भाग ९
आकाश फोनमध्ये पाहताच लगेच कॉल रिसिव्ह करतो आणि बोलू लागतो,
“काय सूम्या !! कसल्या घाण टायमिंगला फोन केलाय तू !!”
“का रे ?? स्टडी करतोयस का ??”
“नाही रे !! जाऊदे तू बोल !! “
“परवाच्या पेपरचा अभ्यास झाला का ???”
“परवा पेपर आहे आपला??”
“हो !! टाइम टेबल बघितलं नाहीस का तू ??”
“अरे अभ्यासाच्या नादात राहून गेलं !!” आकाश सुमितला खोटं बोलतो.
“बरं !! अभ्यास कर नक्की !! तुझ्या जीवावर आहे मी!! तुझ्या मागेच नंबर आहे माझा!! “
“काळजी नको रे करू !! लिहू आपण पेपर !!”
“ओके !! कर मग अभ्यास !! आपण डायरेक्ट आता पेपरलाच भेटुयात !!”
“नक्की !!”
आकाश सायलीच्या स्वप्नातून खडबडून जागा होतो, मोबाईलमध्ये टाइम टेबल बघतो. परवा या विषयाचा पेपर आहे तर, अस म्हणत तो त्या विषयाचं पुस्तक शोधू लागतो, कित्येक वेळ पुस्तक शोधल्या नंतर तो अभ्यास करायला बसतो,
मनात त्याच्या विचार चालूच असतात,
“हे सगळे पेपर झाले की सायलीला प्रपोज करेन मी !! असही फक्त हो म्हणायचं राहील आहे तिच !! आज तर चक्क मला ती मिस यू म्हणाली !! पण अस करतो परवा पेपर झाले की तिला भेटुन येतो !! तिला जाताना एखाद चॉकलेट घेऊन जातो म्हणजे खुश होईल ती !! आक्या तो विचार नंतर करू आधी पेपरचा अभ्यास कर रे !!”
आकाश आता मोबाईल बाजूला ठेवून मनलावून अभ्यास करत बसतो , आई बाबा बेडरूम मध्ये त्याला अभ्यास करताना पाहून खुश होतात, आई त्याला सगळं जागेवर आणून देते, चहा , नाष्टा आणि नंतर जेवणही. बाबा टीव्हीचा आवाज एकदम बारीक करून पाहू लागतात जेणेकरून आकाशला त्याचा त्रास होऊ नये म्हणून, रात्रभर आकाश अभ्यास करत बसतो , दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा अभ्यासाला बसतो,
“काल सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास झालाय !! आता फक्त रिविजन झाली की झालं सगळं !! ” आकाश समोर ठेवलेलं पुस्तक हातात घेतो.
पुस्तक हातात घेताच मोबाईलची मेसेज टोन वाजते, आकाश मेसेज वाचतो, सायलीने त्याला मेसेज केला होता,
“गुड मॉर्निंग डियर !!”
आकाश पटकन तिला रिप्लाय करतो,
“वेरी गुड मॉर्निंग !!”
“आज दिवसभर काय प्लॅन आहे ??”
“फक्त अभ्यास एके अभ्यास !! उद्यापासून आमची बोर्डाची परीक्षा सुरू होतेय !!”
“हो का!! मग कर तू अभ्यास !! मी नाही डिस्टर्ब करत तुला !! “
“नाही बोल ना !! डिस्टर्ब काय त्यात असही माझा अभ्यास झालाय !! “
“हो विसरलेच मी !! हुशार माणसं तुम्ही !!” सायली हसण्याचा इमोटिकॉन पाठवत रिप्लाय देते.
आकाश सायली सोबत कित्येक वेळ बोलत बसला. त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण तो गमावू लागला. उद्या आपला पेपर आहे हेही तो विसरला.
“माझेही पेपर जवळ आलेत आकाश ! असे काही लांब नाहीत !! उद्या तुझा पेपर आहे आणि परवा माझा !! मलाही अभ्यास करावा लागेल !! “
“झाला नाही अजून अभ्यास ??”
“नाही ना !! काल करत होते , नंतर तुझ्याशी बोलत बसले आणि राहून गेला !! “
“सॉरी म्हणजे माझ्यामुळे तुझा अभ्यास राहिला का ??”
“ये नाही रे !! अस काही नाही !! पण आता तू कर अभ्यास आपण बोलुयात नंतर !!”
आकाश बोलणं झाल्यावर मोबाईल बाजूला ठेवून देतो घड्याळात पाहतो तर संध्याकाळचे पाच वाजले होते, पटकन तो पुस्तक हातात घेतो आणि रीविजन करायला लागतो,
“पाच वाजले !! आता पटापट एक रिविजण पूर्ण करतो म्हणजे उद्याच्या पेपरच टेन्शन नाही राहणार !!”
आकाश तास दोन तास रिविजण करत बसतो, पुन्हा प्रश्नपत्रिका संच सोडवायला घेतो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्याला काहीच सुचत नाही, थोड्या वेळापूर्वी वाचलेलं त्याचा लक्षात राहत नव्हतं, तो पुन्हा पुन्हा पुस्तकात पाहून ते आठवण्याचा प्रयत्न करत होता, शेवटी वैतागून तो मनातच स्वत: ला बोलतो,
“काय झालंय मला !! काहीच कळत नाहीये !! एवढी रिविजण करतोय पण माझ्या लक्षात का राहत नाही !! यापूर्वी मला अस कधीच झालं नाही !! दहावीच्या पेपर वेळी मी एकदा वाचलं तरी सगळं पुन्हा लिहायचो!! ” खुर्चीवर बसून आकाश कित्येक वेळ विचार करत बसला.
थोड्या वेळाने जेवण करून आला ,पुन्हा अभ्यासाला बसला, पुन्हा तेच, कितीही वेळा घोकल तरी ऐनवेळी त्याला काहीच सुचत नव्हतं, शेवटी वैतागून तो पलंगावर येऊन पडला, विचारांच्या तंद्रीत तसाच पडून राहिला, उद्याच्या पेपरची त्याला मनातून भीती वाटू लागली. शेवटी त्याने हस्तमैथुन केला. आणि तो जणू आता काही होणारच नाही या आविर्भावात पडून राहिला. झोपी गेला, जणू कोणत्याही गोष्टीला, टेन्शन असताना ,सुख असताना , दुःख असताना, आव्हान असताना त्यापासून त्याला एकच पर्याय दिसू लागला आणि तो म्हणजे हस्तमैथुन.
एवढं सगळं होऊन तो सकाळी लवकर उठला, सकाळी पाच वाजल्यापासून तो अभ्यास करू लागला. होता होईल तेवढं वाचू लागला. त्याच्या समोर घड्याळाचे काटे जणू धावू लागले, आणि बघता बघता पेपरची वेळ जवळ आली, आकाश आई बाबांचा आशिर्वाद घेऊन परीक्षेला निघाला, परीक्षा केंद्रावर येऊन पोहचला, समोर त्याचे वर्गमित्र सगळे त्याच हसून स्वागत करत होते, आकाश आपला नंबर शोधू लागला, समोर त्याला तेवढ्यात सुमित दिसला, आकाशला पाहताच त्याने त्याला बोलवलं,
“आकाश !! इथे आहे नंबर आपला !! तुझा माझ्या पुढे आहे !! बस !!”
“अभ्यास झालाय ना सुम्या??”
“पहिले चार तर झालेत बघ !! बाकी तुझ्या जीवावर आहे मी!”
आकाश आणि सुमित बोलत असतानाच पेपर सुरू झाल्याची घंटा वाजते, सगळे विद्यार्थी आपापल्या जागेवर बसतात. तेवढ्यात एक शिक्षिका वर्गात येते, सगळे उठून उभे राहतात, थोडा वेळ झाला की पुन्हा एक बेल वाजते, शिक्षिका सगळ्यांना उत्तरपत्रिका वाटत असतात आणि मध्येच बोलतात,
“कोणाकडे काही चिट्टी, पेपर, गाईड असल्या प्रकारच्या कॉपी जर असतील तर आत्ताच बाहेर फेकून द्या !! पुन्हा जर सापडलात तर मी काही बोलू देणार नाही !! सरळ पेपर मधून बाहेर काढेन आणि कारवाई होईल !! आहे का कोणाकडे काही ??” शेवटचं वाक्य त्या शिक्षिका दोन तीन वेळा म्हणतात.
सगळे मुलंही नाही हे एका सुरात बोलतात, थोड्या वेळाने सर्वांना प्रश्नपत्रिका दिल्या जातात. आकाश प्रश्नपत्रिका नीट वाचू लागतो, पेपरची सगळी माहिती लिहून झाल्यावर पेपर लिहायला सुरुवात करतो, कित्येक वेळ जे येत ते तो लिहू लागतो, एक दोन प्रश्न त्याला व्यवस्थित जातात पण पुढे त्याला काहीच सुचेनास होत, जे वाचलं होतं तेही त्याला आता सुचत नव्हतं, आपल्या मेंदूला ताण देऊन तो आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीच सुचत नव्हतं, एका क्षणी तो लिहिण्याच थांबतो आणि विचार करू लागतो,
“इतकी घोकंपट्टी करूनही मला काहीच का सुचत नाहीये ?? माझ्या स्मरण शक्तीला झालंय तरी काय !! मी असा कमकुवत का झालोय माझंच मला कळतं नाहीये !! आजचा पेपर जसा जातोय मला !! माझे पास व्हायचे सुद्धा वांदे होणार आहेत अस मला वाटतंय !! या सुम्याला विचारू का काही !!असही याला काय येत असणार !! हाच माझ्या जीवावर आलाय , याला काय विचारू आता !!” तेवढ्यात शेवटचे पंधरा मिनिटे राहिल्याची बेल वाजते, आकाश भानावर येतो, जे येतंय ते पटापट लिहू लागला.
आकाशच्या लिखाणाचा वेग प्रचंड वाढला. तो जे सुचेल ते लिहू लागला. शेवटच्या दहा मिनिटात त्याने जेवढे लिहिता येतील त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे लिहिली पण तरीही तो मागेच राहिला, पेपर सुटल्याची बेल वाजली , वर्ग शिक्षिका सर्वांचे पेपर गोळा करू लागल्या, तरीही आकाश लिहितच होता, अखेर त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका त्याच्या जवळून खेचून घेतली. आकाश फक्त पाहत राहिला. आणि अखेर तो भानावर आला, आजचा पेपर त्याच्या अपेक्षे प्रमाणे त्याला सोडवता आलाच नाही. मी अगदी सहज सगळे पेपर लिहू शकतो हा त्याचा गर्व क्षणात मोडला. त्याचे डोळे लख्ख उघडले.
वर्गातल्या मित्रांना काहीच न बोलता आकाश थेट घरी निघून आला, घरी येताच आई बाबा त्याची वाटच पाहत बसले होते, त्याला बाबांनी पाहताच म्हणाले,
“साधना !! आकाश आला बघ !!”
आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. आकाशला बघताच ती म्हणाली,
“कसा गेला पेपर आकाश ?? सगळे प्रश्न नीट सोडवलेस ना तू ??”
आकाश मात्र काहीच बोलत नव्हता, फक्त आई बाबांपासून आपली नजर चोरत होता.
“कसा म्हणजे काय साधना मस्तच गेला असणार पेपर त्याला !! हुशार आहे आकाश आपला !!” बाबा आकाशकडे पाहून हसत म्हणाले.
“बरं !! जा फ्रेश होऊन ये !! मी मस्त तुझ्यासाठी आज श्रीखंड पुरी केली आहे !!तुला आवडते ना म्हणून !!”
आई स्वयंपाक घरात जात म्हणाली.
आकाशने कॉलेजची बॅग जवळ ठेवली आणि तो फ्रेश व्हायला गेला. पण आल्यापासून तो गप्पच होता. आई बाबा मात्र त्याला पेपर चांगलाच गेला असणार म्हणून खुश होते , आईने थोड्या वेळाने त्याला श्रीखंड पुरी खायला दिली. तेवढ्यात त्याला बाबांनी विचारलं,
“कोणता प्रश्न अवघड तर नाहीना गेला ??”
“नाही !! ” आकाश तुटक बोलला आणि गप्प बसून श्रीखंड पुरी खाऊ लागला.
“मग ठीक आहे !! एकदा का चांगला रिझल्ट लागला की मग चांगल्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायला मोकळे, तुझ्या ऍडमिशनसाठी मी गेली दोन वर्ष पैसे जमा करतोय !!” बाबा श्रीखंड पुरी खात बोलत होते.
आकाश बाबा बोलल्यावर काहीच त्यावर बोलला नाही. तो गप्प राहिला. नंतर आपल्या बेडरूम मध्ये गेला. मोबाईलमध्ये सायलीचा त्याला एकही मेसेज नाही पाहून त्याला आश्चर्य वाटलं, त्यानेच तिला मेसेज केला,
“आत्ताच जस्ट पेपरवरून आलोय !! आजचा पेपर एकदम मस्त गेला !! “
खुप वेळ होऊनही सायलीचा त्याला रिप्लाय येत नाही , थोड्या वेळाने पुन्हा आकाश मेसेज करतो
“बिझी आहेस का ??”
पण तरीही सायली मेसेज पाहात नाही. आकाश मात्र इकडे बैचेन होतो.
दर दहा मिनिटाला तो तिला मेसेज करू लागतो. आणि शेवटी वैतागून म्हणतो,
“आजच्या या पेपरच्या टेन्शनमुळे तिला भेटायला जायचं राहील पण उद्या असही तिचा पेपर आहे तेव्हा भेट होईलच !! फक्त मला लवकर तिच्या कॉलेजवर जाव लागेल !! ठरलं तर मग !! उद्या जातोच भेटायला !! ” आकाश तिला भेटण्याचे ठरवतो.
पण न रहावुन तिला थोड्या थोड्या वेळाने मेसेज करत राहतो, आपल्या अभ्यासात त्याच लक्ष लागतच नाही. पण नंतर थोड्या वेळाने त्याला येणाऱ्या पेपरची काळजी वाटू लागते आणि आता आपल्या पुढच्या पेपरच्या तो तयारीला लागतो, पण सवईप्रमाणे तिला मेसेज करत राहतो , पण तिचा काहीच रिप्लाय येत नाही. आकाश पाच पाच मिनिटाला पुस्तक बाजूला ठेवून मोबाईलमध्ये पाहत राहतो, तिचा रिप्लाय आला की नाही हे पाहत राहतो, पण त्या रात्री तिचा रिप्लाय आलाच नाही , आकाश मात्र ती का रिप्लाय करत नाही याचं विचारात अडकून पडतो,
रात्रभर जागून तो अभ्यास करत राहतो पण त्याच्या मनात सतत सायलीला बोलण्याची इच्छा होत राहते, पण ती काही केल्या रिप्लाय करत नाही, आणि इकडे आकाशच लक्ष अभ्यासात लागत नाही.