भाग १

” जमिनीवर पडलेल्या प्रत्येक अन्नाचा कण मला डोंगरा एवढा मोठा का वाटतो ?? आणि त्याला उचलण्यासाठी माझी ती एवढी धडपड का असेल ?? पण सगळं वायाच गेलं !! मी इकड जमिनीवर पडलेल्या भाकऱ्या गोळा करत बसलो आणि तिकडं त्या माझ्यासारख्याच भुकेजल्या कुत्र्यांनी ते ओढून नेलं !! जाऊदे त्यांच्याच नशिबात असलं ते, म्हणून त्यांना मिळालं !! शेवटी नशिबाच्या पुढं कोणाचं चालतंय का ?? ” सखा आपल्याच विचारांच्या तंद्रीत रस्त्यावरून चालत चालला होता.
“शांतेला काम मिळालं असलं !! ती आणलं काहीतरी खायला संध्याकाळी !! आता तो पर्यंत पोटाची भूक अशीच मारावी लागणार मला !! ” सखा पोटाला हाताने दाबत विचारातून बाहेर येतो.
समोर एक इसम जोरजोरात ओरडत होता. आपल्या हाताखालच्या लोकांना काम लवकर करा म्हणून ताकीद देत होता. सखा एकटक त्याच्याकडे पाहत राहिला. तो इसम स्वतःला पुटपुटत राहिला.

“कामाच्या वेळी कसली रे नाटकं ही !!! साहेबांना जर वेळेत डबा नाही पोहचला तर आपलं काही खर नाही !! “
अचानक तो शेजारचा डबा उचलत म्हणाला.
“पंधरा मिनिटात हा डबा साहेबांना कसा पोहोचवायचा कळत नाहीये !! ” समोरच्या एका कामगाराकडे पाहत म्हणाला.
” काय रे ! आपला शिरपा आज नाही वाटत आला ??”
“जी नाहिजी !! ” एवढं बोलून तो कामगार आपल्या कामाला निघून गेला.

सखा हे सगळं लांबून पाहत होता. त्याने क्षणभर मनात विचार केला आणि लगेच त्याला म्हणाला.
“साहेब !! तुमची काही हरकत नसेल तर मी देऊन येऊ का डबा ??”
तो इसम सखाकडे क्षणभर पाहत राहिला आणि उत्तरला.
“अरे कोण तू ?? आणि तू का देणार डबा ??”
“नाही !! मलापण कामाची गरज आहे!! दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही !! एवढं तुमचं काम करून देतो त्याबदल्यात काय पैसे द्यायचे ते द्या !!” सखा अगदिक होऊन म्हणाला.
“तूच दोन दिवसाचा उपाशी !! तुझ्यावर काय विश्वास ठेवू !! गेलास डबा घेऊन पळून तर साहेब मलाच रागावतील !!” तो इसम आपल्या दुकानात आत जात म्हणाला.
“नाही साहेब !! या सखाला बेइमानी माहीत नाही !!”
तो इसम शांत राहिला. त्याने दोन मिनिटे सखाकडे न्याहाळून पाहील. डोक्यावर मळकी टोपी, डाव्या बाजूला फाटलेला सदरा आणि पांढरी शुभ्र झालेली त्याची तोंडावरची दाढी.
“ठीक आहे !! ठेवतो मी तुझ्यावर विश्वास ! माझा नाईलाज आहे !!! पण लक्षात ठेव !! इथून सावंतवाडीला जायचंय !! साहेबांना वेळेचं भान फार आहे !! आता निघालास तर वीस पंचवीस मिनिटे लागतील!! पण साहेबांना दहा मिनीटात डबा पोहचला पाहिजे !! जमलं का तुला?? “
“त्या टेकडीच्या पल्याडचीच ना सावंतवाडी ?? “
” हो तीच !! “
“ठीक आहे द्या तो डबा !! “

तो इसम सखाकडे डबा देत म्हणाला.
” आणि हो, ऐक !! नारायण मामा म्हणून मोठ दुकान आहे. तिथं दे डबा!! आणि म्हण आप्पा मुनिमांनी डब्बा पाठवलाय म्हणून !! तुला बघितल्यावर ओळखायचे नाहीत ते !! “
“बरं ठीक आहे !! “

सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते, हातात तो डबा होता, आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी दिसत होती. क्षणही सुसाट धावत होते. आणि सखाही !!

धावत धावत सखा त्या दुकानाजवळ येऊन पोहचला. समोरच एक दुकानातील नोकर उभा होता. त्याच्याकडे पाहत सखा म्हणाला.
“आप्पा मुनिमांनी डब्बा पाठवलाय साहेबांसाठी !!”
समोरचा नोकर क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला.
“तू कोण ?? “
“मी सखा !! त्यांनीच मला पाठवलंय !! मला म्हणले दहा मिनीटात साहेबांना डबा पोहचला पाहिजे !! म्हणून धावत आलोय !! ” सखा क्षणात म्हणाला. धापा टाकत टाकत म्हणाला.
“तू सुतारवाडीवरून इथ दहा मिनीटात आलाय ??” तो नोकर आश्चर्य करत म्हणाला.
सखा मान हलवत हो म्हणाला.
“ठीक आहे जा !! मी सांगतो साहेबांना !!”

सखा तेथून परत यायला निघाला. पुन्हा धावत पळत तो सुतारवाडीला आला. समोर सख्याला पाहून आप्पा आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले.
“आलास काय जाऊन ?? का मधल्या वाटेतून परत आलास ??”
“नाही साहेब डबा देऊन आलोय !!”
आप्पाला काही केल्या विश्वास बसेना. त्यांनी पुन्हा पुन्हा विचारलं. डबा सुद्धा त्यांना कुठं दिसला नाही.
“हे बघ सखा !! अरे त्या सावंतवाडीला आमच्या पोराला रोज जायला वीस पंचवीस आणि यायला तेवढेच मिनिट लागतात आणि तू म्हणतोयस की मी वीस पंचवीस मिनिटात जाऊन आलो म्हणून !! “
“आप्पा खरंच जाऊन आलोय !! डबा देऊन आलोय ! मला माझे पैसे द्या !! “
“हे बघ सखा !! तू साहेबांना डबा दिलास की मधल्या मध्येच त्याच काय केलंस याचा मला विश्वास बसत नाहीये !! पण तुझी गरज बघून मी तुला पाच रुपये आत्ता देतोय !! उद्या पुन्हा याच वेळी ये ! मग अजून पाच रुपये देतो !!”
सखा हतबल झाला. त्याने ठीक आहे म्हणून मान हलवली.

“आणि अजून एक !! हे थोड खायचं घेऊन जा !! माझ्याकडून देतोय !! गरजू वाटतोयस म्हणून देतोय !!”
हातावर थोडी भाजी आणि थोड्या पुऱ्या आप्पांनी ठेवल्या. सखा त्या न खाताच आपल्या पिशवीत ठेवून बाहेर आला. धावत धावत त्यानं घर गाठलं. घर कसलं खुराडच ते , समोर शांता बसलेली पाहून त्याला आनंद झाला. आज दिवसभर काय झालं त्यानं सगळं तिला सांगितलं.

“आन ! दहा मिनीटात तुम्ही सावंतवाडील गेलात ??” शांता आश्चर्य वाटत म्हणाली.
“होय तर !! ” सखा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
“काहीही नका बोलू उगाच !! ” शांता चेष्टा करत म्हणाली.
“बरं जाऊदे !! चल त्या दुकानाच्या मुनिमानी पुरी भाजी दिली ती तरी खाऊ !!
“पुरी भाजी ??” शांता आनंदात म्हणाली.
“हो !!”

दोघेही आनंदाने ती पुरी भाजी खात एकमेकांना गप्पा मारत बसले. खाऊन झाल्यावर थकलेला सखा पाठ जमिनीवर टाकताच शांत झोपी गेला. पण आप्पांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजून गेला.

“खरंच तो सखा साहेबांना डबा देऊन आला असेल का ?? आज रात्री साहेब गावाकड येतील तेव्हा कळेलच म्हणा !! तरीही मला विश्वास बसत नाहीये !! ” आप्पा कित्येक वेळ विचार करत राहिले. रात्री दुकान बंद करायलाही त्यांना कळले नाही. अखेर घाईगडबडीत दुकान बंद करून सगळा आजचा जमाखर्च घेऊन ते साहेबांच्या घरी निघाले.

क्रमशः

✍️योगेश खजानदार

SHARE