भाग ३

सखा धावत धावत पुन्हा सुतारवाडीला आला. दुकानात आतमध्ये जाणार तेवढ्यात त्याला जोरजोरात कोणीतरी बोलण्याचा आवाज आला. आप्पांना कोणीतरी भांडत होत हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तो दरवाजातून आत डोकावून पाहू लागला. तेवढ्यात कोणीतरी रागात बाहेर येताना त्याला दिसलं. मागे आप्पाही येत होते.आप्पा दरवाजासमोर येत म्हणाले.

“शिरपा एवढा माज चांगला नाही !!”
“तर तर !! एका मिनीटात मला कामावरून काढलं !! आन आता माज माझाच दिसायला होय !!” शिरपा जोरात म्हणाला.

एव्हाना सख्याच्या लक्षात आल होत काय प्रकार आहे तो. तेवढ्यात आप्पांच लक्ष सखाकडे जात. त्याला बघून ते म्हणाले.
“आलास का डबा देऊन ??”
“होय !!” सखा हळू आवाजात म्हणाला.
“जा !! आत दुसऱ्या कामात मदत करू लाग !! ” आप्पा दरवाज्याकडे हात करत म्हणाले.
तेवढ्यात शिरपा मोठ्याने म्हणाला.
“हे म्हातारं आहे काय साहेबांना डबा द्यायला जाणार !!”
“शिरपा !! तोंड सांभाळून बोल !! आन तुला कामावरून काढल कोण म्हणतंय !! फक्तं हे काम नाही !! दुसरं करायचं !!”
“पण गेली कित्येक वर्ष मीच हे काम करत आलोय !! त्याच काही नाही का ??”
“आहे बाबा !! म्हणून तर साहेबांनी तुला काढून नाही टाकलं !! सावंतवाडीच्या दुकानावर काम दिलंय !!”
“तर तर !! उपकारच केलेत माझ्यावर !!” एवढं बोलून शिरपा तरातरा चालत निघून गेला.

आप्पा आणि सखा एकमेकांकडे पाहत राहिले. क्षणभर काहीच बोलले नाही. दरवाजातून आत जात आप्पा म्हणाले.
“या शिरपाच काही मनावर घेऊ नको सखा !!जरा गरम डोक्याचा आहे !! साहेबांनी सांगितलं की गप्प बसेल !!”
“पण एवढं रागवायच काय त्यात !! तस असलं तर देऊ द्या त्याला डबा, माझं काय मी म्हणलं ते दुसरं काम करतो !!”
“नाही सखा !! साहेबांनी सांगितलं म्हणजे सांगितलं !! यात बदल व्हायचा नाही आता !!”
सखा काहीच बोलला नाही. दिवसभर कामात राहिला. पण त्याला शिरपाच रागावणं अजूनही मनाला खटकत होत.

दिवसभर काम करून सखा थकून गेला. सुर्य मावळतीला आला आणि अखेर घराकड निघाला. आप्पांनी जाताना हातात थोडी मिठाई दिली होती. ती पिशवीत ठेवून तो भराभर चालू लागला. पण अचानक मागून कोणीतरी डोक्यात काहीतरी मारलं हे सखला कळायचा आत त्याच्या डोळ्याला अंधारी आली. पुसट अस कोणीतरी ओळखीचं आहे हे त्याला कळाल. थोड शुद्धीत येताच समोर शिरपा आहे हे त्याला कळलं.

“भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!”
सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो.
“साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!”
सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो.
“पर !! मला तुमचं काही माहीत नव्हतं शिरपा ! “
“आता कळल ना !! निघायचं आता !! पुन्हा जर दुकानात दिसला तर जिता नाही ठेवायचो तुला !!”
“पण साहेब ?? आप्पा !!”
“त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो !! पण तू पुन्हा तिथं नाही दिसला पाहिजे !!”

सखा काहीच बोलत नाही.डोक्यातून ओघळणाऱ्या रक्ताला हातातल्या कापडान झाकत तो घरी निघाला. पायात ताकद राहिली नव्हती. कसाबसा तो घरी पोहचला. समोर शांता त्याची वाट पाहतच बसलेली होती. त्याला अशा अवस्थेत पाहून ती धावतच त्याच्याकडे आली.
“काय झालं !! हे रक्त ?? काय झालं काय !! आहो सांगा की !!” शांता अगदीक होत म्हणाली.
“सांगतो सांगतो !! “
सख्याने तिला घडलेलं सगळं सांगितलं. पुढं काय करावं हेही विचारलं.

“पण त्याला काय एवढं झालंय !! हे नाहीतर ते काम दिलंच ना साहेबांनी ??”
“दिल पण त्याला हेच काम पाहिजे !! काय एवढं आहे यात मलाच कळणा झालंय !!” सखा माठातील पाणी घेत म्हणाला.
“मग तुम्ही काय ठरवलंय आता ??” शांता हळद घेऊन येत म्हणाली.
सखा जमिनीवर बसला. जखम हलकेच शांताकडे करत म्हणाला.
“मलातर काही सुचत नाहीये बघ !! एक मन म्हणतंय जावं !! तर दुसरं म्हणतंय कशाला त्या भानगडी !!”
“एवढ्या कष्टानं मिळालेलं काम असच सोडून देणार तुम्ही ??” जखमेवर हळद लावत शांता म्हणाली.
क्षणभर सखा शांत राहिला झालेली जखम खूप वेदना देत होती. पण स्वतःला सावरत तो म्हणाला.
“उद्या बघू काय करायचं ते !! ” सखा शांता जवळुन उठत म्हणाला.

झालेल्या जखमेत सखा रात्र भर व्हिव्हळत राहिला. त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता.

“कशासाठी एवढा अट्टाहास आहे शिरपाचा काहीच कळत नाहीये ! साहेब पैसे तर त्याला तेवढंच देणार आहेत मग ह्याच कामात काय आहे एवढं !! धाव धाव धावून माझे या वयात पाय फाटले सगळे. मलातरी हौस आहे का याची , पण करावं लागत पोटासाठी. पण शिरपाची ही तळमळ पोटासाठी नाही हे कळायला मी मूर्ख नाही !! काय आहे त्या साहेबांना डबा देण्यात एवढं ?? “

सखा रात्रभर विचारात राहिला. डोक्यावरच्या जखमने व्हिव्हळत होता.

क्रमशः

SHARE