आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मरुन गेले. भाऊबंदांनी त्यांच काय होते नव्हते ते सगळे हिरावून घेतले. मुलांना देशोधडीस लावले. पुढे ती मुले जातां जातां एका नगरांत आली. दोन प्रहराची वेळ झाली आहे. दोघेही दमून गेले आहेत, भुकेने कळवळले आहेत. तोंड सुकुन गेली आहेत, असे ते दोघे त्या नगरांत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्यासाठी घरातून बाहेर आला. त्याने त्या मुलांना पाहिले. आपल्या घरी बोलावून नेले. जेवू घातले. नंतर त्यांची सगळी हकीगत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकिगत त्या ब्राह्मणाला सांगितली. ब्राह्मणाने त्या मुलांना घरी ठेवून घेतले. त्यांना तो वेदाध्यन शिकवू लागला. ती मुलेही वेद शिकू लागली. असे करता करता बरेच दिवस. महिने, वर्ष गेली.