भाग १०
दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सकाळी लवकर उठतो, अभ्यास करतो. पेपरला लवकर जातो. पण मनात सायलीला भेटायला जायचं हे ठरवून जातो. काल सारखेच एक वर्गशिक्षक येतात. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देतात. आकाश पेपर लिहू लागतो. पण त्याच लक्ष पुन्हा पुन्हा मनगटावरच्या घड्याळात राहत. त्याला लवकर पेपर लिहून सायलीला भेटायला जायचं होत. तिचा पेपर सुटण्या अगोदर त्याला तिथे पोहचायच होत. जे येत ते लिहून त्याने पेपर पूर्ण केला. फक्त म्हणण्यासाठी पेपर पूर्ण केला. चूक की बरोबर याचा कोणताच विचार त्याने केला नाही. आलेला पेपर फक्त दिला एवढंच त्यातून वाटतं होत. शेवटची पंधरा मिनिटे राहिली, बेल होताच आकाशने पेपर वर्गशिक्षक यांच्याकडे दिला आणि धावत तो कॉलेजमधून बाहेर पडला. त्याच्या कॉलेजपासून सायलीचे कॉलेज दहा ते पंधरा मिनिटांवर होत. आकाश धावत कॉलेजच्या गेटवर येतो. त्याला सेक्युरिटी गार्ड काही केल्या कॉलेजमध्ये सोडत नाही. तरीही तो वाट पाहत राहतो थोड्या वेळात पेपर संपल्याची घंटा वाजते. त्यानंतर काही वेळात सायली गेटमधून बाहेर येताना त्याला दिसते. तिच्या जवळ जात आकाश तिला हाक मारतो,
“सायली !!”
सायली मागे वळून पाहते, समोर आकाशला पाहून आश्चर्यचकित होते क्षणभर पाहत बसते आणि बोलते,
“आकाश !! तू आणि इथ ??”
“हो मग !! कालपासून मी तुला किती मेसेज करतोय !! एकाही मेसेजचा रिप्लाय नाही ना काही नाही !!”
सायलीच्या मैत्रिणी तिच्याकडे पाहू लागतात. तिच्या ते लक्षात येताच ती आकाशला घेऊन बाजूला येते,
“पेपर आहेत आकाश !! अभ्यास नको करायला !! की चॅटिंग करत बसायचं !!”
“माझेही पेपर आहेत म्हणलं !! ” आकाश नाराज होत म्हणाला.
“हो आहेत ! पण तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे !! तू हुशार आहेस !! माझं अस नाहीना !! “
“काहीही !! सरळ सांग ना बोलायचं नव्हतं म्हणून !! “
“अस का म्हणेन मी आकाश !! “
“हो मग एक मेसेज करायला काय झालं होत !! सांगायचं उद्या पेपर आहे अभ्यास करत होतीस म्हणून !!”
“आकाश काल मी कोणालाच बोलले नाहीये !! विचार हवं तर माझ्या मैत्रीणीना !!”
” त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही का ??”
“म्हणजे ??” सायली आकाशकडे पाहत म्हणाली.
“काही नाही जाऊदे !! भेटावसं वाटलं म्हणून आलो !!बाकी काही नाही !!”
“पेपर एवढ्या लवकर सुटला तुझा ??”
“हो ! लवकर झाला पूर्ण म्हणून आलो लवकर !! “
“छान !! बरं चल निघते मी !! बोलुयात आपण नंतर !! “
सायली आकाशकडे न पाहताच निघून गेली. आकाश तिच्याकडे पहात राहिला. त्याला पुढे काय बोलावं काहीच सुचेना. त्याच्या मनात सायली आपल्याशी इतकी रुक्ष का वागली हेच होत. घरी आल्यावरही आई बाबांशी बोलताना त्याच्या मनात सायलीचाच विचार घोळत होता. उद्या कोणता पेपर असेल हेही तो आता विसरून गेला होता. त्यानंतर सायली जवळजवळ आकाशला चॅटिंगवर एकही शब्द बोलली नाही. तिने फक्त त्याचे मेसेज वाचले. परीक्षेचे हे दिवस असेच गेले. आकाश परिक्षेपेक्षा सायली आणि तिचा तो अबोला यातच जास्त गुरफटून राहिला. त्याच्या मनात मात्र नाना प्रकारचे विचार येऊ लागले,
“कालपरवा पर्यंत मला सारखी बोलणारी सायली अचानक मला का बरं बोलत नसेल. त्या दिवशी मी तिच्या कॉलेजवर जाऊन चूक तर नाहीना केली? कदाचित त्याचाच तिला राग आला असणार. पण मग मी तरी काय करू?? मला नाही राहावत आता तिच्याशिवाय कस समजावून सांगू तिला की माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते !! पण अशी ती गप्प बसल्यावर मी बोलू तरी काय आता ??”
आकाशच्या या विचारात त्याची एक्झाम दिवस न दिवस पुढे सरकत केव्हा संपली त्यालाही कळलं नाही. आता त्याची एन्ट्रांस एक्झाम साठी तयारी सुरू झाली. परीक्षेनंतर महिना उलटून गेला. एका सकाळी त्याला दीपकचा फोन आला,
“बोल दिप्या !! “
“काय भाई ! झाली ना एक्झाम !! फोन नाही अजून !! आहेस कुठे ??”
“एन्ट्रांस एक्झामची तयारी करतोय !!”
“आहेच का अजुन !! छान !!”
“बोल ना कशाला फोन केलास ते ??”
“अरे आज सगळे भेटणार होतो आम्ही, म्हटलं येणार का विचाराव !!”
“कोण कोण आहेत ??”
“सगळेच !! मी पक्या , सायली , सुश्या आणि आपले अजून दोघे तिघे मित्र येतायत दहावीचे !!”
“मी नाही येत दिप्या !! मला नाही जमणार !!”
“का रे भाई !! ये ना एका तासाने काय फरक पडतो !!”
“नाही नको दिप्या !!तुम्ही करा एन्जॉय !! “
आकाश फोन कट करतो. त्याच्या मनात जायची खूप इच्छा असूनही तो जात नाही. रात्री आई बाबांसोबत तो जेवण करायला बसतो, अबोल राहतो, बाबांना ही गोष्ट लक्षात येते जेवण करता करता ते त्याला विचारतात,
“आकाश ! झाली ना रे परीक्षा आता !! मग आता कसलं टेन्शन घेतोस ?”
“कसलं टेन्शन ??” आकाश नजर चोरत बोलतो.
“मग हल्ली मी पाहतोय तू गप्प गप्प असतोस !! जास्त कोणाला काही बोलत नाहीस !! आपल्याच खोलीत सारखा पडून असतोस. “
“अस काही नाही बाबा !! एन्ट्रांस एक्झाम जवळ आली आहे ना !! त्याच थोड मनात चालू होत!!”
“त्यात काय होत मग !! तू हुशार आहेस !! होईल सगळं ठीक !! बाकी प्रेमात वैगेरे नाहीस ना पडला कोणाच्या ??” बाबा मिश्किल हसत म्हणाले.
“प्रेमात आणि मी !! ” आकाश चकित होऊन बाबांकडे पाहत राहतो.
“हो मग !! अस म्हणतात की एका वयानंतर बाप लेकाच नात हे दोन मित्रांसारखं असावं!! त्यामुळे तस काही असेल तर मला नक्की सांग बर !!”
“काहीही काय बाबा ! अस काही नाहीये !! “
आकाशला खरतर बाबांच्या या बोलण्याने मनाला धीर दिल्यासारख वाटलं. आपले बाबा आपल्याला समजून घेतात याची जाणीव त्याला झाली.
रात्री आपल्या बेडरूम मध्ये आल्यानंतर आकाश मोबाइलवर गेम खेळत बसला. त्याच्या समोर पुस्तके तशीच पडून होती. गेम खेळून झाल्यावर मोबाईल बाजूला ठेवत असताना मेसेज टोनने त्याच लक्ष पुन्हा मोबाईलमध्ये गेल, मोबाईलमध्ये पाहताच त्याला क्षणभर आनंद , सायलीचा त्याला मेसेज आलेला होता.
“आज तू भेटायला का आला नाहीस ??”
आकाश मात्र मेसेज पाहूनही खूप वेळ रिप्लाय करत नाही. पण पुन्हा सायलीचा त्याला मेसेज येतो,
“खूप दिवस झाले बोलणं झालं नाही आपलं !! आणि त्या दिवशी कॉलेज समोर तुझ्याशी मी खूप रुडली बोलले ! पण एक्झाम मध्ये मला बोलताच आल नाही. मला माहित होत तू मला भेटायला आलास पण माझ्या अश्या वागण्यामुळे तुला नक्कीच हर्ट झालं असणार ते !! एम रिअली सॉरी !”
आकाश मेसेज वाचून म्हणतो, आज आठवण आली का माझी , मी नाही रिप्लाय करणार,पण पुन्हा मेसेज येतो,
“एक्झाम संपल्यावर मी तुला फोन करणार होते ! पण म्हटलं प्रत्यक्ष भेटून तुझा राग घालवावा ! आज तेच मी ठरवलं होत !! पण तू आलाच नाहीस !! प्लिज रिप्लाय कर !!”
आकाश न राहवून मेसेज टाईप करू लागतो,
“राग येणार नाही तर काय होईल सांग ना !! अस अचानक बोलायचं बंद केल्यावर मी काय समजायचं ??”
“मी म्हटलं ना माझं चुकलं म्हणून !!”
“सारखं नकोस माफी मागुस !! पण मला सांग माझी काय अवस्था झाली होती माहितेय तुला !! कुठच लक्ष लागत नव्हतं माझं !! “
“आता लागेन ना लक्ष ??”
“नाही माहित मला !! पण अस एकदम बोलणं बंद केलंस तर काय करणार मी !!”
“बरं जाऊदे !! आता आपलं सगळं पूर्वीसारखं असू दे !! बेस्ट फ्रेंड्स सारखं !!ओके ??” सायली प्रेमाचे इमोटिकॉन पाठवत विचारते.
“ओके !! ” आकाश स्माईलचे एमोटिकॉन पाठवत म्हणाला.
त्या दिवसापासून आकाश आणि सायली पुन्हा पहिल्या सारखे रात्रंदिवस मोबाईलवर चॅटिंग करू लागले. आकाशही जुन्या गोष्टी विसरून सायली सोबत बोलू लागला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची एन्ट्रांस एक्झाम झाली. आता फक्त त्याला त्याच्या रिझल्टची चिंता लागली होती. पण तेही तो सायली सोबत बोलत विसरून जात होता. आज तिला मनातले सांगेन उद्या तिला मनातलं सांगेन यातच त्यांचे दिवस जात होते. आता दोघे चोरून कोणालाही न सांगता कॉफी प्यायला भेटत होते. जणू दोघांचे एक वेगळच जग तयार झाले होते.
सगळं काही ठीक चालू होते. पण आकाशला एक चिंता राहून राहून वाटत होती आणि ती म्हणजे त्याच्या निकालाची, पाहता पाहता निकालाचे दिवस जवळ येऊ लागले. आई बाबा आकाशच्या भविष्याचा विचार करू लागले, कोणत्या कॉलेज मध्ये जायचं , पुढे पदवीचे शिक्षण कोणत्या शहरात करायचं, पण आकाश यापासून वेगळाच होता ,कारण तो आता सायलीच्या जगात हरवून गेला होता, सायली सोबत चॅटिंग, मोबाईलमध्ये पोर्न व्हिडिओज पाहणे आणि त्यानंतर हस्तमैथुन करून आपल्या शरीराला सुख देणे यामुळे आकाश अनिभिज्ञ होता आपल्या वास्तवापासून, पण तरीही ती चिंता त्याची पाठ सोडत नव्हती, कारण ते सत्य होते.