FavoriteLoadingAdd to favorites

दिवे लागणीला पूर्वी घरात आई शुभंकरोती म्हणायला लावायची. टीव्ही बंदच असायचा. कारण त्यावेळी फक्त एक चॅनल असायचं आणि तासभर जरी टीव्ही पाहिला तरी मनभर आनंद भेटायचा. पण संध्याकाळी सहसा बाहेर जाण्याचा विचार असायचा. एकतर देवाच्या मंदिरात, नाहीतर मग मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणं, पण संध्याकाळ मात्र टीव्ही पाहत बसणे अशी कधीच नव्हती. घरातल्या स्त्रिया एकतर आपल्या शेजारीण किंवा बाहेर आपल्या मैत्रिणींशी, किंवा बाकीच्या स्त्रियांशी गप्पा तरी मारत असायच्या, नाहीतर बाहेर कुठे फिरायला जायच्या. सहसा मुलांना घेऊन बागेत जाणं त्यांना जास्त आवडायचं त्यामुळे संध्याकाळ म्हणजे नुसता गोंधळ , मज्जा , मस्ती असायची. अंधार झाला की घरी यायचं. मग मुल अभ्यासाला लागायची , शाळेत दिलेला गृहपाठ करायची.आणि घरातील गृहिणी स्वयंपाक करायच्या, घरातल्या इतर सदस्यांशी गप्पा मारायच्या. कित्येक स्त्रिया तर मुलांना स्वयंपाक करत करत शिकवायच्या सुद्धा, आणि मग रात्री एकत्र जेवण. अशी ही सुंदर संध्याकाळ आठवली की खरंच छान वाटत.

Join 7,735 other subscribers

त्या नंतर टीव्ही या क्षेत्रात क्रांती झाली आणि एका चॅनल वरून अक्षरशः शेकडो चॅनल्स नवीन आली. पूर्वी ही क्रांती काही मोठ्या शहरांन पुरतीच होती. पुन्हा त्यात डिश हा प्रकार आला आणि ही शेकडो चॅनल्स खेड्यापाड्या पर्यंत पोहचली. प्रगती झाली यात आनंद आहेच. पण या मार्फत मालिका नावाचं एक व्यसन प्रत्येक घरात शिरलं. खासकरून स्त्रियांना याची सर्वाधिक लागण झाली. व्यसन हा शब्द आपण सहसा दारूच व्यसन , सिगरेटच व्यसन असं गृहीत धरतो. पण हे ‘मालिकेचं व्यसन’ खूप लोकांना accept करुन घेणं थोड अवघड जाईल हे मात्र नक्की. पण याला व्यसन का म्हणायचं याची काही कारणही आहेत. जसं की, एखाद्या मालिकेत स्वतःला एवढं हरवून घ्यायचं की समोर कोण आलं गेलं तरी कळतं नाही, एखाद दिवशी मालिका पाहणं जमलं नाही तर उगाच बैचेन होणं, त्या मालिकेतील गोष्टींचा विचार करत बसणं, पुढं काय होईल याबद्दल आपल्या मैत्रिणी सोबत चर्चा करत बसणं, एखादा दुःखद प्रसंग मालिकेत झाला तर स्वतःही उदास होणं. या सगळ्या गोष्टी व्यसन म्हणाव्या नाहीतर अजून काय म्हणायचं हे जाणकारांनी सांगावं. जसं की , दारूडाल्या दारू नाही मिळाली की तो बैचेन होतो , चिडचिड करतो, तसच काहीस या मालिका नावाचं व्यसन लागलेली माणसं करतात.

या मालिका एपिसोड वर एपिसोड्स दाखवतात ,पण यामध्ये, पहिल्या भागाचा आणि सद्य भागाचा काडीचाही संबंध नसलेल्या या बिनबुडाच्या मालिका पाहत बसणं कितपत योग्य आहे, याचा ज्याने त्याने विचार करावा हे मात्र नक्की. त्यातून आपल्याला घेण्यासारख काय आहे याचाही विचार करावा. वाद विवाद , अनैतिक संबंध, नवरा बायको यांचे वाद, कुरघोडी, मारामारी ,अपमान द्वेष , मत्सर या असल्या विचारांच्या मालिका पाहत बसणं म्हणजे आपल्या विचारांना तिलांजली दिल्या सारखं आहे. आपणही आता यांच्या सारखा विचार तर करत नाहीत ना .!! याचाही विचार करण्याची वेळ आता आली आहे. खासकरून स्त्री वर्गाने याचा विचार मनापासून करावा. फावल्या वेळेत एखादी आपल्याला , आपल्या मनाला आनंद देणारी, काहीतरी आपल्याला नवे चांगले संस्कार शिकवणारी मालिका पाहावी हे मात्र नक्की. पण एकच मालिका, ती दिवसभरात केव्हाही फावल्या वेळात. कारण मनोरंजन आणि व्यसन यात फरक आहे.

आज ते व्यसन एवढं वाढलं आहे की , स्त्रिया संध्याकाळचा स्वयंपाक सकाळीच करून ठेवू लागल्या आहेत, का तर ..!! संध्याकाळी मालिका पाहताना व्यत्यय नको, कोणी मोबाईल बंद करून मालिका पाहू लागल्या , लाईट गेली तर ऑनलाईन मालिका पाहू लागल्या , रिपीट टेलिकास्ट पण तेवढ्याच उत्सुकतेने पाहू लागल्या , एक मालिका संपली तर दुसरी लगेच , एका मालिकेने निरोप घेतला , तर लगेच दुसरी , पण मालिका बघायचं काही सोडायला तयार नाहीत. मग त्यात काय दाखवतात याच्याशी काहीएक घेणं देणं नाही. कोणी आले काय, गेले काय ,काही कळत नाही. त्यामुळे असल्या टुकार मालिका पाहत बसण्यापेक्षा एखाद उत्तम पुस्तक वाचणं केव्हाही चांगला पर्याय ठरू शकतो. पण खेड्यापाड्यांत ही हीच परिस्थिती झाली. मोठ्या शहरातल्या लोकांन सारखे खेड्यातही दिवसरात्र दरवाजे लोटून घेऊ लागले. चावडीवर पोर दिसेनाशी झाली. स्त्रिया टीव्हीला एवढ्या चिकटल्या, की कोणाशी बोलणं सुधा लवकर होईना किंवा अस म्हणा की दुसरं काही दिसतच नाही. सगळी एकलकोंडी झाली.

तुम्ही मनाला विचारा, खरंच आता ती संध्याकाळ तेवढी रम्य राहिली का? उत्तर तुम्हाला नक्की मिळून जाईल. या मालिकेच्या नादात आपण सुंदर सूर्यास्त गच्चीवर जाऊन पाहणं ही विसरलो , आपल्याच मुलांचं संगोपन करणं विसरलो , मुल आपल्यालाच उद्धट बोलू लागली त्याच मालिकेतल्या लोकांसारख, सासू सूना एकमेकांना त्याच नजरेतून पाहू लागल्या, संध्याकाळ एकटी झाली. असं वाटत की आपण स्वतःला हरवून बसलो आहोत, या नाटकी दुनियेत , या कित्येक चॅनल्सच्या नादात, आपण विचारशून्य झालो आहोत. पण यात फायदा आपला काहीच नाही, आपल्या अमूल्य वेळेची नासाडी एवढंच झालं. आपल्या नादात, व्यसनात चॅनल्स पैश्यात खेळू लागली, एकाची दोन चॅनल्स करू लागली आणि आपण टीव्हीचे हाफ्ते फेडत आपला वेळ वाया घालवू लागलो, त्यातून बाहेर येण्याची गरज आहे. कारण आजही परिस्तिथी तेवढी वाईट नाही. मनोरंजन असावं , मनाला आनंद भेटावा, आपल्या विचारांना त्याची गरजही आहे ,पण ते कोणत्या मार्गाने होत आहे याचा विचार करावा. मालिका कोणती पाहावी हेही विचार करावा , कारण फिल्म्स , मालिका आपल्या मनावर खोल परिणाम करत असतात. आपल्या सोबत नकळत आपली लहान मूलही या मालिका पाहात असतात, त्यातून खरंच काही शिकण्यासारखं चांगलं असेल तर नक्की पाहाव्या पण त्यातून फक्त गाळचं भेटणार असेल, तर बंद कराव पाहणं, कारण या असल्या गोष्टींचा प्रभाव लहान मुलांवर लवकर होतो. लक्षात ठेवा .!! आपल्या मुलांना चित्रपटातील गाण्या ऐवजी शुभंकरोती , पसायदान , मनाचे श्लोक म्हणायला शिकवा. त्यांना घडवण्यात आपला वेळ घालवा . ना की मालिका नावाचं व्यसन लागून फुकट वेळ बर्बाद करणं.

शेवटी निर्णय तुमचा आहे .!! मनोरंजन हवं आहे , की एक व्यसन .!!!

✍️ योगेश खजानदार

8 thoughts on “रोज मालिका पाहणं ..!! मनोरंजन की व्यसन ..??”

  1. अगदी बरोबर विचार आहेत. TV आणि mobile मुळे संवाद हरवलाय कुठे तरी.. खूप छान

  2. .. सर्वांचा सहभाग गरजेचा आहेच . यात काहीच दुमत नाही !! पण यामध्ये मालिका पाहण्याची सवय सोडावी एवढाच मुद्दा आहे .. आता समजा पुरुषांना त्याची सवय असेल तर त्यांनी सोडावी .. स्त्रियांना असेल तर त्यांनी सोडावी .. आणि तो वेळ संध्याकाळ सुंदर करण्यात घालवावा ..!! इथे स्त्री आणि पुरूष असा भेदभाव नाही.. आता मुलांना कार्टून्स पाहत बसण्याची सवय असते .. अगदी 2 3 तास बघत बसतात.. तर त्यांच्यात सुधारणा व्हावी .. मुळात ज्यांना ही सवय त्याच्याठी ..

  3. तुम्ही पुरूषांना दोष द्यावेत असं माझं मुळीच म्हणणं नाही. फक्त महिला वर्गात मालिका पाहण्याचं प्रमाण जास्त आहे असं म्हणत त्यांनाच लक्ष्य केलेलं खटकलं, एवढंच…

    सर्वांची संध्याकाळ चांगली व्हावी याबाबत केवळ महिलांकडूनच अपेक्षा करण्यापेक्षा घरातील सर्वांचच त्यात थोड्याफार प्रमाणात का होईना, योगदान असायला हवं. घरातील वातावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी केवळ आपल्यावर न टाकता, घरातील सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील आहेत हे त्यांच्या सर्वांच्याच कृतीतून, स्त्रियांना जाणवू द्यावं…

  4. महिला वर्गात याच प्रमाण जास्त आहे, म्हणून महिलांना टार्गेट केलं अस वाटू शकत .. पण यात मी पुरुष दोषीच नाहीत असंही म्हटलं नाही ..याची लागण सगळ्यांनाच झाली हे खरं …

  5. उत्तम लिहीलंत👍🏻. फक्त एक गोष्ट खटकली.. तुम्ही स्त्रियांना लक्ष्य केलंत मालिकांबद्दल. पुरूष मंडळीही तितक्याच नेटानं बसतातच की टीव्हीसमोर. माध्यम वेगळं असू शकतं, पण मनोरंजनाचं हे व्यसन सगळ्यांनाच लागू झालंय हल्ली… त्यात आबालवृद्ध, सगळेच आले… स्त्रियांना लक्ष्य केलेलं तितकसं पटलं नाही..😕

  6. आपण म्हणत आहात तोही मुद्दा अगदी बरोबर आहे .. आजची जीवनपद्धती खूप बदलली आहे .. नोकरी व्यवसाय करणाऱ्या पुरुषांना घरी वेळ देणं तितकस जमत नाही ..त्यातून बायको housewife असेल तर तिचा बहुतेक वेळ कामाव्यतिरिक्त टीव्ही पाहण्यात जातो ..! जबाबदार दोघेही आहेत .. त्यातून विभक्त कुटुंब पद्धतीमूळे लोकांमधे एकटेपणा वाढत चालला आहे .. आणि त्यामुळे करमणूक म्हणून चालू केलेल्या मालिका व्यसन होऊ लागल्या आहेत .. आणि या मध्ये स्त्रिया जास्त गुंतत आहे त्यामुळे त्यांच्यावर जास्त focus दिला आहे …

  7. योगेशजी, आपण मांडलेला विषय आणि त्यासोबतची मांडणी बरोबर आहे. हा विषय विचार करताना फक्त स्त्रियांचं योगदान न बघता घरातील पुरुष मंडळी सुद्धा सहभागी होत असतील का? हे पण आपण विचारात घेऊ शकतो. घरातील पुरुषांनी सुद्धा घरात अनेक कारणांनी संवाद बंद केल्यामुळे हे चलन वाढलंय का? हे पण विचारात घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. बाकी आपला लेख उत्तम. श्रीराम .

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा