्रह्मवृंदा । हिरोनी घेती माघारें ॥ ७६ ॥
एक यतिनिंदा करिती । एक शास्त्रें पहाती द्वैत निर्मिती ।
नाना भ्रष्टमार्ग आचरती । स्वधर्म आपुला सांडोनियां ॥ ७७ ॥
देवालयामाजी जाऊनी । हरिकथापुराणश्रवणीं ।
जे बैसती विडा घेउनी । ते कोडी होती पापिये ॥ ७८ ॥
जे देवळांत करिती स्त्रीसंभोग । कीं स्त्रीभ्रतारांसी करिती वियोग ।
ते नपुसंक होऊनि अभाग्य । उपजती या जन्मीं ॥ ७९ ॥
वर्मकर्में निंदा करीत । तो जगपुरीषभक्षक काग होत ।
शिष्यांसी विद्या असोनि न सांगत । तो पिंगळा होत निर्धारें ॥ ८० ॥
अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती । त्यानिमित्तें गंडमाळा होती ।
परक्षेत्रींच्या गाई वळूनि आणिती । ते अल्पायुषी होती या जन्मीं ॥ ८१ ॥
जो राजा करी प्रजापीडण । तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारुण ।
वृथा करी साधुछळण । निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥ ८२ ॥
स्त्रिया व्रतनेम करीत । भ्रतारासी अव्हेरीत ।
धनधान्य असोनि वंचित । त्या वाघुळा होती या जन्मीं ॥ ८३ ॥
पुरुष कुरुप म्हणोनियां त्यागिती । त्या या जन्मीं बालविधवा होती ।
तेथेंही जारकर्म करिती । मग त्या होती वारांगना ॥ ८४ ॥
ज्या भ्रतारासी निर्भर्सिती । त्या दासी किंवा कुलटा होती ।
सेवक स्वामीचा द्रोह करिती । ते जन्मा येती श्र्वानाच्या ॥ ८५ ॥
सेवकापासूनि सेवा घेऊन । त्याचें जो न दे वेतन ।
तो अत्यंत भिकारी होऊन । दारोदारीं हिंडतसे ॥ ८६ ॥
स्त्रीपुरुष गुज बोलतां । जो जाऊनि ऐके तत्वतां ।
त्याची स्त्री दुरावे हिंडतां । अन्न न मिळे तयातें ॥ ८७ ॥
जे जारणमारण करिती । ते भूत प्रेत पिशाच होती ।
यती उपवासें पीडिती । त्यांतें दुष्काळ जन्मवरी ॥ ८८ ॥
स्त्री रजस्वला होऊनी । गृही वावरे जे पापिणी ।
पूर्वज रुधिरीं पडती पतनीं । त्या गृही देव पितृगण न येती ॥ ८९ ॥
जे देवाच्या दिपाचें तेल नेती । ते या जन्मीं निपुत्रिक होती ।
ज्या रांधितां अन्न चोरोनी भक्षिती । त्या मार्जारी होती या जन्मीं ॥ ९० ॥
ब्राह्मणांसी कदन्न घालून । आपण भक्षिती षड्रसपक्वान्न ।
त्यांचे गर्भ पडती गळोन । आपुलिया कर्मवशें ॥ ९१ ॥
जो मातापित्यांसी शिणवीत । तो ये जन्मीं मर्कट होत ।
सासूश्र्वशुरां स्नुषा गांजित । तरी बाळक न वांचे तियेचें ॥ ९२ ॥
मृगी म्हणे व्याधालागून । जरी मी न ये परतोन ।
तरी ही महत्पापें संपूर्ण । माझ्या माथां बैसोत ॥ ९३ ॥
हे मिथ्या गोष्ट होय साचार । तरी घडो शिवपूजेचा अपहार ।
ऐसी शपथ ऐकतां निर्धार । व्याध शंकला मानसीं ॥ ९४ ॥
म्हणे पतिव्रते जाई आतां । सत्वर येईं निशा सरतां ।
हरिणी म्हणे शिवपदासी तत्वतां । पुण्यवंता जाशील ॥ ९५ ॥
उदकपान करुनि वेगीं । निजाश्रमा गेली ते कुरंगी ।
इकडे व्याध दक्षिणभागीं । टाकी बिल्वदळें खुडूनियां ॥ ९६ ॥
दोन प्रहर झाली यामिनी । द्वितीय पूजा शिवें मानुनी ।
अर्धपाप जळालें मुळींहुनी । सप्तजन्मींचें तेधवा ॥ ९७ ॥
नामीं आवड जडली पूर्ण । व्याध करी शिवस्मरण ।
मृगीमुखें ऐकिलें निरुपण । सहज जागरण घडलें तया ॥९८ ॥
तों दुसरी हरिणी अकस्मात । पातली तेथें तृषाक्रांत ।
व्याधें बाण ओढितां त्वरित । करुणा भाकी हरिणी ते ॥ ९९ ॥
म्हणे व्याधा ऐक ये समयीं । मज कामानळें पीडीलें पाहीं ।
पतीसी भोग देईनि लवलाही । परतोनि येतें सत्वर ॥ १०० ॥
व्याध आश्र्चर्य करी मनांत । म्हणे शपथ बोलोनि जाई त्वरित।
धन्य तुमचें जीवित्व । सर्व शास्त्रार्थ ठाउका ॥ १०१ ॥
चापी तडाग सरोवर । जो पतित मोडी देवागार ।
गुरुनिंदक मद्यपानीं दुराचार । तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥ १०२ ॥
महाक्षत्रिय आपण म्हणवित । समरांगणीं मागें पळत ।
वृत्ति हरी सीमा लोटित । ग्रंथ निंदित महापुरुषांचे ॥ १०३ ॥
वेदशास्त्रांची निंदा करी । संतभक्तांसीं द्वेष धरी ।
हरिहर चरित्रें अव्हेरी । माझें शिरीं तीं पापें ॥ १०४ ॥
धनधान्य असोनि पाहीं । पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं ।
पति सांडोनि निजे परगृहीं । तीं पापें माझिया माथां ॥ १०५ ॥
पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्ततां । त्यांसी व्यर्थचि गांजिती जे न पाहता ।
ते कुरुप होती तत्वतां । हिंडतां भिक्षा न मिळेचि ॥ १०६ ॥
बंधुबंधु जे वैर करिती । ते या जन्मीं मत्स्य होती ।
गुरुचें उणें जे पाहती । त्यांची संपत्ती दग्ध होय ॥ १०७ ॥
जे मार्गस्थांचीं वस्त्रें हरिती । ते अतिशूद्र प्रेतवस्त्रें पांघरती ।
आम्ही तपस्वी म्हणोनियां अनाचार करिती । ते घुले होती मोकाट ॥ १०८ ॥
दासी स्वामी सेवा न करी । ती ये जन्मीं होय मगरी ।
जो कन्या विक्रय करी । हिंसक योनीं निपजे तो ॥ १०९ ॥
स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजित ।
त्याचा गृहभंग होत । जन्मजन्मांतरीं न सुटे ॥ ११० ॥
ब्राह्मण करी रसविक्रय । घेतां देतां मद्यपी होय ।
जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे । तो होय ब्रह्मराक्षस ॥ १११ ॥
एकें उपकार केला । जो नष्ट नाठवी त्याला ।
तो कृतघ्न जंत झाला । पूर्वकर्में जाणिजे ॥ ११२ ॥
विप्र श्राद्धीं जेवुनी । स्त्रीभोग करी ते दिनीं ।
तो श्र्वानसूकरयोनीं । उपजेल निःसंशयें ॥ ११३ ॥
व्यवहारी दहांत बैसोन । खोटी साक्ष देई गर्जोन ।
पूर्वज नरकीं पावती पतन । असत्य साक्ष देतांचि ॥ ११४ ॥
दोघी स्त्रिया करुन । एकीचेंच राखी जो मन ।
तो गोचिड होय जाण । सारमेय शरीरीं ॥ ११५ ॥
पूर्वजन्मीं कोंडी उदक । त्याचा मळमूत्र निरोध देख ।
करितां साधुनिंदा आवश्यक । सत्वर दंत भग्न होती ॥ ११६ ॥
देवालयीं करी भोजन । तरी ये ज्मीं होय क्षीण ।
पृथ्वीपतीची निंदा करितां जाण । उदरीं मंदाग्नि होय पैं ॥ ११७ ॥
ग्रहणसमयीं करी भोजन । त्यासी पित्तरोग होय दारुण ।
परबाळें विकी परदेशीं नेऊन । तरी सर्वांगी कुष्ट भरे ॥ ११८ ॥
जी स्त्री करी गर्भपातन । ती उपजे वंध्या होऊन ।
देवालय टाकी पाडोन । तरी अंगभंग होय त्याचा ॥ ११९ ॥
अपराधाविण स्त्रीसी गांजिताहे । त्याचें ये जन्मीं एक अंग जाये ।
ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये । त्यांचा वंश न वाढे कधीं ॥ १२० ॥
गुरु संत माता पिता । त्यांसी होय जो निर्भत्सिता ।
तरी वाचा जाय त्तवतां । अडखळे बोलतां क्षणक्षणां ॥ १२१ ॥
जो ब्राह्मणांसी दंड भारी । त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं ।
जो संतांसी वादविवाद करी । दीर्घ दंत होती त्याचे ॥ १२२ ॥
देवद्वारींचे तरुवर । अश्र्वत्थादि वृक्ष साचार ।
तोडितां पांगुळ होय निर्धार । भिक्षा न मिळे हिंडता ॥ १२३ ॥
जो सूतकान्न भक्षित । त्याचे उदरी नाना रोग होत ।
आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त । तरी दुर्गंधी सर्वांगीं ॥ १२४ ॥
ब्राह्मणाचे ऋण न देतां । तरी बाळपणीं मृत्यु पावे पिता ।
जलवृक्षछाया मोडितां । तरी एकही स्थळ न मिळे त्यातें ॥ १२५ ॥
ब्राह्मणासी आशा लावून । चाळवी नेदी कदा दान ।
तो ये जन्मी अन्न अन्न । करीत हिंडे घरोघरीं ॥ १२६ ॥
जो पुत्रद्वेष करीत । आणि दरिद्रियाचें लग्न मोडित ।
तरी स्त्रीसी सल राहे पोटांत । वंध्या निश्र्चित संसारीं ॥ १२७ ॥
जेणें ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसें तोडी सूर्यनंदन ।
जो नायके कथाग्रंथ पावन । बधिर होय जन्मोजन्मीं ॥ १२८ ॥
जो पीडी मातापितयांस । त्याचा सर्वदा होई कार्यनाश ।
एकासी भजे निंदी सर्व देवांस । तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥ १२९ ॥
जो चांडाळ गोवध करी । त्यासी मिळे कर्कश नारी ।
वृषभ वधितां निर्धारीं । शतमूर्ख पुत्र होय त्यासी ॥ १३० ॥
उदकतृणेंविण पशु मारीत । तरी मुक्याचि प्रजा होती समस्त ।
जो पतिव्रतेसी भोगूं इच्छित । तरी कुरुप नारी कर्कशा मिळे ॥ १३१ ॥
जो पारधी बहु जीव संहारी । तो फेंपरा होय संसारीं ।
गुरुचा त्याग जो चांडाळ करी । तो उपजतांचि मृत्यु पावे ॥ १३२ ॥
नित्य अथवा रविवारी मुतें रवीसमोर । त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र ।
जे मृत बाळासाठीं रुदती निर्धार । त्यांस हांसतां निपुत्रिक होय ॥ १३३ ॥
हरिणी म्हणे व्याधालागून । मी सत्वर येतें पतीसी भोग देऊन ।
न ये तरी हीं पापें संपूर्ण । माझ्या माथां बैसोत पैं ॥ १३४ ॥
व्याध मनांत शंकोन । म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान ।
सत्वर येईं गृहासी जाऊन । सत्य संपूर्ण सांभाळीं ॥ १३५ ॥
जलपान करुनि वेगीं । आश्रमा गेली ते कुरंगी ।
तो मृगराज तेचि प्रसंगीं । जलपानार्थ पातला ॥ १३६ ॥
व्याधें ओढिला बाण । तों मृग बोले दीनवदन ।
म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण । त्यांसी पुसोन येतों मी ॥ १३७ ॥
शपथ ऐकें त्वरित । कीर्तन करिती प्रेमळ भक्त ।
तो कथारंग मोडितां विर्वंश होत । पाप सत्य मम माथां ॥ १३८ ॥
ब्रह्मकर्म वेदोक्त । शुद्ध निजांगें आचरत ।
तो अधम नरकीं पडत । परधर्म आचरतां ॥ १३९ ॥
तीर्थयात्रेसी विघ्नें करी । वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी ।
तरी सर्वांगीं व्रण अघोरीं । नरकीं पडे कल्पपर्यंत ॥ १४० ॥
शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण । कूटकविता करी क्षुद्र लक्षून ।
हरिती ब्राह्मणांचा मान । तरी संतान तयांचें न वाढे ॥ १४१ ॥
हरिदिनीं शिवदिनीं उपोषण । विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण ।
तरी हस्त पाद क्षीण । होती त्याचे निर्धारें ॥ १४२ ॥
एक शिवहरीप्रतिमा फोडिती । एक भगवद्भक्तां विघ्नें करिती ।
एक शिवमहिमा उच्छेदिती । नरकीं होती कीटक ते ॥ १४३ ॥
मातृद्रोही त्यासी व्याधी भरे । पितृद्रोही पिशाच विचरे ।
गुरुद्रोही तात्काळ मरे । भूतप्रेतगणीं विचरे तो ॥ १४४ ॥
विप्र आहार बहुत जेविती । त्यांसी जो हांसे दुर्मती ।
त्याचे मुखीं अरोचक्ररोग निश्र्चिती ॥ १४५ ॥
एक गो विक्रय करिती । एक कन्या विक्रय अर्जिती ।
ते नर मार्जार मस्त होती । बाळें भक्षिती आपुलीं ॥ १४६ ॥
जो कन्या भगिनी अभिलाषी । कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी ।
प्रमेहरोग होय त्यासी । कीं खडा गुह्यांत दाटत ॥ १४७ ॥
प्रासादभंग लिंगभंग करी । देवांचीं उपकरणें अलंकार चोरी ।
देवप्रतिष्ठा अव्हेरी । पंडुरोग होय ॥ १४८ ॥
एक मित्रद्रोह विश्र्वासघात करिती । मातृपितृहत्या गुरुसी संकटीं पाडिती ।
ब्रह्मवध गोवध न वारिती । अंगी सामर्थ्य असोनियां ॥ १४९ ॥
ब्राह्मण बैसवोनि बाहेरी । उत्तमान्न जेविती गृहांतरीं ।
सोयर्‍यंची प्रार्थना करी । संग्रहणी पोटशूळ होती ॥ १५० ॥
एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती । एकब्राह्मणांची सदनें जाळिती ।
एक दीनासी मार्गी नागविती । एक संतांचा करिती अपमान ॥ १५१ ॥
एक करिती गुरुछळण । एक म्हणती पाहों याचें लक्षण ।
नाना दोष आरोपिती अज्ञान । त्यांचें संतान न वाढे ॥ १५२ ॥
जो सदा पितृद्वेष करी । जो ब्रह्मवृदांसी अव्हेरी ।
शिवकीर्तन ऐकतां त्रासे अंतरी । तरी पितृवीर्य नव्हे तो ॥ १५३ ॥
शिवकीर्तनीं नसे सादर । तरी कर्णमूळरोग निर्धार ।
नसत्याचि गोष्टी जल्पे अपार । तों दर्दुर होय निर्धारें ॥ १५४ ॥
शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण । तेथें शयन करितां सर्प होय दारुण ।
एक अतिवादक छळक जाण । ते पिशाचयोनी पावती ॥ १५५ ॥
एकां देवार्चनीं वीट येत । ब्राह्मण पूजावया कंटाळत ।
तीर्थप्रसाद अव्हेरीत । त्यांच्या आंखुडती अंगशिरा ॥ १५६ ॥
मृग म्हणे ऐसीं पापें अपार । मम मस्तकीं होईल परम भार ।
मग पारधी म्हणे सत्वर । जाई स्वस्थाना मृगवर्या ॥ १५७ ॥
व्याध शिवनामें गर्जे ते क्षणीं । कंठ सद्गदित अश्रु नयनीं ।
मागुती बिल्वदळें खुडोनी । शिवावरी टाकीतसे ॥ १५८ ॥
चौं प्रहरांच्या पूजा चारी । संपूर्ण झाल्या शिवजागरीं ।
सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं मुळींहूनी भस्म झालीं ॥ १५९ ॥
तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळित । सुपर्णाग्रज उदय पावत ।
आरक्तवर्ण शोभा दिसत । तेंचि कुंकुम प्राचीचें ॥ १६० ॥
तों तिसरी मृगी आली अकस्मात । व्याध देखिला कृतांतवत ।
म्हणे मारुं नको मज यथार्थ । बाळासी स्तन देऊनि येतें मी ॥ १६१ ॥
व्याध अत्यंत हर्षभरित । म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ ।
तो ऐकावया म्हणत । शपथ करुनि जाय तूं ॥ १६२ ॥
यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक । जो तृणदाहक ग्रामदाहक ।
गो ब्राह्मणांचें कोंडी उदक । क्षयरोग त्यासी न सोडी ॥ १६३ ॥
ब्राह्मणांची सदनें हरिती देख । त्यांचे पूर्वज रौरवीं पडती निःशंक ।
मातृपुत्रां बिघडती एक । स्त्रीपुरुषां बिघड पाडिती ॥ १६४ ॥
देवब्राह्मण देखोन । खालती न करिती कदा मान ।
निंदिती बोलती कठोर वचन । यम कर चरण छेदी तयांचे ॥ १६५ ॥
परवस्तु चोरावया देख । अखंड लाविला असे रोख ।
साधुसन्मानें मानी दुःख । त्यासी नेत्ररोगतिडका न सोडिती ॥ १६६ ॥
पुस्तकचोर ते मुके होती । रत्नचोरांचे नेत्र जाती ।
अत्यंत गर्वी ते महिष होती । पारधी निश्र्चिती श्येनपक्षी ॥ १६७ ॥
भक्तांची जो निंदा करीत । त्याचे मुखीं दुर्गंधी घाणित ।
जो मातापितयांसी ताडित । लुला होत यालागीं ॥ १६८ ॥
जो अत्यंत कृपण । धन न वेंची अणुप्रमाण ।
तो महाभुजंग होऊन । धुसधुसीत बैसे तेथें ॥ १६९ ॥
भिक्षेसी यतीश्र्वर आला । तो जेणें रिता दवडिला ।
शिव त्यावरी जाण कोपला । संतती संपत्ती दग्ध होय ॥ १७० ॥
ब्राह्मण बैसला पात्रावरी । उठवूनि घातला बाहेरी ।
त्याहूनियां दुराचारी । दुसरा कोणी नसे ॥ १७१ ॥
ऐसा धर्माधर्म ऐकोन । पारधी सद्गद बोले वचन ।
स्वस्थळा जाई जलपान करुनियां । बाळासी स्तन देऊन येईं ॥ १७२ ॥
ऐसें ऐकोनि मृगी लवलाह्या । गेली जलप्राशन करुनियां ।
बाळें स्तनीं लावूनियां । तृप्त केलीं तियेनें ॥ १७३ ॥
वडील झाली प्रसूत । दुसरी पतीची कामना पुरवीत ।
मृगराज म्हणे आतां त्वरित। जाऊं चला व्याधापासीं ॥ १७४ ॥
मृग पाडसांसहित सर्वही । व्याधापासीं आली लवलाही ।
मृग म्हणे ते समयीं । आधीं मज वधी पारधिया ॥ १७५ ॥
मृगी म्हणे हा नव्हे विधी । आम्हीं जाऊं पतीच्या आधीं ।
पाडसें म्हणती त्रिशुद्धी । आम्हांसी वधीं पारधिया ॥ १७६ ॥
त्यांचीं वचनें ऐकतां ते क्षणीं । व्याध सद्गद झाला मनीं ।
अश्रुधारा लोटल्या नयनीं । लागे चरणीं तयांच्या ॥ १७७ ॥
म्हणे धन्य जिणें माझे झालें । तुमचेनि मुखें निरुपण ऐकिलें ।
बहुतां जन्मींचे पाप जळालें । पावन केले शरीर ॥ १७८ ॥
माता पिता गुरु देव । तु्म्हीच आतां माझे सर्व ।
कैंचा संसार मिथ्या वाच । पुत्रकलत्र सर्व लटकें ॥ १७९ ॥
व्याध बोले प्रेमेंकरुन । आतां कधीं मी शिवपद पावेन ।
तों अकस्मात आलें विमान । शिवगण बैसले त्यावरी ॥ १८० ॥
पंचवदन दशभुज । व्याघ्रांबर नेसलें महाराज ।
अद्भुत तयांचे तेज । दिक्चक्रामाजी न समाये ॥ १८१ ॥
दिव्य वाद्यें वाजविती किन्नर । आलाप करिती विद्याधर ।
दिव्य सुमनांचे संभार । सुरगण स्वयें वर्षती ॥ १८२ ॥
मृगें पावली दिव्य शरीर । व्याध करी साष्टांग नमस्कार ।
मुखें म्हणे जयजय शिव हर हर । तों शरीरभाव पालटला ॥ १८३ ॥
परिसीं झगडतां लोह होय सुवर्ण । तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन ।
शिवगणीं बहुत प्रार्थून । दिव्य विमानीं बैसविला ॥ १८४ ॥
मृगें पावलीं दिव्य शरीर । तींही विमानीं आरुढली समग्र ।
व्याधाची स्तुति वारंवार । करिती सुरगण सर्वही ॥ १८५ ॥
व्याध नेला शिवपदाप्रती । तारामंडळी मृगें राहती ।
अद्यापि गगनीं झळकती । जन पाहती सर्व डोळां ॥ १८६ ॥
सत्यवतीहृदयरत्नखाणी । रसभरित बोलिला लिंगपुराणीं ।
तें सज्जन ऐकोत दिनरजनीं । ब्रह्मानंदेकरुनियां ॥ १८७ ॥
धन्य ते शिवरात्रीव्रत । श्रवणें पातक दग्ध होत ।
जे हें पठण करिती सावचित्त । धन्य पुण्यवंत नर तेचि ॥ १८८ ॥
सज्जन श्रोते निर्जर सत्य । प्राशन करोत शिवलिलामृत ।
निंदक असुर कुतर्कीं बहुत । त्यांसी प्राप्त कैचें हे ॥ १८९ ॥
कैकासनाथ ब्रह्मानंद । तयाचें पदकल्हार सुगंध ।
तेथें श्रीधर अभंग षट्पद । रुंजी घालीत शिवनामें ॥ १९० ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । द्वितीयाध्याय गोड हा ॥ १९१ ॥

Sponsored Links

SHARE

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • Click to share on Skype (Opens in new window)
Tags श्रीशिवलिलामृत अध्याय दुसरा DEVOTIONAL

READ MORE

श्री बटुक भैरव स्तोत्र || Devotional ||
श्री बटुक भैरव अष्टोत्तर नामावली || Devotional ||
भगवान कुबेर यांची १०८ नावे || Devotional ||
श्री कुबेर अष्टोत्तर नामावली || Devotional ||
बुद्धिस्तोत्र || Buddhistotr || Adhyatmik ||
श्री सरस्वती अष्टोत्तर नामावली || Devotional ||
श्रीकृष्णाष्टोत्तरशतनाम स्तोत्रं || Stotr || Devotional ||
श्री कृष्ण अष्टोत्तर नामावली || Devotional ||
Read Previous Story श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा || Devotional ||
Read Next Story श्रीशिवलीलामृत अध्याय आठवा || Devotional ||

TOP POEMS

photo of elderly woman wearing saree

खंत || KHANT MARATHI POEM ||

तो दरवाजा उघडला होता तीच्या डोळ्यात पाणी होते आईची खंत काय आहे ते मन आज बोलतं होते नकोस सोडुन जावु मजला मी काय तुला मागितले होते एक तु,तुझे प्रेम बाकी काय हवे होते
a couple holding hands

त्या वाटेवरती…!! || TYA VATEVARATI ||

मी पुन्हा त्या वाटेवरूनी तुला पहात जावे किती ते नजारे आणि किती ते बहाणे कधी उगाच त्या वाटेवरती घुटमळत राहता कोणती ही ओढ मनाची कोणते हे तराणे
burning tree

मन स्मशान || SMASHAN || MARATHI KAVITA ||

जळाव ते शरीर दुखाच्या आगीत मरणाची सुद्धा नसावी भीती पिशाच्च बनावं स्वार्थी दुनियेत माणुस म्हणुन नसावी सक्ती पडावा विसर त्या विधात्याला
woman standing nearcherry blossom trees

चालण्यास तू सज्ज हो || Marathi Motivational Poem ||

शोधता मिळे तो मार्ग !! चालण्यास तू सज्ज हो!! नकोच किंतू आणि परंतु !! लढण्यास तू सज्ज हो !! बोलेल वाट परतून जाण्या !! ढाल हाती सज्ज हो !! होतील वार कित्येक तुझ्यावर !! निडर होण्या सज्ज हो !! बरसतील त्या सरी अनावर !! भिजुनी जाण्या सज्ज हो !! प्रखर त्या सुर्यासवे मग !! तळपण्यास तू सज्ज हो!!
woman covering her face

हळूवार तू लाजता || Haluwar Tu Lajata || Marathi Poems ||

हलके ते हात, हातात आज घेणे!! नकळत तो स्पर्श, मनास त्या बोलणे !! क्षणात या सहज, क्षण विरून जाणे !! तुझ बोलता नकळत, बहरून आज जाणे !!
man holding a megaphone

आवाज || AAWAZ MARATHI KAVITA ||

आवाज आता दबुन गेला शक्ती आता संपुन गेली वाईटाच्या मार्गावर अखेर माणुसकी ही मरुन गेली कोणी कोणाला बोलायचं नाही अत्याचाराशी लढायचं नाही निर्दोष लोकं फुकट मेली गुन्हेगार इथे सुटुन गेली

TOP STORIES

bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग ३ || NAKALAT || LOVE STORY ||

I'm really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! " मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.
वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||

वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||

बाबा ऑफिसला गेले आणि आकाश आपल्या खोलीतून बाहेर आला. लवकर लवकर सगळं आवरू लागला. त्याला कधी एकदा आवरून पुन्हा मोबाईल हातात घेतोय अस झाल होत. त्याची ही लगबग आईच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याला म्हणाली , "आकाश एवढी काय घाई आहे !! मोबाईल कुठे जाणार आहे का ?? का कोणी विकून टाकणार आहे ??" "आई !! काहीही काय ? " " मग जरा सावकाश !! जेवण सुद्धा नीट करत नाहीये तू !!"
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न || कथा भाग २ || MARATHI STORIES ||

घराचा दिवा पोरगं जणू घराची वात पोरगी असते घरात सारे शिकले तर घराची प्रगती होत असते
close up photo of skull

स्मशान || कथा भाग ३ || Gavakadchya Katha ||

सदा शिवाच्या मागे मागे चालू लागला. तसेतसे ते कंदील आणखी जवळ येऊ लागले. शिवा आणि सदा थोडे जवळ येताच त्या दिशेने बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने शिवा गोंधळून गेला. "आबा !! बाईंचा आवाज!!"सदा कुतूहलाने म्हणू लागला.
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || शेवट भाग || Marathi katha ||

प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर एका परपुरूषाशी तू माझ्या समोर प्रेमाची कबुली देत आहेस !! आणि मी फक्त बघत बसलो! !! माझ्यावर खोट प्रेम केलंस तू !! नाटक केलंस!! त्या अनिकेतला फसवलस,! नाही प्रिती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही !! तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यु
child and woman standing near water

आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy