शर्यत || कथा भाग २ || Marathi Stories ||

भाग २

आप्पा लगबगीने साहेबांच्या घरी पोहचले. आज नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला होता त्यांना. साहेबांचं घर म्हणजे जणू एक महालच होता. आप्पा मुख्य दरवाज्यातून आत गेले. समोर साहेब नुकतेच जेवण करून हात धुवायला गेले होते. आप्पांना समोर पाहून ते हातातील ताब्या बाजूला ठेवत म्हणाले.

“काय आप्पा !! कधी नाही ते आज उशीर झाला यायला!!”
आप्पा क्षणभर काहीच बोलले नाही. हातातील हिशोबच वही समोर करत म्हणाले.
“आज थोडा वेळच झाला दुकान बंद करायला !! “
“बरं बरं !!” साहेब आप्पांच्या हातातील हिशोबाची वही घेत म्हणाले.

दोघांमध्ये कित्येक वेळ दुकानाच्या हिशोबा विषयी चर्चा झाली आणि मध्येच साहेबांनी आप्पांना विचारलं.

“आप्पा !! दुपारी डबा कोणाच्या हातून पाठवला होता ??”
“तुम्हाला डबा मिळाला ??”
“हो तर !! अगदी वेळेत दिला आणून !!”
“नवीनच होता माणूस !! सखा नाव आहे त्याच !!”
“सखा !! बरं बरं !! पुन्हा बोलावून घ्या त्याला !!”
” हो जी !! उद्या येतो म्हणाला !! अजून पाच रुपये द्यायचे राहिलेत त्याचे !!”
“द्यायचे राहिलेत ?? का बरं ??”
” साहेब दहा मिनीटात तो तुम्हाला डबा द्यायला पोहचला !! आणि तेवढ्याच वेळात पुन्हा आला !! मला विश्वासाचं बसत नव्हता !! मला वाटलं त्यानं डबा मध्येच खाऊन टाकला !! म्हणून त्याला पाच रुपये कमी दिले !!”
“नाही आप्पा !! माणूस कामाचा आहे !! गावची जत्रा जवळ आली माहितेय ना ??”
“जी साहेब !! पण आपण तर दरवेळी शिरपाला !!”
“हो माहितेय !! पण यावेळी माणूस बदलायचा !! यावर्षी काहीही झालं तरी शर्यत जिंकायची ! “
“हो !! ” आप्पा साहेबांकडे पहात म्हणाले.
“त्याला आता फक्त कामावर ठेवून घ्या !! बाकी सगळं मी सांगेन त्याला भेटल्यावर !!”
“जी साहेब !!”

आप्पा एवढं बोलून आपल्या घरी निघून गेले. त्याच्या डोक्यात तेच होत. दोन दिवस पोटात अन्नाचा एक कणही नसताना हा सखा एवढा धावला कसा ? कोणती ताकद होती ती, की जी त्याला हे सगळं करायला भाग पाडत होती. खरंच माझं चुकलंच ते , त्याच्यावर असा अविश्वास दाखवायला नव्हता पाहिजे मी !! माझं खरंच चुकलं !! उद्या तो येईल तेव्हा त्याची पहिलं माफी मागेन मी !! हातात एवढा जेवणाचा डबा असतानाही, ते अन्न घेऊन तो इमानाने धावला, फक्त मला दिलेल्या शब्दासाठी !! आणि मी क्षणात त्याच्यावर अविश्वास ठेवून त्याला घालवून दिलं. पण माझं दुसरं मन मला म्हणाल होत सखा तसा नाहीरे आप्पा ! पण काय करू या व्यवहारी जगात राहून मला त्याचं कधी ऐकूच आल नाही. “

आप्पा विचारांच्या तंद्रीत घरी येऊन कधी झोपी गेले त्यांनाही कळलं नाही. सकाळच्या त्या सूर्यकिरणांनी डोळ्यांना त्रास दिला तेव्हा त्यांना जाग आली. लगबग सुरु झाली. सर्व आवरून पुन्हा दुकानात ते निघाले. कालच्या त्या विचारात त्यांना आपल्यातला दुसरा चेहरा दिसला याच नवल वाटत होत. दुकानात काम करता करता वेळ धावु लागला. दुपारची वेळ झाली. त्याची नजर सखा कधी येतोय त्याकडेच लागली होती.

“राम राम आप्पा !!”
आप्पा नजर वर करून पाहू लागले. समोर सखा उभा होता.
“सख्या !! बरं झालं तू आलास !! अरे कालच्या तुझ्या कामान साहेब खूप खुश झालेत बघ !!”
“म्हणजे !! बसला ना तुमचा विश्वास की मी डबा देऊन आलो होतो ते !!”
“हो रे !! बसला विश्वास !!”
“मग द्या माझे उरलेले पाच रुपये !!”
” अरे !! पाच रुपयाचं काय घेऊन बसलास !! मी तुला कामावरच ठेवून घेतो की !! “
” मला ??” सखा अगदी आनंदात म्हणाला.
“हो तुला !! महिना पाचशे रुपये पगार पण देतो !! “
“काय मस्करी करता काय गरीबाची !!” सखा आप्पाला हसत म्हणाला.
“मस्करी नाही आणि काही नाही !! बोल आहे मंजूर ??”
“पण काम ??”
“काही नाही काल जे केलस तेच रोज करायचं !! थोडफार दुसरही काम पडलं तर करायचं !!!”
“रोज साहेबांना डबा द्यायचा ??”
“हो!”
“ठीक आहे आप्पा !! मला चाललं !! “
“मग घे हा डबा आणि लाग कामाला !!”

सखा आनंदाने धावत सुटला, त्याच्या मनात कित्येक विचारांचं काहूर माजल होत.
“कधी एकदा इथून घरी जातोय अस झालंय मला !! लवकरात लवकर डबा पोहोचवतो आणि घरी जातो !! शांताला ही बातमी ऐकून भारी आनंद होईल !! तिच्या डोळ्यात मला तो आनंद पाहायचा आहे. धाव सखा !! अजून जोरात धाव !! पाचशे रुपये देणार आहेत तुला ते !! कामात ढिलाई करून कसं चाललं !! अरे पाच रुपयांसाठी केली नाही !! हे तर पाचशे आहेत !! धाव ! अरे पण भूक ??” सखा कित्येक मनातील प्रश्नात गुंतला त्याच्या धावण्याचा वेग अजून वाढला.
“या पैश्याच्या समोर कसली भूक !! “

सखा धावत धावत दुकाना समोर आला. समोर कालचाच तो नोकर उभा होता. त्याला पाहून सखा हसला आणि म्हणाला.
“डबा पाठवलाय आप्पांनी !!”
“तू सखा ना ??”
“होय सखा !!”
“जा मग आत !! साहेब तुझी वाट पाहत बसलेत !!
“साहेब अन् माझी वाट ??? का बरं ?? माझं काय चुकलं का ??”
“ते मला काही माहीत नाही !! पण त्यांनी मला सांगितलं तू आलास की आत पाठवून दे म्हणून !!”
“बरं बरं !!

सखा डबा घेऊन दुकानाच्या आत गेला. समोर साहेब बसलेले पाहून त्यांना नमस्कार करत म्हणाला,
“मी सखा !!”
“बरं बरं !! मी नारायण मामा !! या दुकानाचा मालक !!”
“साहेब !! ” सखा थोड झुकत म्हणाला.
“असू दे !! असू दे !! मला काल आप्पांनी सांगितलं की तू सुतारावाडीवरून इकडं सावंतवाडीला फक्त दहा मिनीटात आला म्हणून !”
“होय साहेब !!”
“आणि आप्पांनी एवढं सांगितल्यावर मला वाटलं कोणी तरणा बांड मुलगा असेल म्हणून !! पण तू तर केस पिकलेला म्हातार निघालास !! “
“काय करू साहेब !! पोटात भुकेन कावळे ओरडत होते!! हाताला काहीच काम नव्हतं !! म्हणून आप्पांना म्हटलं करतो हे काम !!”
“व्हा !! छान !! पण मग एकटाच आहेस की ??”
“बायको आहे माझ्यासोबत !! तीन पोर पण आहेत पण त्यांना आता आम्ही जड झालो म्हणून सगळे गेली निघून शहराकड !!”
“अरेरे !! म्हातारपणी आधार गेला !! पण अंगातली ताकद तुला साथ देते आहे हेच नशीब !!”
“होय साहेब !!”
“बाकी आप्पांनी तुला सांगितलं असेलच सगळं !! रोज या वेळेत डबा द्यायला यायचं !! ठीक आहे ??”
सखा फक्त मान हलवून हो म्हणाला.
“बाकी काही लागलं तर सांग नक्की !! ये आता !!” साहेब दिलेला डबा उघडत म्हणाले.

सखा साहेबांना हात जोडून नमस्कार करत तेथून निघाला. पुन्हा धावत ! अगदी जोरात धावत निघाला !!

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *