शर्यत || कथा भाग ४ || Sharyat || katha bhag 4 ||

भाग ४

सखा कित्येक दिवस दुकानाकडे गेलाच नाही. त्याच्या मनात सारखं जाण्याचा विचार येतही होता पण त्याला काय करावं सुचतच नव्हतं. पुन्हा त्या शिरपाने मारलं तर ?? या भीतीने तो घरातच थांबला. या वयात काही झालं तर निस्तारायला पैसे तरी आहेत का ?? या विचारांनी तो पुरता वेडावून गेला होता. डोक्यावरची जखम आता हळूहळू बरी होत आली होती.

सांजवेळ होत आली आणि शांता समोरून येताना त्याला दिसली. तिला पाहून तो जागेवरून उठला तिच्या डोक्यावर भलीमोठी लाकडाची मोळी होती. ती डोक्यावरून उतरवत शांता बोलू लागली.
“आज दिवसभर भटकले !! पण कुठ पण काम मिळालं नाही मला!! शेवटी पलिकडच्या गावात झाड तोडायच होत, ते केलं !! कसे बसे पाच रुपये दिलेत त्यांनी !! ” शांता खाली बसत म्हणाली.
“भूक लागली असलं ना ??” सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला.
शांता पाणी घटाघटा प्याली.
“पोटात भुकेन कावळे वरडायलेत !!” शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली.
“चल मग जेवूयात !! ” सखा तिला उठवत म्हणाला.
“जेवण ??”
सखा फक्त तिच्याकडे पाहून हसला.
“तुम्ही केलंत ??”
“हो !! “

सखा आणि शांता जेवण करायला बसले. शांता एकटक हातातल्या घासाकडे पाहत राहिली.
“जेव की !! काय झालं ??”
“किती दिवस अस घाबरून घरी बसून राहणार ?? शांता सखाकडे पाहत म्हणाली.
“भित नाहीये मी !!!” सखा नजर चोरत म्हणाला.
“खर ??”
सखा काहीच बोलला नाही. जेवण करून तो उठला आणि समोरच्या अंगणात जाऊन बसला.

“काय सांगू शांता तुला !! हो खरंच मला भीती वाटतेय !! मला काही झालं तर तुझ काय होईल याची !! माझ्यामुळ तुला काही त्रास होईल याची !! पोटच्या पोरानी जिवंतपणी अनाथ केलं ! घराबाहेर काढून आभाळ दाखवलं !! ते दुःख तू पचवलस !! म्हणूनच कदाचित आता तुला मला अजून दुःख द्यायचं नाहीये !! हा हे खरंय की घरात बसूनही चालणार नाही !! मला आज नाहीतर उद्या काहीतर खटाटोप करावी लागणारच आहे. माहितेय मला !!!” सखा गोधडीवर पडून विचार करत होता.

“सखा !! ये सखा ??” समोरून कोणीतरी आवाज देत होत.
“कोण आहे ?? ” सखा जागेवरून उठला.
“मीच आहे !! आप्पा !!” आप्पा सख्याच्या जवळ येत म्हणाले.
“आप्पा तुम्ही ??”
“हो मीच !! काय माणूस आहेस का कोण आहेस तू ??कामावर का येत नाहीस तू ??”
सखा काहीच बोलला नाही.
“सांग ना ?? का आला नाहीस ??”
“बरं वाटतं नाही म्हणून येणं झालं नाही !!”
“खर की काही वेगळं अजून !! दहा पंधरा दिवस झाले कामावर नाहीस !! बरं तुझा पत्ता माहीत नाही !! तुझ्या वस्तीतला एकजण भेटला त्याला विचारलं तेव्हा माहीत झालं तुझ घर !!”
“चूक झाली आप्पा !!” सखा हात जोडत म्हणाला.
“त्या शिरपामूळ आला नाहीस ना ??”
आप्पांनी विचारताच सखा आश्चर्याने पाहू लागला.
“पाहू नकोस तसा !! साहेबांनी चोप चोप चोपलाय त्याला तेव्हा सांगितलं त्यानं !!”
“त्याची काही चूक नाही आप्पा !! मीच त्याच्या पोटावर पाय दिला म्हणून तो चिडला !!”
“पोटावर कसला !! माजलाय भडकाव !! जिथं खातो तिथंच थुकतो रांडचा !!” आप्पा रागात म्हणाले.
आप्पा बोलताना सखा फक्त पाहत राहिला. जरा वेळ थांबून आप्पा म्हणाले.
” ताबडतोब तुला साहेबांनी वाड्यावर घेऊन यायला सांगितलय !! चल पटकन !!”
“आत्ता ?? “
“हो आत्ता !!

सखा पटकन उठला, घरात गेला. शांताला बाहेर आप्पा आल्याचं त्याने सांगितलं. कपडे घालत घालत बाहेर आला.शांता त्याच्या मागे मागे आली. आप्पांकड पाहून हात जोडून म्हणाली.

“साहेब गरिबाच्या घरचा चहा तरी घेऊन जा !!”
“नको बाई ! पुढच्या वेळी येईल तेव्हा नक्की घेईन चहा !!” आप्पा तिला नमस्कार करून पुढे निघाले.

