ॐ श्रीशाबरी देव्यै नमः ।
ॐ नमो श्रीगजवदना । गणराया गौरीनंदना ।
विघ्नेशा भवभयहरणा । नमन माझे साष्टांगी ॥ १ ॥
नंतर नमिली श्रीसरस्वती । जगन्माता भगवती ।
ब्रह्मकुमारी वीणावती । विद्यादात्री विश्र्वाची ॥ २ ॥
नमन तैसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।
स्मरुनि त्या पवित्र पाया । चित्तशुद्धी जाहली ॥ ३ ॥
थोर ऋषिमुनी संतजन । नवनाथ नवनारायण ।
करुनी तयांसी नमन । स्तोत्र पाठ आरंभिला ॥ ४ ॥
सूर्य, चंद्र आणि मंगळ । बुध, गुरु हा ग्रह विशाल ।
शुक्र, शनी हे सकळ । राहू-केतूसह वंदिले ॥ ५ ॥
पंचमहाभूते सप्तऋषी । सप्त चिरंजीव अष्टदिक्पालांसी ।
प्रार्थितो त्या सर्वांसी । स्तोत्र प्रभावी करावया ॥ ६ ॥
ॐ नमो शाबरीशक्ती । तुझे स्तोत्र गातो यथामति ।
स्वीकारुनी ही माझी भक्ती । मनोरथ पूर्ण करावे ॥ ७ ॥
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती । विश्र्वमाता विश्र्वसाक्षी भगवती ।
नामे रुपे अनंत असती । एकाच शाबरी शक्तीची ॥ ८ ॥
आदिमाया सती गौरी । जी असे त्रिपुरसुंदरी ।
तीच महादेवी शाबरी । संशय यात नसे मुळी ॥ ९ ॥
बगलामुखी, भ्रामरी । सर्वबाधाहरिणी भुवनेश्र्वरी ।
चंद्रिका, चामुंडा, चक्रेश्र्वरी । चतुःश्रृंगीची देवी ती ॥ १० ॥
शाकिनी, डाकिनी, महापिशाचिनी । सप्त मातृका, चौसष्ट योगिनी ।
रुद्राणी आकाशनिवासिनी । मुंडमालाधारिणी ॥ ११ ॥
मधुकैटभादी सात अरी । त्या सर्वांसी संहारी ।
म्हणुनी नामे सातेरी । जगी प्रसिद्ध जाहली ॥ १२ ॥
भवानीचे तुळजापूर । रेणूकेचे ते माहूर ।
अंबाबाईचे कोल्हापूर । अंबेजोगाई योगिनीचे ॥ १३ ॥
साडेतीन पीठे ती देवीची । एकावन पीठे शक्तीची ।
तीच स्थाने श्रीशाबरीची । पुण्यक्षेत्रे भूवरी ॥ १४ ॥
जेथे धैर्य, साहस, उद्यम । बुद्धी, शक्ती, पराक्रम ।
सहा गुण हे सर्वोत्तम । तेथेही देवी नांदते ॥ १५ ॥
नाथपंथी सिद्ध चौर्याऐंशी । त्यांनी स्तविले नित्य तिजसी ।
अष्टसिद्धी प्राप्त झाल्या त्यांसी । देवीच्याच कृपेने ॥ १६ ॥
ब्रह्मांडाचा खेळ मांडी । खेळी खेळे आणि सोडी ।
उगवी, वाढवी आणि तोडी । लीला करी अगाध ॥ १७ ॥
नवदुर्गा, सप्त आसरा । या रुपांनी विश्र्वपसारा ।
पसरिला हा तिनेच सारा । ऐसी सर्वाधारा ती ॥ १८ ॥
पूजा, पूजक, पूजन । ध्येय, ध्याता, ध्यान ।
कर्म, भक्ती आणि ज्ञान । अशा त्रिपुटी अनेक ॥ १९ ॥
अनेक शब्द अनेक वृत्ती । अनेक वाद अनेक कृती ।
परंतु यांतील मूळ तत्त्व ती । शबरीदेवी जाणावी ॥ २० ॥
त्रिविध दुःखनिवृत्ती । आणि परमानंद स्थिती ।
दोन अंगे ही मुक्तीची । तिच्याच कृपेने लाभती ॥ २१ ॥
नवनाथांनी केली उपासना । दिव्य शक्ती लाभली त्यांना ।
त्यांचीच ही गुप्त प्रार्थना । स्तोत्र रुपे प्रकटली ॥ २२ ॥
भजन, पूजन नामस्मरण । भक्तीची मुख्य साधने तीन ।
ध्यान आणि स्तोत्रपठण । नित्यनेमे करावे ॥ २३ ॥
श्रद्धा असावी सबळ । जैसी श्रद्धा तैसे फळ ।
श्रद्धेवाचून भक्ती निष्फळ । श्रद्धा बैठक जीवनाची ॥ २४ ॥
देवऋण आणि पितृऋण । समाजऋण, राष्ट्रऋण ।
कोणी जाऊ नये विसरुन । तीच सेवा देवीची ॥ २५ ॥
प्रयत्न तेथे प्रगती । आळस तेथे आपत्ती ।
हे कोरुन ठेवावे चित्ती । कर्तव्यकर्म करावे ॥ २६ ॥
शरीर आणि चंचल मन । यांवर ठेवावे नियंत्रण ।
आहार, विहार, भाषण । प्रमाणात असावे ॥ २७ ॥
ठेवुनी नित्य शुद्धाचरण । मनापासून करी प्रयत्न ।
तयास देवी होते प्रसन्न । आणि इच्छिलेले देतसे ॥ २८ ॥
सत्यापरता नाही धर्म । सत्य हेच धर्माचे मर्म ।
या धर्ममर्माविरुद्ध जे कर्म । ते महापातक जाणावे ॥ २९ ॥
सदासर्वदा सत्य वदावे । सत्य तेही गोड असावे ।
गोड परंतु असत्य नसावे । सनातन धर्म हा असे ॥ ३० ॥
व्याघ्र वाहन, लाल वसन । विंध्यगिरी वास्तव्यस्थान ।
तरी त्रिलोकी करी भ्रमण । तिच्या चरणी प्रणाम ॥ ३१ ॥
फल्गुनदी गयेची । सरस्वती ती प्रयागची ।
त्या दोन्ही गुप्त गंगांची । स्नानें घडती स्मरणमात्रे ॥ ३२ ॥
त्रिशूळ, खङ्ग, चक्र, गदाधारिणी । अज्ञान-निमिरहारिणी ।
साक्षात सूक्ष्मस्वरुपिणी । विघ्ने निवारी सर्वही ॥ ३३ ॥
निर्लेप आणि निर्विकारी । जी स्थूलसूक्ष्म स्थिरचरी ।
प्रत्यक्ष ब्रह्म जी शाबरी । चैतन्यरुपे राहतसे ॥ ३४ ॥
आकाश, वायू, अग्नी । पाणी आणि मेदिनी ।
पंचक्रोश पंचेंद्रियांतुनी । तीच आत्मशक्ती संचरे ॥ ३५ ॥
तिचेच करावे चिंतन । देवीमय व्हावे आपण ।
तेव्हांच कुंडलिनी जागृत होऊन । साक्षात्कार होतसे ॥ ३६ ॥
ऐसे ब्रह्मचिंतन, आत्मचिंतन । जे-जे करिती रात्रंदिन ।
तेची जगी धन्यधन्य । जन्ममरण नसे तया ॥ ३७ ॥
देवीचे रुप आठवावे । तिच्यापुढे नम्र व्हावे ।
दोन्ही हात जोडावे । आणि मागावे मागणे ॥ ३८ ॥
शरण, त्रिवार शरण । दुःखदारिद्र्य दूर करुन ।
आयुष्य, आरोग्य, धन । देई माते उदंड ॥ ३९ ॥
भार घालुनी तुझ्यावरी । वागतो मी या संसारी ।
अपराध होती कितीतरी । त्यांची क्षमा असावी ॥ ४० ॥
अशुभ टळावे, मंगल व्हावे । सौभाग्य गृह-दारसुख मिळावे ।
मनःशांती वाहनसुख असावे । संतती होवो सद्गुणी ॥ ४१ ॥
त्रिदोषांचे व्हावे शमन । क्षय-कुष्टादी रोग दारुण ।
शत्रुभयही निवारुन । आनंदीआनंद करावा ॥ ४२ ॥
तू अससी कल्पलता । इच्छिलेले देई आता ।
आणि धरुनी माझा हात । सन्मार्गाने चालवी ॥ ४३ ॥
जादूटोणा, जारण-मारण । सर्वारिष्ट क्लेश नष्ट करुन ।
रोगव्याधी दूर ठेवून । सुखरुप ठेवी सर्वांना ॥ ४४ ॥
ऐहिक जीवनात होवो प्रगती । अध्यात्मज्ञानाची व्हावी प्राप्ती ॥ ४५ ॥
हेची दान देई देवी । निरंतर तुझी कृपा असावी ।
शिरी वरदहस्त ठेवी । हेच माझे मागणे ॥ ४६ ॥
ग्रहपीडा आणि भूतबाधा । यांवर एक उपाय साधा ।
लाल दोरा गळ्यात बांधा । शाबरी मंत्राने मंत्रुनी ॥ ४७ ॥
एकान्ती किंवा जनीवनी । दिवस असो वा रजनी ।
मंत्र जपावा मनीच्यामनी । देवी रक्षील निश्र्चये ॥ ४८ ॥
कार्य व्हावया निर्विघ्न । प्रिय व्यक्तीचे व्हावया दर्शन ।
स्पर्धेत मिळावे यश म्हणून । स्तोत्र जवळ बाळगावे ॥ ४९ ॥
कामकाजांत मिळाया सुयश । सर्व लोक व्हावया वश ।
आणि निघताना प्रवासास । स्तोत्र सन्निध असावे ॥ ५० ॥
निदान प्रत्येक मंगळवारी । आणि नेमाने शुक्रवारी ।
दिवसातून एकदातरी । स्तोत्र अवश्य वाचावे ॥ ५१ ॥
देवीभक्तीच्या प्रसारासाठी । जो ही स्तोत्रे इतरांना वाटी ।
महत्पुण्य तो बांधी गाठी । देवीकृपा होतसे ॥ ५२ ॥
शाबरीकवच जे पुरातन । त्याचाच आधार घेऊन ।
मराठी स्तोत्र केले निर्माण । म्हणे मिलिंदमाधव ॥ ५३ ॥
शके एकोणीसशे सात वर्षी । मार्गशीर्ष मासी कृष्ण पक्षी ।
सप्तमी शुक्रवार दिवशी । स्तोत्र पूर्ण झाले हे ॥ ५४ ॥
ॐ शाबरीदेव्यै नमः । शुभं भवतु ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
भक्तकवी मिलिंदमाधवकृत प्रभावी शाबरी स्तोत्र संपूर्ण ॥