भाग ११
दिवसा मागून दिवस निघून जात होते, रिझल्टची वेळ जवळ आली होती. पण आकाशला वेगळीच ओढ लागली होती,
“सायली सोबत गप्पा मारताना, तिच्या सोबत बाहेर कुठे असताना मला जणू एक पूर्णत्व येत. कोणतंही टेन्शन असू दे तिचा एक मेसेज तेवढ्यात आला तर सगळं टेन्शन कुठच्या कुठे निघून जात. पण हे तिलाही वाटतं असेलच ना?? तिलाही माझ्याबद्दल त्याच फीलिंग्ज असतील ना ?? उगाच नाही आम्ही दोघे एकमेकांत इतके गुंतून गेलो. पण मी माझ्या मनातलं सांगू तरी कस तिला, हेच मला कळत नाहीये !! ” आकाश विचार करत असतानाच सायलीचा त्याला मेसेज येतो,
“हाय !! बिझी आहेस का ??”
आकाश मेसेज पाहून रिप्लाय करतो,
“आता कसलं काम !! निवांत आहे. !!”
“तरीपण विचारावं म्हटलं !! असही मला कोण आहे दुसरं तुझ्याशिवाय बोलायला !!”
“का ?? कोणीच नाही ??”
“नाहीना !! “
“बर बर !!”
मेसेज टाईप करत असतानाच मध्येच दिपकचा फोन येतो. फोन उचलत आकाश बोलतो,
“बोल दिप्या !! “
“भाई परवा आपला रिझल्ट लागतोय !! “
आकाश हे ऐकताच क्षणभर शांत झाला. त्याला काय बोलावं काहीच कळेना,
“आकाश !! ऐकतोस ना ??”
“हा बोल बोल !! कोणी सांगितलं ??”
“टीव्हीवर बातमी आली सकाळीच !! यावर्षी म्हणे लवकर लागणार आहे निकाल !! “
“कन्फर्म ना ??”
“हो !! बरं ऐक उद्या आपण सगळे भेटतोय !! आपल्या शाळेच्या जवळचा कट्टा आहे ना तिथे !! ये वेळेवर !!”
“बरं येतो !!”
फोन ठेवताच आकाश पुन्हा मोबाईलवर चॅटिंग सुरू करतो. मेसेज टाईप करत असतानाच खोलीत बाबा येतात,
“ये आकाश !! परवा तुमचा रिझल्ट आहे म्हणे !!हे बघ टीव्हीवर सांगतायत !! “
“हो बाबा !! कळलय मला ते आधीच !!”
“बरं ऐक ना !! तुझा रोल नंबर !!बाकी डिटेल्स देऊन ठेव मला !! मला खात्री आहे तू बोर्डात नक्की येणार !! ऑफिस मध्ये सगळ्यांना रिझल्ट दाखवता येईल !!”
आकाश मोबाईल बाजूला ठेवत बोलतो,
“काही गरज नाही बाबा कोणाला रिझल्ट दाखवायची !!”
“अस काय करतोस !! देना !! ” बाबा आकाशची कॉलेज बॅग जवळ घेतात. वरच्या कप्प्यात त्यांना हॉल तिकीट सापडते.
“हेच आहे ना !!”
“हो बाबा !! पण मलाही डिटेल्स लागतील ना !!”
“काही गरज नाही !! मीच तुला रिझल्ट सांगतो !! “बाबा खोलीतून बाहेर जात म्हणाले.
बाबांनी हॉल तिकीट घेऊन गेल्यानंतर आकाशला अजून जास्त टेन्शन यायला लागत. व्यक्ती जगाला कितीही फसवू शकली तरी ती स्वतः ला कधी फसवू शकत नाही. असच काहीस आकाश सोबत झालं होत. रात्रभर तो झोपलाच नाही. त्याच्या मनात विविध विचार येऊ लागले. पण त्यातूनही सायली आणि त्याची चॅटिंग काही थांबली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आकाश अंघोळ करून, नाष्टा करून आपल्या खोलीत येऊन बसला. आई बाबांशी बोलणं त्यानं टाळल. पण आई बाबाना मात्र त्याच्या रिझल्ट बद्दल खूप उत्सुकता होती. आकाशच्या आयुष्यातील हे नवे वळण आहे अस त्यांचं मत होत.
आकाश खोलीत बसून मात्र गेम खेळण्यात दंग झाला होता. दिपकचा फोन आला तेव्हा त्याच्या लक्षात आल की आज त्यांना भेटायचं होत. धावत पळत आकाश आवरून मित्रांना भेटण्यासाठी निघतो. जाताना बाबांना आणि आईला यायला उशीर होईल म्हणून सांगतो. शाळेच्याजवळ असलेल्या कट्ट्यावर आकाश येऊन पोहचतो. दिप्या सुश्या ,पक्या आणि खूप दिवसांनी आलेला मित्र मंदार त्याला भेटतो.
“मग मंदार !! खूप दिवसांनी हा !! कुठे असतोस हल्ली !!” आकाश समोर ठेवलेली कॉफी पित म्हणाला.
“बाहेरगावी गेलो दहावी नंतर शिकायला !! त्यामुळे कोणाशी भेटणं होतंच नाही !! तुम्ही सगळे नेहमी भेटता अस दिप्या म्हणाला!! म्हणून आज आवर्जून त्याला म्हटलं भेटुयात !!”
“ओके !! पण बर वाटलं भेटून !! आमचं काय !! सगळे आम्ही शाळेतून वेगळे झालो पण मैत्री तशीच अजूनही !! काय रे दिप्या !!”
आकाश दिपकला डिवचत म्हणाला. दीपक मात्र मोबाईल मध्ये चॅटिंग करत असतो.
“बाकीचे कोण कोण आहेत अजून काँटॅक्ट मध्ये ??” मंदार आकाशकडे पहात म्हणातो.
“बाकीचे बघ ,इथे आहेत ते तुम्ही सगळे !! बाकी मुलीत म्हणशील तर नेत्रा, दीप्ती आणि हो सायली एक !!”
“सायली तर सगळ्यांच्या काँटॅक्ट मध्ये आहे !!”
मंदार अस म्हणताच आकाश क्षणभर गप्प बसतो. शेजारी बसलेल्या दिपकचा मोबाईल हातात घेत त्याला बोलतो,
“आम्हाला भेटायला बोलावून तू स्वतः चॅटिंग करत बसलाय ! याला काय अर्थ आहे !! बघू तरी कोणाला बोलतोयस !!”
आकाश मोबाईल मध्ये पाहतो. सायलीच नाव ऐकून चकित होतो. दिपककडे पहात म्हणतो,
“सायली ??”
“हा ना भाई !! आज गेली बॉयफ्रेंडला भेटायला !! तिला ये म्हटलं होत तर काहीही कारण सांगते म्हणून जरा खीचाई करत होतो !!”
आकाश दिपकने जे सांगितल ते ऐकून चकित झाला. त्याला दिपकच्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्याला गुदमरल्या सारखं वाटायला लागलं. पण त्याला दीपक बोलतोय यावर अजूनही विश्वास बसत नव्हता.
“काहीही काय बोलतोय दिप्या !! सायली चांगली मुलगी आहे रे !!”
दीपक जोरात हसला आणि आकाशच्या हातातील मोबाईल घेत त्याला दाखवू लागला,
” हे बघ !! त्यांचे फोटो !! हा त्यांच्या कॉलेज मधला !! हा त्यांच्या पार्टीतला ! क्लासमेट आहे तिचा गेली दीड वर्ष झाली रीलेशनशिप मध्ये आहेत ते !! “
आकाश शांत होऊन सगळं ऐकत होता.
“बघू रे फोटो !! ” समोर बसलेला मंदार मोबाईल घेत म्हणाला.
“मध्ये भेटायला आली होती तेव्हाच ओळखल मी !! म्हटलं उगाच नाही ही पोरगी आपल्याला सारखं भेटायला या म्हणत !!”
“म्हणजे !” पक्या मध्येच विचारतो.
“अरे त्यानिमित्ताने त्याला भेटायला जाता येत ना हिला!! आधी काय करायची आपल्याला भेटायची!! आणि मग त्याच्याकडे जायची !! “
“भारीच की !! पोरगी लई पुढची निघाली राव !!” पक्या हासत म्हणाला.
“मला आधी वाटलं या आकाश सोबतच हीच काहीतरी आहे !! पण नंतर सगळा घोळ लक्षात आला !!”
“मलापण आधी तसच वाटलं होत बरं का !! पण डायरेक्ट कस विचारू म्हणून बोललो नाही !!” मंदार मध्येच बोलला.
“बरं घरी तिला नीट बोलता येत नाही, चॅटिंग करता येत नाही !! म्हणून ही शहाणी काय करते माहिती का ?”
“काय काय ??” पक्या उत्सुकतेने विचारतो.
“ही आपल्याला पण चॅटिंग करत बसते!! चार पाच मित्रांसोबत चॅटिंग केली आणि जरी घरच्यांनी पहिली तरी त्यांना वाटत मित्रांशी बोलत बसते म्हणून !! त्या दिप्तीला विचार की तिला तर फुल्ल पिडते !!”
दीपक सगळं मजा घेत सांगत होता.
“पण दिप्या हे सगळं तुला कस माहिती ??मला नाही वाटत तिने तुला हे सगळं सांगितलं असेल म्हणून !!” पक्या म्हणतो.
आकाश मात्र गप्प बसून सगळं ऐकत होता.
“अरे काय झालं !! एक रात्री चॅटिंग झाली आणि मी गुड नाईट म्हणालो!! तर ही समोरून म्हणे गुड नाईट लव यू टेक केअर !! बरं थोड्या वेळाने पुन्हा तिचाच मेसेज आला सॉरी दीपक चुकून तुला लव यू सेंड झालं !! बर मग मी म्हटलं , खर खर सांग कोणाला पाठवणार होतीस !!मी कोणाला काही म्हणणार नाही , आणि नाही सांगितलं तर हा स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकेन !! तेव्हा कुठं सगळं मला कळलं !!”
आकाशने हे सगळं ऐकताच त्याच्या जणू पायाखालची वाळूच सरकली, तो कोणालाही काहीच बोलला नाही , तडक तो घरी निघून येतो,आपल्या खोलीत स्वतः ला कोंडून घेतो.
“किती मूर्ख आहे मी !! खरच मला आता काय करावं काहीच कळत नाहीये !! मुर्खासारख त्या सायलीवर मी प्रेम करायला लागलो होतो. पण खरतर यात माझी काय चूक ?? ” आकाशला हे सगळं ऐकून राग अनावर झाला. त्याच्या मनात कित्येक विचार येऊ लागले.
“दिवस बघितला नाही !! रात्र बघितली नाही या सायलीला बोलताना मी !! सतत मिस यू म्हणणारी!! आयुष्यात प्रत्येक गोष्ट पहिले मी तुलाच सांगते अशी म्हणणारी ती माझी सायली असूच शकत नाही !! पण मग ते फोटोज् खोटे नाहीत ना बोलत ! !! नाही नाही नाही !! आकाश तू चुत्यात निघाला आहेस !! तीच गोड बोलणं हे तिच्या स्वार्थासाठी होत आकाश !! फक्त ती तिचा स्वार्थ बघत होती!! तू मूर्ख आहेस जो तिच्या गोड गोड बोलण्याला भुललास !! “
आकाशच्या डोळ्यात पाणी होत. तो बेडवर पडून विचारात मग्न होता.
विचारांच्या तंद्रीत असताच मेसेज टोन वाजते, आकाश मेसेज पाहतो,
“हाय !! आज मी नाही येऊ शकले भेटायला !!घरी आई बाबांनी सोडलच नाही मला !! “
आकाश मेसेज वाचून मोबाईल ठेवून देतो. पुन्हा मेसेज येतो,
“बिझी आहेस का ??” आकाश पुन्हा मेसेज वाचून ठेवून देतो.
“सांग ना ??”
आकाश रागात बेडवर उठून बसतो आणि टाइप करायला लागतो,
“का करू मी रिप्लाय !! कोण आहेस तू माझी ??”
“म्हणजे ??” सायली लगेच रिप्लाय करते.
“आपल्यात नात कोणतं ??”
“मैत्रीचं !!”
“मैत्रीचं !! दिवस रात्र चॅटिंग करत बसायचं !! मिळेल तेव्हा भेटायचं !! सतत डोक्यात बोलणं एवढच ठेवायचं !! आणि फक्त मैत्री ??”
” हो !! मग अजून काय असणार !!”
“सायली मी डायरेक्ट बोलतो !! आय लव्ह यू !! तुझही माझ्यावर प्रेम असेलच ना?? नाही कारण सारखं मला मिस करत असतेस म्हणून विचारलं ??”
आकाशचा मेसेज वाचून सायलीने कित्येक वेळ रिप्लाय केलाच नाही. आकाश मात्र वेड्यासारखं तिच्या रिप्लायची वाट पाहत राहतो. या सगळ्या भानगडीत रात्र केव्हा होते त्यालाही कळतं नाही. बाबा खोलीत येऊन त्याला जेवायला चल म्हणून आग्रह करतात. पण आकाश काही केल्या जात नाही. त्याच्या मनातून दिपकने सांगितलेलं जाता जात नाही. ते शब्द त्याला पुन्हा पुन्हा आठवत राहतात. पण आकाश मात्र अजूनही मनातून सायलीच्या होकाराची वाट पहात राहतो. त्याला मनापासून वाटतं की दिपकने सांगितलेलं सगळं खोटं असावं. सायलीने मनापासून माझ्यावर प्रेम करावं हेच त्याला वाटत राहतं.
मध्यरात्र झाली तरी आकाश जागाच होता. दोन दिवस झाले त्याने नीट झोपही घेतली नव्हती, पण उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीन खोटं बोलून आपल्याला फसवल याची खंत त्याला काही झोप येऊ देत नव्हती. एकटक तो खिडकीतून बाहेर पाहत विचारत करत बसतो, आपण किती मुर्खात निघालो याच विचारात असतानाच मोबाइलमध्ये मेसेज येतो,