Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क

मुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा || Devotional ||

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा || Devotional ||

श्रीगणेशाय नमः ॥

धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण ।
सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥ १ ॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ।
त्यांच्या पुण्यास नाहीं मिती । त्रिजगतीं तेचि धन्य ॥ २ ॥
जोसहस्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ।
तो शंकरचि त्याचें दर्शन । घेतां तरती जीव बहु ॥ ३ ॥
अथवा षोडश षोडश दंडी जाण । बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ।
शिखेमाजी एक बांधावा पूर्ण । शिवस्वरुप म्हणवुनी ॥ ४ ॥
त्यावरोनि करितां स्नान । तरी त्रिवेणी स्नान केल्यासमान ।
असो द्वादश द्वादश मनगटीं पूर्ण । रुद्राक्ष बांधिजे आदरे ॥ ५ ॥
कंठी बांधावे बत्तीस । मस्तकाभोंवते चोवीस ।
सहा सहा कर्णीं पुण्य विशेष । बांधितां निर्दोष सर्वदा ॥ ६ ॥
अष्टोत्तरशत माळ । सर्वदा असावी गळां ।
एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजितां भाग्य विशेष ॥ ७ ॥
पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ।
सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करितां ॥ ८ ॥
नित्य रुद्राक्षपूजन । तरी केलें जाणिजे शिवार्चन ।
रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयीं ॥ ९ ॥
काश्मीर देशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन ।
विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥ १० ॥
प्रजा दायाद भूसुर । धन्य म्हणती तोचि राजेश्र्वर ।
लांच न घे न्याय करी साचार । अमात्य थोर तोचि पैं ॥ ११ ॥
सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी । पूर्वदत्तें ऐसी लाघिजे कामिनी ।
सुत सभाग्य विद्वान गुणी । विशेष सुकृतें पाविजे ॥ १२ ॥
गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर । शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ।
वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार । विशेष सुकृतें लाहिजे ॥ १३ ॥
श्रोता सप्रेम चतुर सावधान । यजमान साक्षेपी उदार पूर्ण ।
काय आरोग्य सुंदर कुलीन । पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥ १४ ॥
असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करितां अनुष्ठान ।
दोघांसी झाले नंदन । शिव भक्त उपजतांचि ॥ १५ ॥
राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम ।
दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानीं ॥ १६ ॥
बाळें होऊनि सदा प्रेमळ । अनुराग चित्तीं वैराग्यशीळ ।
लौकिकसंगे ध्रुव अमंगळ । त्यांची संगती नावडे त्यां ॥ १७ ॥
पंचवर्षी दोघे कुमर । लेवविती वस्त्रें अलंकार ।
गजमुक्तमाळा मनोहर । नाना प्रकारें लेवविती ॥ १८ ॥
तंव ते बाळ दोघेजण । सर्वालंकार उपाधी टाकून ।
करिती रुद्राक्ष धारण ।भस्म चर्चिती सर्वांगीं ॥ १९ ॥
आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत ।
बोलती शिवनामावळी सत्य । पाहाणें शिवपूजा सर्वदा ॥ २० ॥
आश्र्चर्य करिती राव प्रधान । यांसी कां नावडे वस्त्रभूषण ।
करिती रुद्राक्षभस्म धारण । सदा स्मरण शिवाचें ॥ २१ ॥
विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रें भूषणें लेवविती ।
ते सवेंचि ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥ २२ ॥
शिक्षा करितां बहुत । परी ते न सांडिती आपुलें व्रत ।
राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावें काय आतां ॥ २३ ॥
तों उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर ।
सवें वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥ २४ ॥
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता । त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ।
जो वसिष्ठाचा नातू तत्त्वतां । राक्षससत्र जेणें केलें ॥ २५ ॥
जेवीं मनुष्यें वागती अपार । तैसेचि पूर्वीं होते रजनीचर ।
ते पितृकैवारें समग्र । जाळिले सत्र करुनियां ॥ २६ ॥
जनमेजयें सर्पसत्र केलें । तें आस्तिकें मध्येंचि राहविलें ।
पराशरासी पुलस्तीनें प्रार्थिलें । मग वांचले रावणादिक ॥ २७ ॥
विरंचीस दटावूनि क्षणमात्रें । प्रतिसृष्टि केली विश्र्वामित्रें ।
तेवीं पितृकैवारें पराशरें । वादी जर्जर पैं केले ॥ २८ ॥
ते सांगावी समूळ कथा । तरी विस्तार होईल ग्रंथा ।
यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां । कळलें पाहिजे निर्धारें ॥ २९ ॥
ऐसा महाराज पराशर । ज्याचा नातू होय शुक योगींद्र ।
तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार । घरा आला जाणोनी ॥ ३० ॥
राव प्रधान सामोरे धांवती । साष्टांग नमूनि घरासी आणिती ।
षोडशोपचारीं पूजिती । भाव चित्तीं विशेष ॥ ३१ ॥
समस्तां वस्त्रें भूषणें देऊन । राव विनवी कर जोडून ।
म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचें ॥ ३२ ॥
नाचडती वस्त्रें अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर ।
वैराग्याशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासीं ॥ ३३ ॥
इंद्रियभोगावरी नाहीं भर । नावडे राजविलास अणुमात्र ।
गजवाजियानीं समग्र । आरुढावें आवडेना ॥ ३४ ॥
पुढें हे कैसें राज्य करिती । हें आम्हांसी गूढ पडलें चित्तीं ।
मग ते दोघे कुमर आणोनि गुरुप्रती । दाखविले भद्रसेनें ॥ ३५ ॥
गुरुनें पाहिलें दृष्टीसीं । जैसे मित्र आणि शशी ।
तैसे तेजस्वी उपमा तयांसी । नाहीं कोठें शोदहितां ॥ ३६ ॥
यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे कां झाले शिवभक्त ।
यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतो ॥ ३७ ॥
पूर्वी काश्मीर देशांत उत्तम । महापट्टण नंदिग्राम ।
तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचें ॥ ३८ ॥
त्या ग्रामींचा तोचि भूप । पृथ्वीमाजी निःसीम स्वरुप ।
ललिताकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ ३९ ॥
जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसें तिजवरी विराजे छत्र ।
रत्नखचित यानें अपार । भाग्या पार नाहीं तिच्या ॥ ४० ॥
रत्नमय दंडयुक्त । चामरें जीवरी सदा ढळत ।
मणिमय पादुका रत्नखचित । चरणीं जिच्या सर्वदा ॥ ४१ ॥
विचित्र वसनें दिव्य सुवास । हिरण्मय रत्नपर्यंतक राजस ।
चंद्ररश्मिसम प्रकाश । शय्या जिची अभिनव ॥ ४२ ॥
दिव्याभरणीं संयुक्त । अंगीं सुगंध विराजित ।
गोमहिषीखिल्लारें बहुत । वाजी गज घरीं बहुवस ॥ ४३ ॥
दास दासी अपार । घरीं माता सभाग्य सहोदर ।
जिचें गायन ऐकतां किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥ ४४ ॥
जिच्या नृत्याचें कौशल्य देखोन । सकळ नृप डोलविती मान ।
तिचा भोगकाम इच्छून । भूप सभाग्य येती घरा ॥ ४५ ॥
वेश्या असोनि पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वतां ।
त्याचा दिवस न सरतां । इंद्रासही वश्य नव्हे ॥ ४६ ॥
परम शिवभक्त विख्यात । दानशील उदार बहुत ।
सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेंसीं ॥ ४७ ॥
अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळें शिव पूजित ।
ब्राह्मणहस्तें अद्भत । अभिषेक करवी शिवासी ॥ ४८ ॥
याचक मनीं जें जें इच्छीत । तें तें महानंदा पुरवीत ।
कोटि लिंगें करवीत । श्रावणमासीं अत्यादरें ॥ ४९ ॥
ऐकभद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरुन ।
त्यांच्या गळां रुद्राक्ष बांधोन । नाचूं शिकविलें कौतुकें ॥ ५० ॥
आपुलें जें कां नृत्यागार । तेथें शिवलिंग स्थापिलें सुंदर ।
कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीनें ॥ ५१ ॥
करी शिवलीलामृतपुराणश्रवण । तेंही ऐकती दोघेजण ।
सवेंचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढें ॥ ५२ ॥
महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेंकरुन ।
त्यांच्या गळां कपाळीं जाण । विभूति चर्ची स्वहस्तें ॥ ५३ ॥
एवं तिच्या संगतीवरुन । त्यांसही घडतसे शिवभजन ।
असो तिचें सत्त्व पाहावया लागोन । सदाशिव पातला ॥ ५४ ॥
सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला ।
त्याचें स्वरुप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवां ॥ ५५ ॥
पूजा करोनि स्वहस्तकीं । त्यासी बैसविलें रत्नमंचकीं ।
तों पृथ्वीमोलाचें हस्तकीं । कंकण त्याच्या देखिलें ॥ ५६ ॥
देखतां गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गींची वस्तु वाटे पूर्ण ।
विश्र्वकर्म्यानें निर्मिली जाण । मानंवी कर्तृत्व हें नव्हे॥ ५७ ॥
सौदागरें तें काढून । तिच्या हस्तकीं घातलें कंकण ।
येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासी ॥ ५८ ॥
पृथ्वीचें मोल हें कंकण । मीहि बत्तीस लक्षणी पद्मिण ।
तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झालें मी ॥ ५९ ॥
तयासी तें मानलें । सवेंचि त्यानें दिव्यलिंग काढलें ।
सूर्यप्रभेहूनि आगळें । तेज वर्णिलें नवजाय ॥ ६० ॥
लिंग देखोनि ते वेळीं । महानंदा तन्मय झाली ।
म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनि वंदी लिंगातें ॥ ६१ ॥
म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी । कोटी कंकणें टाकावी ओवाळूनी ।
सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवी जतन हें ॥ ६२ ॥
म्हणे या लिंगापाशीं माझा प्राण । भंगलें कीं गेलें दग्ध होऊन ।
तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझें ॥ ६३ ॥
येरीनें अवश्य म्हणोन । ठेविलें नृत्यगारीं नेऊन ।
मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकीं ॥ ६४ ॥
तिचें कैसें आहे सत्त्त्व । धैर्य पाहे सदाशिव ।
भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥ ६५ ॥
त्याच्या आज्ञेंकरुन । नृत्यशाळेसी लागला अग्न ।
जन धांवों लागले चहूंकडोन । एकचि हांक जाहली ॥ ६६ ॥
तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ।
येरी उठली घाबरी । तंव वातात्मज चेतला ॥ ६७ ॥
तैशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून ।
कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥ ६८ ॥
नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर ।
यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवां ॥ ६९ ॥
माझें दिव्यलिंग आहे कीं जतन । महानंदा घाबरी ऐकोन ।
वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध झालें ॥ ७० ॥
सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन ।
मी आपुला देतों प्राण । लिंगाकारणें तुजवरी ॥ ७१ ॥
मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथें जाती ज्वाळा ।
सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥ ७२ ॥
अतिलाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग ।
उडी घातली सुवेग । ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥ ७३ ॥
ऐसें देखतां महानंदा । बोलाविलें सर्व ब्रह्मवृंदा ।
लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥ ७४ ॥
अश्र्वशाळा गजशाळा संपूर्ण । सर्व संपत्तिसहित करी गृहदान ।
महानंदेनें स्नान करुन । भस्म अंगीं चर्चिलें ॥ ७५ ॥
रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । हृदयीं चिंतिलें शिवध्यान ।
हर हर शिव म्हणवुन । उडी निःशंक घातली ॥ ७६ ॥
सूर्यबिंब निघे उदयाचळीं । तैसा प्रगटला कपाळमौळी ।
दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटीं पाळी भक्तांतें ॥ ७७ ॥
माथां जटांचा भार । तृतीयनेत्रीं वैश्र्वानर ।
शिरी झुळझुळ वाहे नीर । भयंकर महाजोगी ॥ ७८ ॥
चंद्रकळा तयाचे शिरीं । नीळकंठ खट्वांगधारी ।
भस्म चर्चिलें शरीरीं । जगचर्म पांघुरला ॥ ७९ ॥
नेसलासे व्याघ्रांबर । गळां मनुष्यमुंडांचें हार ।
सर्वांग वेष्टित फणिवर । दशभुजा मिरवती ॥ ८० ॥
वरचेवरी कंदुक झेलीत । तेवीं दहाभुजा पसरोनी अकस्मात ।
महानंदेसी झेलूनि धरीत । हृदयकमळीं परमात्मा ॥ ८१ ॥
म्हणें जाहलों मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान ।
ती म्हणे हे नगर उद्धरुन । विमानीं बैसवीं दयाळा ॥ ८२ ॥
माताबंधूंसमवेत । महानंदा विमानीं बैसत ।
दिव्यरुप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥ ८३ ॥
पावलीं सकळ शिवपदीं । जेथें नाहीं आधिव्याधी ।
क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैंची तेथें ॥ ८४ ॥
नाहीं काम क्रोध द्वंद्व दुःख । मद मत्सर नाहीं निःशंक ।
जेथींचें गोड उदक । अमृताहूनि कोटिगुणें ॥ ८५ ॥
जेथें सुरतरुंचीं वनें अपारें । सुरभींचीं बहुत खिल्लारें ।
चिंतामणींचीं धवलागारें । भक्तांकारणें निर्मिलीं ॥ ८६ ॥
जेथें वोसणतां बोलती शिवदास । तें तें मास होय तयांस ।
शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथें पावली ॥ ८७ ॥
हे कथापरम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास ।
म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥ ८८ ॥
कंठीं रुद्राक्षधारण । भाळीं विभूति चर्चून ।
त्याचि पूर्वपुण्येंकरुन । सुधर्म तारक उपजले ॥ ८९ ॥
हे पुढें राज्य करतील निर्दोष । बत्तीसलक्षणीं डोळस ।
शिवभजनीं लाविती बहुतांस । उद्धरितील तुम्हांतें ॥ ९० ॥
अमात्यसहित भद्रसेन । गुरुसी घाली लोटांगण ।
म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरीं जन्मले ॥ ९१ ॥
भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षें करिती ।
आयुष्याप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥ ९२ ॥
बहुत करितां नवस । एवढाचि पुत्र आम्हांस ।
परम प्रियकर राजस । प्राणांहूनि आवडे बहु ॥ ९३ ॥
तुमच्या आगमनेंकरुन । स्वामी मज समाधान ।
तरी या पुत्रांचें आयुष्यप्रमाण । सांगा स्वामी मज तत्त्वतां ॥ ९४ ॥
ऋषि मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख ।
हे सभा सकळीक । दुःखार्णवीं पडेल पैं ॥ ९५ ॥
प्रत्ययसदृश बोलावें वचन । ना तरी आंगास येतें मूर्खपण ।
तुम्हां वाटेल विषाहून । विशेष ऐसी ते गोष्टी ॥ ९६ ॥
भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान ।
तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण । झालीं असतां जाणपां ॥ ९७ ॥
आजपासोनि सातवे दिवशीं । मृत्यु पावेल या समयासी ।
राव ऐकतां धरणीसी । मूर्छा येऊनि पडियेला ॥ ९८ ॥
अमात्यासहित त्या स्थानीं । दुःखाग्नींत गेले आहाळोनी ।
अंतःपुरीं सकळ कामिनी । आकांत करिती आक्रोशें ॥ ९९ ॥
करुनियां हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर ।
मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥ १०० ॥
नृपश्रेष्ठा न सोडीं धीर । ऐक एक सांगतों विचार ।
जें पंचभूतें नव्हतीं समग्र । शशिमित्र नव्हते तैं ॥ १०१ ॥
नव्हता मायामय विकाार । केवळ ब्रह्ममय साचार ।
तेथें झालें स्फुरणजागर । अहं ब्रह्म म्हणोनियां ॥ १०२ ॥
तें ध्वनि माया सत्य । तेथोनि जाहलें महत्तत्त्व ।
मगत्रिविध अहंकार होत । शिवइच्छेंकरुनियां ॥ १०३ ॥
सत्त्वांशें निर्मिला पीतवसन । रजांशें सृष्टिकर्ता द्रुहिण ।
तमांशें रुद्र परिपूर्ण । सर्गस्थित्यंत करविता ॥ १०४ ॥
विधीसी म्हणे सृष्टि रचीं पूर्ण । येरु म्हणे मज नाहीं ज्ञान ।
मग शिवें तयालागून । चारी वेद उपदेशिले ॥ १०५ ॥
चहूं वेदांचें सार पूर्ण । तो हा रुद्राध्याय परम पावन ।
त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान । भुवनत्रयीं असेना ॥ १०६ ॥
बहुत करीं हा जतन । त्याहूनि आणिक थोर नाहीं साधन ।
हा रुद्राध्याय शिवरुप म्हणून । श्रीशंकर स्वयें बोले ॥ १०७ ॥
जे रुद्राध्याय ऐकती पढती । त्यांच्या दर्शनें जीव उद्धरती ।
मग कमलोद्भव एकांतीं । सप्तपुत्रां सांगे रुद्र हा ॥ १०८ ॥
मग सांप्रदायें ऋषीपासोन । भूतलीं आला अध्याय जाण ।
थोर जप तप ज्ञान । त्याहूनि अन्य नसेचि ॥ १०९ ॥
जो हा अध्याय जपे संपूर्ण । त्याचेनि दर्शनें तीर्थें पावन ।
स्वर्गींचे देव दर्शन । त्याचे घेऊं इच्छिती ॥ ११० ॥
जप तप शिवार्चन । याहूनि थोर नाहीं जाण ।
रुद्रमहिमा अगाध पूर्ण । किती म्हणोनि वर्णावा ॥ १११ ॥
रुद्रमहिमा वाढला फार । ओस पडिलें भानुपुत्रनगर ।
पाश सोडोनि यमकिंकर । रिते हिंडो लागले ॥ ११२ ॥
मग यमें विधिलागी पुसोन । अभक्तिकृत्या निर्मिली दारुण ।
तिणें कुतर्कवादी भेदी लक्षून । त्यांच्या हृदयीं संचरली ॥ ११३ ॥
त्यांसी मत्सर वाढविला विशेष । वाटे करावा शिवद्वेष ।
तेणें ते जावोनि यमपुरीस । महानरकीं पडलें सदा ॥ ११४ ॥
यम सांगे दूतांप्रती । शिवद्वेषी जेपापमती ।
ते अल्पायुषी होती । नाना रीतीं जाचणी करा ॥ ११५ ॥
शिव थोत विष्णु लहान । हरि विशेष हर गौण ।
ऐसें म्हणतीजे त्यालागून । आणोनि नरकीं घालावे ॥ ११६ ॥
रुद्राध्याय नावडे ज्यांसी । कुंभीपाकीं घालावें त्यांसी ।
रुद्रानुष्ठानें आयुष्यासी । वृद्धि होय निर्धारें ॥ ११७ ॥
याकरितां भद्रसेना अवधारीं । अयुत रुद्रावर्तनें करीं ।
शिवावरी अभिषेकधार धरीं । मृत्यु दूरी होय साच ॥ ११८ ॥
अथवा शतघट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून ।
रुद्रें उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करीं ॥ ११९ ॥
नित्य दहा सहस्र आवर्तनें पूर्ण । क्षोणीपाळा करीं सप्तदिन ।
रायें धरिलें दृढ चरण । सद्गद होवोनि बोलत ॥ १२० ॥
सकळऋषिरत्नमंडितपदक । स्वामी तूं त्यांत मुख्य नायक ।
काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनि ॥ १२१ ॥
तरी त्वां आचार्यत्व करावें पूर्ण । तुजसवें जे आहेत ब्राह्मण ।
आणीक सांगती ते बोलावून । आतांचि आणितों आरंभी ॥ १२२ ॥
मग सहस्र विप्र बोलावून । ज्यांची रु्रानुष्ठानीं भक्ति पूर्ण ।
न्यासध्यानयुक्त पढून । गुरुपासून जे आले ॥ १२३ ॥
परदारा आणि परधन । ज्यांसी वमनाहूनि नीच पूर्ण ।
विरक्त सुशील गेलिया प्राण । दुष्ट प्रतिग्रह न घेती ॥ १२४ ॥
जे शापानुग्रहसमर्थ । सामर्थ्यें चालों न देती मित्ररथ ।
किंवा साक्षात उमानाथ । पुढें आणोनि उभा करिती ॥ १२५ ॥
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन ।
सहस्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥ १२६ ॥
स्वर्धुनीचें सलिल भरलें पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून ।
रुद्रघोषें गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिलें ॥ १२७ ॥
शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशीं मध्यान्हीं आला चंडांश ।
मृत्युसमय येतां धरणीस । बाळ मूर्छित पडियेला ॥ १२८ ॥
एक मूहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिलें समस्त ।
परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकारा ॥ १२९ ॥
रुद्रोदक शिंपून । सावध केला राजनंदन ।
त्यासी पुसती वर्तमान । वर्तलें तेंचि सांगत ॥ १३० ॥
एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळीं शेंदूर ।
विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारखें ॥ १३१ ॥
तो मज घेऊनि जात असतां । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वतां ।
पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळ भवांडीं दुजी नसे ॥ १३२ ॥
ते तेजें जैसे गभस्ती । दिगंततम संहारिती ।
भस्म अंगीं व्याघ्रांबर दिसती । दश हस्तीं आयुधें ॥ १३३ ॥
ते महाराज येऊन । मज सोडविलें तोडोनि बंधन ।
त्या काळपुरुषासी धरुन । करीत ताडन गेले ते ॥ १३४ ॥
ऐसें पुत्रमुखींचें ऐकतां उत्तर । भद्रसेन करी जयजयकार ।
ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रु नेत्रीं आले ॥ १३५ ॥
अंगीं रोमांच दाटले । मग विप्र चरणीं गडबडां लोळे ।
शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमनें वर्षती ॥ १३६ ॥
अनेक वाद्यांचे गजर । डंका गर्जे अवघ्यांत थोर ।
मुखद्वयांची महासुस्वर । मृदंगवाद्यें गर्जती ॥ १३७ ॥
अनेक वाद्यांचे गजर । शिवलीला गाती अपार ।
श्रृंगेंभृंगे काहाळ थोर । सनया अपार वाजती ॥ १३८ ॥
चंद्रानना धडकत भेरी । नाद न माये नभोदरीं ।
असो भद्सेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥ १३९ ॥
षड्रस अन्नें शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रें देत ।
अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पीं ब्राह्मणांसी ॥ १४० ॥
दक्षिणेलागी भांडारें । मुक्त केली राजेंद्रें ।
म्हणे आवडे तितुके भरा एकसरें । मागें पुढें पाहूं नका ॥ १४१ ॥
सर्व याचक केले तृप्त । पुरे पुरे हेचि ऐकिली मात ।
धनभार झाला बहुत । म्हणोनि सांडिती ठायीं ठायीं ॥ १४२ ॥
ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता ।
ऐसा अति आनंद होत असतां । तों अद्भुत वर्तलें ॥ १४३ ॥
वसंत येत सुगंधवनीं । कीं काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ।
कीं श्र्वेतोत्पलें मृडानी । रमण लिंग अर्चिलें ॥ १४४ ॥
कीं निर्दैवासी सांपडे चिंतामणी । कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि ये धांवूनी ।
तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणीं । नारदमुनी पातला ॥ १४५ ॥
वाल्मीक सत्यवतीनंदन । औत्तान पादीकयाधुहृददयरत्न ।
हे शिष्य ज्याचे त्रिभुवनीं जाण । वंद्य जे कां सर्वांतें ॥ १४६ ॥
जो चतुःष्ठिकळाप्रवीण निर्मळ । चतुर्दशविद्या करतळामळ ।
ज्याचें स्वरुप पाहतां केवळ । नारायण दुसरा कीं ॥ १४७ ॥
हें कमळभवांड मोडोनी । पुनः सृष्टि करणार मागुतेनी ।
अन्याय विलोकितां नगनीं । दंडें ताडील शक्रादिकां ॥ १४८ ॥
तों नारद देखोनि तेचि क्षणीं । कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी ।
दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखतां ॥ १४९ ॥
पराशरादि सकळ ब्राह्मण । प्रधानासहित भद्रसेन ।
धांवोनि धरिती चरण । ब्रह्मानंदें उचंबळले ॥ १५० ॥
दिव्य गंध दिव्य सुमनीं । षोडशोपचारें पूजिला नारदमुनी ।
राव उभा ठाकें कर जोडोनी । म्हणे स्वामी अंर्तीदिव्यद्रष्टा तूं ॥ १५१ ॥
त्रिभुवनीं गमन तुझें सर्व । कांहीं देखिलें सां अपूर्व ।
नारद म्हणे मार्गीं येतां शिव- । दूत चौघे देखिले ॥ १५२ ॥
दशभुज पंचवदन । तिहीं मृत्यु नेला बांधोन ।
तुझ्या पुत्राचें चुकविलें मरण । रुद्रानुष्ठानें धन्य केलें ॥ १५३ ॥
तव पुत्ररक्षणार्थ ते वेळां । शिवें वीरभद्र मुख्य पाठविला ।
मज देखतां मृत्युसी पुसूं लागला । शिवसुत ऐका तें ॥ १५४ ॥
तूं कोणाच्या आज्ञेवरुन । आणीत होतासी भद्रसेननंदन ।
त्यासी दहा सहस्र वर्षें पूर्ण । आयुष्य असे निश्र्चयें ॥ १५५ ॥
तो सार्वभौम होईल तत्त्वतां । रुद्रमहिमा तुज ठाऊक असतां ।
शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वतां । कैसा आणीत होतासी ॥ १५६ ॥
मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून ।
तव द्वादशवर्षीं मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होतें ॥ १५७ ॥
तें महत्पुण्यें निरसूनि सहज । दहा सहस्र वर्षें करावें राज्य ।
मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधें कष्टीं बहू ॥ १५८ ॥
मग उभा ठाकूनि कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत ।
हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळतां घडला हा ॥ १५९ ॥
ऐसें नारदें सांगतां ते क्षणीं । रायें पायांवरी घातली लोळणी ।
आणीक सहस्र रुद्र करुनी । महोत्साह करीतसे ॥ १६० ॥
शतरुद्र करितां निःशेष । शतायुषी होय तो पुरुष ।
हा अध्याय पढतां निर्दोष । तो शिवरुप याचि देहीं ॥ १६१ ॥
तो येथेंचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थें तरती बहुत ।
असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥ १६२ ॥
आनंदमय शक्तिनंदन । रायें शतपद्म धन देऊन ।
तोषविला गुरु संपूर्ण । ऋषिंसहित जाता झाला ॥ १६३ ॥
हें भद्रसेन आख्यान जें पढती । त्यांसी होय आयुष्य संतती ।
त्यांसी काळ न बाधे अंतीं । वंदोनि नेती शिवपदा ॥ १६४ ॥
दशशत कपिलादन । ऐकतां पडतां घडे पुण्य ।
केलें असेल अभक्ष्यभक्षण । सुरापान ब्रह्महत्या ॥ १६५ ॥
एवं महापापपर्वत तत्त्वतां । भस्म होती श्रवण करितां ।
हा अध्याय त्रिकाळ वाचितां । गंडांतरें दूर होती ॥ १६६ ॥
यावरी कलियुगीं निःशेष । शिवकीर्तनाचा महिमा विशेष ।
आयुष्यहीन लोकांस । अनुष्ठान हेंचि निर्धारें ॥ १६७ ॥
मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रासी राज्य देऊन ।
युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळीं ॥ १६८ ॥
मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना ।
शिवअनुष्ठान रुद्राध्याना । करितां महारुद्र तोषला ॥ १६९ ॥
विमानीं बैसवूनि त्वरित । राव प्रधान नेलें मिरवित ।
विधिलोकीं वैकुंठीं वास बहुत । स्वेच्छेंकरुनि राहिले ॥ १७० ॥
शेवटीं शिवपदासी पावून । राहिले शिवरुप होऊन ।
हा अकरावा अध्यय जाण । स्वरुप एकादश रुद्रांचें ॥ १७१ ॥
हा अध्याय करितां श्रवण । एकादश रुद्रां समाधान ।
कीं हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिलें फळ देणार ॥ १७२ ॥
मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न ।
पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥ १७३ ॥
येथें जो मानील अविश्र्वास । तो होईल अल्पायुषी तामस ।
हें निंदी तो चांडाळ निःशेष । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १७४ ॥
त्यासी प्रसवोनि वांझ झाली माता । त्याची संगती न धरावी तत्त्वतां ।
त्यासी संभाषण करितां । महापातक जाणिजे ॥ १७५ ॥
ते आपुल्या गृहासी न आणावे । आपण त्यांच्या सदनासी न जावें ।
ते त्यजावे जीवेंभावें । जेवीं सुशील हिंसकगृह ॥ १७६ ॥
जो प्रत्यक्ष भक्षितो विष । जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ।
त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस । संदेह कांहीं असेना ॥ १७७ ॥
असों सर्वभावें निश्र्चित । अखंड पहावें शिवलीलामृत ।
हें न तरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ॥ १७८ ॥
या अध्यायाचें करितां अनुष्ठान । तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य ।
त्याचे घरीं अनुदिन । ब्रह्मानंद प्रगटेल ॥ १७९ ॥
अपर्णाहृदयाब्जमिलिंद । श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ।
जो जगदानंदमूळकंद । अभंग न विटे कालत्रयीं ॥ १८० ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । एकादशाध्याय गोड हा ॥ १८१ ॥

॥ इति एकादशोऽध्यायः संपूर्णः ॥

Sponsored Links

SHARE

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on LinkedIn (Opens in new window)
  • Click to share on Skype (Opens in new window)
Tags श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा DEVOTIONAL

READ MORE

श्री बटुक भैरव स्तोत्र || Devotional ||
श्री बटुक भैरव अष्टोत्तर नामावली || Devotional ||
भगवान कुबेर यांची १०८ नावे || Devotional ||
श्री कुबेर अष्टोत्तर नामावली || Devotional ||
बुद्धिस्तोत्र || Buddhistotr || Adhyatmik ||
श्री सरस्वती अष्टोत्तर नामावली || Devotional ||
श्रीकृष्णाष्टोत्तरशतनाम स्तोत्रं || Stotr || Devotional ||
श्री कृष्ण अष्टोत्तर नामावली || Devotional ||
Read Previous Story श्रीशिवलिलामृत अध्याय पहिला || Devotional ||
Read Next Story श्रीशिवलिलामृत अध्याय दुसरा || Devotional ||

TOP POEMS

white painted papers

हरवलेले पत्र || PATR MARATHI KAVITA ||

हरवलेल्या पत्रास आता कोणी पत्ता सांगेन का खुप काही लिहलंय मनातल आता कोणी वाचेन का काळाच्या धुळीत मिसळुन सगळं काही संपलय का शोधुनही सापडेना काही वाट मी चुकतोय का
a couple sitting on the floor

पाहुनी तुझ एकदा !! || PAHUNI TUJH Ekda || Marathi love Poem ||

पाहुनी तुझला एकदा मी पुन्हा पुन्हा का पहावे नजरेतुनी बोलताना ते शब्द घायाळ का व्हावे घुटमळते मनही तिथेच तुझ्या वाटेवरती का फिरावे तुला भेटण्यास ते पुन्हा कोणते हे कारण शोधावे
happy ethnic couple with suitcase in park

कधी कधी || KADHI KADHI || MARATHI POEM||

कधी कधी मनाच्या या खेळात तुझ्यासवे मी का हरवतो तुला शोधण्याचा हट्ट इतका का? की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो तुला यायचं नाही माहितेय मला तरी मी तुझी वाट का पाहतो
a woman and her child sitting on the shore

मातृत्व || Best Marathi Poems || आईसाठी कविता ||

वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !!
glasses filled with tea on the table

चहा .. || CHAHA MARATHI POEM ||

अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या याच्या शिवाय पर्याय नाही पेपर वाचत दोन घोट घेता स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही
man and woman kissing under sunset

हास्य || HASYA MARATHI KAVITA ||

खळखळून वाहणाऱ्या नदीत तुझ हास्य वाहुन जातं माझ्या मनातल्या समुद्रात अलगद ते मिळुन जातं ओलावतात तो किनारा ही नावं तुझ कोरुन जातं लाटांच्या या खेळात कित्येक वेळा पुसुन जातं

TOP STORIES

bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग १ || LOVE STORIES ||

आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगितलं होतं की आता पुन्हा प्रेमात पडायचं नाही. ती आली पुन्हा तरी तिला माफ करायचं नाही. पण जेव्हा तिचा आठवणीतला चेहरा पाहतो तेव्हा सगळं हे ठरवलेलं चुकीचं होईल अस वाटत राहतं
child and woman standing near water

आई || कथा भाग १० || Story || Marathi ||

"हॅलो !! हा मेघा बोल ना !!" "मॅम कुठे आहात आपण ?? सकाळपासून किती फोन लावले मी तुमच्या घरी , नंतर कळाल की फ्लॅटला तर कुलूप आहे !! मग कसातरी बॉसने इमर्जंसी नंबर मधून तुमचा घरचा नंबर शोधून काढला..!! काय झालं अस अचानक तुम्ही तिकडे गेलात ??"
child and woman standing near water

आई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||

"शीतल काही विचारायचं होत !! " "विचार ना !!" "पुण्याला कशी जाणार आहेस ?? म्हणजे त्रिशा ??" "तिचं काय रे !!ती राहील तुमच्या सोबत इथे !! " "पण ती राहील तुझ्याशिवाय !!" "तिला राहावं लागेल !!" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. "समीर !! थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे !! खूप मोठी संधी आहे समीर !! आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल !!" "पण ती खूप लहान आहे अजून !! राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही !! "
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न ||अंतिम भाग || SWAPN MARATHI KATHA ||

बरसल्या सरी अगणित वेळा त्या शांत कराया मातीस तूही प्रयत्न कर अगणित वेळा मनातल्या त्या स्वप्न पूर्तीस
fashion man people woman

द्वंद्व || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले असे काय?? की विशाल स्वतःला हरवून गेला.
child and woman standing near water

आई || कथा भाग ११ || मराठी कथा || Story ||

दुसरा दिवस सर्व आवरा आवर करण्यातच गेला. बाबा आणि समीर त्या तिघींना पुण्याला सोडण्यासाठी जायचं ठरलं. जायच्या दिवशीही सगळे आवरा आवर करत होते. समीर आणि शीतल मध्येच काही राहील तर नाहीना याची शहानिशा करत होते. बाबा त्रिशाला आपल्या कडेवर घेऊन सर्व घरात फिरत होते. आज त्रिशा पुण्याला जाणार या विचाराने त्यांच्या मनात घालमेल होत होती. एका आजोबाला आपल्या नातीपासून दूर राहण्याच दुःख काय असतं जणू ते व्यक्तही करू शकत नव्हते. घरभर फिरून खेळत असताना समोर दरवाजा वाजतो, बाबा दरवाजा उघडतात. समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून बाबा त्याला विचारतात,

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy