ॐ श्रीगणपतिला वंदन । प्रार्थितसे लीन होऊन ।
दुःख दैन्य सारे जाऊन । समाधान मज लाभो ॥ १ ॥
वनदुर्गा उपनिषदात । गणपतिमाला मंत्र वर्णित ।
एक लाख पुरश्चरण करित । मंत्र सिद्धी लाभेल तया ॥ २ ॥
दहावा भाग घृतसहित । हवन करावे शास्त्रोक्त ।
याच क्रमे तर्पणमार्जनादिक पुनीत । ब्राह्मण भोजन घालावे ॥ ३ ॥
ऐसे करिता सिद्ध होत । मंत्र तै तो लाभ देत ।
प्रसन्नचित्त गणेशभक्त । उद्धरील आर्त जनांते ॥ ४ ॥
ॐ क्लीं, र्हीं श्रीं म्हणोनि । ऐं ग्लौंम ॐ र्हीं,क्रौं गं उच्चारोनी ।
ॐ नमो भगवते शब्दांनी । मालामंत्र प्रारंभ ॥ ५ ॥
हे भगवंता महा गणपते । स्मरणमात्रेचि संतुष्ट तूते ।
सर्वविद्याप्रकाशकाते । वंदन माझे विोनम्र ॥ ६ ॥
हे सर्वकामप्रदा देवा । भवबन्ध माझा तोडावा ।
र्हीं तन्त्ररुपा आठवावा । म्हणोनि तुजला नित्य नमी ॥ ७ ॥
क्रौं बीजाक्षर जगती । सर्व भूते बंधनी पडती ।
क्लीं म्हणता आकृष्ट होती । साध्ये सारी जगतात ॥ ८ ॥
तंत्राक्षरी शक्ती वसत । क्लीं जगत् त्रय वश होत ।
सौंः सर्वमनक्षोभण करित । श्रीं हे महत्संपत्प्रद ॥ ९ ॥
ग्लौं भूमण्डलाचे आधिपत्य । देई त्याला नमू नित्य ।
महाज्ञानप्रदासी सत्य । चिदानन्दा वंदन ॥ १० ॥
गौरीनन्दनाला नमन । महायोग्याचे चिंतन ।
शिवप्रियाला जावें शरण । तोचि जगी शिवप्रद ॥ ११ ॥
सर्व आनंद करी जो वर्धन । सर्व विद्यांचे प्रकाशन ।
करुनिया देई दान । ऐशा गणेशा नमन असो ॥ १२ ॥
द्रां चिरंजीवाला स्मरावे । ब्लूं संमोहनासी भजावे ।
ॐ मोक्षप्रदा सतत ध्यावे । फट् म्हणोनी प्रार्थना ॥ १३ ॥
वश करी, देवा वश करी । वौषड् आकर्षण नित्य करी ।
हुं विद्वेषण करी विद्वेषण करी । फट् उच्चाटन उच्चाटन ॥ १४ ॥
ठः ठः स्तम्भन करी स्तम्भन । खें खें मार मार शत्रुंस येउन ।
शोष शोष भव सिंधू उन्मन । ऐसी विनंती पुनः पुनः ॥ १५ ॥
शत्रुच्या मंत्रतंत्रयंत्रा छेद छेद । दुष्ट ग्रहां उच्छेद उच्छेद ।
दुःखे सारी हरण कर विशद । व्याधी नष्ट विनष्ट करी ॥ १६ ॥
नमन ऐश्या संपन्नाला । स्वाहा अर्पू संपन्नाला ।
सर्व पल्लव स्वरुपाला । महाविद्यादहिपतीस ॥ १७ ॥
गं गणपतीला स्वाहा । ज्याची कृपा लाभता महा ।
भय चिंता नुरते देहा । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १८ ॥
ज्याच्या मन्त्राचे करिता मनन । निरंतर करोनिया चिंतन ।
तेणे पवित्र साधने दर्शन । करिता मृत्युही घाबरतो ॥ १९ ॥
ज्याचे आशीर्वाद वज्रासमान । प्रलयकाळीच्या पवनासमान ।
भूतप्रेतपिशाचां पळवून । पीडा त्यांची दूर करिती ॥ २० ॥
जे जे उपजले दुःख दुरित । ते ते उच्चाटन करी समस्त ।
अभीष्टदात्या भयहर्त्यास नमित । विघ्नौघनाशका गणाधिपा ॥ २१ ॥
ॐ गं गणपतिला नमन । ॐ र्हीं ऐं ईं स्वाहा जपानुष्ठान ।
त्या गणराजाचे तन्त्ररुप पावन । त्याचे ध्यान फलप्रद ॥ २२ ॥
ईं हे प्रथम अक्षर वदन । द्रां द्रीं स्तनद्वय समजून ।
क्लीं नाभिस्थ अनंगराजसदन । ब्लूंकार मांड्या दोन ज्याच्या ॥ २३ ॥
सः रुपी पाय ते मदन । बन्धूक पुष्पासम द्युती छान ।
ऐसे त्या गजवदनाचे ध्यान । गंगाप्रवाहासमान ॥ २४ ॥
मनींचा संशय फेडून । करिता पुलकित होय मन ।
गणपतिमाला मंत्र जपून । चिंतामणी तोषवावा ॥ २५ ॥
ईं द्रां द्रीं क्लीं म्हणून । ‘ सः ‘ पद अंती उच्चारुन ।
गणेश मंन्त्राचे ध्यान । करिता वांछित लाभेल ॥ २६ ॥
मूळमंत्र गीर्वाणभाषेत । त्याचा अनुवाद मराठींत ।
सीताराम गणेशसुत । देसाई कुलोत्पन्न करी ॥ २७ ॥
गणपती तुझी कृपा सतत । दुःख दैन्यांचे हरण करित ।्
अष्ट सिद्धी भक्तां देत । ऐशी कृपा मज लाभावी ॥ २८ ॥्
स्तोत्राचे एकवीस पाठ करावे । प्रतिदिनी मनी ध्यावें ।
अथवा एक वेळ तरी वाचावे । साधकाने नित्य नेमे ॥ २९ ॥
प्रभो देवा गौरीनंदना । प्रणवा पुरवी मनःकामना ।
ऐहिक पारलौकिक साधना । सफल होवोत भक्तांच्या ॥ ३० ॥
गणपतिमाला मंत्र स्तोत्र । सांज सकाळी वाचावे पवित्र ।
तेणे गणाधिप कृपा प्राप्त । गणेशसायुज्य भक्तांसी ॥ ३१ ॥
इति श्री सीतारामविरचित श्रीगणपतिमालामंत्रानुवाद स्तोत्रं संपूर्णम् ॥
श्रीगणपतीमालामंत्र स्तोत्र || Stotr ||
