भाग ३
बाबा ऑफिसला गेले आणि आकाश आपल्या खोलीतून बाहेर आला. लवकर लवकर सगळं आवरू लागला. त्याला कधी एकदा आवरून पुन्हा मोबाईल हातात घेतोय अस झाल होत. त्याची ही लगबग आईच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याला म्हणाली ,
“आकाश एवढी काय घाई आहे !! मोबाईल कुठे जाणार आहे का ?? का कोणी विकून टाकणार आहे ??”
“आई !! काहीही काय ? “
” मग जरा सावकाश !! जेवण सुद्धा नीट करत नाहीये तू !!”
आकाश काही न बोलताच खोलीत निघून गेला. आई पुढे काहीच बोलली नाही. तिच्या मनात सतत एकच गोष्ट येत होती. आपण आकाशला मोबाईल देऊन खरंच चूक तर नाहीना केली ?? पण पुन्हा ती आपल्या मनाला समजावून सांगत होती. की नाही साधना मोबाईल ही काळाची गरज आहे . आज जर मी आकाशला यापासून दूर ठेवलं तर तो कदाचित या जगापासून दूर जाईल नको साधना उगाच विचार करू नकोस . काहीही होत नाही.
तेवढ्यात खोलीतून आकाशचा मोठ्याने आवाज आला. साधना आकाशची आई धावत खोलीकडे गेली, पाहते तर आकाश मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यात मग्न आपण जिंकलो याचा आनंद त्याला इतका झाला की त्याला तो लपवताच आला नाही. तो मोठ्याने ओरडत होता. चित्रविचित्र हावभाव करत होता.
अचानक मोबाईलची रिंग वाजते आकाश पटकन फोन उचलतो. पलीकडून दीपक त्याचा मित्र बोलत होता.
“हॅलो , आकाश दिप्या बोलतोय !! “
“बोल ना दिप्या !! का फोन केला !! आन केला ते केला चुकीच्या पॉईंटला केला. “
“का रे भाई !! बिझी होता का कुठ !!” दिप्या मिश्किल हसत म्हणाला.
“तुझ्या दोस्तान २६ लेव्हल पूर्ण केली ना भाऊ !!”
“काय म्हणतो !! खरंच ??”
“हा मग !! रात्रभर खेळून पूर्ण केली !! “
“लकी आहेस !! नाहीतर इथ आम्हाला दोन मिनट सुद्धा फोनला बाबा हात लावू देत नाहीत !!”
“आता काय लहान आहेस का रे दिप्या तू?? आपला आपला वेगळा मोबाईल पाहिजे आता !! “
“तुझं बरंय रे !! तुझ्या बाबांनी तुला गिफ्ट केलाय !! इथ समोरून घेऊन द्या म्हटलं तर बघू नंतर म्हणाले.”
“बरं ते जाऊ दे !! फोन का केला ते सांग आता !!”
हे सगळं बाहेरून पाहणारी आई आकाशला आपल्याच जगात हरवून जाताना पाहत होती. तिला त्याच्या भोवती एका वेगळ्याच जगाची जाणीव व्हायला लागली होती. ती तिथून बाजूला आली. आणि आपल्या कामाला लागली. आकाश आणि दिपकच बोलणं चालूच होत.
“आज भेटायचं ठरलंय सात वाजता लक्षात आहे ना ??”
“अरे भाई !! बरं झालं आठवण करून दिलीस !! पटकन मोबाईल मध्ये रिमाईंडर सेट करून ठेवतो. “
“सकाळी सहाच्या क्लासला आलार्म न लावता लवकर उठणारे साहेब आता रीमाइंडर लावणार !! छान !!”
“गप रे दिप्या !! येतो मी नक्की !! आणि बाकीच्यांना पण सांग वेळेवर यायला. “
“हो रे ! नक्की !! बरं ठेवतो आता फोन !!”
“ओके !!”
आकाश मोबाईल मध्ये रिमाइंडर सेट करतो. आणि पुन्हा मोबाईल मध्ये मग्न होतो. जो आकाश प्रत्येक आपलं काम वेळेवर पूर्ण करत होता. त्याला आता वेळेचं भान राहावं म्हणून रिमाइंडर ची गरज जाणवू लागली होती. त्याच्या गरजा आता बदलू लागल्या होत्या. ज्या जगात तो आता वावरत होता तिथे सगळंच आभासी होत. तो त्या आभासी जगातच वावरत होता, फिरत होता, बोलत होता व्यक्त होत होता आणि लोकांशी भेटतही होता, गेम्स च्या जगात कधी जिंकत होता, कधी पराभव पत्करावा लागत होता, तर कधी त्यामुळे अचानक हसत ,तर कधी उदास होत होता. जणू त्या वर्तुळात त्याला सगळं जग मिळालं होत. आणि त्या जगातूनच त्याला संध्याकाळी मित्रांना भेटण्याची आठवण करून देत होता तो त्याचा मोबाईल.
आकाश पटपट सगळं आवरून निघाला. आईकडे पाहून म्हणाला,
“आई सगळे मित्र आज भेटणार आहोत तिकडेच जातोय !! यायला थोडा उशीर होईल !!”
“उगाच उशीर करू नकोस !! लवकर ये !! आणि तो हेडफोन लावून नको जाऊस !! त्यामुळे काही ऐकू येत नाही बाहेरच !! आजूबाजूला कोणतं वाहन येतजात काही कळतं नाही त्यामुळे !! “
“आई कुठल्या जगात वावरते आहेस तू !! हल्ली हे सगळं कॉमन आहे !! आणि समज मी बसमध्ये गर्दीत आहे आणि अचानक तुझा कॉल आला तर कसा उचलायचा ??”
आई निरुत्तरीत राहिली. तिला पुढे काय बोलावं तेच कळलं नाही. मात्र तिच्या मनात एक प्रश्न मात्र निर्माण करून गेला की हेडफोन खरतर मानवाला चांगले की वाईट ?? पण याची उत्तर तिच्या मनात निरुत्तरीत राहिली. मात्र आकाशला बाहेर जाताना पाहून तिच्या मनात असंख्य विचार येऊन गेले.
“कालपरवा पर्यंत कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी मला विचारणारा आकाश आता किती बदलून गेला आहे नाही , मुल मोठी होतात पण ते क्षणात बदलतात त्याचा अनुभव आज मला येतोय. आई वहिला कोणतं कव्हर लावू?, आज कोणता शर्ट घालू ?, आई मी बाहेर मित्रात खेळायला जाऊ? म्हणून विचारणारा आकाश आता मोठा झाला नाही!! आता तो कॉलेजला जाईल नव्या जगाची त्याला ओळख होईल, पण या जगात आकाश मला ओळखेन का ?? की विसरून जाईल मला , की आम्ही आता जुन्या विचारांचे झालो म्हणून. काही काही कळत नाही. आम्हीही तरुणाईच्या जगात असेच काहीसे पाऊल ठेवले , पण जग आता बदलून गेले आहे चिंता फक्त याचीच वाटते. बाकी माझा आकाश हुशार आहे तो नक्कीच याची काळजी घेईल. ” आई कित्येक वेळ तिथेच उभा राहून आकाशच्या विचारात हरवून गेली होती.
नव्या जगात मात्र आकाश बेधुंद होऊन फिरत होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्याला खूप काही खुणावत होते. आकाश पंख पसरून आभाळाकडे पाहत होता,