भाग १
“माझ्यासारख्या सुखी माणसाच्या आयुष्यात काय हवं होतं, पुरेसा पैसा , सोबतीला चार मित्र आणि आपल्यावर प्रेम करणारे आपली माणसं..!! होना !! मग सार मिळुनही एका क्षणात उधळून का जावं ??..काहीच कळतं नाही!! ही कथा माझी आहे !! माझ्या आयुष्याची व्यथा सांगणारी आहे !! हो विश्वासाला तडा जाणारी आहे !! सांगू की नको या निर्णयावर मी होतो !! पण अखेर सांगतोच आहे !! मी तरी कोणापुढे मनमोकळ बोलायचं ..!!”
या कथेची सुरुवात होते ती माझ्या लग्नानंतरच्या काही दिवसापासून,
“प्रिया ..!! आज आपण थोड बाहेर जायचं का?? ” मी म्हणजे सुहास तिला विचारत होता.
“कुठे जायचं आहे !!” प्रिया सुहासकडे पाहत म्हणाली.
“विसरलीस ??”
“काय ??”
“आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे !!!” सुहास तिच्या डोळयात पाहत म्हणाला.
“अरे !! हे बघ सुहास !! असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये !!”प्रिया रागात बोलली आणि निघून गेली.
“मला तुझं हे उत्तर माहीत होत प्रिया !! आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या मनाविरुध्द तूझं लग्न माझ्याशी केलं गेलं ते !! पण त्याची शिक्षा माझी काहीच चूक नसताना मला देते आहेस !! हे कधी तरी जाणून घे तू !!!” पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रियाकडे सुहास बघून बोलत होता. तिने सगळे ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केलं.
“मन..!! खरतर याच काही कळतचं नाही मला. त्याच्या सारखं वागल तरी ते वाहवत घेऊन जात आणि त्याच्या विरुध्द वागल तरी ते नाराज होतं.. मग वागावं तरी कसं?? आणि समजून तरी काय घ्यावं .. की आपल्या मनाला काही किंमतच नाही. प्रिया..!! कधी तिने मला जाणून घेतलच नाही. मग कशासाठी हे सगळं..!! ” सुहास शांत बसून कित्येक वेळ आपल्या मनातल्या विचारांशी भांडत होता. तसाच कित्येक वेळ बसून होता.
“प्रियाशिवाय तरी कोण आहे माझ्या आयुष्यात, ही करोडोंची संपत्ती , हा बंगला , या गाड्या मला एकट्या का वाटाव्या ..!! .. मी प्रियाला पहिल्या वेळी जेव्हा पाहिलं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि सार आयुष्य तिच्यासाठी जगायचं अस ठरवलंही होत ..!!पण झाल भलतचं काही..!! उरल्या फक्त काही आठवणी ज्या ना मला सुखावून जातात ना तिला..!!”
खिडकीच्या जवळ बसून सुहास स्वतः ला हरवून जात होता, पण तेवढ्यात दरवाजाचा आवाज झाला. सुहास धावत खोलीच्या बाहेर गेला. पाहतो तर प्रिया जमिनीवर कोसळली होती.
“प्रिया …!! काय झाल हे !! “सुहास तिला उठवू लागला.
“आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहेना ..!! तो साजरा करत होते ..!! ” प्रिया दारूच्या नशेत बोलत होती.
“हा असा !! प्रिया तू दारू पिऊन आली आहेस ??”
“हो..!! तुला आवडणार नाही माहितेय मला..!! पण तरी मी दारू पिऊन आले!! ” धडपड करत प्रिया उठून उभा राहिली. हसत हसत खोलीत निघून गेली.
“happy anniversary !!” सुहास स्वतःकडे बाजूच्या आरशात पाहतच म्हणाला. डोळ्यातून येणारा एक अश्रू हसतच जमिनीला मिळाला. कोणाला काहीही न सांगता.
माझ्या आणि प्रिया मध्ये कधी प्रेम झालचं नाही. मी केलं तिच्यावर पण तिने कधी केलंच नाही. आणि मनमोकळेपणाने कधी मला ती बोललीच नाही.काय सलते आहे मनात ते तरी सांगावं ना मला एकदा .. पण तेही नाही ..!! नात तोडायच नाही तर जपते तरी कशाला ती ?? समाजाच्या लाजे खातर की पुन्हा नव्याने नात्याची सुरुवात करावी लागेल म्हणून..!! तिच्या मनात काय चालले आहे काही कळत नाही.!!
पण रात्रीच्या त्या अंधारात माझ्यातील पुरुष जागा होतो. आणि मला म्हणतो की काय ऐकून घेतोस तीच तू !! तू पुरुष आहेस ना !! मग उठ जा खोलीत त्या, आणि ठणकावून सांग तिला !! या क्षणी या पलंगावर तुझ्यासोबत मी असायला हवा.. !! नव्हे नवरा म्हणून माझा तो अधिकार आहे !! उठ सुहास !! ” पण मन वाईट आहे ..!! कारण ते वाहवत घेऊन जात ..पण मनाविरुध्द वागून तरी काय मिळवलं मी..? काहीच नाही .. मग त्या मनाविरुद्ध वागून मला अखेर भोगावचं लागलं ना.!!. आज दारूच्या नशेत ती माझ्या समोर आली आणि मी तिला काहीच बोलू शकलो नाही. तुझ्यावर माझ कधीच प्रेम नव्हतं आणि नसणार आहे !! अस ती बोलताना मी गप्प राहण्या शिवाय काहीच केलं नाही…!! ना कधी मी तिचा नवरा आहे म्हणून बळजबरिणे तिच्या सोबत क्षण घालवले !! नाही ना !! मग तरीही तिला माझ प्रेम कळालं नाही..! खऱ्या प्रेमाची काहीच किंमत नाही ?? ” सुहास विचारांच्या तंद्रीत होता आणि तिकडे रात्रीच्या अंधारावर किरणांनी विजय मिळवला होता.
रात्रीच्या त्या प्रसंगात आपण खरंच चुकीचं वागलो असं बहुतेक प्रियालही वाटत होतं. ती पलंगावरून उठली आणि थेट सुहास बाहेरच्या खुर्चीत बसला होता त्याच्याकडे गेली.
“माझ जरा काल चुकलंच ..!! “पाठमोऱ्या सूहासकडे पाहून प्रिया म्हणाली.
सुहास खुर्चीवरून उठला तिच्याकडे बघत तो फक्त हसला आणि म्हणाला.
“ठीक आहे ..!! जाऊ दे !! होत असं !! बस मी तुला चहा देतो करून !!”
“नाही नको !! ” प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.
“घे थोडा चहा !! आणि मलाही घ्यायचाच आहे थोडा !! “
“बरं !!” प्रिया होकारार्थी मान डोलवत म्हणाली.
सुहास स्वयंपाक घरात जाऊ लागला. अचानक त्याची नजर खाली पडलेल्या एका कागदावर जाते. कुतूहलाने तो कागद सुहास उचलून घेतो आणि स्वयंपाकघरात जातो. प्रियाला आणि त्याला दोन कप चहा तो करू लागतो. चहा करण्याच्या नादात तो कागद तसाच बाजूला ठेवला जातो.
बाहेर दोन कप चहा घेऊन येत सुहास प्रियाच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहू लागला. तिच्या जवळ येत तिला चहाचा कप देत तो म्हणाला.
“तुला हवं असेल तर तू आई बाबांकडे जाऊ शकतेस तुझ्या !!”
सुहासच्या या बोलण्याकडे आश्चर्य चकित होऊन प्रिया पाहू लागली आणि म्हणाली.
“नाही ..!! त्याची काही गरज नाहीये ..!! ” एवढंच बोलून प्रिया चहाचा कप घेऊन खोलीत गेली.
खोलीत येताच आपल्या पर्स मध्ये ती पाहू लागली. कित्येक वेळ शोध घेऊनही तिला हवं ते मिळत नव्हतं. ती खोलीतून बाहेर आली. बाहेर पाहू लागली. आणि समोर आलेल्या सुहासला पाहून शांत झाली.
सुहास ती काहीतरी शोधते आहे हे पाहून विचारू लागला.
“काही शोधते आहेस का?? “
” काही नाही!! ” एवढंच म्हणून प्रिया पुन्हा खोलीत निघून गेली.
खोलीत येताच पुन्हा शोधू लागली.
“इथेच असायला हवी ती चिठ्ठी !! सापडत नाहीये !!” शोधून शोधून थकलेली प्रिया स्वत:ला म्हणू लागली. तिच्या चेहऱ्यावर चिंता वाढू लागली.