वर्तुळ || कथा भाग ४ || मराठी रंजक गोष्टी ||

भाग ४

पंख पसरून तारुण्याकडे पाहताना सगळं कसं नकळत भेटत जात, त्याच कुतूहल वाटायला लागतं. आपण आता मुक्त आहोत सारं जग आपल्या हाती आहे हा आविर्भाव मनात यायला लागतो. आणि तसच काहीस आकाशला वाटू लागलं होत. सगळं अगदी सहज सोप असतं आणि जीवन याचंच नाव असतं अस त्याला वाटू लागलं , आकाश थोड्या वेळाने दिपक आणि इतर मित्रांना भेटायला त्यांच्या नेहमीच्या जागेवर आला. त्याच्या आधीच तिथे त्याचे मित्र येऊन थांबले होते. आकाशला पाहून आनंदाने दीपक बोलू लागला.

“भाई !! लवकर आला तू !! ” दीपक त्याला मिठी मारत म्हणाला.
“निघायला उशीर झाला रे !! आणि त्यातून ही ट्रॅफिक ! वैताग आणलाय नुसता !!”
“का भाई मोबाईलने रीमाइंडर दिलं नाही का काय नीट ??” दीपक इतर मित्रांकडे हसत बघून म्हणाला आणि पुन्हा आकाशकडे पाहू लागला.
“दिप्या मोबाईल बद्दल तर बोलूच नको!! बाबांनी काय भारी मोबाईल गिफ्ट केलाय विचारू नको !! “
“दाखवशील तर कळेल ना !!”
“हा बघ ना !! ” आकाश दिपकच्या हातात मोबाईल देत म्हणाला.
दीपक मोबाईल बघण्यात गुंग झाला. आकाश इतर मित्रांना बोलू लागला.
“सुश्या !! मग काय म्हणतेय सुट्टी ??”
“एक नंबर चालू आहे !! कालच वन डे ट्रीपला जाऊन आलोय !! फुल्ल एन्जॉय !! “
“क्या बात है !!! बरं काही खायला मागवल आहेत की असच बसायचं आहे ?”
“मागवा ना मग !! आजची पार्टी आकाशकडून !! मोबाईलची पार्टी !!” दीपक हसत म्हणाला.
“नक्की नक्की !! बिनधास्त !! काय मागवायच ते मागवा !! तुमचा भाऊ आज एकदम खुश आहे !!” आकाश सगळ्यांकडे पाहत म्हणाला.

सगळे खूप दिवसांनी भेटल्यामुळे आनंदून गेले. शाळेत असताना दररोज भेटणारे मित्र आता वेळ ठरवून भेटायला येवू लागले. कित्येक वेळ तिथे बसून मजा मस्ती , टिंगलटवाळी करू लागले. कोण कुठे जाणार ,कुठल्या कॉलेजात प्रवेश घेणार याबद्दल चर्चा करू लागले.
“माझं तर ठरलं आहे बघ !! मी तर एम. बी. बी एस करणार !! अजून आई बाबांना बोललो नाहीये पणं आता बारावीला बायोलॉजी घेणार !! “
“तुझं काय रे आकाश !! तू हुशार आहेस घेशील प्रवेश बायोलॉजीला !! आम्हाला इथ कॉमर्स जरी मिळालं तरी आनंदाने वेड लागलं !! “
“कोणी कुठेही प्रवेश घेऊ देत !! भेटायचं मात्र इथेच आपण सगळे !! अगदी दरवर्षी !! “सुश्या मध्येच बोलू लागला.
“नक्की !! भाई काहीही झालं तरी भेटत राहु !! ” आकाश सुश्याकडे पाहत म्हणाला.

कित्येक वेळ गप्पा मारून झाल्यावर सगळे मित्र आपापल्या घरी जायला निघाले. आकाश सुध्दा निघणार तेवढ्यात दिपकने त्याला थांबून घेतलं.
“थांबणा जरा !! जाऊ आपण दोघेनंतर !! उशीर झाला तर काकूंना माझ्याकडे होतास म्हणून सांग !!”
“दिप्या नको रे !! आधीच आई रागावली आहे माझ्यावर !!”
“थांब रे !! बोलायचं आहे तुझ्याशी थोड !! ये सुश्या , पम्या तुम्ही निघा !! आम्ही जातो दोघे !!

बाकीचे सगळे मित्र निघून गेल्यावर आकाश आणि दीपक दोघेच तिथे राहिले. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले.
“साल्या सायली भेटली होती काल मला !! “
“काल ?? काय म्हणाली रे !! “
“तुझी आठवण काढत होती !! आकाश कुठे आहे !! कसा आहे !! हे ते ! काय नी काय !!”
“काहीही !! ” आकाश गालातल्या गालात हसत म्हणाला.
“भाई लिहून घे तीच नक्की प्रेम आहे तुझ्यावर !! परवा कार्यक्रमात तुझा सत्कार झाला तेव्हा सगळ्यात जास्त तिनेच टाळ्या वाजवल्या होत्या माहितेय का ??” दीपक मिश्किल हसत म्हणाला.
“काहीही !! ” बरं सोड जाऊदे मी निघतो आता !! “
“गेम खेळायच्या असतील ना मोबाईलवर ??”
“सध्या आपल्याला काय काम !! आहे निवांत तर मस्त एन्जॉय करून घेतो!!”
“काय लहान पोरांसारख गेम खेळत बसतो !! भाई मोबाईलवर अजून भरपूर काय काय आहे !! “
“हा माहितेय मला!”
“काय माहिती ??” दीपक प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाला.
“सगळं !!”
“व्हिडिओ बघतो का नाही !! भारीवाले??”
“कसले व्हिडिओ !!” आकाश गोंधळून गेला. त्याला दीपकच बोलणंच कळेना.
“अरे !! सगळं काय सांगावं लागत का !! माझ्या पेनड्राईव मध्ये ४ जिबी आहे !! फुल्ल हॉट मसाला !!”
“दिप्या कधीपासून हे बघायला तू ??” आकाशला त्याच्या बोलण्याच आश्चर्य वाटलं. तो काय बोलतोय हे कळाल.
“भाई मोठा झाला ना तू ?? का अजून शाळेतच आहेस ??”
“हा पण ते घान व्हिडिओ काय बघायचे !! कोणाला कळलं तर !!”
“इथ आमच्याकड मोबाइल नाही तरी आम्ही कुठ ना कुठ जुगाड लावतो !! आणि तुमच्याकडे सगळा दुष्काळच !! गेमा खेळ तू !! ” दीपक आकाशच्या हातातील मोबाईल घेत म्हणाला.
“आता मोबाईल कशाला घेतला !! जाऊ दे रे ! !! दिप्या आपण यावर बोलू नंतर !! “
“कलंक आहेस रे मैत्रीला !! आकाश तू कलंक आहेस !! इथ मित्र आतुर झालाय व्हिडिओ बघायला आणि तुला घरी जायचंय !!”

त्यानंतर दीपक आकाशच्या मोबाईलवर कित्येक वेळ ते व्हिडिओज आणि फोटो पाहत बसला. आकाशही आता त्याला साथ देवू लागला. आकाश आता त्याच्या भोवती नकळत तयार होऊ लागलेल्या वर्तुळात अडकत जाऊ लागला. तारुण्याच्या उंबरठयावर शरीरातल्या होणाऱ्या बदलला आकाशने आता ओळखल होत.

कित्येक वेळ दीपक सोबत गप्पा मारल्यानंतर रात्री आकाश उशिरा घरी आला. आई आणि बाबा त्याची जेवणासाठी वाटच पाहत होते. आकाशला पाहिल्यानंतर बाबा त्याच्या जवळ जात म्हणाले.
“आज काय मग मित्रांसोबत मज्जा मस्ती का ??”
“हो बाबा !! आज सगळे भेटायचं ठरलं होत !! “
“वाजलेत किती याच भान आहेना तुला ??” आई मध्येच म्हणाली . तिचा रागावलेला स्वर आकाशला लगेच लक्षात आला आणि तो म्हणाला.
“मी काही आता क्कुक्कुल बाळ नाहीये आई !! झाला थोडा उशीर त्यात काय एवढं !!”
“आकाश नीट बोल ! आईशी बोलतोयस याच भान ठेव !!”
“साधना !! जाऊदे झाला एखाद दिवशी उशीर !! चल आकाश फ्रेश होवून ये आणि जेवायला बस !! “
“बाबा आज बाहेरच जेवण करून आलोय त्यामुळे भूक नाहीये !! “
“थोड तरी जेव आणि मग झोप !!”

बाबांनी सांगताच आकाश त्यांच्यासोबत जेवायला बसला. थोडावेळ गप्पा मारत बसला. आणि नंतर आपल्या खोलीत येऊन झोपायची तयारी करू लागला.
बेडवर पडून तो कित्येक वेळ गेम खेळत बसला. नंतर वैतागून गेला. आणि अचानक त्याच्या डोक्यात दिपकचे शब्द घुमू लागले. नकळत तो पुन्हा व्हिडिओ पाहण्याकडे ओढला जाऊ लागला.

नकळत आकाश इंटरनेटच्या जगात स्वतःला हरवू लागला.
“एकच नंबर आहे रे हा व्हिडिओ !! काय दिसते आहे ती !!” आकाश असे कित्येक शब्द बोलू लागला जे यापूर्वी त्याने कधी ऐकले सुध्दा नव्हते.
आणि अचानक त्याच्या शरीरात एक वीज चमकून गेली. त्याच्या शरीरात त्याला संभोग करण्याची भूक जाणवू लागली. तो कित्येक वेळ ते व्हिडिओ पाहू लागला. स्वतःला त्यात पाहू लागला. आकाशला शरिरसुखाची ओढ जाणवू लागली.

रात्र आकाशची यातच गेली. त्याला काय करावं काहीच सुचेना. त्याच्या डोळ्यासमोर सतत तेच चित्र येऊ लागले. तो बेडवर पडून अस्वस्थ होऊ लागला. मनात कित्येक विचारांचा गोंधळ होऊ लागला.
“यापूर्वी ही अस्वस्थता मला कधीच का जाणवली नाही ?? माझ्या शरीरातील त्या गोष्टींना कशाची ओढ लागली हे आता मला जाणवतंय. माझं तारुण्य मला बोलावत आहे. पण मी काय करू काहीच कळतं नाहीये !! तो मोबाईल ,त्यावरच्या त्या गेम्स क्षणार्थात मला कमी महत्त्वाच्या का वाटू लागल्या आहेत ?? मलाच माहीत नाही. नको आकाश !! या मोहात पडू नकोस !! पण मग ही अस्वस्थता ??”

आकाश पुन्हा पुन्हा व्हिडिओज पाहत बसला. त्यात स्वतःला पाहू लागला. आकाश वर्तुळात भरकटून गेला.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *