Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क

मुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीशिवलिलामृत अध्याय तेरावा || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय तेरावा || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय तेरावा || Devotional ||

श्रीगणेशाय नमः ॥

जो सद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाह्रुदयाब्जमिलिंद ।
स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध । चरणारविंद नमूं त्याचे ॥ १ ॥
स्कंदपुराणीं सूत । शौनकादिकांप्रति सांगत ।
त्रेतायुगीं अद्भुत । कथा एक वर्तली ॥ २ ॥
दक्षप्रजापति पवित्र । आरंभिता झाला महासत्र ।
निंदोनि स्वामी त्रिनेत्र । सर्व निर्जर बोलाविले ॥ ३ ॥
जगदात्मा सदाशिव । जयासी वंदिती पद्मज रमाधव ।
आम्नाय आणि वासव । स्तविती ज्यासी सर्वदा ॥ ४ ॥
शिवमहिमा नेणोनि अद्भुत । दिवसनिशीं दक्ष निंदीत ।
नरमुंडमाळा अपवित्र बहुत । गळां घालित कैसा हा ॥ ५ ॥
करी ओलें जगचर्म प्रावरण । न कंटाळे दुर्गंधीनें मन ।
भिक्षा मागे नरकपाळ घेऊन । वसे स्मशानीं सर्वदा ॥ ६ ॥
चिताभस्म अंगीं चर्चिलें । विख्यार ठायीं ठायीं वेष्टिले ।
भ्रष्ट तितुकें अंगिकारिलें । सवें पाळे भूतांचे ॥ ७ ॥
अभद्र तितुकें अंगिकारिलें । यासी कोण म्हणतील भलें ।
ज्यासी जें योग्य नाहीं बोलिलें । तें दिल्हें येणें सर्वस्वें ॥ ८ ॥
यासी देव म्हणेल कोण । क्रोधें संतप्त अनुदिन ।
तृतीय नेत्रीं प्रळयाग्न । वाटे त्रिभुवन जाळील ॥ ९ ॥
मस्तकीं वाहे सदा पाणी । नाचत जाऊन निजकीर्तनीं ।
भक्त देखतां नयनीं । बैसे अवघें देवोनि ॥ १० ॥
दैत्यांसी देवोनियां वर । येणेंचि माजविले अपार ।
न कळे यासी लहान थोर । वाहन ढोर तयाचें ॥ ११ ॥
शिवनिंदा करावया कारण । एकदां दक्ष गेला कैलासालागून ।
शिवें नाहीं दिधले अभ्युत्थान । तेणें दुःखें क्षोभला ॥ १२ ॥
ऐसा दक्ष शिवासी निंदी । यज्ञीं न पूजी विभाग नेदी ।
पुरली आयुष्याची अवघी । तरीच हे बुद्धि उपजली ॥ १३ ॥
शिवभजन न करी जो पतित । त्यावरी विघ्नें पडती असंख्यात ।
याग जप तप दान व्यर्थ । उमानाथ नावडे जया ॥ १४ ॥
जेणें निंदिला शिवदयाळ । परम निर्दय तो दुर्जन खळ ।
मनुष्यांमाजी तो चांडाळ । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १५ ॥
असो दक्षकन्या दाक्षायणी । कैलासीं वाट पाहे भवानी ।
म्हणे याग मांडिला पितृसदनीं । मज बोलावूं नये कां ॥ १६ ॥
अपर्णा म्हणे त्रिनेत्रा । मी जाईन पित्याच्या सत्रा ।
तेणें सर्व कन्या पंचवक्रा । सन्मानेंसी बोलाविल्या ॥ १७ ॥
मज विसरला काय म्हणौनि । तरी मी तेथवरी जाईन ।
यावरी बोले भाललोचन । मृडानीप्रति तेधवां ॥ १८ ॥
म्हणे मृगलोचने ऐक गौरी । पद्मजजनकसहोदरी ।
लावण्यामृतसरिते अवधारीं । कदापी तेथें न जावें ॥ १९ ॥
तव पिता निंदक कुटिल । मम द्वेषी दुर्जन खळ ।
तूं जातांचि तात्काळ । अपमानील शुभानने ॥ २० ॥
ज्याच्या अंतरीं नाहीं प्रीती । त्याचें वदन न पहावें कल्पांतीं ।
ऐसें त्र्यंबक बोले अंबिकेप्रती । नारद तेथें पातला ॥ २१ ॥
म्हणे पितृसदना जावयालागून । न पहावा कदाही मान ।
नंदीवरी आरुढोन । दाक्षायणी चालिली ॥ २२ ॥
सवें घेतले भूतगण । मनोवेगें पातली दक्षसदन ।
तंव मंडप शोभायमान । ऋषीं सुरवरीं भरला असे ॥ २३ ॥
आपुलाल्या पूजास्थानीं । देव बैसविले सन्मानेंकरुनी ।
एक सदाशिव वेगळा करुनी । पूजीले ऋषि सुरवर ॥ २४ ॥
जैसा उडुगणांत मिरवे अत्रिसुत। तैसा दक्ष मध्यें विराजत।
शिवद्वेषी परम अभक्त । कुंडीं टाकीत अवदानें ॥ २५ ॥
भवानी जवळी आली ते वेळे । देखोनि सुरवर आनंदले ।
परी दक्षाचे धुरें डोळे भरले । कन्येकडे न पाहेचि ॥ २६ ॥
नंदिवरुनि उतरुनी । पितयासमीप आली भवानी ।
दक्ष मुख मुरडोनी । घाली ग्रंथी भ्रूमंडळा ॥ २७ ॥
जगन्माता गुणनिधान । न्याहाळूनि पाहे पितृवदन ।
म्हणे धुरें भरले नयन । म्हणोनि न पाहे मजकडे ॥ २८ ॥
सकळ भगिनींचा सन्मान बहुत । दाक्षायणी तेव्हां देखत ।
जननीकडे विलोकीत । तेही न पाहे तियेतें ॥ २९ ॥
मनांत दक्ष भावीत । ईस कोणें बोलाविलें येथ ।
कन्या आणि जामात । दृष्टीं मज नावडती ॥ ३० ॥
आदिमाया प्रणवरुपिणी । अनंतब्रह्मांडांची स्वामिणी ।
तिचा अपमान देखोनि । भ्याले सकळ सुरवर ॥ ३१ ॥
म्हणती दक्ष भुलला यथार्थ । हे ब्रह्मांड जाळील निमिषांत ।
अपमान देखोनि उमा तेथ । क्रोधें संतप्त जाहली ॥ ३२ ॥
प्रळयवीज पृथ्वीवरी पडत । तैसी उडी घातली कुंडांत ।
उर्वीमंडळ डळमळत। होय कंपित भोगींद्र ॥ ३३ ॥
वैकुंठ कैलास डळमळी । कमळभवांडीं हांक वाजली ।
कृतांत कांपे चळचळी । म्हणे बुडाली सृष्टि आतां ॥ ३४ ॥
हांक घेवोनी शिवगण । गेले शिवापाशीं धांवोन ।
सांगती सर्व वर्तमान । जें जें जाहलें दक्षगृहीं ॥ ३५ ॥
ऐकतां क्षोभला उमाकांत । जेवीं महाप्रळयींचा कृतांत ।
हांक देवोनि अद्भुत । जटा आपटीत आवेशें ॥ ३६ ॥
तों अकस्मात वीरभद्र । प्रगटला तेथें प्रळयरुद्र ।
वाटे प्रलयाग्नि आणि द्वादश मित्र । एकत्र होवोनि प्रगटले ॥ ३७ ॥
वाटे त्याचिया तेजांत । चंद्रसूर्य बुचकळ्या देत ।
आकाश असे आसुडत । सडा होत नक्षत्रांचा ॥ ३८ ॥
कुंभिनी बुडाली देख । चतुर्दश लोकीं गाजली हांक ।
दक्षगृहीं बलाहक । रक्तवर्षाव करीतसे ॥ ३९ ॥
अवचित उकलली क्षिती । दिवसा दिवाभीतें बोभाती ।
दक्षअंगींची सर्व शक्ती । निघोनी गेली तेधवां ॥ ४० ॥
इकडे वीरभद्र शिवस्तवन । करोनि निघाला क्रोधायमान ।
एकवीस पद्में दळ घेऊन । मनोवेगें धांविन्नला ॥ ४१ ॥
साठ कोटि गण घेऊन । मागूनि धांविन्नला अपर्णाजीवन ।
पुढें शिवपुत्र धांवोन । ख्याती केली दक्षयागीं ॥ ४२ ॥
वारणचक्र असंभाव्य । त्यावरी एकला लोटे कंठीरव ।
कीं विनायकें घेतली धांव । अपार अही पाहोनी ॥ ४३ ॥
आला देखोनि वीरभद्र । पळों लागले देव समग्र ।
अवदानें सांडोनि सत्वर । ऋत्विज पळाले तेथोनियां ॥ ४४ ॥
आकांतला त्रिलोक । प्रळयकाळींचा पावक ।
दुमदुमिला ब्रह्मांडगोळक । शक्रादिदेव कांपती ॥ ४५ ॥
एक मलमूत्र भयें विसर्जिती । धोत्रें गळालीं नेणती क्षितीं ।
कुक्कुटरुपें रोहिणीपती । पळता झाला तेधवां ॥ ४६ ॥
शिखी होवोनियां शिखी । पळता झाला एकाएकीं ।
यम आपुलें स्वरुप झांकी । बकवेष घेवोनियां ॥ ४७ ॥
नैऋत्यपति होय काक । शशक होय रसनायक ।
कपोत होवोनियां अर्क । पळता झाला तेधवां ॥ ४८ ॥
कीर होवोनि वृत्रारी । पळतां भय वाटे अंतरीं ।
नाना पक्षिरुपें झडकरी । नवग्रह पळाले ॥ ४९ ॥
मिंधियावरी वीज पडत । दक्षावरी तेवीं अकस्मात ।
महावीर शिवसुत । वीरभद्र पातला ॥ ५० ॥
षड्बाहु वीर दैदीप्यमान । असिलता खेटक धनुष्य बाण ।
त्रिशूळ डमरु शोभायमान । सायुध ऐसा प्रगटला ॥ ५१ ॥
पूषाचे पाडिले दांत । भगदेवाचे नेत्र फोडीत ।
खांड मिशा उपडीत । ऋत्विजांच्या तेधवां ॥ ५२ ॥
चरणीं धरुनि आपटिले । बहुतांचे चरण मोडिले ।
कित्येकांचे प्राण गेले । वीरभद्र देखतां ॥ ५३ ॥
मागूनि पातला शंकर । तेणें दक्षपृतना मारिली सत्वर ।
कुंडमंडप समग्र । विध्वंसूनि जाळिला ॥ ५४ ॥
देखोनियां विरुपाक्ष । भयभीत झाला दक्ष ।
पद्मज आणि सहस्राक्ष । पूर्वींच तेथोनि पळाले ॥ ५५ ॥
वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा । त्वां निंदिलें कैसें विरुपाक्षा ।
तुज लावीन आतां शिक्षा । शिवद्वेषिया पाहें पां ॥ ५६ ॥
विद्युत्प्राय असिलता तीव्र । ऊर्ध्वहस्तें महावीर ।
छेदितां झाला दक्षशिर । प्रळय थोर जाहला ॥ ५७ ॥
दक्षशिर गगनीं उसळलें । वीरभद्रें पायांतळीं रगडिलें ।
मग उमाधवापाशीं ते वेळे । देव पातले चहूंकडोन ॥ ५८ ॥
सकळ सुरांसहित कमळासन । करीत उमावल्लभाचे स्तवन ।
म्हणे वृषभध्वजा कृपा करुन । दक्षालागीं ऊठवीं ॥ ५९ ॥
संतोषोनि कर्पूरगौर । म्हणे आणोनि लावा दक्षाचें शिर ।
परी तें नेदी वीरभद्र । पायांतळीं रगडिलें ॥ ६० ॥
म्हणे शिवद्वेषी दुराचार । त्याचा करीन ऐसा संहार ।
जो शिवनाम न घे अपवित्र । जिव्हा छेदीन तयाची ॥ ६१ ॥
जो न करी शिवार्चन । त्याचे हस्त चरण छेदीन ।
जो न पाहे शिवस्थान । त्याचे नयन फोडीन मी ॥ ६२ ॥
विष्णु थोर शिव लहान । हर विशेष विष्णु सान ।
ऐसें म्हणे जो खळ दुर्जन । संहारीन तयातें ॥ ६३ ॥
सर्वथा नेदीं मी दक्षशिर । काय करितील विधिहरिहर ।
मग मेषशिर सत्वर । दक्षालागीं लाविलें ॥ ६४ ॥
सजीव करोनियां दक्ष । तीर्थाटना गेला विरुपाक्ष ।
द्वादश वर्षे निरपेक्ष । सेवीत वनें उपवनें ॥ ६५ ॥
महास्मशान जें आनंदवन । तेथें शंकर राहिला येऊन ।
मग सहस्र वर्षें संपूर्ण । तपासनीं बैसला ॥ ६६ ॥
पुढें हिमाचलाचे उदरीं । अवतरली त्रिपुरसुंदरीं ।
शिवआराधना नित्य करी । हिमाचळीं सर्वदा ॥ ६७ ॥
हिमनगाची स्री मेनका । तीस पुत्र झाला मैनाकपर्वत देखा ।
पार्वती कन्या जगदंबिका । आदिमाया अवतरली ॥ ६८ ॥
ब्रह्मांडमंडपामाझारीं । जिची प्रतिमा नाहीं दुसरी ।
कमळजन्मावृत्रारी । त्यांसही दुजी करवेना ॥ ६९ ॥
तिचें स्वरुप पहावया । येती सुर भूसुर मिळोनियां ।
जिचें स्वरुप वर्णावया । सहस्रवदना शक्ति नव्हे ॥ ७० ॥
मृग मीन कल्हार खंजन । कुरवंडी करावेनेत्रांवरु ।
अष्टनायिकांचें सौंदर्य पूर्ण । चरणांगुष्ठीं न तुळे जिच्या ॥ ७१ ॥
आकर्णनेत्र निर्मळ मुखाब्ज । देखोनि लज्जित होय द्विजराज ।
कंठीरव देखोनि जिचा माज । मुख न दावी मनुष्यां ॥ ७२ ॥
परम सुकुमार घनश्यामवर्णीं । ओतिली इंद्रनीळ गाळुनी ।
दंततेज पडतां मेदिनीं । पाषाण महामणी पैं होती ॥ ७३ ॥
आदिमाया प्रणवरुपिणी । ते झाली हिमनगनंदिनी ।
अनंतशक्तींची स्वामिणी । वेदपुराणीं वंद्य जे ॥७४ ॥
कोट्यानुकोटी मीनकेतन । सांडणी करावी नखांवरुन ।
आंगींचा सुवास संपूर्ण । ब्रह्मांड फोडोन वरी जाय ॥ ७५ ॥
ब्रह्मादिदेव मुळींहूनी । गर्भी पाळी बाळें तीन्ही ।
बोलतां प्रकाश पडे सदनीं । निराळवर्णी कोमलांगी ॥ ७६ ॥
सहज बोलतां क्षितीं । वाटे रत्नराशी विखुरती ।
पदमुद्रा जेथें उमटती । कमळें उठती दिव्य तेथें ॥ ७७॥
त्या सुवासासी वेधोनि वसंत । भोवंता गडबडां लोळत ।
केवळ कनकलता अद्भुत । कैलासाहुनी उतरली ॥ ७८ ॥
नंदिसहित त्रिपुरारी । येवोनि हिमाचळीं तप करी ।
शिवदर्शन झडकरी । हिमनग येता जाहला ॥ ७९ ॥
घालोनियां लोटांगण । करीत तेव्हां बहुत स्तवन ।
यावरी पार्वती येऊन । करीत भजन शिवाचें ॥ ८० ॥
साठ सहस्र लावण्यखाणी । सवें सखिया जैशा पद्मिणी ।
तयांसहित गजास्यजननी । सेवा करी शिवाची ॥ ८१ ॥
द्वारीं सुरभीपुत्र रक्षण । ध्यानस्थ सदा पंचवदन ।
लाविले पंचदशलोचन । सदा निमग्न स्वरुपीं ॥ ८२ ॥
तारकासुराचे पुत्र तिघेजण । तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन ।
तिहीं घोर तप आचरोन । उमारमण अर्चिला ॥ ८३ ॥
सहस्रदळकमळेंकरुन । त्रिवर्ग पूजिती त्रिनयन ।
सहस्रांत एक न्यून । कमळ झालें एकदां ॥ ८४ ॥
तिघेही काढूनि नेत्रकमळें । शिवार्चन करिते झालें ।
मागुती एक न्यून आलें । मग स्वशिरकमळें अर्पिलीं ॥ ८५ ॥
प्रसन्न होवोनि त्रिनेत्र । तिघे उठविले तारकापुत्र ।
तिघांसी दीधले अपेक्षित वर । झाले अनिवार त्रिभुवनीं ॥ ८६ ॥
तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊन । त्रिपुरें दीधलीं अंतरिक्षगमनीं ।
दिव्य सहस्र वर्षे पाहतां शोधोनी । निमिषार्धें एकहोती ॥ ८७ ॥
इतुक्यांत जो धनुर्धर । मारील लक्ष्य साधुनि शर ।
त्रिपुरांसहित संहार । तुमचा करील निर्धारें ॥ ८८ ॥
यावरी त्या तिघांजणीं । त्रिभुवन त्रासिलें बळेंकरुनी ।
देव पळविले स्वस्थानाहूनी । पीडिली धरणी बहगु पापें ॥ ८९ ॥
मग देव ऋषि सकळ मिळोन । वैकुंठपतीस गेले शरण ।
गरुडध्वज सर्वांसी घेऊन । शिवापाशीं पातला ॥ ९० ॥
करितां अद्भुत स्तवन । परम संतोषला पंचवदन ।
म्हणे मी झालों प्रसन्न । मागा वरदान अपेक्षित ॥ ९१ ॥
म्हणती त्रिपुरें पीडिलें बहुत । देव ऋषि झाले पदच्युत ।
शिव म्हणे पाहिजे रथ । त्रिपुरमर्दनाकारणें ॥ ९२ ॥
तंव देव बोलती समस्त । आम्ही सजोनि देतों दिव्य रथ ।
मग कुंभिनी स्यंदन होत । चक्रें निश्र्चित शशिमित्र ॥ ९३ ॥
मंदरगिरी अक्ष होत । स्तंभ झाले चारी पुरुषार्थ ।
चारी वेद तुरंग बळवंत । मूर्तिमंत पै झाले ॥ ९४ ॥
सारथी विधि होत सत्वर । लाविले शास्त्रांचे वाग्दोर ।
पुराणें तटबंध साचार । उपपुराणें खिळे बहु ॥ ९५ ॥
कनकाद्रि धनुष्य थोर । धनुर्ज्या होत भोगींद्र ।
वैकुंठींचा सुकुमार । झाला शर तेजस्वी ॥ ९६ ॥
रथीं चढतां उमानाथ । रसातळीं चालिला रथ ।
कोणासी न उपडे निश्र्चित । मग नंदी काढीत श्रृंगानें ॥ ९७ ॥
मग स्यंदनीं एक चरण । दुजा नंदीवरी ठेवून ।
अपार युद्ध करुन । त्रिपुरदळें संहारिलीं ॥ ९८ ॥
होतां युद्धाचें घनचक्र । वीरभद्रें संहारिले असुर ।
परि अमृतकुंडे समग्र । दैत्यांकडे असती पैं ॥ ९९ ॥
अमृत शिंपितां अमित । सजीव होती सवेंचि दैत्य ।
शिवें मेघास्त्र घालूनि समस्त । अमृतकुंडें बुडविलीं ॥ १०० ॥
अंतराळीं त्रिपुरें भ्रमती । लक्ष साधी मृडानीपती ।
दिव्य सहस्र वर्षें झालीं येचि रीतीं । न लागती पातीं कदापि ॥ १०१ ॥
आंगीं लोटला धर्मपूर । ते हे भीमरथी गंगा थोर ।
नेत्रींचे जलबिंदु पडतां अपार । रुद्राक्ष तेथें जाहले ॥ १०२ ॥
दैत्यस्रिया पतिव्रता थोर । तेणें असुरांसी जय अपार ।
मग बौद्धरुपें श्रीकरधर । दैत्यस्रियांत प्रवेशला ॥ १०३ ॥
वेदबाह्य अपवित्र । प्रगट केलें चार्वाकशास्त्र ।
पतिव्रताधर्म मोडोनि समग्र । व्यभिचारकर्में करविलीं ॥ १०४ ॥
तेणें दैत्यांसी झाले अकल्याण । तंव इकडे शिवें लक्ष्य साधून ।
धनुष्यीं योजिला विष्णुबाण । पाशुपतास्त्र स्थापुनी ॥ १०५ ॥
उगवले सहस्र मार्तंड । तैसें अस्त्र चालिलें प्रचंड ।
कीं उभारिला कालदंड । संहारावया विश्र्वातें ॥ १०६ ॥
कीं प्रळयाग्नीची शिखा सबळ । कीं कृतांताची जिव्हा तेजाळ ।
कीं ते प्रळय मेघांतील । मुख्य चपळ निवडिली ॥ १०७ ॥
कीं सप्तकोटी मंत्रतेज पाहीं । एकवटलें त्या अस्राठायीं ।
देव दैत्य भयभीत हृदयीं । म्हणती कल्पान्त मांडिला ॥ १०८ ॥
न्याससहित जपोनि मंत्र । सोडोनि दिधलें दिव्यास्र ।
नवखंडधरणी आणि अंबर । तडाडलें ते काळीं ॥ १०९ ॥
सहस्र विजा कडकडती । तैसी धाविन्नली अस्रशक्ती ।
भयें व्यापिला सरितापती । आंग टाकूं पहाती दिग्गज ॥ ११० ॥
देव विमानें पळविती । गिरीकंदरीं असुर दडती ।
एक मूर्च्छना येवोनि पडती । उठती ना मागुते ॥ १११ ॥
त्या अस्रें न लागतां क्षण । त्रिपुरें टाकिलीं जाळून ।
त्यांत तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न । साह्य झाला तयातें ॥ ११२ ॥
तीन्ही ग्राम सेनेसहित । त्रिपुरें भस्म झालीं तेथ ।
देव शिवस्तवन करीत । चरण धरीत सप्रेमें ॥ ११३ ॥
त्यावरी त्रिपुरपिता तारकासुर । तेणें प्रळय मांडिला थोर ।
देव पळविले समग्र । चंद्र सूर्य धरुनि नेले ॥ ११४ ॥
भागीरथी आदि गंगा पवित्र । धरुनि नेत तारकासुर ।
देवांगना समग्र । दासी करोनि ठेविल्या ॥ ११५ ॥
ब्रह्मा विष्णु शचीवर । करिती एकांतीं विचार ।
म्हणती शिवउमा करावी एकत्र । होईल पुत्र षण्मुख ॥ ११६ ॥
त्याचे हस्तें मरेल तारकासुर । मग बोलावूनि पंचशर ।
म्हणती तुवां जावोनि सत्वर शिवपार्वतीऐक्य करीं ॥ ११७ ॥
हिमाचळीं तप करी व्योमकेश । मन्मथा तूं भुलवीं तयास ।
मग रतीसहित कुसुमेश । शिवाजवळी पातला ॥ ११८ ॥
पार्वतीच्या स्वरुपांत । रती तेव्हां प्रवेशत ।
वसंतें वन समस्त । श्रृंगारिलें तेधवां ॥ ११९ ॥
शिवाच्या मानसीं सतेज । प्रवेशला शफरीध्वज ।
पांखरें करिती बहु गजबज । शिवध्यान विक्षेपिती ॥ १२० ॥
ते पक्षी हांकावया नंदिकेश्र्वर । गेला होता तेव्हां दूर ।
तों पार्वती होवोनि कामातुर । पाठीसी उभी मन्मथाच्या ॥ १२१ ॥
शिवें उघडिले नयन । तों पुढें देखिला मीनकेतन ।
म्हणे माझ्या तपासी केले विघ्न । मग भाललोचन उघडिला ॥ १२२ ॥
निघाला प्रळयवैश्र्वानर । भस्म केला कुसुमशर ।
फाल्गुनी पौर्णिमा साचार । काम जाळिला ते दिनीं ॥ १२३ ॥
शिवदूत भूतगण । महाशब्दें हांक देऊन ।
स्मरगृहशब्द उच्चारुन । नानापरी उपहासिती ॥ १२४ ॥
शिवाची आज्ञा तैंपासून । फाल्गुनमासीं हुताशनी करुन ।
जो हें व्रत न पाळी पूर्ण । अवदसा जाण त्या बाधी ॥ १२५ ॥
ऐसा संहारुन पंचशर । विचार करुनि पंचवक्र ।
तत्काळ उठोनि कर्पूरगौर । गेला कैलाससदनासी ॥ १२६ ॥
रती शोक करी बहुत । मग समाधान करी निर्जरनाथ ।
म्हणे कृष्णावतारीं तुझा कांत । रुक्मिणी उदरीं अवतरेल ॥ १२७ ॥
कमलासनें कन्येसी भोगितां । कंदर्पासी शाप दिधला होता ।
कीं शिवदृष्टीनें तत्त्वतां । भस्म होसील कामा तूं ॥ १२८ ॥
असो इकडे हिमनगकुमारी । शिवप्राप्तीलागीं तप करी ।
सप्तऋषि प्रार्थिती त्रिपुरारी । वरी कन्या हिमनगाची ॥ १२९ ॥
पार्वती तप करी जे वनीं । शिव तेथें गेला बटुवेष धरुनि ।
गायनाच्या छंदेकरुनी । पुसे भवानीप्रति तेव्हां ॥ १३० ॥
कासया तप करिसी येथ । येरी म्हणे जो कैलासनाथ ।
पति व्हावा एतदर्थ । आचरें तप येथें मी ॥ १३१ ॥
बटु बोले ते अवसरीं । तूं तंव हिमनगराजकुमारी ।
शंकर केवळ भिकारी । महाक्रोधी दारुण ॥ १३२ ॥
ओलें गजचर्म प्रावरण । शार्दूलचर्म नेसला सर्पभूषण ।
वसविलें महास्मशान । भूतगण सभोंवते ॥ १३३ ॥
तरी विष्णु विलासी सगुण । त्यासी वरीं तूं ऐक वचन ।
तुजयोग्य पंचवदन । वर नव्हे सर्वथा ॥ १३४ ॥
ऐकतां क्षोभली जगन्माता । म्हणे शिवनिंदका होय परता ।
वदन न दाखवीं मागुता । परम खळा द्वेषिया ॥ १३५ ॥
शिवनिंदक जो दुराचार । त्याचा विटाळ न व्हावा साचार ।
तुज शिक्षा करीन निर्धार । विप्र म्हणोनि राहिलें ॥ १३६ ॥
देखोनि दुर्गेचा निर्धार । स्वरुप प्रगट करी कर्पूरगौर ।
पार्वतीनें करुन जयजयकार । चरण दृढ धरियेले ॥ १३७ ॥
शिव म्हणे ते समयीं । प्रसन्न झालों माग लवलाहीं ।
अंबिका म्हणे ठाव देईं । अर्धांगीं तुझ्या जगदात्म्या ॥ १३८ ॥
अवश्य म्हणोनि त्रिपुरारी । कैलासासी गेला ते अवसरीं ।
पितृसदना झडकरी । गेली तेव्हां जगदंबा ॥ १३९ ॥
मग सप्तऋषि ते वेळे । शिवें हिमाचळा पाठविले ।
हिमनगें ते आदरें पूजिले । षोडशोपचारेंकरुनियां ॥ १४० ॥
अरुंधतीनें येऊन । भवानी पाहिली अवलोकून ।
म्हणे शिव आणि भवानी पूर्ण । जोडा होय निर्धारें ॥ १४१ ॥
मन्मथसंवत्सर चैत्रमासीं । लग्न नेमिलें शुद्ध अष्टमीसी ।
निश्र्चय करुनि सप्तऋषि । स्वस्थानासी पातले ॥ १४२ ॥
कधीं होईल शिवगौरीलग्न । इच्छिती ब्रह्मेंद्रादि सुरगण ।
तारकासुराचा तो प्राण । शिवपुत्र घेईल कधीं ॥ १४३ ॥
इकडे नंदीसी पाठवूनि ते वेळे । सर्व देव शिवें बोलाविले ।
घेवोनि त्रिदशांचे पाळे । पाकशासन पातला ॥ १४४ ॥
इंदिरेसहित इंदिरावर । सावित्रीसहित चतुर्वक्र ।
अठ्ठ्यायशीं सहस्र ऋषीश्र्वर । शिष्यांसहित निघाले ॥ १४५ ॥
सिद्ध चारण गुह्यक । पितृगण मरुद्गण वसुअष्टक ।
एकादशरुद्र द्वादशार्क । यक्षनायक पातला ॥ १४६ ॥
आपुलाल्या वाहनीं बैसोन । लोकपाल निघाले संपूर्ण ।
नवग्रह अष्टनायिका आदिकरुन । किन्नर गंधर्व सर्वही ॥ १४७ ॥
एवं सर्वांसहित शंकर । हिमाचलासी आला सत्वर ।
नगेंद्र येवोनि समोर । पूजोनि नेत सकळांतें ॥ १४८ ॥
दशसहस्र योजनें मंडप । उभविला ज्याचें तेज अमूप ।
सुवर्णसदनें देदीप्यमान । जानवशासी दीधलीं ॥ १४९ ॥
शिवस्वरुप पाहतां समस्त । वर्‍हाडी होती विस्मित ।
एक म्हणती वृद्ध बहुत । पुराणपुरुष अनादि ॥ १५० ॥
हा आहे केवळ निर्गुण । नवरी स्वरुपें अति सगुण ।
असो देवकप्रतिष्ठा करुन । मूळ आला हेमाद्रि ॥ १५१ ॥
आद्यंत अवघें साहित्य । कमलोद्भव स्वयें करीत ।
नवनिधी अष्ट महासिद्धि राबत । न्यून तेथें नसे कांहीं ॥ १५२ ॥
असो नवरा मिरवीत । नेला आपुल्या मंडपात ।
मधुपर्कादि पूजाविधि समस्त । हिमाचळ करीतसे ॥ १५३ ॥
लग्नघटिका आली जवळी । तंव ते श्रृंगार सरोवर मराळी ।
बाहेर आणिली हिमनगबाळी । उभी केली पटाआड ॥ १५४ ॥
लग्नघटिका पाहे दिनपती । मंगळाष्टकें म्हणे बृहस्पती ।
ॐपुण्याहं निश्र्चिती । कमलासन म्हणतसे ॥ १५५ ॥
असो यथाविधि संपूर्ण । दोघां झालें पाणिग्रहण ।
होमासी करिती प्रदक्षिण । शिवशक्ती तेधवां ॥ १५६ ॥
इतुकें याज्ञिक झाले सर्वही । परी नोवरी कोणी देखिली नाहीं ।
प्रदक्षिणा करितां ते समयीं । पदनख देखिले विधीनें ॥ १५७ ॥
कामें व्यापिला सूर्यजामात । पटपटां वीर्यबिंदु पडत ।
साठीसहस्र बालखिल्य तेथ । जन्मले क्षण न लागतां ॥ १५८ ॥
अन्याय देखोनि थोर । मदनांतक कोपला अनिवार ।
ब्रह्मयाचें पांचवें शिर । छेदून टाकिलें तेधवां ॥ १५९ ॥
झाला एकचि हाहाकार । त्यावरी वैकुंठीचा सुकुमार ।
समाधान करी अपार । चतुर्वक्र नाम तैंपासुनी ॥ १६० ॥
असो यथाविधि सोहळे । चारी दिवस संपूर्ण जाहले ।
सकळ देव गौरविले । वस्त्रालंकारीं हिमनगें ॥ १६१ ॥
सवें पार्वती घेऊनी । कैलासा आला शूलपाणी ।
यावरी सर्व देव मिळोनी । प्रार्थिते झाले विश्र्वनाथा ॥ १६२ ॥
खुंटली विश्र्वाची उत्पत्ती । मन्मथ उठवीं उमापती ।
मग तो मीनध्वज पुढती । अनंग करोनि जीवविला ॥ १६३ ॥
अंधकपुत्र तारकासुर । तेणें पळविले देव समग्र ।
शिवासी होईल कधीं पुत्र । देव समग्र वांछिती ॥ १६४ ॥
चारी युगेंपर्यंत । शिव उमा एकांतीं रमत ।
परी नोहे वीर्यपात । नव्हे सुत याकरितां ॥ १६५ ॥
तों तारकासुरें केला आकांत । स्वर्ग जाळिले समस्त ।
देवललना धरुनि नेत । दासी बहुत पैं केल्या ॥ १६६ ॥
देव शिवासी शरण जाती । तंव तीं दोघें एकांतीं रमती ।
देव ऋषि बाहेर तिष्ठती । प्रवेश कोणा नव्हेचि ॥ १६७ ॥
मग अग्नि आंत पाठविला । अतीरवेष तेणें धरिला ।
तो तृतीय नेत्रीं शिवाच्या राहिला । देवीं पाठविला मित्र म्हणोनी ॥ १६८ ॥
हांक फोडोनि भिक्षा मागत । शिव पार्वतीस आज्ञापित ।
माझें वीर्य धरोनि अद्भुत । भिक्षा देईं अतीतातें ॥ १६९ ॥
मग अमोघ वीर्य धरुन । अग्नीसी देत अंबिका आणोन ।
सांडलें जेथें वीर्य जाण । रेतकूप झाला तो ॥ १७० ॥
तोचि पारापरम चंचळ । न धरवे कोणा हातीं तेजाळ ।
असो कृशानूने वीर्य तत्काळ । प्राशन केलें तेधवां ॥ १७१ ॥
अग्नि झाला गरोदर । परम लज्जित हिंडत कांतार ।
तों साही कृत्तिका परम सुंदर । ऋषिपत्न्या देखिल्या ॥ १७२ ॥
त्या गंगेंत स्नान करुनी । तापत बैसल्या साहीजणी ।
तंव अग्नीनें गर्भ काढूनि । पोटांत घातला साहींच्या ॥ १७३ ॥
साहीजणी झाल्या गर्भिणी । परम आश्र्चर्य करिती मनीं ।
मगलज्जेनें गर्भ काढूनि । साहीजणींनी त्यागिला ॥ १७४ ॥
साहींचें रक्त एक झालें । दिव्य शरीर तत्काळ घडलें ।
सहा मुखें हस्त शोभले । द्वादश सरळ तेजस्वी ॥ १७५ ॥
कार्तिक मासीं कृत्तिकायोगीं । कुमार जन्मला महायोगी ।
मयूर वाहन भस्म अंगीं । उपासित शिवाातें ॥ १७६ ॥
शिवें निजपुत्र जाणोनी । नेवोनि लाविला अपर्णास्तनीं ।
सप्त वर्षें मृडानी । लालन पालन करी त्याचें ॥ १७७ ॥
देवांसी सांगे वैश्र्वानर । शिवासी झाला स्कंद पुत्र ।
ऐकतां देव समग्र । तारकावरी चालिले ॥ १७८ ॥
सेना जयाची बाहत्तर अक्षौहिणी । त्याचें नगर वेढिती सुधापानी ।
पृतनेसहित तेंच क्षणीं । तारकासुर बाहेर निघे ॥ १७९ ॥
इंद्रें स्वामी कार्तिकापासीं जाऊन । सेनापतित्व दिधलें संपूर्ण ।
दिव्यरथीं बैसवून । अभिषेकिला कुमार ॥ १८० ॥
इकडे तारकासुर सुधापानी । युद्ध करिती झोटधरणी ।
देव त्रासविलें दैत्यांनीं । आले पळोनि कुमाराकडे ॥ १८१ ॥
स्कंदापुढें कर जोडून । देव करिती अपार स्तवन ।
रक्षीं तारकासुरापासून । शिवनंदन तोषला ॥ १८२ ॥
देवांचा वृत्तांत जाणोनि सकळ । कुमारें धरिलें रुप विशाळ ।
तों तारकासुर धांविन्नला प्रबळ । शिवकुमार लक्षुनी ॥ १८३ ॥
तेहतीस कोटी सुरवर । उभे स्वामीचे पाठीं भार ।
तारकाअंगीं बळ अपार । दशसहस्र कुंजरांचें ॥ १८४ ॥
तारकासुर अनिवार । वर्षें सायकांचे संभार ।
स्वामीचे पाठीसी सुर । लपती सत्वर जाऊनी ॥ १८५ ॥
लक्षूनिया पाकशासन । तारकें शक्ति दिधली सोडून ।
प्रळयचपळेसी मागें टाकून । मनोवेगें चालली ॥ १८६ ॥
