भाग १६
खरं प्रेम
आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले.
कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला.
“आक्या !! दोन दिवस झाले बघतोय !! तुझं वागणं जरा बदललंय बर का ??”
“म्हणजे ??” आकाश प्रश्नार्थक मुद्रेने पाहत म्हणाला.
“म्हणजे ?? काल कुठे होतास दिवसभर तू ??”
“काल !! अरे मित्रांकडे गेलो होतो !! “
“कोणत्या मित्रांकडे ?? आमच्या शिवाय अजून कोण आहेत मित्र तुला ??”
“अरे बार्शीहून आले होते !! “
“हा मग भेटायला घेऊन यायचं की आम्हाला पण !!”
सदानंद बोलत असताना मध्येच आकाशचा फोन वाजतो. आकाश बोलता बोलता फोन उचलतो,
“हॅलो !! कोण ??”
“हाय !! अरे निशा बोलते आहे !! चल येणार आहेस ना आजच्या ट्रीपला !! मी तुझ्या कॉलेज समोर आले आहे !! तीन वाजलेत”
“हो आलोच !! आलोच मी !!”
आकाश सदानंद सोबत बोलणं अर्धवट ठेवून पळत कॉलेज बाहेर गेला. समोर निशाला पाहून अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. नकळत तो तिच्याकडे पाहत राहिला.
“चल !! आधीच उशीर झालाय !!”
आकाश बाईकवर मागे बसून निघू लागतो, तेवढ्यात शेजारी त्याच्या गणेश येतो,
“काय भाई !! कुठे निघाली स्वारी ??”
“ये गग्या !! भेटतो तुला रात्री !! तेव्हा बोलू आपण !!”
आकाश आणि निशा बाईकवर निघून गेले. थोड्या वेळाने वाड्यावर पोहचले. तेव्हा समोर कर्णिक त्यांची वाटच पाहत होते. त्यांना पाहून ते लगेच म्हणाले,
“अरे किती उशीर !! “
“मी वेळेवरच आले होते !! आकाशच्या लक्षात नव्हतं बहुतेक आज यायचं !!”
कर्णिक लगेच आकाशकडे पाहत म्हणाले,
“काय रे आकाश !! एका दिवसात कंटाळलास का रे आम्हाला ??”
“नाही दादा !! अस काही नाही ! उलट मी सकाळपासून वाटच पाहत होतो यायची !! पण कॉलेज मध्ये मित्रांमध्ये लक्षात राहील नाही. “
“बरं बरं !! मी अरे मस्करी केली रे !! चला तर मग !! “
कर्णिक आणि सर्व मित्र त्यांच्या मागे मागे निघाले. खूप वेळ बाईकवर ते जात होते. नंतर एक घनदाट झाडी दिसताच ते थांबले. समोर त्या झाडीत ते चालत चालत लांब आले. त्यांच्या मागे सगळे मित्र येत होते. एका ठिकाणी एक छोटा पण सुंदर असा झरा वाहत होता. छोट्याश्या दगडांवरून तो खाली पडत होता. आणि त्या दगडातून वाट काढत काढत तो झरा पुढे जात होता.
“तर मित्रांनो आज आपण इथे सगळे मिळून एक सुंदर कथा वाचणार आहोत !!” आपल्या बॅगेतून कर्णिक यांनी दहा बारा पुस्तक बाहेर काढली.
त्याच्या शेजारी उभ्या एका मित्राने ती पुस्तके सर्वांना वाटली.
“ज्यांना जी जागा आवडेल त्यांनी त्या जागेवर जाऊन बसा !! जेवढं वाचता येईल तेवढं वाचा !! प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्या !! एकरूप होऊन जा त्या पुस्तकात !! आता इथून पुढे सर्वांनी एकह शब्द न बोलता पुस्तक वाचायला सुरुवात करा !! सूर्यास्त झाला की आपण इथून निघुयात !! ओके !!”
सर्वांनी आपल्या जागा धरल्या, निशा आणि आकाश समोरासमोर बसले. वाचनात मग्न झाले.
“खरच ती माझ्यावर प्रेम करत असेल का ?? पण हे मला कळणार तरी कसे ? हेच मला कधी कळत नाही. प्रियाच्या प्रत्येक शब्दात मला ती स्वतःकडे ओढते आहे, असच मला का वाटावं? पण प्रेम म्हणजे तरी नक्की काय ??” आकाश पुस्तकातील मजकूर मनातल्या मनात वाचत होता.
“तिच्या नाजुक ओठांवर माझ्यामुळे आलेलं हसू म्हणजे प्रेम आहे ना ?? मी तिच्या आठवणीत तिला पुन्हा भेटण्याचं वचन म्हणजे प्रेम आहे ना ?? ती रुसल्यावर तिला पुन्हा मनवण म्हणजे प्रेम आहे ना? खरच हे प्रेम आहे तरी कसे ??”
जयदत्त विचार करत असताना प्रिया त्याच्या समोर आली. तो तिच्याकडे पाहत राहिला. आणि ती क्षणात बोलून गेली.
“जयदत्त मला विसरून जा !! मी या जन्मी तुझी नाही होऊ शकत !! मी तुझ्या प्रेमाची कबुली द्यायला आतुर झाले होते !! तुझ्या डोळ्यात मी ते पाहिलं सुद्धा होत. पण आता मला ते शक्य होत नाही. मला विसरून जा !!”
जयदत्त काहीच बोलला नाही. तिच्या डोळ्यात त्याला फक्त ओढ दिसली. त्याच्यासाठी प्रेम दिसलं. पण ते प्रेम त्याला कधीच भेटू शकणार नव्हतं. पाठमोऱ्या तिला जाताना तो कित्येक वेळ पाहत राहिला.
“हो प्रिया !! मी तुझ्यावर प्रेम करतो. हे म्हणण्या आधीच तू मला त्याच उत्तर दिलं आहेस !! पण तरीही तू लक्षात ठेव मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करत राहील !! एखाद्याला मिळवणं हेच फक्त प्रेम नाही !! तर त्याच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्याच्यावर मनापासून प्रेम करणं !! यालाही प्रेम म्हणतात. तू आज जरी माझ्या समोरून निघून गेली असशील तरी मी तुझ्या येण्याची आयुष्यभर वाट पाहील !! प्रिया आयुष्यभर वाट पाहील !”
आकाश पुस्तकातील वाचून होताच समोर पाहू लागला. निखळ प्रेमाची व्याख्या त्याला कळली होती. सगळीकडे शांतता होती फक्त त्या पाण्याचा आवाज तेवढा होत होता. हळू हळू संध्याकाळ होत आली. तसे सर्व मित्र पुस्तक वाचून शांत एका ठिकाणी बसून होते. नकळत आकाशची नजर निशावर पडली. पुस्तक मिटताना तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आकाश क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला . खूप वेळ कोणीच काही बोललं नाही. सगळे आपल्यातच मग्न झाले होते. तेवढ्यात कर्णिक जागेवरून उठले, त्यांच्या हाती मात्र या सर्वापेक्षा वेगळच पुस्तक होत.
“झालं सगळ्यांचं वाचून ?? “
कोणीच काही बोलत नव्हतं.
“पुस्तक वाचून झाल्यावर मलाही असच झालं होत मित्रानो !! कित्येक दिवस मी विचार करत होतो की त्या प्रियकराने तिला अडवल का नाही ?? तो म्हणाला सुद्धा नाही की थांब नको जाऊस !! पण नंतर त्यातील सगळी गुपिते माझेच मला कळत गेली. ” कर्णिक पुन्हा शांत झाले . आणि थोड्या वेळाने बोलू लागले.
“मित्रानो स्त्री आणि पुरुष यांमधील खर प्रेम हे फक्त शरीर आकर्षण कधीच नसतं !! आणि जिथं असतं त्याला प्रेम नाही तर शरीराची भूक , वासना म्हणतात. खर प्रेम हे त्यागात असतं, त्याने तिच्यासाठी केलेला, किंवा तिने त्याच्यासाठी !! खर प्रेम हे नजरेतून कळत की त्याला तिला काय म्हणायचं आहे !! ती कधीही पुन्हा येणार नाही हे माहीत असूनही तो तिची वाट पाहतोय याला म्हणतात खर प्रेम !! “
कित्येक वेळ कर्णिक बोलत राहिले. सगळे फक्त ऐकत होते, खऱ्या प्रेमाची ओळख करून घेत होते. पुन्हा सगळे परतीच्या प्रवसाला निघाले. आकाश निशा सोबत बाईकवर निघाला. सगळे मित्र वाड्यावर आले. पुन्हा भेटण्याचे ठरवून सगळे आपापल्या घरी निघाले. आकाशला निशा हॉस्टेलवर सोडून गेली. सोडताना गंग्याने पाहिलं. आकाशला जवळ येताना पाहून तो म्हणाला.
“काय भावा !! हवा चालु आहे तुझी ?? कुठं जातोय पोरीला घेऊन काही कळू देत नाही !! “
“काही नाही रे गंग्या !! असच क्लास लावलाय तिथे जातोय !! “
“दिवस दिवस बाहेर असतो तू !! कोण आहे ते आयटम सांग की ?? लईच खत्रा माल दिसती !! आमचं जमतंय का बघ की कुठं ??” गंग्या मिश्किल हसत म्हणाला.
आकाशला क्षणात राग आला आणि त्याने गंग्याची कॉलर धरली आणि म्हणाला,
“काहीही बोलू नको गंग्या !! साल्या लाज कशी वाटत नाही तुला पोरींबद्दल अस बोलताना !!”
सदानंदने लांबून सगळं हे पाहिलं आणि तो धावत त्यांच्या जवळ आला.
“अरे ! अरे चाललंय काय तुमचं !! सोड आक्या !! भांडणं नका करू बर इथ !!”
आकाशच हे वागणं बघुन गणेशला राग आला. तो तडक खोलीत निघून गेला.
“काय झालंय एवढं ??”
“अरे !! लाज कशी वाटत नाही त्याला निशाबद्दल अस बोलायची !!”
“कोण निशा !! तुला बाईकवर घेऊन जाते ती ??”
“तुला कसं माहिती ??”
“सगळ्या कॉलेजला माहीत झालंय हे !!”
“कळलं तर कळलं !! मला नाही फरक पडत !! “
“प्रेमात पडलास की काय आकाश ??”
आकाश काहीच बोलत नाही सदानंद जे ओळखायचं ते ओळखतो.
“भाई मग सांगायचं ना मित्रांना ! त्याला तरी काय माहित असणार तुझ्या मनातलं !! “
“तरीपण त्याच बोलणं चुकलं !!”
“हो चुकलं रे !! पण भांडणं करून काही साध्य होणार आहे का?? “
आकाश आणि सदानंद त्यानंतर कॅन्टीन मध्ये गेले. त्यांनी जेवण केल. आकाशने सदानंदला सगळी हकीकत सांगितली.
“सद्या !! मला मनातून सुख मिळालं रे तिथ !! या जगाकडे ,प्रत्येक नात्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला या दिनेश दादांनी !! “
“अरे मग आम्हाला सांगायचं ना !! आम्ही थोडच तुला काही बोलणार होतो !!”
“कोणत्या तोंडान सांगायचं होत सांग ना ?? त्यावेळी ती ताकद ,तो दृष्टिकोन माझ्याकडे नव्हता. आज मला कळून चुकलं की आपल्यातल्या खऱ्या चुका याच आपल्या यशाच्या सर्वात मोठ्या बाधा आहेत. “
“वाह आकाश ! दोन दिवसात एवढा बदल !!”
“एकदा तू चल माझ्या सोबत मग कळेल तुला !!”
“नाही नको !! मी आहे तिथे सुखी आहे !! मुळात मी कोणत्या बंधनात अडकेल अस मला वाटत नाही. पण ज्या दिवशी अडकेल ,तेव्हा नक्की तुझ्या सोबत येईल !!”
“बरं !!” आकाश हसत म्हणाला.
सदानंद आणि आकाश दोघेही हॉस्टेलवर आले. खोलीत येताच समोर एक बॅग गणेश भरत होता. त्याला पाहून सदानंद म्हणाला.
“हे काय रे आता ??”
“मी खोली बदलतोय !! “
“काय ??” मध्येच सदानंद म्हणाला.
“होय !!”
” ये गंग्या !! एवढ्याश्या कारणावरून कोणी खोली बदलत का रे ??” सदानंद त्याला अडवत म्हणाला.
“एवढंस !!बर बर !!”
आकाश अचानक गंग्या समोर आला आणि त्याची बॅग धरत म्हणाला.
“भावा चुकलं माझं !! “
गंग्या काहीच बोलत नाही.
“ये गंग्या एकदा म्हणाला तो चुकलं म्हणून !!”
“नको भावा तुमचं काही !! मी वाईट आहे खूप कशाला उगाच माझा त्रास !!”
“गंग्या भावा !! खरंच चुकलं रे !! पण काय करू मी माझं प्रेम आहे रे तिच्यावर !! ती समोर आली की काहीच सुचत नाही मला !! आणि तिच्याबद्दल अस बोलला तू ते सहन नाही झालं मला !!”
गंग्या एकदम भावूक होऊन म्हणाला.
“ए ए !! आक्या !! भाई तुझं प्रेम आहे तिच्यावर ??मग तर खूप मोठी चूक झाली रे माझ्याकडुन !! मला माफ कर !!”
“नाही मला तू माफ कर !! मी खूप बोललो तुला !!”
“बस् बस् !! खूप झालं माफी पुराण !!”
तिघेही त्या रात्री कित्येक वेळ गप्पा मारत बसले. आकाश किती दिवसांनी मनमोकळेपणाने बोलत बसला.
कर्णिक यांच्या सोबत आकाश त्याच्या वर्तुळ या संस्थेसाठी आता मन लावून काम करू लागला होता. याकाळात त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी तो आता पुण्याला जाणार होता. त्यावेळी त्याच्यासोबत निशा सुद्धा यायला तयार झाली होती. आई बाबांना आता त्याचा अभिमान वाटू लागला होता. कारण आकाश पुन्हा दहावी नंतर आत्ता अभ्यासात चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाला होता.
तो आयुष्याचा प्रवास त्याला त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जाणारा होता.