भाग ५
दिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला. पाहता पाहता त्याच्या जवळ नवीन मित्र ,नवीन लोक येऊ लागले. आयुष्याच्या वळवणार तो कसा त्यांना प्रतिसाद देतो हेच खर पाहण्यासारख होत. पण एक गोष्ट मात्र त्याची पाठ सोडत नव्हती आणि ते म्हणजे संभोगाच्या विषयी आकर्षण. आजपर्यंत कधीही त्याला त्याच खरं महत्त्व कळालच नाही, ते म्हणजे फक्त दोन जीवांना सुख मिळण्याचा एक भाग ,एवढंच त्याला त्यातलं कळतं होत. म्हणूनच की काय तो आता हस्तमैथुन करू लागला. जणू त्याला त्यातच सगळं सुख वाटू लागलं. मोबाईलमध्ये पोर्न व्हिडिओज पाहत आकाश आपली ती इच्छा पूर्ण करत असे. पण तेव्हा तो आयुष्यात पुढे येणाऱ्या आव्हानांना अनभिज्ञ होता. बारावीच्या महत्त्वाच्या वर्षात त्याला उत्तम मार्क मिळवणं तेवढंच गरजेचं होत. आई बाबा त्याच्या या सवयींपासून अजाण होते. एक दिवस अचानक आई त्याच्या खोलीत आली आकाश अभ्यास न करता मोबाईलमध्ये काहीतरी पाहतोय हे तिच्या लक्षात आलं , त्याच्या जवळ जात ती म्हणाली,
“बारावीच वर्ष आहे आकाश ,अभ्यास करायचा सोडून तू चक्क मोबाईलवर गेम्स खेळतोय !! “
“आई !! जस्ट आत्ताच घेतलाय मोबाईल हातात ,थोड्यावेळाने पुन्हा बसतो अभ्यास करायला!!”
“बघ बाबा तुझं तू काय करायचं ते !! अभ्यास कर नाही तर नकोच करुस !! ” आई रागात म्हणाली.
“एवढं काय ग लगेच !! करतो म्हणालो ना मी !! “
आई काहीच न बोलता खोलीतून बाहेर गेली. आपल्या कामात व्यस्त झाली. बाबांना बाहेर तिच्या चेहऱ्यावरची चिंता लगेच कळून आली. तिच्या जवळ जाऊन तिला ते म्हणाले,
“काय झालंय साधना ??”
” काही नाही !! “
“सांग बरं !! “
” मला आकाशच्या भविष्याची चिंता वाटते !!” जवळच ठेवलेला पाण्याचा ग्लास ती बाबांना देत म्हणाली.
“उगाच चिंता करतेस साधना तू !! आपला मुलगा हुशार आहे!! नक्कीच तो बोर्डात येईल बघ !! “
“अवघड आहे !! सतत मोबाईल तरी खेळत असतो, नाहीतर मित्रांशी फोनवर तरी बोलत असतो !! कॉलेजमधून घरी आला की सतत खोलीचा दरवाजा बंद करून बसलेला असतो! अभ्यास करतो की नुसता टाईमपास त्यालाच माहिती !!”
“आपणही असेच वागायचो ना त्याच्या एवढे होतो तेव्हा !! सतत मित्र , मजा मस्ती !!”
“हो पण तेव्हा बाबांचा धाक वेगळाच होता !! बाबांनी नुसतं पाहिलं तरी भीती वाटायची !! हल्ली मुलांना धाक म्हणजे आपण त्यांच्यावर अत्याचार करतोय अस वाटत !!”
“एवढं मात्र खर आहे तुझं !! पण आता जग बदललं , त्यातील गोष्टी बदलल्या !! त्यानुसार आपल्याला चालाव लागेलच ना !!”
“हो पण चालायचं म्हणजे कोणत्याही गोष्टीला पाठिंबा द्यायचं अस नाहीना !! “
“हो ते तर आहेच !! “
“हेच तर मला म्हणायचं आहे !! आकाशची एवढी बारावी होई तोपर्यंत त्याच्याकडून तो मोबाईल काढून घ्या !!”
“शक्य वाटत नाही मला ते !! हल्ली मोबाईलवर सुद्धा क्लास भरतात म्हणे !!”
“मग त्याला काही नियम घालून द्यावे लागतील !! “
“मी बोलतो त्याच्याशी !! पण तू नकोस घेऊ उगा टेन्शन !! तरुण रक्त आहे !!”
“आपण नव्हतो तरुण ?? मी तर एकत्र कुटुंबात वाढले!! तारुण्यात काय होते , ते बदल सगळं कळत होत !! पण एक मर्यादा कुठेतरी आपल्याला असावीच लागते. “
“खरंय तुझं !! आज संध्याकाळी त्याला बोलतो मी !! “
बाबांनी आईच्या मनात काय चालू आहे हे लगेच ओळखलं, त्यांनाही तीच बोलणं योग्य वाटलं, आपला मुलगा चुकीच्या वळणाला जाऊ नये एवढीच त्याची इच्छा होती. आईला एकवेळ आकाश ऐकून न ऐकल्या सारखे करत असे पण अजून तरी बाबांचा शब्द तो पाळत होता. त्याच्या मनात बाबांबद्दल तेवढा आदर होता.
संध्याकाळी जेवण झाल्या नंतर बाबा ठरवून आकाशला भेटायला त्याच्या खोलीत गेले. अचानक आलेल्या बाबांना पाहून आकाश थोडा गोंधळून गेला नंतर सावरत त्याने समोर ठेवलेल्या काही गोष्टी बाबांना कळू नये असे लपवल्या, बाबा त्याच्याकडे पाहत म्हणाले,
“कसा चालू आहे मग अभ्यास ??”
“एकदम मस्त बाबा !! आज अचानक ??”
“काय होत ना आकाश मी एरवी असतो माझ्या कामात , आई असते तिच्या कामात ,आणि तुझं आहे बारावीच वर्ष त्यामुळे तुपण अभ्यासात बिझी !!त्यामुळे आज ठरवून म्हटलं विचारावं कुठवर आलाय अभ्यास तुझा !!”
“अभ्यास एकदम मस्त !! फिजिक्स, केमिस्ट्री जवळ जवळ पूर्ण होत आलाय !!”
“अरे वा !!छान !! पण नुसते पूर्ण नको करुस पक्के कर !! आणि त्यासाठी मोबाईलचा वापर जरा कमी कर !!”
“आईने सांगितलं ना तुम्हाला मोबाईलबद्दल !!” आकाश खोलीच्या दरवाज्याकडे बोट करत म्हणाला.
“हो पण तिने काळजीपोटी सांगितलं मला !! “
“बाबा !! एम. बी बी. एस ला काय मी असा सहज जाईल !! “
“बाळा तुझा कॉन्फिडन्स चांगला आहे !! पण शालेय जीवन आणि कॉलेज जीवन यात खूप फरक आहे !!”
“माहितेय मला बाबा !! “
“हो ना!! म्हणूनच आजपासून कॉलेज मधून घरी आलास की मोबाईल तू माझ्या खोलीत ठेवून द्यायचा !! जर अगदीच महत्त्वाचं असेल तर मी तुला सांगेन !! “
“काय ???? ” आकाश एकदम जागेवरून उठला , त्याला बाबांच्या बोलण्याच आश्चर्य वाटू लागलं.
“हो !! एवढं एक वर्ष फक्त, पुन्हा तू एकदा चांगल्या मार्क्सने पास झालास की मी तुला याबद्दल कधीच काही बोलणार नाही !!”
“नाही बाबा !! तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का ??”
“इथे प्रश्न विश्वासाचा नाहीये !! तुझ्या भविष्याचा आहे !! आणि मला कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये !! तुझी आई म्हणाली म्हणून नाही पण मलाही वाटतं या मोबाईलमुळे , त्यावर ते सतत चॅटिंग ,गाणे यामुळे तुझं लक्ष विचलित होतंय. त्यामुळे हा मोबाईल माझ्याकडे राहील !!” बाबा मोबाईल हातात घेत म्हणतात.
“नको बाबा !! द्या तो मोबाईल इकडे !! ” आकाश मोबाईल हातात घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
बाबांनी त्या मोबाईलवर कोणा तरुणीचा मादक हावभाव असल्याचा फोटो वॉल्पेपर म्हणून पाहिला. ते पाहताच बाबा आकाशला म्हणाले.
” काय रे हे ?? “
“काही नाही बाबा !!” आकाशने जवळ जवळ बाबांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला.
पुढे काय बोलावं हे बाबांना काहीच कळेना. क्षणभर त्यांच्या विचारांची शक्ती जणू हरवून गेली. त्यांना हे कळलंच नव्हतं की आकाश आता मोठा झालाय, क्षणभर ते शांत झाले आणि म्हणाले,
“आकाश जे करतोयस ते नीट विचार करून कर !! तारुण्याच्या चुका पुढे आयुष्यभर भोगाव्या लागतात एवढं मात्र लक्षात ठेव !! तू तरुण आहेस !! पण चूक की बरोबर यातलं अंतर ओळखायला विसरू नकोस एवढंच माझं म्हणणं आहे !!”
बाबा आकाशकडे न पाहताच खोलीतून बाहेर गेले, त्यांच्या मनातील उदासीनता त्यांनी आकाशला जाणवू दिली नाही. पण विचारांच्या समुद्रात मात्र ते पार बुडाले,
“सगळ्यांचं जगणं सारखंच असतं , मी ही तारुण्यात पदार्पण केल तेव्हा नकळत माझ्या कॉलेजमधल्या माझ्या सखीच्या प्रेमात पडलो होतो. निरागस प्रेम होत ते, एक विशिष्ट आकर्षण. पुढे शिक्षण झाल्यावर ती तिच्या मार्गावर गेली आणि मी माझ्या मार्गाला निघालो. तारुण्याच्या त्या काळात शरीरात झालेले बदल मलाही बोलत होते, पण मी वासनेच्या आहारी न जाता त्याला लांब केल, घराची परिस्थिती नसताना शिकलो, बी. कॉम पूर्ण केलं आणि बँकेत नोकरीला लागलो. पुढे साधना माझ्या आयुष्यात आली आमचं लग्न झालं, वैवाहिक आयुष्य आमचं सुखाचं झालं, कारण स्त्री आणि पुरुष फक्त संभोग करण्यापुरते नाहीत तर आयुष्याची एकमेकांना साथ देण्यासाठी आहेत हे आम्हाला कळाल, म्हणूनच की काय आजही वीस वर्षाचा आमचा संसार सुखाने चालतो आहे, पण मग आजच्या तरुण पिढीत तारुण्याला या शरीराचं, संभोगाच, फक्त एवढंच जगणं माहिती आहे का?? खरंच तो निरागसपणा कुठेतरी हरवून गेलाय का?? या आजच्या तारुण्याला सांगायला हवं की संभोग हा प्रेमाचा एक भाग नक्की आहे, पण ना की स्त्री आणि पुरुषातला फक्त एकच सुखाचा तो मार्ग. ” बाबा कित्येक वेळ विचार करत बसले. त्यांच्या आणि आजच्या पिढीतील अंतर शोधत बसले.