भयभीत शक्र होऊन । करी हरिस्मरण कर जोडून ।
म्हणे हे इंदिरा मानसरंजन । निवारी येवोनि शक्ति हे ॥ १८७ ॥
ब्रह्मानंदा विश्र्वव्यापका । दशावतार चरित्रचाळका ।
मधुमुरनरकांतका । निवारीं प्रळयशक्ति हे ॥ १८८ ॥
वैकुंठंहूनि योगमाता । हरीनें धाडिली लवलाह्या ।
तिणें ते शक्ति परतोनियां । एकीकडे पाडिली ॥ १८९ ॥
यावरीं तारकें बाणांचे पूर । स्वामीवरी सोडिले अपार ।
मुख पसरोनि शिवकुमार । तितुके गिळिता जाहला ॥ १९० ॥
नाना शस्त्रें अस्त्रशक्ती । तारकें सोडिल्या अनिवार गती ।
तितुक्या गिळिल्या सहजस्थितीं । शास्त्रसंख्यावदनानें ॥ १९१ ॥
कल्पांतरुद्रासमान । भयानक दिसे मयूरवाहन ।
तारकें ब्रह्मास्त्र दिधलें सोडून । तेंही गिळी अवलीळें ॥ १९२ ॥
जितुके शस्त्रमंत्र निर्वाण । तितुके प्रेरीतसे चहूंकडून ।
प्रळयकाळासम शिवनंदन । गिळी क्षण न लागतां ॥ १९३ ॥
मग निःशस्त्र तारकासुर । स्यंदनांहूनि उतरला सत्वर ।
स्वामीवरी धांवे अनिवार । सौदामिनीसारिखा ॥ १९४ ॥
ऐसें देखोनि षडानन । कृतांता ऐसी हांकदेऊन ।
रथाखालीं उतरुन । मल्लयुद्ध आरंभिलें ॥ १९५ ॥
सप्तदिवसपर्यंत । युद्ध झालें परम अद्भुत ।
तारकासुर अत्यंत । जर्जर केला आपटोनी ॥ १९६ ॥
पायीं धरोनि अवलीला । चक्राकार भोवंडिला ।
मग धरणीवरी आपटिला । चूर्ण झाला मृतवत ॥ १९७ ॥
निघोनियां गेला प्राण । दुंदुभी वाजवी शचीरमण ।
पुष्पें वर्षती सुरगण । कर जोडोनी स्तुति करिती ॥ १९८ ॥
मारिला जेव्हां तारकासुर । तेव्हां सात वर्षाचा शिवकुमार ।
मग सेनापतित्व समग्र । इंद्रें त्यासी दीधलें ॥ १९९ ॥
तारकासुर नगर । इंद्रें लुटिलें समग्र ।
देवस्रिया सोडविल्या सत्वर । सर्व देव मुक्त झाले ॥ २०० ॥
लागला तेव्हां जयवाद्यांचा घोष । कुमार गेला वाराणसीस ।
नमूनि शिवमृडानीस । सुख अपार दीधलें ॥ २०१ ॥
मग झालें मौंजीबंधन । सर्व तीर्थे करी षडानन ।
मग कपाटीं बैसला जाऊन । अनुष्ठान करी सुखें ॥ २०२ ॥
षडाननास भवानी म्हणत । ब्रह्मचर्य केलें आजपर्यंत ।
आतां स्री करुनि यथार्थ । गृहस्थाश्रम करीं कीं ॥ २०३ ॥
षडानन म्हणे अंबेप्रती । सांग स्रिया कैशा असती ।
म्यां देखिल्या नाहींत निश्र्चितीं । कैसी आकृति सांगे मज ॥ २०४ ॥
अपर्णा म्हणे सुकुमारा । मजसारिख्या स्रिया सर्वत्रा ।
ऐकतां हांसे आलें कुमारा । काय उत्तरा बोलत ॥ २०५ ॥
तुजसारिख्या स्रिया जरी । तुजसमान मज निर्धारीं ।
तुझ्या वचनासी मातुश्री । अंतर पडों नेदीं मी ॥ २०६ ॥
ऐसें कुमार बोलोन । महाकपाटांत जाय पळोन ।
मग ते जगन्माता आपण ।धरुं धांविन्नली तयातें ॥ २०७ ॥
नाटोपे कुमार ते क्षणीं । अंबा दुःखें पडे धरणीं ।
जें त्रिभुवनपतीची राणी । वेदपुराणीं वंद्य ॥ २०८ ॥
अरे तूं कुमारा दावीं वदना । आला माझ्या स्तनासी पान्हा ।
कोणासी पाजूं षडानना । निजवदना दाखवीं ॥ २०९ ॥
घेईं तुझें दूधलोणी । म्हणोनि कुमार वर्मी ते क्षणीं ।
बोले तेव्हां शापवाणी । क्रोधेंकरुनि कुमार तो ॥ २१० ॥
माझें दर्शना जी स्री येईल । ती सप्तजन्म विधवा होईल ।
स्वामीदर्शना पुरुष येईल । कार्तिक मासीं कृत्तिकायोगीं ॥ २११ ॥
तो जन्म सभाग्य । होईल धनाढ्य वेदपारंग ।
अनामिक हो अथवा मातंग । दर्शनें लाभ समानचि ॥ २१२ ॥
स्वामीस ऋषि विनविती समस्त । भवानी तुजलागीं तळमळत ।
भेटोनि येईं त्वरित । वाराणसीस जाऊनी ॥ २१३ ॥
मग स्वामी आनंवदना जाऊनी । आनंदविली शिवभवानी ।
उभयतांचे समाधान करुनी । मागुतीं गेला पूर्व स्थळा ॥ २१४ ॥
स्कंदपुराणीं कथा सूत । शौनकादिकांप्रति सांगता ।
ऐकतां विघ्नें समस्त । क्षणमात्रें दग्ध होती ॥ २१५ ॥
अपर्णाहृदयाब्जमिलिंद । श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ।
पूर्णब्रह्म अनादिसिद्धा । आनंदकंदा जगद्गुरु ॥ २१६ ॥
शिवलीलामृतग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्कन अखंड । त्रयोदशोध्याय गोड हा ॥ २१७ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

Sponsored Links

SHARE

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • Click to share on Skype (Opens in new window)
Tags श्रीशिवलिलामृत अध्याय तेरावा DEVOTIONAL

READ MORE

श्री बटुक भैरव स्तोत्र || Devotional ||
श्री बटुक भैरव अष्टोत्तर नामावली || Devotional ||
भगवान कुबेर यांची १०८ नावे || Devotional ||
श्री कुबेर अष्टोत्तर नामावली || Devotional ||
बुद्धिस्तोत्र || Buddhistotr || Adhyatmik ||
श्री सरस्वती अष्टोत्तर नामावली || Devotional ||
श्रीकृष्णाष्टोत्तरशतनाम स्तोत्रं || Stotr || Devotional ||
श्री कृष्ण अष्टोत्तर नामावली || Devotional ||
Read Previous Story श्रीशिवलिलामृत अध्याय चौदावा || Devotional ||
Read Next Story श्रीशिवलिलामृत अध्याय पहिला || Devotional ||

TOP POEMS

white painted papers

हरवलेले पत्र || PATR MARATHI KAVITA ||

हरवलेल्या पत्रास आता कोणी पत्ता सांगेन का खुप काही लिहलंय मनातल आता कोणी वाचेन का काळाच्या धुळीत मिसळुन सगळं काही संपलय का शोधुनही सापडेना काही वाट मी चुकतोय का
a couple sitting on the floor

पाहुनी तुझ एकदा !! || PAHUNI TUJH Ekda || Marathi love Poem ||

पाहुनी तुझला एकदा मी पुन्हा पुन्हा का पहावे नजरेतुनी बोलताना ते शब्द घायाळ का व्हावे घुटमळते मनही तिथेच तुझ्या वाटेवरती का फिरावे तुला भेटण्यास ते पुन्हा कोणते हे कारण शोधावे
happy ethnic couple with suitcase in park

कधी कधी || KADHI KADHI || MARATHI POEM||

कधी कधी मनाच्या या खेळात तुझ्यासवे मी का हरवतो तुला शोधण्याचा हट्ट इतका का? की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो तुला यायचं नाही माहितेय मला तरी मी तुझी वाट का पाहतो
a woman and her child sitting on the shore

मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||

वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!
glasses filled with tea on the table

चहा .. || CHAHA MARATHI POEM ||

अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या याच्या शिवाय पर्याय नाही पेपर वाचत दोन घोट घेता स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही
man and woman kissing under sunset

हास्य || HASYA MARATHI KAVITA ||

खळखळून वाहणाऱ्या नदीत तुझ हास्य वाहुन जातं माझ्या मनातल्या समुद्रात अलगद ते मिळुन जातं ओलावतात तो किनारा ही नावं तुझ कोरुन जातं लाटांच्या या खेळात कित्येक वेळा पुसुन जातं

TOP STORIES

bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग १ || LOVE STORIES ||

आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगितलं होतं की आता पुन्हा प्रेमात पडायचं नाही. ती आली पुन्हा तरी तिला माफ करायचं नाही. पण जेव्हा तिचा आठवणीतला चेहरा पाहतो तेव्हा सगळं हे ठरवलेलं चुकीचं होईल अस वाटत राहतं
child and woman standing near water

आई || कथा भाग १० || Story || Marathi ||

"हॅलो !! हा मेघा बोल ना !!" "मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??"
child and woman standing near water

आई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||

"शीतल काही विचारायचं होत !! " "विचार ना !!" "पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??" "तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! " "पण ती राहील तुझ्याशिवाय !!" "तिला राहावं लागेल !!" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. "समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!" "पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! "
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न ||अंतिम भाग || SWAPN MARATHI KATHA ||

बरसल्या सरी अगणित वेळा त्या शांत कराया मातीस तूही प्रयत्न कर अगणित वेळा मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस
fashion man people woman

द्वंद्व || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले असे काय?? की विशाल स्वतःला हरवून गेला.
child and woman standing near water

आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy