शर्यत ( कथा भाग ५) || Sharyat katha bhag 5 ||

भाग ५

सखा भरभर घराकडे निघाला. त्याला कधी एकदा सगळं शांताला सांगेन अस झाल होतं.
“शांता ऐकून खुषच होईल !! साहेबांनी एवढा मोठा विश्वास दाखवला माझ्यावर !!! एकदा शर्यत जिंकलो की मग सगळं काही नीट होईल !! शांता मी दोघं सुखान राहू. चांगलं छप्पर असलेलं घर येईल , सकाळ संध्याकाळ जेवण मिळलं. शांताला गल्लो गल्ली जाऊन कामासाठी भिक मागायची वेळच येणार नाही. सगळं काही चांगलं होईल. ” सखा चालत चालत घरासमोर आला.

“शांता !! शांता !! कुठंय तू ??”
सख्याला शांता कुठच दिसत नव्हती. तो सगळीकडे तिला पाहू लागला. घराच्या मागे समोर तिला शोधू लागला. त्याची नजर तिला सगळीकड शोधत होती.अचानक सख्याला शांता झाडाच्या जवळ पडलेली दिसली. धावतच तो तिच्याकडे गेला. तिचे डोळे मिटलेले होते. सखा तिला उठवू लागला.
“शांता !! उठ !! उठ शांता !! काय झालंय तुला ?? “
शांता डोळे उघडतं नव्हती. तिला कसबस उचलत सखा वैद्यांनकडे घेऊन जाऊ लागला. धावत धावत तो वैद्यांच घर पाहू लागला. त्याचा जीव कासावीस झाला. शांताला अश्या अवस्थेत पाहून त्याला काहीच सुचत नव्हतं. तो तिला सारखं उठवण्याचा प्रयत्न करतं होता. रखडत रखडत तो वैद्यांच्या घराजवळ आला. समोरच्या अंगणात शांताला ठेवून तो वैद्यांना बोलावू लागला.

“वैद्यबुवा !! वैद्यबुवा !! “
दोन तीन वेळा हाक मारल्या नंतर वैद्यबुवा खोलीतून बाहेर आले. त्यांना पाहताच सखा त्यांच्या जवळ गेला. त्यांना हात जोडून बोलू लागला.
“वैद्यबुवा माझ्या बायकोला काय झालंय बघा !! ती डोळे उघडतं नाही !! काही बोलत नाही !!”
वैद्यबुवा सख्याला केसांपासून नखापर्यंत नीट पाहतात आणि म्हणतात,
“कुठल्या वस्तीवरून आला ??”
“इथ सुतारवाडीवरून आलोय !!”
“बरं बरं !!पैसे आहेत ना इलाज करायला ??”
सखा क्षणभर शांत बसला आणि म्हणाला.
“किती लागतील?? “
” दहा रुपये लागतील !! आणि दवादारूचे वेगळे !!”
“दहा रुपये !! एवढे तर नाहीत माझ्याकडे!! ” सखा नाराज होऊन म्हणाला.
“मग कसं रे !! ” वैद्यबुवा सख्याकड पाहत म्हणाले.
सखा क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला
“बुवा तुमचे पैसे नक्की देतो मी, नाहीतर मला काही काम सांगा ते करून देतो त्याबदल्यात !!”
“अस !! बरं !! जा मग पलिकडच्या विहिरीतून पाणी या कळशित घेऊन ये आणि या हौदात भर !! सगळा हौद भरला की झाले पैसे !!”
“बरं बुवा !! पण आधी माझ्या बायकोला बघा तरी !!!”

बुवा शांताला तपासू लागले , काही औषधे तिला देऊ लागले. सखा शांत सगळे पाहत होता.

“काय काम करती रे बायको तुझी ??” वैद्यबुवा सखाकडे पाहत म्हणाले.
“पडलं ती काम करती माझी बायको!! कष्टाची आहे खूप !!”
“तेच कष्ट भोवलय तिला !! “
“म्हणजे ??”
“अशक्तपणा आलाय तिला !! त्यामूळे चक्कर येऊन पडली !! औषध दिलंय मी, एका तासात येईल शुद्धीवर !!”
“लई उपकार झाले बुवा !!” सखा बुवाकडे पाहत म्हणाला.
“उपकार वैगेरे काही नाही !! माझं कामच आहे हे !! आता ती शुद्धीवर येई पर्यंत तू हौद भरून घे !!”
” हो !! लगेच करतो काम !!”

सखा समोर ठेवलेली कळशी घेऊन विहिरकड गेला. भराभर त्या विहिरीतून पाणी उपसू लागला. वैद्यबुवाची बायको घरातून मिश्किल हसत सखाकडे पाहत होती. जणू त्याला त्याच्या गरिबीची जाणीव करून देत होती. सखा राहून राहून बेशुद्ध पडलेल्या शांताकडे पाहत होता. तिच्या विचारात तिला जणू बोलत होता.

“शांता !! माझ्या आयुष्याची जणू ती, श्वास आहे असच मला वाटतं!! तिच्या या अशा बेशुद्ध पडण्यान, मला आज एका क्षणात या निर्दयी जगात एकटं पडल्याची जाणीव होऊन गेली. तिचे ते मिटलेले डोळे मला खूप काही सांगून गेले. तिच्या शिवाय हे जग माझं नाही !!! सखा प्रत्येक कळशी हौदात ओतत असताना त्याला पुन्हा ते पाणी कमी झाल्यासारख वाटत होतं. तो भरत होता पण तरीही ते भरत नाही याची जाणीव त्याला वेळोवेळी होत होती. जणू तो हौद त्याला सांगत होता ,आयुष्याच ही असच आहे सखा, तू कितीही भरण्याचा प्रयत्न केलास तरी तो लवकर भरतं नाहीच !! आणि जेव्हा भरेन तेव्हा सार काही संपलेल असेल!!” सखा खूप वेळ पाणी भरत राहिला.

थोड्या वेळातच शांताला जाग आली. ती कुतूहलाने सगळीकडे पाहू लागली. समोर बसलेल्या वैद्यबुवांकडे पाहत ती म्हणाली.

“कोण तुम्ही ?? आणि मी इथे कशी ??”
बाई तू बेशुद्ध पडली होतीस तुझ्या घरी !! तुझा नवरा तुला इथे घेऊन आलाय !!”
“कुठे आहेत ते ??”
“तो तिकडं पाणी भरतोय !! तुझ्या इलाजाचे पैसे नव्हते त्याच्याकडे, म्हणून करतो म्हणाला काम !!”
शांताला हे कळताच तिला रडू कोसळलं. आपल्या पदराला मुठीत आवळून आपला हुंदका तिने दाबला आणि पटकन उठली, तरातरा चालत ती विहीर जवळ आली.
“कशासाठी एवढी कष्ट ?? मी जगावं म्हणून ना ?? पण तुमच्या जीवाचा तरी विचार करा !!” शांता सखाच्या जवळची कळशी घेत म्हणाली.
“शांता मग करायचं तरी कोणासाठी सांग ना ?? हे शरीर देवाने एवढं टिकवल ते उगाच नाही !! जा बस तिथे माझं झालाच आहे !! “
” नाही ! मीपण मदत करणार तुम्हाला !!”
“नाही म्हटलं ना !! जा !!”

शांता भरल्या डोळ्यांनी सखाकडे पाहत राहिली. थोड्या वेळात सखा काम पूर्ण करून आला. दोघेही घरी जायला निघाले.
“बाई !! शुद्ध जरी आली तरी लगेच काम करत बसू नको !! जरा आराम कर !! वेळच्या वेळी जेवण कर !! नाहीतर आज नुसती चक्कर आली!! उद्या जीवावर बेतू शकतं बरं !! ” वैद्यबुवा जाता जाता सखा आणि शांताकडे पाहून म्हणाले.

दोघेही तसेच हळू हळू चालत घरी आले.सखा आता शांताची काळजी घेऊ लागला.घरी येताच शांता अंथरुणात पडून राहिली. सखा घरातील सगळी कामं करू लागला. थोड्या वेळाने तिला बरं वाटतंय हे पाहून त्याने साहेबांचा विषय काढला. त्याने जे काही घडलं ते सगळं सांगितलं.

“हजार रुपये ?? आणि राहायला घ. .ऽऽ. र ??” शांताला बोलता बोलता खोकल्याची उबळ आली. सखा लगेच पाणी घ्यायला धावला.
पाण्याचा तांब्या तिच्याकडे देत म्हणाला.
“हो तर !! साहेब म्हणाले उद्यापासून ये कामाला!!”
“मग काय ठरवलंय तुम्ही ??”
“ठरवायचं काय त्यात !! शांता मी शर्यतीत धावणार !! आणि जिंकणारच !! बघ तू !! हे घर !! हे फाटके कपडे सगळं काही बदलणार !! खिशात पैसा येणार !! तुला आता कोणाच्या घरची चाकरी करायची वेळ येणार नाही !! दहा रुपयांनसाठी मला कोणाकडे पाणी भरायची वेळ येणार नाही !! आपले दिवस बदलणारं शांता !! आपले दिवस बदलणारं !!” सख्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली.
“हो बदलतील !! तुम्ही शर्यत जिंकणार हे माहितेय मला !!” शांता आता दबक्या आवाजात बोलत होती.

दोघेही पोटभर जेवले. खूप वेळ पुढं काय करायचं याची चर्चा करत बसले. भविष्याला वर्तमानात जगत बसले. थोड्या वेळात शांता झोपी गेली. तिला पाहून सख्याला समाधान वाटत होत. तिच्याकडे पाहत तो आपली सगळी कष्ट विसरून गेला होता.

“माझ्यासारख्या दरिद्री माणसा सोबत कसा काय संसार केला असेन हे या शांतालाच माहीत. तिच्याकडे पाहून खरंच मला अभिमान वाटतो.ही गरिबी काही जन्मजात नाही. आपल्याच लोकांनी ज्यावेळी नाती तोडली , तेही रक्ताच्या, तेव्हा मिळालेली ही गरिबी आहे. शांताच माहेर म्हणजे लक्ष्मीचं घर, लक्ष्मी पाणी भरते म्हणातात ते तिथे जाणवत. पण माझ्यासाठी , माझ्या स्वाभिमानासाठी तिन्ही सगळ्यांची भीक नाकारली. मी एकदाच म्हणालो होतो माझ्या मुलांना , जेव्हा त्यांनी मला घरातून बाहेर काढल तेव्हा , या मनगटात ताकद आहे तोपर्यंत मी स्वाभिमानाने जगेन , ज्या दिवशी ती ताकद संपली तो अंत माझा !! आणि ती तो स्वाभिमान अजूनही सांभाळत आहे ती , पडेल ते काम करेन पण फुकटची एक दमडी घेणार नाही कोणाची!!”

सखा रात्रभर शांताची काळजी घेत राहिला. सकाळ झाली तेव्हा तिला थोड बरं वाटू लागलं. पण अंथरुणातून उठायची काही ताकद तिला येत नव्हती. अशात सखा पटापट आवरून लागला. शांताला काय हवं नको विचारू लागला. त्याला पुन्हा कामावर जायची ओढ लागली होती.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *