कित्येक शब्दांची जुळवाजुळव करत तो तिला मनापासून मनवायचा प्रयत्न करत होता. पण ती काही केल्या राग सोडायला तयार नव्हती.काय करावं असं म्हणतं तो कित्येक वेळ माझ्या सोबत बसला होता. खूप वेळ बोलण झाल्या नंतर मी त्याला रोज एक संध्याकाळी तिला मेसेज करायला सांगीतला. त्यामध्ये बाकी काही नाही फक्त त्याला आपल्या गोष्टी पुन्हा पहिल्या सारख्या व्हायला हव्या एवढंच लिहायला सांगितलं होत आणि शेवटी एक वाईट शब्द लिही अस निक्षून सांगितलं. तसे त्याने महिनाभर केले त्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट तिने त्याला सगळीकडे ब्लॉक केले फोन रिसिव्ह करणे सोडून दिले.
महिना झाल्या नंतर मी दोघांनाही त्यांच्या नकळत मला भेटायला सांगितल. वेळ एकच पण दोघेही अचानक समोर येतील या गोष्टी पासून अनभिज्ञ. अचानक समोर एकमेकांना पाहून दोघेही गोंधळून गेले. तिला एवढं समजावून सांगूनही ती समजू शकली नाही या गोष्टीमुळे तोही थोडा चिडलेला. कारण व्यक्तीला समजून सांगूनही जर समजत नसेन तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग यायला लागतो. तिने त्याच्याकडे बघून न पाहिल्या सारखे केले. थोडा वेळ जाऊ दिला आणि विषयाला हात घातला. तो म्हणाला आता मला तिला समजावून नाही सांगायचं . आणि ती म्हणाली मला आता त्याला बोलायचं नाहीये. दोघांचेही मत ऐकून घेतल्यावर मला त्यांना विचारावं वाटलं. गेला महिना याने तुला कित्येक मेसेजेस केले तरीही तुझा राग का गेला नाही?? तर तिचं एकच म्हणणे होते की त्याच्या प्रत्येक मेसेजेस मध्ये तो एकतरी शब्द वाईट बोलत होता. मी म्हटलं तुला याबद्दल विचारावं अस वाटल नाही ?? तर तिचा इगो दुखावला जाईल म्हणून ती काहीच बोलत नाही. म्हणजे नात कायमच तुटलं तरी चालेल पण इगो दुखावला नाही पाहिजे. पुन्हा मी त्याला विचारलं की मित्रा तू असा का करत होतास?? तर त्याच उत्तर अगदी अपेक्षित होत की तू म्हणालास म्हणून. दोघांच्या ही बाजू कित्येक वेळ ऐकून घेतल्या नंतर मी माझे मत मांडले.
खरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी म्हणालो म्हणून त्याने तिला रोज एक वाईट शब्द बोलत गेला. तिने त्याच्या मेसेजेस मध्ये फक्त तेच वाईट शब्द पाहिले पण त्याची तिच्या बद्दलची काळजी कधी पहिलीच नाही. दोघेही चुकत न्हवते पण नाते कुठे विसरले जाते आहे हे त्यांना कळलं नाही. कित्येक चर्चा अशाच घडत जातात. आपण नेहमी आपल्या नात्यामध्ये वाईट गोष्ट धरून ठेवतो जी पूर्ण नातं उध्वस्त करून जाते. नात हे खरतर दोघांच्या समजुतीने टिकते, ना की कोणाच्या सांगण्यावरून. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कोण दुसऱ्याने सांगितले म्हणून वाईट म्हणणे खरंच चूक असते. खरतर यात त्याच काहीच चुकत नसते नात्यातील कित्येक गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हातून नकळत घडून जातात. कोणीतरी म्हटलं म्हणून, किंवा कोणाकडे पाहून नात कधीच सुधारू शकत नाही.त्याला लागतात एकमेकांमध्ये विश्वासाचे धागे जे कोणीही कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी तुटू नयेत असे . अखेर दोघांनाही कळून चुकलं की नात्यात छोट्या छोट्या वाईट गोष्टी पहायच्या नसतात अशाने नात टिकवायचं अवघड होऊन बसतं. त्या छोट्या मेसेजेस ने त्यांना खूप काही शिकवलं. कोणीतरी सांगितल म्हणून आपल्या व्यक्तीला नाव ठेवायचं नसत हे त्यालाही कळून आले. बाकी नाती काय मनातून सुरू होतात आणि अखंड ओठातून बोलू लागतात . अगदी अखेर पर्यंत, हो ना???
✍योगेश खजानदार
टीप: एक छोटा अनुभव share केला आहे.