लोक काय म्हणतील !! या एका वाक्यात आपण कित्येक वेळा आपल्या मनातील गोष्टी करतच नाहीत. मला ते करायचं होत पण लोक काय म्हणतील म्हणून मी ते केलच नाही असे म्हणत किंवा मनात असेच विचार ठेवून राहणारे कित्येक असतात. आजही या गोष्टीचा परिणाम आपल्या मनात होताना दिसतो. मला आजही अनुभव येतात. आपण कित्येक नवीन गोष्टी करताना पहिले लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसतो. आणि आपण आपल्याच मनाला मुरड घालत राहतो.
खरंतर लोक काहीच म्हणत नसतात किंवा माणसांना काही म्हणायच ही नसत पण आपलेच मन कित्येक तर्कवितर्क काढत बसते आणि जे करायचं ते राहून जात. मला वाटतं याचा विचार खरंच करणं तितकं बरोबर नसत. मी परीक्षेत नापास झालो, मग लोक काय म्हणतील असे आपण विचार करत बसतो किंवा आपले मित्र पास झाले याचा. खरं तर याचा विचार करत बसण्या पेक्षा आपले मित्र आभ्यासात आपल्या पेक्षा कुठेतरी पुढे आहेत आणि आपल्याला अजुन तयारी करायला हवी आणि त्या कामाला लागले पाहिजे . कारण पुढे तुम्ही यशस्वी झाल्यावर हेच लोक तुमची स्तुती करणार हे मात्र खरं. मनातल सांगताना किंवा एखादी गोष्ट करताना आपण स्वतःचा विचार करायला हवा असे मला वाटते. लोक काय म्हणतील म्हणून आजही कित्येक स्वप्न मनातच राहून जातात. चार ओळी सुचल्या आणि त्या कशाही असो मला त्या मांडता आल्या याच मनाला कौतुक असायला हवं. कारण आपण व्यक्त झालो याला महत्त्व असतं.
लोक काय म्हणतील जर मी हे केलं तर, अस जर कित्येक थोर विचारवंत म्हणत बसले असते तर त्याचे विचार आज आपल्या पर्यंत आलेच नसते. वेडात विर दौडले सात!! यांनी विचार नाही केला लोक काय म्हणतील याचा, स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज असेच विचार करत बसले असते तर हिंदवी स्वराज्य मनातच राहील असतं. सावरकरांनी समुद्रात उडी मारण्या आधी लोक काय म्हणतील याचा विचार केला असता तर !! असे कित्येक उदाहरण देता येतील. तुम्ही जे करता त्याला लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं नसत तर महत्त्वाचं असत ते तुम्ही किती मनापासून ती गोष्ट करता आहात याच.
खरंतर तुम्ही कित्येक गोष्टी पाहू शकता ज्या पहिले दिसायला खुप छोट्या दिसतात पण ती करण्याची ताकद त्या गोष्टी मोठ्या करते. कित्येक विद्वान , कित्येक महापुरुष यांनी या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टींना सुरुवात केली आणि ते मोठे झाले. कारण त्यांची त्या कामा बद्दल तेवढी तळमळ होती.
आपण लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण जे करणार आहोत त्याबद्दल आपली शक्ती, आपली चिकाटी किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जे विचार मांडत आहात तेच लोक ऐकतील पण जर तुम्ही लोकाचं ऐकत बसलात तर तुम्ही फक्त ऐकत राहाल. आज इतिहासाचे कित्येक पाने उलटून पाहिल्यावर आपल्याला असे दिसेल की कित्येक अशक्य गोष्टी शक्य झाल्या. कारण त्यांचा स्वतःवर जास्त विश्वास होता. लोक किंवा समाज हा तुम्हाला दोन्हीही बाजूने बोलेल, फक्त फरक एवढाच असतो की कधी तुमच्या बाजूने बोलणारे जास्त असतील आणि कधी तुमच्या विरोधात बोलणारे जास्त असतील. पण जे बोलतात त्याच मत कधीच होऊ शकत नाही ती एक प्रतिक्रिया असू शकते. विरोध किंवा सहभाग होतच राहणार पण यात आपलं मत खोडून जाता कामा नये. कारण तुम्हाला तुमचं मत असणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला विरोध होईल किंवा सहभागही असेल पण लोक काय म्हणतील म्हणून आपण आपल्या मनाला मुरड कधीच नको.
शेवटी कसं असत , आपण जे करतो त्याला महत्त्व असतं. या लोकांच्या समूहात तुम्ही नक्कीच छान राहाल पण स्वतःच अस्तित्व हवं असेन तर याच समाज, लोक यांचा काय म्हणतील हा विचार मनाला कधीच स्पर्श करू द्यायचा नसतो. नाहीतर तुम्ही फक्त तेच करू शकाल जे हा समाज ही लोक बोलतील, तुमचं स्वतःच अस मत काही उरणारच नाही. शेवटी विचार आपणच करायाचा असतो लोकांनी नाही …!!
✍योगेश खजानदार