भाग ६
त्या दिवसानंतर आकाश आणि बाबांमध्ये पहिल्या सारखं बोलणं कधी झालच नाही. आकाशने त्यानंतर बाबांसमोर काही दिवस जाणं टाळलं. पण मनातली ती इच्छा मात्र तो काही सोडत नव्हता. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पूर्णतः बदलून गेला होता. आयुष्यात कोणी मुलगी असावी अस त्याला सतत वाटतं होत, पण प्रेम करण्यासाठी की फक्त संभोग करण्यासाठी, याच उत्तर मात्र त्याचे त्यालाही सापडत नव्हत. कधी कोणा मुलीच्या स्तनाकडे पाहून उत्तेजीत व्हायच, तर कधी कोणा मुलीच्या सौंदर्यावर भाळून जायच, पण खर प्रेम कुठे असेल हे त्याने कधी शोधलच नाही. तारुण्याच्या नशेत तो फक्त जाणून होता ते स्वतःच मिळवलेल शरीरसुख, हस्तमैथुन आणि तो एकांतात मोबाईलवर नग्न स्त्रियांचे फोटो पाहून डोळ्याला दिलेला खोटा आनंद, पण यामध्ये तो आपल्या आयुष्याच्या स्पर्धेत कुठेतरी मागे पडत होता, बारावीच्या महत्त्वाच्या वर्षात तो कुठेतरी कमी पडतं होता, एक दिवस त्याला याची जाणीव झाली , कॉलजेमधल्या युनिट टेस्ट मध्ये मिळालेले मार्क्स पाहून , त्या दिवशी त्याच्या क्लास टीचर्सनी त्याला खूप सुनावलं,
“मे आय कमिंग सर” कॉलेज स्टाफरूम मध्ये आपल्या क्लास टीचर्सना पाहून आकाश म्हणाला.
आकाशला समोर पाहून त्याला थांबायला सांगत त्याचे टीचर बाहेर आले, आणि म्हणाले,
“आकाश आज भेट झालीच तर आपली!!”
“तुम्ही मला भेटायला बोलावलं होत म्हणून आलो !!”
“हो नक्कीच !! हल्ली तू क्लास मध्ये नसतो म्हणून आवर्जून बोलावणं पाठवलं !!”
“माझं काही चुकलं का सर ??”
“आकाश तुला तुझी चुक माहिती आहे ! आणि त्याबद्दल बोलण्यासाठीच मी तुला बोलावल आहे !!”
“चूक ??”
“हो चूक !! तुझं अभ्यासात लक्ष नाहीये आकाश !! युनिट टेस्ट मध्ये चक्क तू नापास झाला आहेस ??”
“सर त्यावेळी माझा अभ्यास झाला नव्हता !!”
“अभ्यास नाही ?? आकाश दोन महिन्यावर एक्साम आली आहे आणि तू म्हणतोस अभ्यास झाला नाही ??”
“सॉरी सर!!”
“सॉरी ऐकायसाठी नाही बोलवलं आकाश तुला !! तू हुशार विद्यार्थी आहेस म्हणून तुला बोलावलं आहे मी !! कॉलेज एडमिशन मध्ये पहिल्या लिस्ट मध्ये तुझं नाव होत!! मी स्वतः तुझ्या हुशारीच कौतुक केलं होत !! “
“मी आता अजून जोमाने अभ्यास करेन सर !!”
“तुला करायलाच हवा !! डॉक्टर व्हायचं आहे ना तुला ??”
” हो सर !! “
“मग तू असा डॉक्टर होशील ??”
आकाश काहीच बोलला नाही, सर पुढे बोलू लागले,
“वाटतं तितकं सोपं नाहीये आकाश डॉक्टरकीला एडमिशन घेणं !! तुम्हा आजकालच्या विद्यार्थ्यांना सगळं अगदी सोप वाटतं !! पण तस ते नाहीये !! आयुष्याची खूप महत्त्वाची पायरी आहे ही, इथे चुकलास तर आयुष्यभर तुला पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही.
“मी यापुढे अभ्यास करेन सर !! “
“गुड !! यू मे गो नाव !!”
आकाश सरांच्या रागवण्यामुळे भानावर आला. आपण नक्कीच कुठेतरी चुकत आहोत याची त्याला जाणीव झाली. त्यानंतर तो रागरागत घरी आला. आई बाबा कोणालाही काहीच बोलला नाही. कित्येक वेळ खोली बंद करून बसून राहिला. मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांना चाळू लागला,
“आजपासून अभ्यासाला सुरुवात !! बस्स !! रात्री जेवण करून पहिले अभ्यास करायला बसायचं !! “
रात्री जेवायला बसल्यावर आकाशने बाबांना याविषयी सांगितलं,
“बाबा !! आजपासून मी रात्र रात्र अभ्यास करणार !! “
“व्हा !!! आनंद आहे !! छान !! “
कित्येक दिवसानंतर आईच्या चेहऱ्यावर हसू आले. त्यानंतर आकाश सगळं पटापट आवरून अभ्यासाला बसला,
“आज अभ्यासाला फिजिक्स घेतो !! सुरुवात यापासून केली तर सगळं एकदम मस्त होईल !! “
कित्येक वेळ आकाश मन लावून अभ्यास करत होता, तेवढ्यात त्याच्या शेजारी ठेवलेला मोबाईल वाजला. वॉलपेपरला ठेवलेला फोटो पाहून क्षणभर आकाश आपल्या विचारांपासून दूर झाला, पण पुन्हा तो अभ्यास करू लागला,
“आता ना या मोबाईलला हातच लावत नाही !! चांगला मन लावून करत होतो अभ्यास तर डिस्टर्ब मध्येच !!”
आकाश मोबाईल बेडवर फेकून देत म्हणाला. त्यानंतर अर्धा पाऊण तास त्याने मन लावून अभ्यास केला. पण पुन्हा फोन वाजला.
फोन उचलताच म्हणाला,
“हा बोल सुमित !! “
सुमित हा आकाशचा वर्गमित्र ,
“आक्या युनिट टेस्टचा रिझल्ट बघितला का ??”
“सुम्या आजच पाटील सरांच्या शिव्या खाऊन आलोय !!”
“का ??”
“भाई गेलोना दोन सब मध्ये !!”आकाश हसत म्हणाला.
“काय म्हणतो !! म्हणजे माझं आणि तुझं सारखंच आहे तर !!”
“तू पण का ??”
“हो!! तुला सरांना भेटून जाताना पाहिलं म्हणून तर कॉल केला तुला!! म्हटलं तू पण शिव्या खाल्ल्या की नाही विचारावं!!” सुमित हसत म्हणाला.
“मग आता अभ्यास कर जोरात !!”
“आपला जल्वा डायरेक्ट एक्झाम मध्ये !! असही अजून दोन महिने आहेत !! आरामात होईल सगळं !!” सुमित परत हसत म्हणाला.
सुमित आणि आकाश खूप वेळ बोलत बसले. पुढं काय करायचं नाही करायचं यांच्याविषयी देवाणघेवाण झाली.
“चल मग!! ठेवतो फोन !! मी सुरू करतोय अभ्यास !! “
“कर कर !! आपलं तर निवांत आहे !! झोपायच आता मला !! गुड नाईट!!”
एवढं बोलून सुमित फोन ठेवतो. सुमितने फोन ठेवताच आकाश आपल्या मोबाईलवर वॉलपेपरला ठेवलेल्या सुंदर मुलीचा फोटो बघतो. क्षणात त्याने ठरवलेलं सगळं तो विसरून जातो. सुमितचे शब्द त्याच्या मनात घोळू लागतात ,
“असही अजून दोन महिने आहेत !! आरामात होईल सगळं !! “
आकाशच्या हातून नकळत हातातील पुस्तक बाजूला ठेवलं गेलं. मोबाईलवर तो आता एकापाठोपाठ सुंदर सुंदर मुलींचे फोटो पाहत बसला.
क्षण न क्षण महत्त्वाचा असणारा, आकाश ते व्हिडिओज पाहण्यात घालवू लागला. ते संभोगाचे व्हिडिओज बघत असतानाच नकळत आकाश हस्तमैथुन करू लागला, त्याला आता कोणतेच भान राहिले नाही, नग्न स्त्रिया , त्या व्हिडिओज मध्ये आपणच आहोत असा तो भाव आणि परमोच्च आनंदाचा क्षण त्याला जणू इथेच आहे असे वाटू लागले, कित्येक वेळ आकाश त्या जगात जणू आनंद शोधत राहिला, जगत राहिला. त्याच्या समोर दुसरे काहीच येत नव्हते. रात्रभर मोबाईलमध्ये पोर्न व्हिडिओज पाहत बसण , यातच जणू त्याला आता सुख आहे असे वाटू लागले. तो विसरून गेला सरांनी त्याला अभ्यास कर म्हणून रागावले होते, तो विसरून गेला बाबांना त्याच्या मोबाईल मधले ते फोटो पाहून लाज वाटली होती. तो विसरून गेला अभ्यास नाही केला तर आपण नापास होऊ याची भीती , त्याच्या डोक्यात फक्त आता नग्न स्त्रियांचे फोटो , हस्तमैथुन करताना मिळालेला आनंद , एखादी स्त्री संभोग करायला मिळाली तर काय होईल?? हे विचार. यामुळे तो बाकीचं सगळं जग विसरून गेला.
त्यानंतर आकाश गाढ झोपी गेला. बाजूला ठेवलेल्या पुस्तकाची पाने कित्येक वेळ पंख्याच्या वाऱ्याने फडफडत राहिली पण आकाशला त्याचा आवाजही आला नाही, सकाळी दहा वाजले तरी आकाश उठला नाही. बाबांना आणि आईला वाटले पोर रात्रभर अभ्यास करून झोपल असेल म्हणून त्यांनीही त्याला उठवलं नाही. बाराच्या ठोक्याला आकाश झोपेतून उठला, जवळच पुस्तक टेबलवर ठेवून तो आपल्या खोलीतून बाहेर आला ,कित्येक दिवसानंतर आई त्याला स्वतःहून बोलली,
“आकाश !! रात्रभर अभ्यास झाला ना नीट ??”
आकाश क्षणभर शांत राहिला त्याला काय बोलाव कळेना पण आईला उत्तर द्यायला हवं म्हणून बोलला,
“एकदम मस्त !! ” आकाशच्या ओठांवर खोटे हसु आले.
“चांगल आहे !! उशीरा का होईना पण तुला अक्कल आली म्हणायचं !!” आई आपलं काम करत करत बोलली.
आकाश मात्र काहीच बोलला नाही. त्याचे त्याला मनात आपण खोटं बोलतोय हे माहीत होत. त्यामुळे तो गप्प राहिला.
“बाबा सकाळी आवरून ऑफिसला गेले !! मला म्हणाले रात्रभर जागून अभ्यास केलाय तर त्याला उठवू नकोस लवकर !! म्हटलं बर !! आता आवरतोस का लवकर ??” आईच्या बोलण्यात मात्र अजूनही थोडा कडवटपणा त्याला जाणवतं होता.
“हो आवरतो !! ” एवढं बोलून आकाश अंघोळ करायला गेला.
“सगळ्यांना वाटतं आई प्रत्येकवेळी रूप का बदलत असते?? कधी ती मायेनं जवळ घेते तर कधी ती रागावते सुद्धा. पण ती अशी का वागते याचा विचार कधी कोणी केला आहे ?? नाहीना !! पण मग तिच्या मनात काहीच नसते का ?? की उगाच ती अशी वागते !! तर अस नसतं !! माझ्या आकाशबद्दलच विचार करताना मला हे विचार नेहमी येतात !! माझा आकाश हुशार आहे !! पण तितकाच प्रवाहासोबत वाहत जाणारा आहे!! मला त्याला वेसण घालावच लागेन अस मला नेहमी वाटतं !! म्हणूनच त्याच्यात होत चाललेले बदल मला कळत नाहीत का ?? अस त्याला वाटतंय. पण तस नाहीये !! मला सगळं कळतंय!! तो आता तरुण आहे, त्याचे पाऊल योग्य ठिकाणी पडाव एवढंच मला वाटत. पण एक आई म्हणून मी कुठेकुठे पुरणार आहे त्याला?? काही निर्णय त्याला स्वतःला घ्यावे लागणार. आता तो लहान नाही की त्याच्या कानाला पकडुन चूक की बरोबर सांगू, त्याच सतत गेम्स खेळन, चॅटिंग , गरजेपेक्षा जास्त मिळालेला एकांत, खरतर याची मला भीती वाटते. कारण माझं मुल काय करत?? हे मला माहितीच नाहीये !! मी अनभिज्ञ आहे यापासून !! ” आकाशची आई विचारांच्या तंद्रीत होती. समोर कूकरच्या शिट्टीने ती भानावर आली. आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाली.
आकाश मात्र आपल्याच जगात होता. सगळं आवरून तो बाहेर आला. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजला फोन उचलत तो बोलू लागला,
“बोल !! दिप्या!! “
“भाई !! आज पिक्चरला जायचा प्लॅन आहे सगळ्यांचा !! येणार का??”
“कधी ठरलं ??”
“भाई ग्रूपवर बोलणं झालय !! तू सांग येणार का ? “
“दिप्या एक्झाम जवळ आली आहे !! मला नाही वाटत आई बाबा जाऊ देतील !! “
“कलंक आहेस रे तू !! मैत्रीला कलंक !!”
” काय झालं आता ??”
“क्लास आहे म्हणून सांग ना !! आणि भाई सायली पण येतेय पिक्चरला!”
सायलीच नाव ऐकताच आकाश मनातून खूष झाला आणि म्हणाला,
“बरं करतो काहीतरी !! येतोच !! किती वाजता जायचं आहे?? “
” तीनचा शो आहे लवकर निघ !!”
“बरं !! “
आकाश समोर ठेवलेल्या घड्याळात पाहतो तर दीड वाजलेले होते, पटपट आवरू लागतो, पाठीवर कॉलेजची बॅग घेत बाहेर पडतो ,समोर आईला पाहून थांबतो, अडखळतो आणि बोलतो,
“आई !! आज पाटील सरांचा एक्स्ट्रा क्लास आहे !! मला जाव लागेल !! “
“अरे पण आता सगळे क्लास झाले आहेत ना ?? अभ्यास करायला सुट्ट्या दिल्यात ना ?? मग एकदम कुठून क्लास आज??”
“मलाही माहित नव्हतं !! आता कॉलेज मधून सुमितचा कॉल आला तेव्हा कळाल !! “
“बरं मग जेवण तरी करून जा !!”
“नाही नको !!! बाहेर कॅन्टीन मध्ये करतो आज जेवणं!! उशीर झालाय !!”
आकाश धावतच घरातून बाहेर पडतो. आई पाठमोऱ्या आकाशकडे पाहत राहते, त्याच्या काळजीने मनात झुरत राहते.