दोघेही साहेबाच्या घरी जायला निघाले. सख्याला काय करावं?? काय होतंय ?? काहीच कळत नव्हतं !! सगळं काही घडत होत. अगदी अनपेक्षित. दोघही फक्त चालत होते. आप्पा हातात दुकानाच्या हिशोबाची वही घेऊन जोरात चालत होते. त्याच्या मनात काहीतरी सुरू होत म्हणूनच की काय ते सख्याला एकही शब्द बोलत नव्हते.

साहेबांच घर समोर येताच आप्पा म्हणाले.

“चल !! आल साहेबांच घर !! ” त्या कोपऱ्यात चरवितल पाणी घेऊन पाय धू आणि मगच आत ये !!”

साहेबांच घर पाहून सखा थोड्या वेळ शांतच बसला. स्वप्नातलं घर म्हणावं ते यालाच की काय असं त्याला वाटू लागलं. जागोजागी लावलेले कारंजे, शोभेची झाड आणि त्या झाडातून येणारा रातराणीचा सुगंध त्याला मोहून टाकू लागला. तो क्षणभर एकाच जागी अडखळला.

“ये सखा !! ये आत !!” साहेब समोर येत म्हणाले.
आप्पा आणि सखा लगबगीनं साहेबांन जवळ गेले.
“काय झालं सखा ?? का आला नाहीस इतक्या दिवस !! त्या शिरपामूळ ?? अरे एकदा येऊन मला बोलायचं होतस ! त्याला तुझ्या समोर हाणला असता !!”साहेब सख्याला खाली बसायला खुणावत म्हणाले.
“नाही साहेब !! पण या वयात कुठ मला भांडण झेपणार होत का !! म्हणून मग !!” सखा खाली जमिनीवर बसत म्हणाला.
” बरं असुदे !! आता त्याचं डोक्यात काही घेऊ नकोस !! उद्यापासून पुन्हा कामाला ये !!”
“जी साहेब !!” सखा आनंदाने म्हणाला.

साहेब आणि आप्पा एकमेकांकडे पाहत काहीतरी खुणावू लागले. सखा शांत बसून राहिला. क्षणभर साहेब शांत राहिले. आप्पांनी त्यांना हिशोबाची वही हातात दिली. हिशोबाच्या वही बघत बघत साहेब बोलू लागले.

“सखा तुला माहितेय तुला मी कामावर का घेतल ते ??”
सखा फक्त साहेबांकड पाहत राहिला. साहेब लगेच म्हणाले.
“तुझ्या इमानदारीमूळ ! अरे , पोटात एवढा भुकेचा आक्रोश होत असतानाही तू मला डबा द्यायला धावत आलास !! त्यासाठी !! ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होत !! “
“तुमची कृपा अशीच राहुद्य साहेब !!” सखा हात जोडून म्हणाला.
“कृपा नाही सखा !! तुझं कष्ट तुला बोलत!!” साहेब आप्पाकड पाहात म्हणाले.
साहेब वही बंद करून आप्पणाकड देत जागेवरून उठले. सखाही जागेवरून उठू लागला त्याला पाहून साहेब म्हणाले.

“बस बस !! खरंतर सखा मी तुला आज दुसऱ्याच कारणासाठी बोलावलय !!”
“कोणतं साहेब ??” सखा कुतूहलाने विचारू लागला.
“शर्यतीच !! “
“शर्यत?? ” सखा प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.
“हो शर्यत !! मानाची शर्यत !! महादेवाच्या जत्रेतली !! इतकी वर्ष तो शिरपा आमच्या बाजून पळायचा !! पण दर वर्षी हरायचा !! परवा त्याला कळलं की साहेबांना त्याच्या पेक्षाही भारी माणूस भेटला म्हणून त्यानं तुला मारलं !! आप्पांनी चौकशी केली तेव्हा सगळं उघडीस पडलं !!” साहेब आपांकड पाहत म्हणाले.
आप्पा मध्येच म्हणाले.
“भाडकाव वर्षभर साहेबांच खाऊन त्यांनाच दगा द्यायचा !! दरवर्षी पलिकडच्या कुरलेवाडीच्या पाटलाकडून पैसे घेऊन मुद्दाम हरायचा !! खाल्या मिठाला जागला नाही रांडचा!!”
“म्हणूनच सखा तुला यावर्षी आमच्याकडुन शर्यतीत पळाव लागलं. त्याबदल्यात तुला वर्षभर मी जेवण , कपडे आणि राहायला एक घर आणि महिना हजार रुपये पगार देईल !!” साहेब सखाच्या जवळ जात म्हणाले.
“हजार रुपये ?? “
“हो हजार रुपये !! पण लक्षात ठेव शर्यत जिंकायलाच पाहिजे !! मानाची शर्यत आहे ती !! जो व्यापारी जिंकेल त्याला राजदरबारी वेगळाच मान असतो, आणि सगळ्या राज्याचा महुसुल गोळा करायची काम पण मिळतात त्या व्यापाराला !! वेगळाच मान असतो !!!” साहेबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.

सखा शांत झाला. त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याला आज कळलं होत डबा रोज धावत पळत जाऊन देण्याचं महत्त्व. ती त्याची परीक्षा होती. ती त्याच्या साहेबाची प्रतिष्ठा होती.

सखा सगळं ऐकून बाहेर आला. तो काहीच बोलतं नव्हता. आप्पा आपल्या घरी निघून गेले. सखा हळू हळू पाऊल टाकत घराकड निघाला.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *