वर्तुळ || कथा भाग १ || मराठी कथा ||

टीप : वर्तुळ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून, याचा कोणत्याही मृत अथवा जिवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेत उल्लेख केलेले नाव, स्थळ, जात, धर्म, पंथ, विचार , घटना हे सर्व लेखकांच्या विचारांतून लिहिलेले आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.

भाग १

” दहावीत उत्तम मार्क मिळालेल्या सर्व विद्यार्थांचे मी मनापासून अभिनंदन करते. तुमच्या पुढे आता आयुष्याचे कित्येक मार्ग खुले झाले आहेत, तुमच्यातील कोणी पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेईल ,कोणी कला ,तर कोणी कॉमर्स या शाखेत जाईल पण विद्यार्थ्यांनो तुमचं मूळ मात्र एकच राहील आणि ती म्हणजे आपली शाळा. आणि या शाळेचं नाव मोठं करण्याचं काम आता तुम्हा सर्वांवर आहे , सुंदर पुस्तक वाचा , अभ्यास करा , शिका आणि मोठे व्हा. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ” सर्वत्र टाळ्यांचा आवाज झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या पाहुण्या आपल्या जागेवर जाऊन बसल्या.

“खूप खूप धन्यवाद सुनेत्रा मॅम , आपण दिलेल्या या विचारांचा नक्कीच भविष्यात विद्यार्थ्यांना सदुपयोग होईल !! ” निवेदिका क्षणभर थांबून पुन्हा म्हणाल्या, “आणि आता दहावीच्या परीक्षेत आपल्या शाळेतून पहिला , दुसरा आणि तिसरा आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते.” आणि त्यांनी विद्यार्थ्यांची नावे घेण्यास सुरुवात केली.

“आपल्या प्रशालेतून दहावीच्या परीक्षेत तिसरी आलेली आहे, सीमा करंजकर !!” निवेदिका अगदी चढ्या आवाजात बोलल्या.
विद्यार्थ्याच्या रांगेतून एक चुणचुणीत मुलगी मंचावर आली. प्रमुख पाहुण्यांनी तिचा सत्कार केला. ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली. दुसऱ्या विद्यार्थाचे नाव घेताच त्यानेही मंचावर जाऊन सत्कार स्वीकारला.

“यावर्षी आपल्या प्रशालेत दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे, आकाश देशपांडे !!” सर्वत्र टाळ्यांचा आवाज घुमला.
समोरच्या रांगेत बसलेला एक मुलगा धावत मंचावर गेला. शिक्षकांनी त्याच तोंडभरून कौतुक केल. तो आपल्या जागेवर जाऊन बसला. सर्वांच्या नजरा कित्येकवेळ त्याच्यावरच होत्या. मागे उभ्या आई बाबांना त्याचे कौतुक वाटतं होते.

थोड्या वेळाने सत्कार समारंभ संपला. त्या गर्दीत आकाश आपल्या हातातील पुष्पगुष्छ संभाळत शाळेतून बाहेर आला. सगळे विद्यार्थी त्याला आवर्जून बोलत होते, त्याच अभिनंदन करत होते. तेवढ्यात समोर आईला पाहून आकाश धावत तिच्याकडे गेला. आईला त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसू लागली होती. आपल्या मुलाचं एवढं यश पाहून ती भारावून गेली होती. बाबा एका कोपऱ्यात उभा राहून सगळं आनंदाने पाहत होते.

“चल आकाश, घरी जायचं ना आता !! ” आई त्याला मिठी मारत म्हणाली.
“हो आई एक पाच मिनिट !! मित्रांना सांगतो नी निघू आपण !!”
“बरं ठीक आहे !!”
आई आणि बाबा कारमध्ये जाऊन बसले. ते लांबूनच आकाशकडे पाहत होते.
“साधना आज त्याला ते गिफ्ट द्यायचं ना ??”
“तुम्हाला नाही वाटतं आपण त्या गोष्टीची जरा घाई करतोय ते !!”
” नाही ग !! उलट उशीर झालाय !! आजच्या या काळात त्याला या सगळ्यांसोबत चालायचं असेल तर त्याची गरज आहेच !!”
“ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा !! “
आई बाबा दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात.

“आपण भेटू रे लवकर !! असही अकरावी म्हणजे नुसता आराम आहे !! पुन्हा आहेच बारावी !!” आकाशचा मित्र दीपक आकाशला म्हणतो.
“पण लक्षात ठेव एकच कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायचं आहे हे विसरू नकोस !!”
“एकाच कॉलेज मध्ये ?? अरे तू ९८ टक्क्यावाला आम्ही सत्तरचे !! कसा मेळ बसायचा !! “
“ते बघू आपण ! आता! येतो मी आई बाबा वाट पाहतायत !! आणि सुश्या, पश्या, विक्या आणि धोल्याला सांग परवा सगळे भेटू म्हणून !! “
“हो नक्की “

आकाश गाडीत येवून बसला. गाडी घराकडे निघाली.
“आकाश आज तुझ्यासाठी गिफ्ट आहे बरं का ??”
“गिफ्ट माझ्यासाठी ??”
“हो!!” आई आकाशकडे पाहून बोलते.
“काय आहे सांगा ना गिफ्ट !!”
“घरी गेल्यावर कळेलच ना तुला !!”
“तरीपण सांगा ना !!” आकाश बाबांना विनवणी करतो.
“ना बेटा !! मग गिफ्टची मजा ती काय!!”
“असही घर यायला पाचच मिनिट राहिले आहेत !!”

आकाश कारच्या मागच्या बाजूस शांत बसतो. त्याला राहून राहून मनात आपण पुन्हा त्या शाळेत जाणार नाहीत याचं वाईट वाटतं होत. तो वर्ग , ते वर्गमित्र ,ते शिक्षक आणि तो शाळेचा परिसर त्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे जणू बोलवत होता. पण आता ती एक फक्त आठवण राहणार होती. त्याच्या मनात कुठेतरी.

आकाश आपल्या शाळेच्या आठवणींत रमला होता , तो राहुन राहुन आपल्या हातातील पुष्पगुच्छ पाहत होता.

“चला !! आलो घरी एकदाचे !! ” बाबा हातातील कारची चावी टेबलावर ठेवत म्हणाले.
तेवढ्यात आकाश भानावर आला. त्याला बाबांच्या गीफ्टची आठवण झाली. तो धावत त्यांच्याकडे गेला.
“बाबा गिफ्ट ??”
“आत्ता लगेच ??”
“हो मग !! “
“आकाश !!” मागून आई त्याला हाक मारते.
आकाश मागे वळून पाहतो. आईच्या हातात गिफ्टचा बॉक्स होता. आकाशने तो पाहताच खुश झाला. आईने हळूच तो त्याच्याकडे दिला. त्यावेळी त्या बॉक्समध्ये काय आहे हे पाहण्यासाठी आकाशची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याने पटकन तो बॉक्स उघडला आणि आश्चर्याने तो आईकडे बघत म्हणाला,
“मोबाईल ??”
“हो !! ” आई आनंदाने म्हणाली.
“बाबा मोबाईल “
“हो तुझ्यासाठी !! तुझ्या भविष्यासाठी !! हल्ली अस म्हणतात सगळं जग या एका मोबाईल मध्ये सामावल आहे !!”
“थॅन्क्स बाबा !!”
आई बाबा आकाशकडे फक्त पाहत होते. आकाश मोबाईल बघण्यात गुंग झाला.

“पण !! पण !! आकाश !!” बाबा आकाशच्या हातातील मोबाईल घेत म्हणाले.
“या मोबाइलच्या जगात तुला जे योग्य आहे , जे तुझ्या फायद्याचं आहे तेच घ्यायचं आहे हे लक्षात ठेव !! हा मोबाईल मी फक्त तुझ्या सोयीसाठी दिला आहे.”
“हो बाबा !! मी लक्षात ठेवेन हे सगळं !!

एवढं बोलून आकाश मोबाईल घेऊन आपल्या खोलीत निघून गेला. आई बाबांना आज त्याच्याकडे पाहून आनंद झाला. आकाश नव्या जगात पाऊल ठेवू लागला.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *