मास्तर || MARATHI SHORT STORIES ||

” रोजच्याच धावपळीत आजूबाजूलाही पाहायला वेळ नसलेल्या आपल्या लोकांना आयुष्य काय असतं हे कधी कळलंच नाही. ‘तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे तुम्ही आवर्जून रोज पहावं!!’ असं म्हणणाऱ्या आमच्या मास्तरांची शिकवणं काही वेगळी असायची. आपण अगदी चाळिशीत गेलो डोक्यावरचे छप्पर उडाले पण डोक्यातले संस्कार मात्र मास्तरांनी अगदी गाय दावनीला बांधावी तसे आयुष्यभर आपल्या मनाला बांधून ठेवावेत इतके ते घट्ट आहेत.
आयुष्यात पुढे गेल्यानंतर अचानक आपले मास्तर आपल्या समोर दिसावे आणि जुन्या गोष्टी पुन्हा आठवाव्या अस काहीस मला झालं. कडक शिस्त , शिकवणं आणि कित्येक गोष्टी यामुळे शाळेतले मास्तर आपल्या नेहमीच लक्षात राहतात. आज अचानक समोर दिसल्यावर हातात एक काठी, भिंगाचा मोठा चष्मा, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या ,पण एक मास्तर म्हणून असलेलं तेज तसचं पहाताना जवळ जावून त्यांच्याशी भेटण्याचा मोह झाल्यावाचून राहत नाही.” समोरच उभ्या मास्तरांना पाहून मंदारच्या मनात कित्येक विचार आले.

“गुरुजी!” मास्तरांच्या जवळ जावून मंदारने हाक मारली.
गुरुजी किंचित मागे वळले. आपल्या भिंगाचा चष्म्यातून पाहत बोलले.
“कोण ??”
मंदार एक क्षण थांबून.
“गुरुजी !! मी मंदार!! मंदार सुभेदार !! तुमचा विद्यार्थी !!” मंदार त्याच्या समोर येत म्हणाला.
“मंदार सुभेदार !! म्हणजे इयत्ता सातवी ते दहावी !! ” इतक्या वर्षा नंतरही मास्तरांनी मंदार किती इयत्ता त्याच्या वर्गात होता हे अगदी अचूक सांगितलं.
“हो !! तोच मी !!” मंदार मास्तरांना म्हणाला.
“किती वर्षांनी भेटलास मंदार !!शाळा संपली आणि महाविद्यालयात गेलास तेव्हा तरी भेटी व्हायच्या !!पण पुढे भेटीही विरळच झाल्या !!” मास्तर मंदारला निरखत म्हणाले.
“मध्यंतरी गावाला येऊन गेलो होतो !! तेव्हा भेटायचं म्हटलं होतं !! पण तुम्ही निवृत्त झाल्याचं कळाल!!” मास्तर आणि मंदार शेजारीच असलेल्या बाकड्यावर बसले.
“अरे !! निवृत्त झाल्यावर गावाकडे मनच लागेना !! म्हणून इकडे आलो!!
“होका !!” मंदार.
“बाकी कुठं असतोस हल्ली ??” मास्तर काठी शेजारी ठेवतं बोलले.
“ठाण्याला कलेक्टर ऑफिसात कामाला आहे !!” मंदार.
“छान!! लग्न केलस की आजही आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा टिकवून आहेस !! ” मास्तर किंचित मंदारकडे पाहून हसत म्हणाले.
“हो झालं ना लग्न !! दोन मुलंही आहेत !!”
“छान !! सुधाकरराव काय म्हणतायत??” मंदारच्या वडलां बद्दल मास्तरांनी विचारले.
“आई आणि बाबा दोघेही माझ्याकडेच असतात ठाण्याला !! ” मंदार मास्तरांच्या काठीकडे पाहत म्हणाला.
“गेल्यावर मी आठवण काढली होती म्हणून सांग नक्की !! “
“नक्की सांगेन !! “

मास्तर कित्येक वेळ मंदारला बोलत राहिले. आपल्या कडक शिस्तीमुळे विद्यार्थी त्यांना चांगलेच भिऊन असायचे. पण शाळेच्या बाहेर कित्येक वर्षांनी भेटल्यावर त्याच्यातील एका वेगळ्याच मास्तरांची ओळख मंदारला झाली. त्यात कित्येक आपुलकी होती.

“आयुष्याच्या खऱ्या वाटेला सुरुवात झाली तेव्हा कित्येक गोष्टी कळल्या. एक मास्तर म्हणून आपलं कर्तव्य करताना गुरुजी तितकेच कणखर भूमिका मांडायचे. पिकलेल्या त्यांच्या केसांकडे पाहून वर्गात असताना त्यांची कित्येक वेळा थट्टा करायचो पण आज आपलेही केस का पांढरे झाले हे कळल्या शिवाय राहिले नाही. वर्गातला तो मंदार आठवला की आज खरंच गम्मत वाटते.” मंदार मनातच कित्येक गोष्टी बोलू लागला.

“हल्ली कुठे असता तुम्ही??” मंदार म्हणाला.
“वृद्धाश्रम आहे इथे जवळ !! तिथेच असतो !! ” मंदारला हे एकूण काय बोलावं तेच कळेना.
मास्तर बोलत राहिले. मंदार ऐकत राहिला.
“मुलगा विलायतेत नोकरी करतो !! वर्षभरापूर्वी सौ गेल्या !! घर खूपच खायला उठलं !! म्हणून मग इकडेच राहायला आलो !! तेवढाच विरंगुळा !! ” मास्तर एकटक शेजारच्या फुलांच्या रोपट्यांकडे पाहत राहिले. कित्येक भाव आपल्या चष्म्या आढ लपवत राहिले.
“बरं चल निघतो मी आता !!एक दिवस निवांत भेटायला येईन ठाण्याला !! तुझा पत्ता तेवढा देऊन ठेवं !! आमच्या घरात आज एक नवीन मित्र येणार आहे ना !! त्यांना भेटायचं आहे !!” मंदारकडे पाहत मास्तर उठू लागले.
“मी सोडू तुम्हाला !!” मंदार शांत म्हणाला.
“नाही नको !! जाईन मी !!” मास्तर मंदारला कित्येक क्षण पाहत राहिले.

ती काही क्षणांची भेट मंदारला खूप काही सांगून गेली. शाळेच्या प्रांगणात एक गुरुजी म्हणून कित्येक विद्यार्थी घडवणारे ते आणि वर्गाच्या बाहेर भेटलेले तेच गुरुजी यात फरक तो किती होता. पण आयुष्याचे नियम मात्र तेच कडक शिस्त , आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी नेहमीच सुंदर.

“मला घडवणाऱ्या माझ्या मास्तरांना मला म्हणावेसे वाटले की तुम्ही माझ्या सोबत चला !! पण कितीही केलं तरी तुम्ही येणार नाहीत हे माहितेय मला..!! शेवटी या मनावर तुम्हीच संस्कार केले आहेत !! ” पाठमोऱ्या जाणाऱ्या मास्तरांकडे पाहून मंदार मनातल्या कित्येक विचारांशी बोलत राहिला.

पुन्हा कित्येक वेळा मंदार मास्तरांना आवर्जून भेटायला गेला. ठाण्याला गेल्यावर मास्तर मंदारकडे आवर्जून मुक्काम करू लागले. मंदारचा गच्चीत ठेवलेल्या गुलाबांच्या फुलांकडे आवर्जून पाहून स्वतः ची शिकवण आठवू लागले. “तुम्ही तुमचं आयुष्य इतकं सुंदर जगावं की कुंडीतल्या गुलाबाला आज किती गुलाब आले आहेत हे तुम्ही आवर्जून पहाव!! ” अगदी न चुकता.

*समाप्त*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *