शर्यत कथा भाग ८

पाहता पाहता शर्यतीचा दिवस उजाडला. सखा सकाळी उठून सगळं आवरू लागला. शांता कशीतरी उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला उठताच येत नव्हतं. तिची ती धडपड पाहून सखा तिच्या जवळ जात म्हणाला.
“बसून राहा शांता, तापेचा जोर खूप वाढलाय !! आज संध्याकाळी शर्यत जिंकून आलो की तुला पहिले मोठ्या शहरातल्या वैद्याकडे घेऊन जाईन !! तोपर्यंत जरा कळ काढ !! “
शांता स्वतःला सावरत बसून राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ दिसत होती. सखाला ती जाणवली. तो लगेच म्हणाला,
“माहितेय मला!! तुला एकटीला सोडून जाणं मला खूप अवघड आहे !! पण नाईलाजाने मला हे करावं लागेल शांता !! आपल्यासाठी !!”
“तुम्ही निर्धास्त जा !! मला काही होणार नाही !! तुमची सगळी ताकद त्या शर्यतीत खर्ची करा !! तुम्ही जिंकणार हे माहितेय मला !!”
सखा तिला नीट बसवून तेथून उठला. सगळं काही आवरू लागला. शांताला जेवायला देऊन तो घरातलं सगळं काम करू लागला, तेवढ्यात बाहेरून हाक ऐकू आली,
” सख्या !! ये सख्या !! चल जायचंय ना शर्यतीला !! ” घरात येत आप्पा म्हणाले.
“चला आप्पा !! झालंय माझं आवरून !!” सखा जागेवरून उठत म्हणाला.
सखा आणि आप्पा घरातून बाहेर चालले. क्षणभर सख्याचे पाय अडखळले. त्याने एक नजर शांताकडे पाहिलं. तिच्या ओठावर हसू होते आणि डोळ्यात अश्रू. सखा तसाच जड पावलाने निघाला. आप्पा आणि सखा चालत चालत महादेवाच्या मंदिराजवळ आले. तिथे येताच सगळीकडे नुसती गर्दी गोंधळ त्यांना दिसू लागला. जो तो आपापल्या गावच्या शर्यतीच्या गप्पा करू लागला. पुसट सखा ते ऐकू लागला. मध्येच आप्पा त्याला बोलत होते,

“सख्या गावाच्या मानासाठी तुला जिंकावच लागेल !! लक्षात ठेव हा मान आपल्या गावाला कधीच मिळाला नाही !! ही शर्यत सुरू आपल्याच गावात होते पण नेहमी तो मान दुसऱ्याच गावचे लोक जिंकून घेऊन जातात. तुला तो मान या गावाला द्यावा लागेल !!” आप्पांच्या डोळ्यात सखाला वेगळीच चमक दिसू लागली.
“होय आप्पा !! नक्की मी माझी सगळी ताकद या शर्यतीसाठी लावेल !! ” सखा आप्पाकडे हसत बघत म्हणाला.
“ठीक आहे !! सखा आता तू पलीकडे त्या सगळ्या स्पर्धकांत जाऊन उभा राहा !! हे घे आपल्या गावाची निशाणी !! ही दाखवली की तुला ते स्पर्धेच्या मैदानावर सोडतील!! सखा आता आपली भेट स्पर्धा संपल्यावरच !! “
“ठीक आहे आप्पा !! ” सखा आप्पांच्या हातातली ती निशाणी घेत म्हणाला.
चालत चालत तो स्पर्धकांच्या रांगेत जाऊन उभा राहिला. त्याला हे सगळं काही नवीन होत. तो कुतूहलाने सगळीकडे पाहू लागला. त्याच्या मनात कित्येक विचारांच काहूर माजलं.
“शर्यत !! आयुष्याची शर्यत !! जणू खूप काही सांगणारी ही शर्यत !! मला माझ्यात पुन्हा पाहायला लावणारी ही शर्यत !! कधी विचारही केला नव्हता या क्षणांचा !! या वयात तरण्या पोरां सारखं धावाव लागेल ते !!पण एवढा अट्टाहास कशासाठी !! माझ्या शांतेला चांगल्या वैद्याकडे घेऊन जाण्यासाठी !! या वयात तिला चांगल्या घरात राहायला मिळावं यासाठी!! तिला रोज कष्ट पडू नये यासाठी!! ही शर्यत फक्त आमच्यासाठी !! हो ना !! मग यामध्ये !! साहेब !! आप्पा!! गावची शान !! मान !! आणि महसूल, ही नकळत जोडले जावे ते कशासाठी ?? कारण स्वार्थी दुनियेत कवडीही मिळत नाही फुकट !! इथेतर सार आयुष्य पणाला लागल आहे !! ” सखा स्वतःच्या तंद्रीत होता.
“ओ भाऊ !! चला पुढं !! ” स्पर्धेच्या मैदानात सोडणारा माणूस सख्याला म्हणाला.

सखा आपल्या विचारांतून बाहेर आला. पुढे येत त्याने त्याला हातातील निशाणी दिली. त्याने ती हातातून घेत आपल्या वहीत सूतारवाडी लिहिलं आणि सख्याला आत जायचा इशारा केला.

सखा शर्यतीच्या मैदानात आला. सगळ्या स्पर्धकांसाठी आखून दिलेले रखाने पाहू लागला. पंचाने त्याला समोरच्या रखाण्यात उभारण्याची आज्ञा दिली. सखा तिथे जाऊन उभा राहिला. क्षणभर इकडे तिकडे तो पाहत होता. समोरच त्याला साहेब दिसले. मानाच्या खुर्चीवर ते आरामात बसले होते. दुरूनच त्यांनी सख्याला इशारा केला. स्पर्धा जिंकण्याची जिद्द दिली. सखा आता त्या रखाण्यात उभा राहून स्पर्धा सुरू व्हायची वाट पाहत होता. अजून काही स्पर्धक आत येत होते. सखा येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांकडे पाहत होता. अचानक त्याला शिरपा आत येताना दिसला. सखा क्षणभर त्याला पाहतच राहिला. शिरपा आत येताच त्याची नजर सखावर गेली. तो चालत चालत सखा जवळ आला. त्याच्याकडे हसून पाहू लागला. तेवढ्यात त्याला पंचाने सखाच्या शेजारच्याच रखाण्यात उभारायल सांगितलं. सखा त्याच्याकडे पाहून न पहिल्या सारखं करू लागला. बाहेर उभारलेल्या आप्पा आणि साहेबांनही ही गोष्ट लक्षात आली. त्यांना कळून चुकल की शिरपा फक्त साहेबांच्या विरूद्ध मुद्दाम शर्यतीत उतरला आहे. कुरलेवाडीच्या पाटलांनी त्याला यावर्षी शर्यतीत उतरवल होत. सगळे तरुण तडफदार स्पर्धक सखाकडे पाहून हसत होते हा काय पळणार असं मनातल्या मनात म्हणत होते.

सखा आता फक्त शर्यतीत धावण्याचा विचार करू लागला. त्याच्या समोर राहून राहून शांताचा तो इकडे येतानाच चेहरा दिसत होता. सखा आता हरवून गेला होता. त्याला चिंता लागून राहिली होती ती शांताच्या तब्येतीची. इकडे येण्या आधी तिची तब्येत त्याला खूप अस्वस्थ करत होती. तिला क्षणभरही एकटं सोडू नये असं त्याला वाटलं होत पण शर्यतीचा पर्याय तिला चांगल्या वैद्याकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग होता. सखा अचानक भानावर आला. पंच आता शर्यत सुरू होण्याची शिट्टी देऊ लागला.

आणि अखेर पंचाने शर्यत सुरू झाल्याचा इशारा केला. सखा जीव तोडून पळत सुटला. समोर आता फक्त त्याला सावंतवाडीच महादेवाचं मंदिर दिसत होत. थोड पुढं जाताच त्याला मागून कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतंय अस जाणवलं तो शिरपा होता. सखाच्या मांडीवर जोरात लाथ मारत त्याने सखाला खाली पाडल. सखा जमिनीवर लोळत गेला. शिरपा हसत पुढे निघून गेला. सखा कसाबसा जागेवरून उठला. पुन्हा धावत सुटला. समोर पाहत फक्त धावत होता. पाहता पाहता तो सगळ्यांच्या पुढे जाऊ लागला. पुन्हा त्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करू लागले. सखा कित्येक वेळ असेच मार चुकवत राहिला. धडपड करत धावत राहिला. पण अचानक जोरात त्याच्या डोक्यात कोणीतरी घाव केला. तो शिरपा होता. शिरपा हात धुवून सखाच्या मागे लागला होता. त्याला त्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. सखा जागेवरून उठला आजूबाजूला कोणीच नव्हतं!! बाकीचे स्पर्धक अजून खूप मागे राहिले होते.
“हे बघ शिरपा !! माझं तुझ्याशी काही वैर नाहीये !! मला जाऊ दे !! “
“होय तर !! तुझ्यामुळे तर आज मला दुसऱ्या गावाकडून पळाव लागतंय !! तुझ्यामुळ मला साहेबांनी मारलं !!”
“माझ्यामुळ नाही !! तुझ्या बेइमानीमूळ !! ” सखा जागेवर उठत म्हणाला.
“गप रे भाडकाव !! ” अस म्हणत पुन्हा त्याने शिरपाला जोरात डोक्यात मारलं .
सखा पुन्हा जमिनीवर पडला. त्याला अचानक आप्पाच वाक्य आठवलं ” आपण जर प्रतिकार नाही केला तर हे लोक आपल्याला मारून टाकतील!!” सखा शेजारचा दगड हातात घेत उठला. मागे फिरत शिरपाला जाऊ देण्याची विनवणी करू लागला. पण त्याला कळून चुकलं हा असा ऐकणार नाही. हातातला दगड त्याने जोरात शिरपाच्या डोक्यात घातला. शिरपा क्षणात जमिनीवर कोसळला. सखा त्याच्याकडे क्षणभर पाहू लागला. तेवढ्यात बाकीचे स्पर्धक मागून धावत येताना त्याला दिसले. तो पुढे पळत सुटला. अगदी जोरात धावत सुटला. पाहता पाहता त्याने सावंतवाडीच्या महादेवाचे मंदिर गाठले. पुन्हा तो परतीच्या वाटेवर लागला. शर्यत जिंकण्याच्या अगदी क्षणभर तो जवळ आला होता.
अगदी शर्यतीच्या शेवटच्या टप्पयात आता सखा आला होता. जीव तोडून आता तो पळत होता. तरुण तडफदार स्पर्धक आता जवळ जवळ सखाच्याच बरोबर पळत होते. सख्याला कळून चुकलं ही स्पर्धा वाटते तितकी सोपी नाही. इकडे आप्पा, साहेब सख्याला पाहण्यासाठी आतुर झाले होते. त्यांची नजर त्या वाटेवर लागली होती. आणि तेवढ्यात आप्पा जोरात म्हणाले.
“धाव सखा !! धाव !! जोरात धाव !! ” सख्याला सगळ्यात पुढे पाहून आप्पांच्या अंगात जणू विजच संचारली होती.
सखा धावत सुटला. ती स्पर्धा जिंकण्याची रेष त्याला खुणावत होती. पायात काटे टोचले होते. डोक्यातून रक्त येत होत. सखा त्या रेषेच्या पलीकडे गेला होता. आप्पा आणि साहेब धावतच सख्याकडे आले. साहेबांनी सख्याला मिठीच माराली. सख्या जोरजोरात श्वास घेत होता. त्याच्या समोर सार काही येऊन थांबलं होत. कित्येकांनी त्याला हार् तुरे घातले होते. मानाचा फेटा बांधून त्याला सगळीकडे मिरवत होते. सखा शर्यत जिंकला होता.
व्हा व्हा सखा !! मानलं तुला !! आज तू मला तो मान मिळवून दिलास ज्याच्यासाठी मी कित्येक वर्षे वाट पाहत होतो !! ” साहेब सख्याला मिठी मारत म्हणाले.
“सख्या गावाचं नाव काढलास बघ!! ” आप्पा हातातला हार सख्याला घालत म्हणाले.
सखा अचानक भानावर आला.त्याला आता शांताची ओढ लागली. त्यानं सार काही तिथंच सोडलं. साहेबांना नमस्कार करून आप्पांना सोबत घेऊन तो घराकडे निघाला. वाटेत त्याने आप्पांना सगळं सांगितलं,
“सख्या अधीतरी सांगायच ना रे !! तुझ्या बायकोची तब्येत बिघडली ते !!”
” शर्यतीच्या राड्यात सांगणं जमलच नाही आप्पा !! “
“बरं चल आता पटकन !! असही तुझं काम संपलय आता !! साहेब पाहून घेतील पुढचं !! “
सखा आणि आप्पा धावतच घराकडे येतात. धावतच सखा घरात जातो. आप्पा घरात येत म्हणतात,
“लगेच शेचारच्या मोठ्या वैद्याकडे घेऊन जाऊ सखा ! क्षणभर ही वाट पाहू नकोस !! “
“जी आप्पा !!”
सखा आत आला समोर भिंतीला टेकून बसलेल्या शांताकडे पाहत म्हणाला.
“मी शर्यत जिंकलो शांता !! बघ !! हा हार् बघ !! ही पैश्यांची माळ बघ ! ये शांता !! हे बघ !! तुला गावच्या मोठ्या वैद्यांकडे घेऊन जायला कोण आलंय !! आप्पा आलेत !!”
शांता शांत बसून होती.
” ये शांता !! उठ ना !! तुला आनंद नाही का झाला ??! हे बघ आता आपण मोठ्या घरात राहायला जायचंय तुला नीट बरं व्हायचंय !! हे बघ !! सार काही नीट होणार आता !! तू आणि मी सुखात राहणार !! शांता ” सखा शांताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
क्षणार्धात शांता बसल्या जागी खाली पडली. आप्पांना कळून चुकलं. क्षणात आप्पा पुढे आले. त्यांनी शांताची नाडी पाहिली. आणि म्हणाले,
“गेलीय ती सखा !!!”
“काय ??”
“स्वतःला सावर सखा गेलीय ती !! “
“अशी कशी गेली !! मला वचन दिलं होत तिने की मी आल्यावर ती माझ्यासोबत आपल्या नव्या घरात राहायला जाणार म्हणून , अशी कशी गेली?”
“भानावर ये सख्या !! ” सख्याच्या गालावर हात फिरवून आप्पा म्हणाले.
सखा क्षणभर शांत राहिला. जणू तो भानावर आला. शांताला एकटक पाहू लागला. त्याच्या डोळ्यात आता अश्रूंचा पूर आला होता. सखा एखाद्या लहान मुलासारख रडू लागला होता. त्याला आप्पा सावरत होते.
“ये शांता !!! ऐक ना !! उठ ना !! चल आपल्याला जायचंय त्या वैद्याकडे असं नकोना करू !! उठ ना !! “
” सावर स्वतःला सख्या !! ” आप्पा त्याच्या जवळ जात म्हणाले.
कित्येक वेळ सखा शांताला आपल्या कुशीत घेऊन रडत राहिला. आप्पा बाजूला बसून त्याला धीर देत होते. जणू सखा शांताच्या आठवणीत हरवून गेला.

“आयुष्याची दुसरी बाजू सुरू झाली तेव्हा शांता तू मला किती सांभाळलं होतस !! प्रत्येक क्षणी तू माझी मैत्रीण माझी अर्धांगिनी बनून माझ्या सोबत राहिलीस !! आजही या शर्यतीसाठी तू मला किती प्रोत्साहन देत राहिलीस !! नेहमी म्हणालीस की मी शर्यत नक्की जिंकणार !! तो आत्मविश्वास मला त्या शर्यतीत नेहमी सोबत देत राहिला. पण तुझं हे असं अचानक जाण मला नाही मान्य शांता !! नाही मान्य !! मी ती शर्यत नक्की जिंकलो पण ही शर्यत, ही श्र्वासांची शर्यत हरलो शांता !! मी हरलो !! “

*समाप्त*

READ MORE

अंतर ( PART 1) || MARATHI LOVE STORY ||

कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच र…

Read More

अंतर (भाग -२) || LOVE STORIES ||

“माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या …

Read More

अंतर(कथा भाग ४)|| LOVE STORY ||

“तुझ्या आवडती coffee!!!” प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली. “थॅन्क्स!!” योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. …

Read More

काॅफी || COFFEE MARATHI KATHA ||

काही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी …

Read More

दुर्बीण .. एक कथा..

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घ…

Read More

द्वंद्व (कथा भाग २)

विशालच्या समोर अचानक आलेली पायल हा त्याचा भास होता की सत्य? आईच्या मनातली विशाल बद्दलची खंत आणि एक न…

Read More

द्वंद्व (कथा भाग ३)

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आण…

Read More

द्वंद्व (कथा भाग ४)

विशालच स्वतःतच मग्न राहणं. सदाला पुन्हा पुन्हा नकळत सायलीबद्दल विचारणं, आईला विशालच्या वागण्याचं नवल…

Read More

नकळत (कथा भाग १) || LOVE STORIES ||

आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगि…

Read More
Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.